११ जानेवारी २०१३
मथितार्थ : कायदा करताय.. जरा सांभाळून !
भविष्य विशेष : भविष्याचे भूतकाळातले कुतूहल
भविष्य २०१३ : जन्मतारीख सांगतेय तुमचं भविष्य
भविष्य विशेष : वाटा भविष्याच्या

भविष्य विशेष : २०१३ मध्ये काय घडणार?

भविष्य विशेष : तळपायावरून भविष्य
भविष्य विशेष : टॅरो कार्ड आणि भविष्य
फ्लॅशबॅक : भविष्य नावाचा बंद लिफाफा
भविष्य विशेष :वास्तुशास्त्र म्हणजे काय?
नक्षत्रांचे नाते : हस्त - २
कोकणचो डॉक्टर : सुक्या गजाली..
सिनेमा आशिया : नीती चकवा!
गूज हुंदक्यांचे : भविष्यातले हुंदके टाळण्यासाठी..
साधनचिकित्सा : जागृत वामकुक्षी

लग्नाची वेगळी गोष्ट : मंगळ

जंगलवाचन : बिबळ्याने गुंगारा दिला, पण..
दबंगवाणी
केल्याने रेषाटन
वाचक प्रतिसाद
भविष्य
संपर्क
मागील अंक

चित्रकथी

चित्रवीण!
विनायक परब

response.lokprabha@expressindia.com
शिक्षणासाठी कोकणातील एका लहानशा गावातून एक मुलगा घराबाहेर पडतो, पुढे जागतिक कीर्तीचा चित्रकार बनतो आणि आपल्याला त्याच्याबद्दल काहीच माहीत नसते!

प्रभाकर नाईक- साटम हे नाव खरे तर आज महाराष्ट्रात घराघरांत माहीत असायला हवे होते. पण हे नाव आज महाराष्ट्रात अनेकांनी ऐकलेलेही नाही. पण अगदी या उलट तुम्ही जपानमध्ये गेलात तर हेच नाव अतिशय आदराने घेतले जाते. जपानमध्ये राहून काम करणारे आंतरराष्ट्रीय कलावंत म्हणून त्यांना मान आहे. जपानमधील होक्कायडो म्युझियम्ससारखी मोठी म्युझियम्स असोत किंवा मग मोठाली शैक्षणिक संकुले या पैकी प्रत्येकाच्या दर्शनी भागामध्ये नाईक- साटम यांनी साकारलेली भलीमोठ्ठी टॅपेस्ट्री कलाकृती ही दिमाखामध्ये मिरवत असते. नाईक- साटम यांनी साकारलेली टॅपेस्ट्री म्युझियमच्या दर्शनी भागात असणे हा स्वत:चा गौरव असल्याचे जपानी मंडळी मानतात. कलावंत अस्सल मराठमोळा कोकणच्या लाल मातीचे आणि निसर्गाचे संस्कार घेऊन वाढलेला.. पण आपल्याला त्याचे कार्यकर्तृत्वच माहीत नाही, अशी अवस्था!
प्रभाकर नाईक- साटमांचे कर्तृत्व समजून घ्यायचे तर आधी त्यांची वाटचाल समजून घ्यायला हवी. कोकणातील बांदिवडे गावात नाईक- साटम या मानकऱ्यांच्या घरात जन्म झाला, वडील शिक्षकी पेशात. कोकणात जन्मलेल्या प्रत्येकावर एक महत्त्वाचा संस्कार होतो तो निसर्गाचा. शिवाय घरातील संस्कारही उत्तम. शाळेत असताना त्यांना पहिल्यांदा चांगल्या चित्रकलेची जाणीव झाली ती शाळेत काढलेल्या कोयत्याच्या स्मरणचित्राचे तोंडभरून कौतुक आठले सरांनी केल्यानंतर. त्यानंतर जगताप सर भेटले ज्यांनी त्यांच्यातील चित्रकाराला प्रोत्साहन दिले. एसएससी झाल्यानंतर शाळेत नोकरी करून मुलगा संसाराला हातभार लावेल, अशी घरच्यांची अपेक्षा होती. कारण एका शिक्षकाच्या पगारात सारे उत्तम चालेल असा तो काळ नव्हता. शिक्षकाच्या नोकरीसाठीची तजवीजही झाली. त्याच वेळेस मनात होते ते चित्रकार व्हायचे. अर्थात त्यासाठी काय करायचे, याची कल्पना नव्हती. त्याच्याच वयाच्या असलेल्या बाबासोबत चर्चा झाली. मग जेजे स्कूल ऑफ आर्टचे नाव कळले. खरे तर दोघेही आधी शिक्षकी नोकरी करून नंतर जेजेला जाणार होते. पण बाबा असाच मुंबईला निघून गेला. त्यावेळेस त्यांच्यासाठी मात्र तो धक्का होता. वडिलांकडे इच्छा बोलून दाखवली खरी, पण त्यांना आपल्याला मुंबईला पाठवणे परवडणारे नाही याची जाणीवही होती. ..पण वडील तयार झाले. मुंबईला असलेल्या बहिणीने त्याच्या जेवणाची जबाबदारी घेतली होती.
वडिलांचे विद्यार्थी असलेल्या परबकाकांनी मुंबईला पोहोचल्यावर मदत केली.. पण पहिल्या वर्षांला जेजेचा प्रवेश हुकला. हा मोठा धक्का होता. गणपतीपाठच्या भिंती रंगवायला आणि छत्रीवर नाव लिहायला मुंबईला जाऊन चित्रकला शिकण्याची गरज काय, असे प्रश्न अनेकांनी कुत्सितपणे गावाहून निघताना विचारले होते ते त्यांना आठवले. ..पण चित्रकला मनात ठसलेली होती. दंडवतीमठांच्या नूतन मंदिरामध्ये मग ओळखीने चित्रकला सुरू झाली. हाती पैसे नव्हते. त्यावेळेस त्यांनी मुंबईत खेरवाडीला असलेल्या लेदर वर्किंग स्कूलची स्कॉलरशिप मिळवली आणि तिथे काम केले. त्या काळी केवळ चर्मकार समाजातील मुले इथे शिक्षण घेत. त्यावर समाजाने त्यांच्यावर टीका केली. क्षत्रिय समाजातला मुलगा चर्मकार झाला म्हणून घरी आल्यानंतर आत न घेता बाहेरच्या खुर्चीवरच त्यांना बसवणे नातेवाईकांनी पसंत केले. पण पैशांसाठी कुणासमोरही हात पसरायचे नाहीत, मेहनतीने पैसे कमवायचे या जिद्दीमुळे त्यांनी सारे काही सहन केले.
सकाळी ७ ते ९ गिरगावात दंडवतीमठ सरांकडे तिथून वांद्रय़ाला जायचे आणि ११ ते सायंकाळी साडेचार काम करायचे, असा त्यांचा दिनक्रम होता. अखेरीस वर्षभरानंतर जेजेमध्ये प्रवेश मिळाला. त्यानंतरची वाढ महाराष्ट्रातील दोन मोठय़ा कलावंतांच्या सोबत झाली. जगन्नाथ अहिवासी आणि शंकर पळशीकर हे दोन्ही त्यांचे शिक्षक होते. भारतीय परंपरेतील चित्रकलेसाठी अहिवासी सर प्रसिद्ध होते. पैशांची असलेली अडचण लक्षात घेऊन अहिवासी सरांकडे नाईक- साटम यांना पाठवण्यात आले. शिवाय त्यांना भारतीय शैली आवडत होती तो भाग वेगळाच. पण पळशीकर सरांनी या विद्यार्थ्यांला पाहिल्यानंतर त्यांना वाटले की, याने पारंपरिकतेमध्ये न अडकता आधुनिकतेचा ध्यास घ्यायला हवा. मग त्यांनी त्यांच्या पद्धतीने प्रयत्न करून अहिवासी सरांच्या वर्गातून त्यांना काढले आणि स्वत:कडे घेतले. पैशांच्या अडचणीमुळे अहिवासींकडे या मुलाला देण्यात आले होते हे कळल्यानंतर पळशीकर सरांचा अहिवासांबद्दलचा आदर अधिक वाढला. नाईक- साटम हे नंतर पळशीकर सरांचे आवडते विद्यार्थी ठरले. असे म्हटले जाते की, चांगले काम, चांगले उद्दिष्ट निश्चित केले आणि आपणही त्यावर ठाम राहिलो की, मग चांगली माणसे पुढे येतात, मदत करतात. याचा प्रत्यय नाईक- साटम यांनाही आला. अहमदाबादची कॅलिको मिल्स ही वस्त्रप्रावरणांच्या क्षेत्रातील त्यावेळची गाजलेली कंपनी. नाईक- साटम यांना त्यांच्या कर्तृत्वाच्या बळावर तिथे कलावंत म्हणून नोकरी मिळाली. साडय़ा आणि कपडय़ांवरील डिझाइन्स असे त्यांचे काम होते. कर्तृत्व सिद्ध केल्यानंतर लंडन येथे रॉयल कॉलेज ऑफ आर्ट्समध्ये प्रगत प्रशिक्षणासाठी जाण्याची संधी मिळाली. नंतर दिल्ली क्लॉथ मिलमध्ये त्यांनी नोकरी केली. पण या दोन्ही नोकऱ्यांमध्ये त्यांना लक्षात आले की, आपल्याला पूर्णवेळ कलावंत व्हायचे आहे आणि ते स्वप्न मागे पडते आहे. मग त्यांनी थेट तत्कालीन झेकोस्लाव्हाकिया गाठले आणि तिथे टॅपेस्ट्रीचे प्रशिक्षण घेतले.
टॅपेस्ट्री हा कलाप्रकार आपल्याकडे लोकांना फारसा माहीत नाही. मात्र युरोपात मान्यता पावलेला असा हा प्रकार आहे. हे एक प्रकारचे वीणकामच असते. पण त्यातून चित्र साकारायचे तेही ललित कलेच्या निकषांमध्ये बसणारे, हे खरे तर आव्हानच आहे. शिवाय महत्त्वाचे म्हणजे टॅपेस्ट्रीची कलाकृती साकारण्यास सहा महिने ते कधी कधी एक वर्ष एवढा मोठा कालावधीही लागतो. प्रथम चांगले चित्र साकारायचे. मग त्यासाठी लागणारे धागे मिळवायचे. त्यानंतर त्याला आपल्या चित्राला साजेसे रंग त्या धाग्यांना द्यायचे. मग ते धागे एका विशिष्ट रचनेमध्ये उभे- आडवे लावायचे आणि मग प्रत्येक धाग्याला विशिष्ट प्रकारे गाठ मारत चित्र साकारायचे. हे कसबी आणि केवळ संयम असलेल्या कलाकाराचेच काम आहे. कारण अनेकदा एक बाय एक सें.मी.मध्ये तब्बल ११० धाग्यांच्या गाठी असतात. यावरून त्याच्या गुंतागुंतीची कल्पना यावी. असे करत मोठे चित्र साकारणे ही तर संयमाची परीक्षाच आहे. अशी परीक्षा नाईक- साटम यांनी वारंवार दिली असून आज केवळ जपानमधीलच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरील उत्तम टॅपेस्ट्री कलावंत म्हणून त्यांना मान आहे. जपानच्या म्युझियम्समधील काही टॅपेस्ट्रीज् तर तब्बल ३५ फुटांच्या आहेत. यावरून त्यांच्या कामाची कल्पना यावी.

चांगले काम, उद्दिष्ट निश्चित केले आणि त्यावर ठाम राहिलो की, मग चांगली माणसे मदत करतात, याचा प्रत्यय नाईक- साटम यांनाही आला.

नाईक- साटम यांचे लग्नही त्यांच्या सहकलाकार असलेल्या जपानी युवतीशी झाले असून ते सुमारे नऊ महिने जपानमध्ये तर तीन महिने भारतात असतात. कोकणच्या मातीची ओढ त्यांच्या मनात आजही तीव्र आहे. सध्या ते भारतात आहेत. त्यांच्याशी मारलेल्या गप्पांमधून आयुष्याचे तत्त्वज्ञान सहज हाताला गवसते. गप्पा मारता मारता ते जपान आणि भारत यांच्यातील भेद नेमके सांगून जातात, पोटासाठी नोकरी करणे ही सामान्य भारतीयांची गरज आहे. ती भागवण्यासाठी ते काम करतात. आयुष्यातील ध्येयवादाची भावना मग हळूहळू नष्ट होते आणि ते फक्त नागरिक उरतात. किंवा जपानी माणसाबद्दल ते म्हणतात.. जपानी माणसाच्या शब्द आणि कृतीमध्ये कधीच फरक नसतो किंवा चूक नसते. म्हणून ते आज यशस्वी आहेत.
जपानमधील त्यांचे घर हे गावकऱ्यांचे टॅपेस्ट्री शिकण्याचे सेंटर आहे आणि गावातील महत्त्वाचे पर्यटन स्थळ. उत्तम टॅपेस्ट्रीचे काम पाहण्यासाठी जपानमधून सर्वजण या ठिकाणी येतात. त्यात अनेक विदेशी नागरिकांचाही समावेश असतो. कोकणच्या लालमातीतील एक कलावंत एवढा मोठा झाला आहे.. पण आपल्याला त्याचा मागमूसही नाही!
हे सारे दुर्दैवी आहे. खरे तर बंगाल आणि महाराष्ट्र ही कलावंतांची कदर करणारी राज्ये म्हणून ओळखली जातात. पण सध्या आपल्याकडे सांस्कृतिक घसरणीचा कालखंड सुरू असून आपली सांस्कृतिकता ही केवळ लावणी आणि तमाशामध्ये अडकली आहे. दृश्यकलांचा तर आपल्याला पुरता विसरच पडला आहे. असेच एक दिग्गज कलावंत महाराष्ट्रात होऊन गेले त्यांचे नाव सदानंद बाकरे. हुसेन, रझा, आरा, बाकरे, गाडे असा हा भारतात नवता घेऊन आलेला कलावंतांचा चमू होता. त्यातीलच हे बाकरे. जर्मनीतील सर्वोच्च पुरस्कारही त्यांना मिळाला. त्यांनी दीर्घकाळ जर्मनीमध्ये काम केले. अखेरीस कोकणच्या ओढीने इथे परतले तेव्हा जर्मन सरकारने त्यांना गळ घातली आमच्या विद्यार्थ्यांना कोकणात पाठवतो, त्यांना आधुनिक शिल्पकला शिकवा. त्यांना पेन्शन अर्थात निवृत्तिवेतन सुरू केले ते जर्मन सरकारने, महाराष्ट्राने नव्हे! त्यांना कोणताही शासकीय सन्मान मिळाला नाही. त्याने त्यांचे काहीच बिघडले नाही. बिघडले आहे ते सरकारचे. कारण बाकरे असोत किंवा मग प्रभाकर नाईक- साटम अशा दिग्गज कलावंतांना मिळालेला पुरस्कार त्यांचा नव्हे तर शासनाचा गौरव असतो. कारण तेव्हा शासन गौरवाने सांगत असते की, हा आंतरराष्ट्रीय कलावंत हा आमचा महाराष्ट्रीय- मराठी माणूस आहे! बाकरे सर तर गेले पण नाईक- साटम आहेत. अद्याप संधी गेलेली नाही!