११ जानेवारी २०१३
मथितार्थ : अभाव ‘सामुदायिक जीवना’चा!
चित्रकथी : चित्रवीण!
कव्हर स्टोरी
क्रीडा : कल खेल में हम हो न हो..
प्रासंगिक

सादरीकरणाची कला आपल्या रक्तातच!
विकेट ‘कीपर’

संगीत : आठवणी वाद्यवृंदाच्या!
थोडी सजगता आणि पथ्य
सेकंड इनिंग : भीष्मासारखं वार्धक्य!
आरोग्यम् : पोलिओ पॉलिटिक्स
चटक-मटक : चवदार, चटपटीत
युवा : जग थिरकतंय ‘गंगन्म स्टाइल’वर..
भंकसगिरी : थोरांचे संमेलन झाले त्याची गोष्ट..
विज्ञान तंत्रज्ञान : टेक फेस्ट टेक्नॉलॉजीची आषाढी
कवितेचं पान : पहिली गाजलेली कविता

शब्दरंग : आम्हा घरीं धन

एकपानी : बी अ कॅलेंडर!
सिनेमा : मराठी सिनेमात नव्या वर्षांत नव्या जोडय़ा
लग्नाची वेगळी गोष्ट : जीवनात ही घडी..
लग्नाची वेगळी गोष्ट : बायका त्या बायकाच..
पाठलाग :एकच प्याला..
माझं शेतघर : फार्म हाऊस पाहावे घेऊन..
संख्याशास्त्र : मूलांक म्हणजे काय?
भन्नाट : आकाशाला गवसणी
केल्याने रेषाटन
वाचक प्रतिसाद
भविष्य
संपर्क
मागील अंक

भंकसगिरी

थोरांचे संमेलन झाले त्याची गोष्ट..
विसोबा खेचर
response.lokprabha@expressindia.com
संमेलन होऊन गेल्यावर त्याची बातमी सगळेचजण देतात. पण विसोबा खेचर यांनी संमेलन व्हायच्या आधीच त्याचा साद्यंत स्पेशल रिपोर्ट ‘लोकप्रभा’च्या वाचकांसाठी पाठवला आहे.

अजून हे फारसे कोठे आलेले नाही. कोणास अद्याप समजलेले नाही. अगदी वृत्तवाहिन्यांनाही याचा गंध (पक्षी : वास) लागलेला नाही. त्यामुळे ब्रेकिंग न्यूज अजून झळकलेल्या नाहीत. पण तुम्हांस म्हणून सांगतो, काल चिपलून मुक्कामी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे सूप साग्रसंगीत वाजले!
संमेलनातील सर्व कार्यक्रम उत्तम झाले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रतिनिधींची राहण्याची व भोजनाची सोय (अडीच हजार रुपयांच्या मानाने) उत्तम होती. संमेलन संपल्यानंतर सगळे साहित्यसूर्य आयोजकांना व प्रायोजकांना धन्यवाद देत तृप्त मनाने व भरल्या हाताने परतले. (आयोजकांनी ज्येष्ठ ज्येष्ठ साहित्यिकांना दोन-दोन किलो हातसडीचे तांदूळ, कोकम, काजू, बोंबिल असे काही साहित्यही दिले होते म्हणतात. आम्हांस मात्र तो वानवळा पावला नाही. प्रकाशभाऊ देशपांडे (पक्षी : कार्याध्यक्ष, लोटिस्मा) प्लीज नोट! आमचा पोस्टल पत्ता तुमच्याकडे आहेच! कृपया, कुरिअर करावे!)
एकंदर परशुरामाच्या या पावन पवित्र भूमीत संमेलनाचा हा मंगल सोहळा आनंदोत्साहात सुफल-संपन्न झाला. विशेष म्हणजे संमेलन परशुराम भूमीत असूनही त्यावर वादाचे परशू पडले नाहीत. हां, एकदाच, अगदी एकदाच वादाचा प्रसंग ओढवला होता! तोही आमच्या प्रिय कोमसापवाल्यांमुळे. कोमसापच्या काही भाईंचे म्हणणे असे, की कांय पन झाला तरी अखेर हे संमेलन अखिल भारतीय आहे. साहित्य महामंडळ ही सर्वाची मातृसंस्थाच आहे. तेव्हा या संमेलनात आम्ही सगळे स्वयंसेवक म्हणून पडेल ती कामे करू! आम्हांला काहीही मानपान नको! तर महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे असे, की तें काही चालणार नाहीं! कोमसापवाल्यांनी व्यासपीठावर मानाने बसून शाल-श्रीफल घेतलेंच पाहिजें! तुंबळ वाद झाला यावरून. अखेर उषाताई (पक्षी : उषा तांबे, अध्यक्षा, अ. भा. मराठी साहित्य महामंडळ.) कोमसापवाल्यांस, संस्था संलग्न करून टाकीन, असा ऋजू दम दिला. मग मराठवाडय़ाचे साहित्यसिंह कौतिकराव ठाले-पाटील यांनीही आवाज दिला. त्याबरोबर एका क्षणात तो वाद संपला. (आणि दुसरा सुरू झाला!)
तर अभाम साहित्य संमेलनाच्याच नव्हे, तर विश्व साहित्य संमेलनाच्या, एवढेच नव्हे, तर जागतिक वाङ्मयाच्या पुठ्ठाबाऊंड इतिहासग्रंथांत सुवर्णाक्षरांनी नोंद करावी, अशा प्रकारे हे संमेलन पार पडले! पण आम्हांस हे पक्के ठाऊक आहे, की आमची नतद्रष्ट माध्यमे याची नीट दखल घेणार नाहीत. परंतु आमच्यासारख्या साहित्यसेवकाला, साहित्य कार्यकर्त्यांला आपल्या विहित कर्तव्यापासून दूर जाता येणार नाही. (उषाताई, वाचताय ना? नाही म्हणजे, पुढच्या विश्व साहित्याच्या वेळी सेवककोटय़ात आमचेही नाव असू द्या, म्हणजे झाले!) तेव्हा आम्हीच येथे या संमेलनाचा समग्र वृत्तान्त सादर करीत आहोत-
रत्नागिरी जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर म्हणजे चिपलून. हे शहर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सतरावर वसले असून, ते फार प्राचीन आहे. येथून जवळच लोटे परशुराम हे शहर आहे. तेथे मोठी औद्योगिक वसाहत असून, चिपलून परिसरात अनेक रसायनांचे व औषधांचे कारखाने आहेत. अशा निसर्गरम्य शहरात लोकमान्य टिळक स्मारक वाचनालय असल्यामुळे तेथे नुकतेच अभाम साहित्य संमेलन आयोजित करण्यात आले होते.
कोकणात मोठय़ा प्रमाणावर गणपती उत्सव साजरा केला जातो. ज्याप्रमाणे सार्वजनिक गणेशोत्सवाचा मंडप घालण्याआधी प्रथम कारखान्यात जाऊन गणपतीच्या मूर्तीची ऑर्डर दिली जाते, त्याचप्रमाणे साहित्य संमेलन भरविण्यापूर्वी त्याच्या अध्यक्षाची निवड केली जाते. (खुलासा : संमेलनाध्यक्ष आणि उत्सवातली गणेशमूर्ती यांत काहीही साम्य नसून, कुणास तसे काही आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. शिवाय संमेलनाध्यक्ष दीड नव्हे, तर अडीच दिवसांचे उत्सवमूर्ती असतात, हा फरक आहेच!) तर महामंडळाच्या परमपवित्र व परमसनातन घटनेनुसार या संमेलनाच्या आधीही अध्यक्षांची सार्वत्रिक निवडणूक झाली. त्यात ज्येष्ठ साहित्यिक, समीक्षक नागनाथ कोत्तापल्ले विजयी झाले. त्यांनी आपले निकटतम प्रतिस्पर्धी व ज्येष्ठ साहित्यिक व समाजउद्धारक ह. मो. मराठे यांचा पराभव केला. (सांगणारे असे सांगतात की, हमो हे पत्रकार असूनही त्यांना एक पोलिटिकली करेक्ट पत्र लिहिता येत नाही, हे पाहूनच मतदार बंधू-भगिनींनी त्यांना धूळ चारली.) सांगणारे असेही सांगतात की, आता या अनुभवावर ते ‘ब्राह्मण (लेखकांना) आणखी किती झोडपणार?’ अशी पुस्तिका लिहिणार आहेत. लिहा, लिहा. आणि त्याला प्रस्तावना आनंद यादवांची घ्या!) संमेलनाध्यक्षपदाची निवडणूक अशी अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. महाराष्ट्रातील काही राजकीय नेत्यांनीही या निवडणुकीकडे पाहून त्यांच्या-त्यांच्या तोंडात बोटे घातली होती, असे म्हणतात.
संमेलनाच्या अध्यक्षपदाची निवडणूक झाल्यानंतर मग लगेचच स्वागताध्यक्षपदाची निवड होते. म्हणजे स्वागताध्यक्ष स्वत:च स्वत:स निवडतो! तेणेप्रकारे चिपळून संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदाची माळ रायगडरुस्तुम मा. ना. सुनील तटकरे यांनी आपल्या गळ्यात घालून घेतली. लोटिस्माने केलेला तटकरेंचा हा सन्मान म्हणजे अंतिमत: महाराष्ट्राचे नेणते राजे अजितदादा पवार यांचाच सन्मान नाही का? त्या सन्मानाने कोकणचे दिल कसे भरून आले! रत्नांग्री राष्ट्रवादीचे भास्करराव जाधव हे तर त्या बातमीने हमसून हमसून हसत होते! आणि का नाही हसणार? संमेलनाचा पारिजात आपुल्या दारी आणि त्याची फुले पडती रायगडात शेजारी हे दृश्य काही कमी विनोदी नाही! तर अस्सा तो सगळा विनोद झाला!

महामंडळाने मराठी साहित्यासाठी केलेल्या सेवेचे वर्णन ऐकून तर सगळ्यांच्या अंगावर रोमांच उभे राहिले! त्यामुळे कधी नव्हे ते महामंडळ अध्यक्षांच्या भाषणास वन्समोअर मिळाला!

असे सगळे विनोदी विनोद होता होता तो दिवस उजाडला. भल्या सकाळी शहरातून ग्रंथिदडी काढण्यात आली. तर त्या वेळी सगळ्या शहरात असा लखलखाट झाला होता. ते पाहून कोणी म्हणाले, की आज सूर्याच्या बत्तीचा मेंटल जरा जास्तच पेटलाय! कोणी म्हणाले, बाजूच्या दाभोळ कंपनीने आज स्पेशल वीज पुरवलीय! पण ते तसे नव्हते. तो िदडीत सहभागी झालेल्या साहित्यसूर्य, प्रतिभामरतड अन् काव्यभास्कर यांचा उजेड होता! (यास अतिशयोक्ती असे म्हणतात. मराठी साहित्य व साहित्यिकांच्या बाबतीत ती चालते! उदाहरणासाठी पाहा : साहित्यिकांचे गौरवग्रंथ!) सांगायचा मुद्दा असा, की कधी नव्हे ते असंख्य थोर थोर लेखक-कवी या िदडीत सहभागी झाले होते. स्वत: नियोजित संमेलनाध्यक्ष नागनाथ कोत्तापल्ले हे तर होतेच. त्यांचा हात धरून आजी अध्यक्ष प्रा. व. आ. डहाके चालले होते. त्यांच्या दुसऱ्या हातात संमेलनाची सूत्रे होती. (पण ती कोणालाच दिसत नव्हती! कशी दिसणार? दुसऱ्या लेखकाच्या मानधनाचा खरा आकडा, आवृत्तीची संख्या या साहित्यिक गूढ गोष्टींप्रमाणेच ही सूत्रे असतात!) अध्यक्षांच्या बरोबर मागे अशोक बागवे कविता गुणगुणत चालले होते. त्यांच्या एका बाजूस हमोजी शिगोंशी हास्यविनोद करीत होते. त्यामागे एका साहित्यिक शिस्तीत लेखक-कवी चालले होते. (त्यातली एक मोठीच्या मोठी रांग तर निव्वळ मराठीतील बेस्ट सेलरांची होती! मराठीतले राजहंसच ते! आज त्यांची नावे फारशी कोणाला माहीत नाहीत. पण त्यांना अनुवादक असे म्हणतात म्हणे!) कोकणातील अनेक साहित्यिकही एकमेकांचे हात व पाय यांवर लक्ष ठेवत या िदडीसोबत चालले होते! असंख्य पुस्तके नावावर असलेले लेखक, एकाच पुस्तकाने गाजलेले लेखक, वृत्तपत्रांतील स्तंभांची पुस्तके काढून साहित्यिक बनलेले लेखक, स्वत:च्या खर्चाने काव्यसंग्रह काढलेले कवी अशांच्या विविध रांगांनी या दिंडीस शोभा आणली होती. काही बलगाडय़ाही दिंडीमध्ये होत्या. त्यांचे प्रयोजन मात्र समजले नाही!
सकाळी ही साहित्यिकांची शोभायात्रा झाली. त्यानंतर ग्रंथ प्रदर्शन व विक्री केंद्रांचे उद्घाटन झाले. त्या वेळी सगळ्या प्रकाशकांनी एकत्र येऊन आयोजक जिंदाबादच्या घोषणा दिल्या!
यानंतर दुपारी स्व. यशवंतराव चव्हाण नगरीत स्व. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व्यासपीठावर संमेलनाच्या उद्घाटनाचा बहारदार कार्यक्रम झाला. व्यासपीठावर फक्त आजी आणि माजी संमेलनाध्यक्ष होते. संमेलनाचा शाही मंडप तुडुंब भरलेला होता. सगळे श्रोते मोबाइल फोन बंद करून बसले होते. महामंडळाच्या अध्यक्षा, स्वागताध्यक्ष अशी मोजकीच मंडळी मग मोजक्याच शब्दांत बोलली. महामंडळाने मराठी साहित्यासाठी केलेल्या सेवेचे वर्णन ऐकून तर सगळ्यांच्या अंगावर रोमांच उभे राहिले! त्यामुळे कधी नव्हे ते महामंडळ अध्यक्षांच्या भाषणास वन्समोअर मिळाला!
यानंतर ज्याची अवघी कायनात आतुरतेने वाट पाहात होती, त्या अध्यक्षीय भाषणास प्रारंभ झाला. नागनाथ कोत्तापल्ले बोलावयास उठले आणि टाळ्यांच्या दीर्घ कडकडाटाने अवघी गगने भेदून टाकली! आपल्या धीरगंभीर प्राध्यापकी आवाजात कोत्तापल्ले सरांनी बोलावयास सुरुवात केली. प्रथम त्यांनी अध्यक्षीय भाषणाच्या परंपरेनुसार कोकणच्या भूमीचा, चिपळूणचा आणि महामंडळाचा सार्थ गौरव केला. आणि मग त्यांनी मराठी साहित्याला जो काही हात घातला की यंव रे यंव! जागतिकीकरण, ग्रामीण व नागरी साहित्य, दलित व आंबेडकरी साहित्य, शाहू-आंबेडकर-फुले, आजचा समाज, चंगळवाद, साहित्याचे कार्य, साहित्यिकांची जबाबदारी, बांधीलकी, कला की जीवन असे नवनवे मुद्दे मांडून त्यांनी संमेलनस्थळ हादरवून सोडले. भाषण संपले तेव्हा मराठी साहित्याचा केवढा तरी विकास झाला होता!
संमेलनाच्या पहिल्या दिवसाची सायंकाळ या भाषणानेच भारावलेली होती. रात्री भोजनाच्या मंडपात कमी गर्दी होती. त्याचे कारण पुसता समजले की, अनेक साहित्यिक व प्रतिनिधींची पोटे भाषणांनी गच्च भरली होती. त्यामुळे त्यांनी लंघन केले होते. मात्र काही बनचुके साहित्यिक त्या वेळी ईश्वराच्या पहिल्या अवताराचा शोध घेत गावभर फिरत होते, असेही समजते.
यानंतर रात्री निमंत्रितांच्या काव्यसंमेलनाचा कार्यक्रम झाला. त्याबद्दल काय सांगावे? सर्व निमंत्रितांनी त्यांच्या गाजलेल्या कविता म्हटल्या. काही निमंत्रितांचे घसे बसले होते. त्यामुळे समोर बसलेल्या श्रोत्यांनीच त्यांच्या कविता म्हटल्या! ते पाहून महेश केळुस्कर, प्रकाश होळकर अशा काही कविवर्याच्या पापण्याच ओलावल्या. या वेळी काही कवयित्रींनी त्यांच्या कविता सादर केल्या. महिलांचे दु:ख, वेदना, अवहेलना हे सर्व काही उजागर करणाऱ्या त्या अनवट कविता ऐकून प्रेक्षकांतील अनेकांना अक्षरश: गदगदून आले. त्यातल्या काहींनी तर तेथेच वुई वाँट जस्टिस अशा घोषणा देण्यास सुरुवात केली! तेवढा एक जंतरमंतरी व्यत्यय सोडल्यास काव्यसंमेलन अपेक्षेपेक्षा अधिक रंगले.
दुसऱ्या दिवशी सकाळी रा. रा. अशोक नायगावकर आणि रा. रा. रामदास फुटाणे यांच्या गप्पांची मफल झाली. त्यांच्या कविता व गप्पा ऐकून सगळे मनमुराद हसले. ते त्यांच्या विनोदांस हसले! यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी विविध विषयांवर परिसंवाद झाले. तेही चांगलेच रंगले. इतके की या परिसंवादांच्या सीडी काढा अशी मागणी करणारा मोर्चा श्रोत्यांनी नंतर काढला. अखेर सरकारकडून अनुदान घेऊन तशा सीडी काढण्यात येतील व काही परिसंवाद मराठी वाहिन्यांवरून प्राइम टाइममध्ये मालिका स्वरूपात दाखविण्यात येतील, असे आश्वासन मा. ना. सुनील तटकरे यांना द्यावे लागले. (स्वागताध्यक्षांचे धर्य असे, की त्यांनीही ते अजितदादांना न विचारता दिले!) यातील सगळ्यात गाजला तो 'आम्ही काय वाचतो, का वाचतो' हा धाडसी परिसंवाद. मराठी साहित्याच्या संमेलनात आम्ही काय वाचतो आणि का वाचतो असा प्रश्न विचारणे हेच केवढे कौतुकास्पद! सर्वानीच त्याचे कौतुक केले. या परिसंवादाचे सार असे निघाले की, आम्ही अनुवादित इंग्रजी पुस्तके, तसेच श्रीमान योगी, स्वामी, ययाती, छावा, पानिपत, पुलं आणि वपु वाचतो!
संमेलनाच्या तिसऱ्या दिवशी बालजल्लोष असा कार्यक्रम होता. (विशेष म्हणजे तो मुलांसाठी आहे, अशी खास नोंद कार्यक्रमपत्रिकेत करण्यात आली होती!) त्यास बालवाचकांनी मोठय़ा संख्येने हजेरी लावली. तेथे मुलांच्या मम्मी-डॅडींचा वेळ मजेत गेला. नंतर त्या सर्व मुलांना त्यांच्या-त्यांच्या पालकांनी श्यामची आई हे पुस्तक घेऊन दिले. या दिवसाचे वैशिष्टय़ ठरला तो मराठी साहित्य आणि चित्रपटसृष्टी हा परिसंवाद. त्याचे अध्यक्ष कलादिग्दर्शक नितीन देसाई होते. त्यांना पाहण्यासाठी तरुणाईने या परिसंवादास मोठी गर्दी केली होती. मराठी साहित्य आणि चित्रपटांचे सेट यांवर देसाई यांनी मांडलेले मार्मिक विचार मननीय होते.
गणेशोत्सवात मांडवाचे मगारी नेहमीच काहीतरी चालते. तोच वसा या संमेलनानेही चालवला. हे सर्व तसे अत्यंत गोपनीय आहे. पण तुम्हांस म्हणून सांगतो, की रोज रात्री संमेलन मंडपाच्या मागच्या बाजूस एका खास खोलीत खास साहित्यिकांसाठी एक खास कार्यशाळा घेण्यात येत होती. विषय होता - 'संमेलनाध्यक्ष कसे व्हावे? महामंडळाचे माजी अध्यक्ष, निवडणूकतज्ज्ञ रा. रा. कौतिकराव ठाले-पाटील हे ही कार्यशाळा घेत होते. त्यात निवडणुकीचे गणित, मतदारयादी कशी वाचावी, महाराष्ट्रातील जातीवास्तव अशी व्याख्याने सोदाहरण देण्यात येत होती. साहित्य संमेलनाचे भावी अध्यक्ष घडविण्याचा हा उपक्रम प्रशंसनीय असाच होता.
याशिवाय नेहमीचे मनोरंजनाचे (उदा. गाणी, बिननिमंत्रितांचे कविसंमेलन, पुस्तकांचे प्रकाशन) असे कार्यक्रमही नेहमीच्या उत्साहात पार पडले. संमेलनाचे सूप वाजले, तेव्हा अनेकांना साहित्याचे फाइव्ह कोर्स डिनर मिळाल्याचा आनंद मिळाला होता.
साहित्य संमेलनांची काय गरज आहे, असा आम्लपित्तयुक्त सवाल पुसणाऱ्यांस या संमेलनाने चांगलेच उत्तर दिलेले आहे, असे आमचे वैयक्तिक मत आहे. उलट अशीच संमेलनांची आंगणेवाडी वारंवार, गावोगावी भरली पाहिजे. आमची तर अशी मागणी आहे, की टुरिंग टाकीप्रमाणेच राज्य सरकारने आता अखिल भारतीय मराठी टुरिंग संमेलने भरविण्यासाठी अनुदान द्यावे. महामंडळाच्या अध्यक्षांनी ही मागणी लावून धरावी, त्यासाठी साहित्यसेवकांच्या मताचा रेटा निर्माण करावा, अशी आमची नम्र विनंती आहे.