११ जानेवारी २०१३
मथितार्थ : अभाव ‘सामुदायिक जीवना’चा!
चित्रकथी : चित्रवीण!
कव्हर स्टोरी
क्रीडा : कल खेल में हम हो न हो..
प्रासंगिक

सादरीकरणाची कला आपल्या रक्तातच!
विकेट ‘कीपर’

संगीत : आठवणी वाद्यवृंदाच्या!
थोडी सजगता आणि पथ्य
सेकंड इनिंग : भीष्मासारखं वार्धक्य!
आरोग्यम् : पोलिओ पॉलिटिक्स
चटक-मटक : चवदार, चटपटीत
युवा : जग थिरकतंय ‘गंगन्म स्टाइल’वर..
भंकसगिरी : थोरांचे संमेलन झाले त्याची गोष्ट..
विज्ञान तंत्रज्ञान : टेक फेस्ट टेक्नॉलॉजीची आषाढी
कवितेचं पान : पहिली गाजलेली कविता

शब्दरंग : आम्हा घरीं धन

एकपानी : बी अ कॅलेंडर!
सिनेमा : मराठी सिनेमात नव्या वर्षांत नव्या जोडय़ा
लग्नाची वेगळी गोष्ट : जीवनात ही घडी..
लग्नाची वेगळी गोष्ट : बायका त्या बायकाच..
पाठलाग :एकच प्याला..
माझं शेतघर : फार्म हाऊस पाहावे घेऊन..
संख्याशास्त्र : मूलांक म्हणजे काय?
भन्नाट : आकाशाला गवसणी
केल्याने रेषाटन
वाचक प्रतिसाद
भविष्य
संपर्क
मागील अंक

कव्हर स्टोरी

लढू या तिच्यासाठी!
वंदना खरे

response.lokprabha@expressindia.com
आपल्या रोजच्या भाषेत, टीव्ही सीरियल्समध्ये, आपल्या सिनेमा- नाटकांमध्ये, आसपासच्या समाजामध्ये बलात्कार संस्कृतीची पाळमुळं आहेत. कतरिनाने, करिनाने केलेल्या आयटेम साँग्जची आपण वाहवा करतो. मुलांकडून होणारी छेडछाड आपल्याला कधीच निषेधार्ह वाटत नाही. स्त्रीला दुय्यम मानण्यात आपल्याला काहीच चुकीचं वाटत नाही. आपण सगळेजण असे बलात्कार संस्कृतीने वेढलो गेलो आहेत. त्यातून बाहेर पडायचं तर आपल्याला आपलीच पाळंमुळं खणून काढावी लागतील. त्यासाठी आहे आपली तयारी?

पुन्हा एकदा हिंसाचाराने एका स्त्रीचा बळी घेतला - असंख्य शारीरिक आणि मानसिक दुखापतींसहित मृत्यूशी चाललेली तिची झुंज शेवटी अपयशी ठरली..! पण जाताजाता ती सगळ्यांच्या मनात एक चिंगारी पेटवून गेली. एका तरुण मुलीवर राजधानीमध्ये सामूहिक बलात्कार झाला आणि अख्खा देश संतापाने पेटून उठला होता. दिल्लीमधल्या त्या घटनेबद्दल सगळीकडे संतापाचा आगडोंब उसळला होता. या घटनेबद्दल देशभरात जवळजवळ पंधरा दिवस मोच्रे, निदर्शने, चर्चा सुरू होते. तिच्या मृत्यूची बातमी येईपर्यंत तिच्यासाठी प्रार्थना सुरू होत्या; त्या मुलीचा सिंगापूरच्या हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाल्याची बातमी जाहीर झाली आणि या बातमीसोबतच दिल्लीत संचारबंदीही जाहीर झाली. पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांनी शांतता पाळायचे आवाहन केलं. तरीही दिल्लीच्या पोलिसांना हिंसक आंदोलनाची भीती वाटत होती; त्यामुळे दिल्लीतली दहा मेट्रो स्टेशन्स बंद केली गेली, इंडिया गेटकडे जाणारे सगळे रस्ते बंद केले गेले. तरीही काही दिवसांपूर्वी हिंसक झालेले लोक आज अतिशय शांतपणे रस्त्यावर आले आहेत. तिला ‘भारताची लेक’ म्हणून श्रद्धांजली वाहिली जाते आहे. तिच्या मृत्यूनंतर सगळा देश हळहळतो आहे. तिचा मृत्यू व्यर्थ जाऊ देणार नाही अशा शपथा घेतल्या जात आहेत.

रस्त्यावर उतरून मोर्चा काढणे याला बलात्काराच्या विरोधात केलेली ‘कृती’ समजायची घोडचूक आपण नको करायला!

एका महिलेवरच्या हिंसाचाराच्या घटनेनंतर जनमताचा एवढा रेटा तयार होण्याची गेल्या कित्येक वर्षांतली ही पहिलीच घटना असेल! या घटनेच्या निमित्ताने फेसबुक, ट्विटरवर बलात्काराविषयी चर्चा घडल्या, लंगिक छळवणुकीविषयीचा कायदा पुन्हा चच्रेत आला. गेली अनेक वर्षे स्त्रीवादी चळवळीने बलात्काराच्या बाबतीत जे मुद्दे मांडायचा प्रयत्न केला होता ते मुद्दे आज मोठय़ा प्रमाणावर मांडले जाऊ लागले. या संदर्भात कधी नव्हे इतका तरुण पुरुषांचाही सहभाग दिसून आला - खरंतर एक स्त्रीवादी कार्यकर्ती म्हणून मला याबद्दल समाधान वाटायला पाहिजे पण त्याऐवजी मला मात्र अस्वस्थ आणि काहीसे निराशच वाटते आहे..
गेल्या आठवडय़ात सामूहिक बलात्काराच्या दोन घटनांमधल्या दोन्ही पीडित मुलींचा मृत्यू झाला! एक घटना घडली होती पतियालामध्ये आणि दुसरी दिल्लीत. एक मुलगी हॉस्पिटलमध्ये मृत्यूशी झुंज देता देता मरण पावली आणि दुसरीने आत्महत्या करण्याआधी न्यायासाठी पोलिसांशी झुंज दिली. पतियालामध्ये झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणात ज्या मुलीने वारंवार पोलिसांकडे मदत मागितली होती. तिच्या वाटय़ाला पोलिसांकडून सतत अवहेलना येत राहिली. तिच्यावर बलात्कार करणारे खुशाल तिला आणि तिच्या कुटुंबाला धमक्या देत गावभर मोकाट फिरत होते. अखेर ४४ दिवसांच्या अपयशी लढय़ानंतर तिने निराशेपोटी आयुष्य संपवले तेव्हा कुठे कोर्टाला तिच्यावर झालेल्या अन्यायाची दखल घ्यावीशी वाटली. या दोन्ही बातम्या ताज्या असतानाच राजस्थानातल्या गँगरेपची बातमी आली अणि लगेचच उत्तर प्रदेशातही एका मुलीचा बलात्कारानंतर खून केल्याची बातमी दिसायला लागली. गेल्या पंधरा दिवसांपासून वर्तमानपत्रांची पाने महिलांविरुद्धच्या हिंसाचाराच्या घटनांनी दुथडी भरून वाहातायत! अचानक महिलांवरचे लंगिक अत्याचार ‘लेबल’ इश्यू ठरले आहेत. पण गेल्या काही दिवसांत स्त्रियांविरुद्धचे ज्या प्रकारचे हिंसाचार माध्यमांतून झळकले त्यातून मला एक मोठाच धोका दिसायला लागला आहे. दिल्लीतली सामूहिक बलात्काराची घटना असेल, डोंबिवलीत घडलेल्या लंगिक छळाच्या घटना असतील किंवा बांद्रय़ाच्या नाहीतर पुण्याच्या कॉलेजमध्ये मुलींवर झालेले हल्ले असतील. सगळ्या घटनांमधला काही सारखेपणा लक्षात येतोय?

सार्वजनिक ठिकाणी शिक्षण, कामधंदा, करमणूक अशा कारणासाठी किंवा अगदी विनाकारणही जाणे हा पुरुषांइतकाच स्त्रियांचा देखील हक्क आहे हे अजूनही आपल्याला मान्य करावेसे वाटत नाही, ही खरी गोची आहे.

या घटनांमध्ये तीन महत्त्वाचे समान मुद्दे आहेत. एक म्हणजे या सगळ्या घटना घराबाहेर सार्वजनिक ठिकाणी घडलेल्या आहेत, दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हे हल्ले कुटुंबाच्या बाहेरील पुरुषांनी केलेले आहेत आणि या सगळ्या हल्ल्यांमध्ये महिलेला गंभीर शारीरिक दुखापत झालेली आहे. जेव्हा जवळजवळ महिनाभर वारंवार अशाच घटनांचे सनसनीखेज रिपोर्टिंग केले जाते. तेव्हा ‘अत्याचार’ कशाला म्हणावे याबद्दल एक विशिष्ट प्रतिमा सामान्य माणसांच्या मनात तयार होत जाते. मग स्त्रियांच्या बाबतीत होणाऱ्या इतर अनेक प्रकारच्या िहसाचारातले गांभीर्य आपोआपच काढून घेतलं जातं..
अगदी याच पंधरवडय़ात समोर आलेला अल्पवयीन आदिवासी मुलीवर झालेल्या आश्रमशाळेतल्या बलात्काराची घटना आठवून पाहा.. त्या मुलीवर बलात्कार झाला आहे हे संबंधित सरकारी अधिकारी अगदी निर्लज्ज्पणे नाकारीत होता. त्याचे म्हणणे होते की ‘जर मुलीच्या अंगावर जखमा दिसत नाहीत तर त्याला बलात्कार कशाला म्हणायचे?’ या त्याच्या वक्तव्याचा कुणी निषेध केल्याचे ऐकलेय का? ज्या महिलांना दिसण्यासारख्या शारीरिक दुखापती झालेल्या नसतील त्यांच्यावर झालेली हिंसा आपल्याला जाणवतच नाही! पण कदाचित दिल्लीतल्या घटनेबद्दलच्या मोठाल्या बातम्यांमध्ये ही छोटीशी बातमी कुणाच्या लक्षातदेखील आली नसेल. दिल्लीच्या घटनेबद्दल इतका मोठा आवाज होऊ शकला त्याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे ही घटना देशातल्या एका शहरात एका मध्यमवर्गीय मुलीसोबत घडली! नाहीतर खेडय़ापाडय़ातल्या दलित किंवा आदिवासी महिलांवरचे अत्याचार, पोलिसांनी आणि सनिकांनी केलेले बलात्कार, घरकामगार मोलकरणींवर होणारे बलात्कार, इतकंच काय तर घरोघरी विवाहांतर्गत होणारे बलात्कार यांच्याविषयी एवढा जनमताचा रेटा तयार होताना आपण कधी पाहिलाय?
दिल्लीतल्या गँगरेपनंतर चॅनेल्सवरून दाखवली जाणारी निदर्शने, वर्तमानपत्रातून दिसणाऱ्या हेडलाइन्समध्ये होणारे उल्लेख यातून आपण नक्की कशाला ‘बलात्कार’ म्हणतोय, कोणत्या प्रकारच्या बलात्काराला, किती आणि कशासाठी महत्त्व देतोय ते हळूहळू स्पष्ट व्हायला लागलं तसतशी माझी अस्वस्थता वाढतच चालली आहे!
आज सगळेजण एक राष्ट्रीय पातळीवरचं दु:ख व्यक्त करताहेत, नराधमांना ताबडतोब शिक्षा करा, बलात्काराविरोधात जास्त कडक कायदे करा, भर चौकात फाशीची शिक्षा द्या, हातपाय तोडा -असे सरकारला ठणकावून सांगताहेत! जर आपल्याला खरोखरच बलात्कार घडू नयेत असे वाटत असेल तर फक्त कायदा बदलून, शिक्षा जास्त कडक करून उपयोग होईल का? या घटनेला ‘अपवादात्मक’ असं जे लेबल लावलं जातंय तशी ही घटना खरोखर ‘रेअरेस्ट ऑफ द रेअर’ आहे का? सरकारने अमुक केले पाहिजे, पोलिसांनी तमुक केले पाहिजे अशा मागण्या करताना आपण अशा घटनांची कारणे स्वत:पासून दूर कुठेतरी आहेत असं मानतो आहोत का? बलात्काराच्या घटना कडक शिक्षेअभावी घडतात अशी भाबडी समजूत कुरवाळत बसणं आपल्या समाजाला आता परवडण्यासारखं आहे का? बलात्कार करणारा कुणीतरी लिंगपिसाट, विकृत कामांध पुरुष असतो अशी भ्रामक प्रतिमा आपल्या डोक्यातून कधी जाईल? दिल्लीतल्या दुर्दैवी घटनेच्या निमित्ताने किमान बलात्काराविषयीच्या मिथकांना वास्तवाशी पडताळून पाहायचे कष्ट तरी आपण घ्यायलाच हवे आहेत.. पण दुर्दैवाने आज या मिथकांना जास्तच घट्ट करण्याचे काम होते आहे.

अनुराग कश्यप सांगतोय- ‘‘मला फार दु:ख झालं आहे,’’ पण हाच अनुराग कश्यप ‘मैं हूं बलात्कारी’ असे आळवणाऱ्या योयो हनिसिंगचा अल्बम बनवतोय.

गेल्या पंधरा दिवसांत या घटनेच्या निमित्ताने ज्या बातम्या दिल्या गेल्या किंवा चर्चा घडल्या त्यातून अनेकांनी अनोळखी, स्थलांतरित, वखवखलेल्या पुरुषांवर बलात्काराचा ठपका ठेवला. बलात्कार करणाऱ्याचा उल्लेख ‘सैतान’ म्हणून केला गेला, बलात्काराचा उल्लेख पाशवी कृत्य असा झाला.. पण सर्वात आधी बलात्कारी पुरुष हा कुणीतरी अक्राळविक्राळ, विकृत ‘पशू’ असल्याची कल्पनाच आपण काढून टाकायला हवी आहे. जगभरात आणि भारतातही बलात्काराबद्दल जो अभ्यास झाला आहे आणि ज्या नोंदी झाल्या आहेत त्यात असे स्पष्ट झालेले आहे की ९०% पेक्षा जास्त बलात्कार ओळखीच्या माणसाकडूनच होतात. म्हणजेच बलात्कारी पुरुष हा रोजच्या वातावरणात मिसळून गेलेला कोणीतरी मामा, काका, बाप, भाऊ, शेजारी, नवरा, मित्र ज्याच्याकडून अशा हिंसाचाराची अपेक्षा नसते असाच असतो. परिचित माणसाकडून होणाऱ्या बलात्कारामुळे त्या स्त्रीच्या विश्वास ठेवण्याच्या क्षमतेवरच आघात होतो. असंख्य मुलींना, बायकांना त्यांच्या घराच्या आतच लंगिक छळाचा सामना करावा लागतो. बलात्कार करणारा माणूस हा नेहमी दूर कुठेतरी दिल्लीला नाहीतर राजस्थानात नसतो, तर तो तुमच्याआमच्या घरातसुद्धा असतो या वास्तवाकडे पाहायची आपली हिंमत नसते. अत्यंत टोकाच्या हिंसाचारी घटनांमध्येदेखील अत्याचार करणारे पुरुष अगदी सामान्य चणीचे असल्याचे दिसून आले आहे. हा एखादा परग्रहावरून आलेला प्राणी नसतो, उलट तो आपल्याच सांस्कृतिक पर्यावरणाचा भाग आहे हे विसरून चालणारच नाही. किंबहुना बलात्कार करण्याच्या मानसिकतेचा जन्मच मुळी आपल्या भोवतालच्या वातावरणात आहे. आपल्या सगळ्यांच्या रोजच्या वागण्याबोलण्यातच आहे. आपण सगळेजण ‘बलात्कार संस्कृती’ने वेढले गेलो आहोत. बलात्कार घडू नयेत असे प्रामाणिकपणे वाटत असेल तर याच संस्कृतीकडे डोळे उघडून पाहायला लागेल. बलात्काराला बळ देणारी ही संस्कृती आपल्या व्रतवैकल्यांमध्ये आहे, आपल्या कपडय़ालत्त्यांमध्ये आहे, दिवे नसलेल्या आपल्या रस्त्यारस्त्यांवरही आहे. आपल्या रोजच्या वापराच्या भाषेत आहे आणि शिव्यांमध्ये तर नक्कीच आहे, रडक्या टीव्ही सीरिअल्स अल्समध्ये आहे, चकचकीत रिअ‍ॅलिटी शोजमध्ये आहे आणि विनोदांमध्ये आहे, सिनेमा-नाटकांमध्ये आहे, आपण ज्यांचे फॅन बनतो आणि ज्यांना डोक्यावर घेतो त्या नटनटय़ांमध्येही आहे. दिल्लीतल्या दुर्दैवी घटनेनंतर अनेक राजकीय नेत्यांनी स्वत:च्या न बोलण्यामुळे किंवा काहींनी असंवेदनशील बोलण्यामुळे टीका ओढवून घेतली. पण नेत्यांवर टीका करतानाच आपण अभिनेत्यांनी डोळे गाळत केलेली निवेदने मात्र शांतपणाने ऐकत होतो.. उत्साहाने त्यांच्यासोबत काळ्याफिती बांधून सामील होत होतो. दिल्लीतल्या घटनेनंतर प्रत्येक बॉलीवूड सेलेब्रिटी महिलांवरच्या हिंसाचाराविरुद्ध ट्विट करतेय नाहीतर कुठल्या ना कुठल्या टीव्ही चॅनेलवर बलात्कार करणाऱ्यांचा निषेध करताना दिसतेय.. कधी सलमान खान म्हणतोय, अत्याचारी माणसांना फाशी झाली पाहिजे ! कुठे अनुराग कश्यप सांगतोय- ‘‘मला फार दु:ख झालं आहे, मला फार संताप आला आहे’’. पण हाच अनुराग कश्यप ‘मैं हूं बलात्कारी’ असे आळवणाऱ्या योयो हनिसिंगचा अल्बम बनवतोय हे आपल्या लक्षात राहात नाही? ‘बीइंग ह्य़ुमन’ चा टी शर्ट घालून मिरवणाऱ्या नटाने त्याच्या मत्रिणीच्या घरासमोर घातलेला धिंगाणा, बेदरकारपणे गाडय़ा चालवून केलेले अपघात आपण विसरून कसे जातो? एकीकडे बलात्काऱ्यांना फाशी झालीच पाहिजे असे म्हणणारी अभिनेत्री पुढच्याच वाक्यात आयटेम साँग करणे हे तिच्या एम्पॉवरमेंटचे लक्षण आहे असे म्हणते. बाईच्या शरीराला वस्तू म्हणून दाखवणारी जी आयटेम साँग्ज असतात त्यांना आपणच आपली मोबाइल टय़ून बनवतो ना? एकीकडे आपण एका मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या विरोधात हजारोंच्या संख्येने रस्त्यावर उतरून निदर्शने करतो आणि दुसरीकडे भरपूर हिंसाचाराचे समर्थन करणाऱ्या दबंग, सिंघम, रावडी राठोडसारख्या फिल्म्सना आपणच लाखोंच्या संख्येने गर्दी करतो ना? आपली स्वत:ची डबल स्टँडर्डस मान्य करायची आपली हिंमत आहे का? की आपल्या वागणुकीतले हे विरोधाभास आपण अजूनही नजरेआड करतच राहणार?
बलात्काराच्या घटनेला या सगळ्याच्या व्यापक संदर्भात पाहणे गरजेचे आहे. दूर कुठेतरी माझ्या नजरेआड काहीतरी घडत असेल, अशा कल्पनेतून बाहेर येऊन रोज आपल्या आजूबाजूला सुरू असणारी हिंसा डोळे उघडून पाहायलाच लागेल. बलात्कारी पुरुषाला ठेचून काढायची भाषा बोलण्यापेक्षा हे खूप कठीण काम आहे. रस्त्यावर उतरून मोर्चा काढणे याला बलात्काराविरुद्ध केलेली ‘कृती’ समजायची घोडचूक आपण नको करायला! बलात्काराच्या बातम्या देणारे, बलात्काराविषयी बोलणारे, ऐकणारे, पाहणारे, बलात्काराला बळी पडणारे, बलात्कार करणारे, बलात्कारापासून संरक्षण करणारे या सगळ्या प्रकारच्या माणसांना एकत्र धरून ठेवणारे जे आपल्या भोवतालचे वास्तव आहे ते आज बलात्काराला पोषक आहे. म्हणूनच तर महिलांविरुद्धच्या अत्याचाराच्या अशाही अनेक घटना असतात ज्यांच्या हेडलाइन बनत नाहीत. फक्त सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या बलात्काराबद्दल चर्चा केली जाते, अनोळखी माणसाकडून झालेल्या बलात्काराबद्दलच मोठय़ा प्रमाणात आवाज उठवला जातो पण कुटुंबाच्या अंतर्गत होणाऱ्या अत्याचारांना मात्र आपण तितकेसे महत्त्व देत नाही, कारण स्त्रीला तिच्या कुटुंबातल्या पुरुषांची मालमत्ताच समजले जाते. यातूनच कुटुंबाच्या आतमध्ये होणाऱ्या हिंसेकडे ‘नाइलाज’ म्हणून पाहायची प्रवृत्ती वाढीस लागते. त्याचाच परिणाम म्हणून स्त्रियांमधली अन्यायाविरुद्ध लढण्याची ईर्षांदेखील दडपली जाते!
सार्वजनिक ठिकाणच्या हिंसाचाराला इतके महत्त्व देण्यातला आणखी एक मोठा धोका म्हणजे त्यातून एकप्रकारे कुटुंब आणि समाज यांच्यातर्फे महिलांवर जी बंधने घातली जातात त्यांना दुजोरा मिळतो. जेव्हा एखाद्या स्त्रीवर सार्वजनिक ठिकाणी झालेल्या हिंसेबद्दल खूप सगळी चर्चा होते; तेव्हा तिच्यासोबत अनेकजणींच्या स्वातंत्र्याचा बळी दिला जातो. अशा घटनांनंतर सगळ्याच मुलींच्या बाहेर येण्याजाण्यावरची बंधनं हमखास जास्त कडक होतात. घर हीच जणू तिच्यासाठी सुरक्षित जागा आहे या कल्पनेला खतपाणी घातलं जातं. बाईची खरी जागा म्हणजे घर आणि बाहेरचं विश्व मात्र पुरुषांसाठी - अशीच आपली पारंपरिक मानसिकता आहे. बायकांच्या बाहेर जायच्या वेळा, त्यांचे पोषाख, त्यांच्या सोबत कोण असावे याबद्दलच्या सगळ्या संकल्पना याच मानसिकतेतून पुढे येत असतात.
सार्वजनिक ठिकाणी शिक्षण, कामधंदा, करमणूक अशा कारणांसाठी किंवा अगदी विनाकारणही जाणे हा पुरुषांइतकाच स्त्रियांचादेखील हक्क आहे हे अजूनही आपल्याला मान्य करावेसे वाटत नाही, ही खरी गोची आहे. म्हणूनच बलात्काराची जबाबदारी कळत-नकळत आपण तिच्यावरच ढकलत असतो. म्हणून तर बलात्कारानंतरच्या चौकश्यांमध्ये- ‘त्या वेळी ती तिथे काय करीत होती; तिने काय कपडे घातले होते; तिचे चारित्र्य कसे होते’ असे प्रश्न पुन: पुन्हा विचारले जातात! तिने तिखटाची पूड जवळ बाळगावी किंवा स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण घ्यावे असे म्हणतानाही हल्ल्यापासून वाचणे - ही तिची जबाबदारी आहे - हेच आपण सुचवत असतो. लहानपणापासून मुलीला ‘सेफ’ राहायची शिकवण दिली जाते, जन्मभर बायकांना बलात्काराच्या दहशतीखाली जगावे लागते तसे पुरुषांना जगावे लागते का? जगातले ९८% बलात्कार महिलांवरच होतात, म्हणजे शंभरातल्या दोन पुरुषांवर तरी बलात्कार व्हायची शक्यता असते, पण म्हणून सगळे पुरुष जन्मभर त्या दहशतीखाली वावरतात का? नाही! सगळेच पुरुष बलात्कार करीत नसले आणि सर्वच स्त्रियांवर बलात्कार घडत नसले तरी आपल्यावर बलात्कार होऊ शकतो या दडपणामुळे स्त्रियांना भीतीच्या चक्रात अडकून पडावे लागते. आपल्यावर लादलेले र्निबध ‘नैसर्गिक’ वाटतील अशी स्त्रियांची मानसिकता तयार होत जाते. पुरुषांनी काहीही केलं तरी चालतं, ही मानसिकता याच दृष्टिकोनाची दुसरी बाजू असते आणि त्यामुळेच पुरुषांना स्त्रियांपेक्षा जास्त सत्ता प्राप्त होते. मुलाचे सामाजिकीकरण होताना म्हणजेच मुलाचा पुरुष बनत असताना त्याच्या अंगात स्पर्धा बाणवली जाते, त्याच्या बेदरकारपणे वागण्याला - त्याने दुसऱ्या पुरुषांवर कुरघोडी करण्याला मान्यताच नव्हे तर अनेकदा प्रोत्साहनच दिलेले असते. त्याने मुळूमुळू रडलेले, भित्री भागूबाई असलेले आपल्याला अजिबात चालत नाही. हिंसाचार करून ‘यशस्वी’ होणाऱ्या पुरुषांची रोल मॉडेल्स उभी केली जातात. बाहेरच्या जगात त्याने मर्दुमकी गाजवण्यावर भर दिला जातो. या मर्दानगीमध्ये पिळदार शरीर, जोरबठका, मारामाऱ्यांसोबत मुलींची छेडछाडदेखील असते. मुलीची इच्छा नसताना तिच्याशी लगट करण्याला आपण ‘छेडछाड’ असे गोंडस नाव देतो. एकतर पुरुषाला स्त्रीपेक्षा जास्त सत्ता असणे यात आपल्याला काही वावगे वाटत नाही आणि ती सत्ता त्याने कशी वापरावी यावरही काही बंधन नाही. छेडछाड हा त्या मुलीचा लंगिक छळ आहे असे आपण मानतच नाही! मग अशा छळाच्या प्रसंगी मुलीच्या बाजूने उभे राहिले पाहिजे - ही कल्पना मग कुठून उगवणार?

जगातले ९८% बलात्कार महिलांवरच होतात, म्हणजे शंभरातल्या दोन पुरुषांवर तरी बलात्कार व्हायची शक्यता असते, पण म्हणून सगळे पुरुष जन्मभर त्या दहशतीखाली वावरतात का? नाही!

परवा जे तरुण दिल्लीतल्या घटनेच्या विरुद्ध रस्त्यांवर आले होते- त्यांच्यापकी कितीजणांनी अशा लहानसहान भासणाऱ्या हिंसाचाराच्या प्रसंगी मदत केली असेल? किती जण बायकांबद्दलच्या अश्लील विनोदांना हसत नसतील? किती जण जाणीवपूर्वक आई-बहिणीवरून शिव्या देणे टाळत असतील? किती जण आवडीने दबंग किंवा रावडी राठोड पाहात नसतील? वर्तमानपत्रातून रोजच्या रोज छापली जाणारी अर्धनग्न चित्र कोण चवीने पाहात नाही? जाहिरातींमधल्या, सिनेमा-नाटकातल्या बायकांच्या आणि पुरुषांच्या ठोकळेबाज प्रतिमांना आपण किती जण विरोध करतो? घरकाम ही एकटय़ा बाईचीच जबाबदारी नाहीए असे आपल्यापकी किती जण मानतात? स्त्रियांवर पुरुषांची सत्ता प्रस्थापित करणाऱ्या अशा अनेक घटना आपल्याला अजिबात खटकत नाहीत! मग फक्त बलात्कारासारख्या घटनेच्या वेळी इतके चवताळून उठणे तरी कितपत खरे मानायचे? समजा दिल्लीतल्या त्या घटनेत जर त्या मुलीवर बलात्काराऐवजी नुसतीच इतर काही शारीरिक हिंसा झाली असती तर इतका जनक्षोभ दिसला असता ?
मुळात आपण ‘बलात्कार’ या घटनेला इतकं महत्त्व देतो याचेही कारण पुन्हा एकदा आपल्या पुरुषप्रधान विचारसरणीतच सापडते. बलात्कार म्हणजे एका शारीरिक हिंसाचारामध्ये स्त्रीच्या जननेंद्रियाला झालेली दुखापत अशा स्वरूपात आपण त्या घटनेकडे पाहूच शकत नाही. म्हणून तर बलात्कारित महिलेसाठी ‘जिंदा लाश’ सारखे शब्दप्रयोग वापरले जातात. स्त्रीची लंगिकता, तिची जननक्षमता आणि पर्यायाने तिची जननेंद्रियेसुद्धा तिच्या नवऱ्याची, प्रियकराची, कुटुंबाची आणि कम्युनिटीची मालमत्ता आहे असे आपण मानतो. जेव्हा बाईवर बलात्कार होतो तेव्हा तिचा पती किंवा बाप, भाऊ हेसुद्धा स्वत:ला एकप्रकारे पीडित मानतात; कारण त्यांच्या मालमत्तेला धक्का लागलेला असतो! इतिहासात असंख्य वेळा एकमेकांच्या या मालमत्तेची लूट करण्यासाठी बलात्कार केले गेले आहेत. या मालमत्तेची किंमत स्त्रीने तिच्या प्राणांपेक्षा जास्त समजली पाहिजे अशी अपेक्षाच नाही तर जबरदस्तीच असते. कारण तिची ‘इज्जत’ तिच्या कुटुंबाच्या प्रतिष्ठेचा भाग आहे. बलात्कार झालेल्या स्त्रीला अपमानाला सामोरे जावे लागते. राजपूत स्त्रियांनी ‘जोहार’ करण्याचे गौरवीकरण केले जाते; ते याचसाठी! बलात्कार झाल्यावर तिला जगणेच नाकारणारी ही मनोवृत्ती अख्ख्या पुरुषप्रधान विचारसरणीचाच भाग आहे, म्हणून आपल्यापकी प्रत्येकाच्या आतमध्ये मूळ धरून असलेल्या या प्रवृत्तीला आपल्याला आता आव्हान द्यावे लागेल. स्त्रीला दुय्यम समजणाऱ्या आपल्या धार्मिक परंपरांनाही खरवडून काढावे लागेल. माध्यमांमधून येणाऱ्या संदेशांना तपासावे लागेल. स्त्रियांना घरात, कामाच्या ठिकाणी, सार्वजनिक जागी- जिथे जिथे दुय्यम वागणूक मिळते तिथे पुरुषांना जागरूकपणे स्वत:मध्ये बदल घडवावे लागेल. त्यासाठी त्यांना स्वत:च्या अनेक प्रकारच्या सत्तेवर पाणी सोडावे लागेल. स्वत:ला माणूस बनवावे लागेल. आपल्यासोबतच्या स्त्रियांना समान पातळीवरचे समान हक्क असलेले पार्टनर्स म्हणून वागवावे लागेल. फक्त बलात्कारच नव्हे तर कुठल्याच प्रकारची हिंसा आपल्या आसपास घडत असेल तर त्याचा विरोध करावा लागेल. मग बलात्कार करणाऱ्यांना फाशीची आणि हातपाय तोडण्याची शिक्षा मागतानाही आपल्याला विचार करावा लागेल! पण हा बदल करायला जे सातत्यपूर्ण प्रयत्न करावे लागतील ते करायची आपली तयारी आहे का? जोपर्यंत समाजातली सत्तेची ही समीकरणं बदलत नाहीत, तोपर्यंत अनेक जणी दहशतीखालीच जगत राहतील आणि असंख्य बलात्कार घडतच राहतील. क्वचित कधीतरी रस्त्यावर येऊन एखाद्या घटनेविरुद्ध संताप व्यक्त करणं सोपं आहे; बलात्काराविरुद्ध लढलेल्या मुलीचा ‘शूर मुलगी’ म्हणून तिचा गौरवणंही सोपं आहे, पण अशा घटना घडूच नयेत यासाठी सामाजिक वातावरण तयार करणं कठीण आहे. कदाचित खूप वेळखाऊ आणि संयमाची परीक्षा पाहणारंही आहे, पण तोच खरा टिकून राहणारा प्रभावी उपाय आहे!