११ जानेवारी २०१३
मथितार्थ : अभाव ‘सामुदायिक जीवना’चा!
चित्रकथी : चित्रवीण!
कव्हर स्टोरी
क्रीडा : कल खेल में हम हो न हो..
प्रासंगिक

सादरीकरणाची कला आपल्या रक्तातच!
विकेट ‘कीपर’

संगीत : आठवणी वाद्यवृंदाच्या!
थोडी सजगता आणि पथ्य
सेकंड इनिंग : भीष्मासारखं वार्धक्य!
आरोग्यम् : पोलिओ पॉलिटिक्स
चटक-मटक : चवदार, चटपटीत
युवा : जग थिरकतंय ‘गंगन्म स्टाइल’वर..
भंकसगिरी : थोरांचे संमेलन झाले त्याची गोष्ट..
विज्ञान तंत्रज्ञान : टेक फेस्ट टेक्नॉलॉजीची आषाढी
कवितेचं पान : पहिली गाजलेली कविता

शब्दरंग : आम्हा घरीं धन

एकपानी : बी अ कॅलेंडर!
सिनेमा : मराठी सिनेमात नव्या वर्षांत नव्या जोडय़ा
लग्नाची वेगळी गोष्ट : जीवनात ही घडी..
लग्नाची वेगळी गोष्ट : बायका त्या बायकाच..
पाठलाग :एकच प्याला..
माझं शेतघर : फार्म हाऊस पाहावे घेऊन..
संख्याशास्त्र : मूलांक म्हणजे काय?
भन्नाट : आकाशाला गवसणी
केल्याने रेषाटन
वाचक प्रतिसाद
भविष्य
संपर्क
मागील अंक

भन्नाट

आकाशाला गवसणी
सुहास जोशी

response.lokprabha@expressindia.com
एक काळ असा होता की, हॉलीवूडच्या सिनेमांमधून दिसणारं पॅराग्लायिडग बघून आपल्याकडचा प्रेक्षक दिङ्मूढ होऊन जायचा. पण आता पुण्या-मुंबईच्या वाटेवर कामशेत इथं पॅराग्लायडिंग सेंटर आहे. कुणीही तिथं जाऊन पक्ष्याप्रमाणे हवेत तरंगण्याची हौस पूर्ण करून घेऊ शकतो.

दूर डोंगराच्या एखाद्या टोकावर तुम्ही उभे असता. अंगावर अनेक पट्टय़ापट्टय़ांची बांधाबांध केलेली असते. मागे २०-२५ फुटांचा ग्लायडरचा फुगारा वाऱ्यावर फडफडत सारखा तुम्हाला खेचत असतो. त्याच्या त्या फडफडीचं नियंत्रण मात्र तुमच्या दोन्ही हातांतील छोटय़ाशा दोऱ्यांवर (ब्रेक) असतं. वारा मनाजोगता आला की मात्र तुम्ही या दोऱ्या थोडय़ा सल सोडता, पाहता पाहता ग्लायडरची अर्धचक्राकार छत्री वाऱ्याने तट्ट फुगते. थोडंसं झुकून छोटीशी धाव घेत डोंगराच्या कडय़ावरून तुम्ही स्वत:ला पूर्णपणे झोकून देता आणि अलगद हवेत उचलले जाता. त्यानंतर सुरू होतो तो वाऱ्यावर स्वार होऊन आकाशाला गवसणी घालण्याचा खेळ. वर अथांग आकाश तर खाली खोल दरी, दूरवर पसरलेलं गाव, हळूहळू तुम्ही वर वर जाऊ लागता. लांबसडक रस्ते, गाव, नदी, धरणं सारे काही एकदम छोटे छोटे दिसू लागते. विश्वाच्या पसाऱ्यात सारे जगच किती लहान आहे त्याची ती एक छोटीशी झलकच असते. त्याचबरोबर डोळ्यांचं पारणं फेडणारा सोहळाच असतो तो! एखाद्या पक्ष्याप्रमाणे तुम्ही आकाशात घिरटय़ा घालत असता, तेदेखील स्वछंदपणे. कधी तरी विमानातून जाताना खिडकीतून (जागा मिळालीच तर) डोकावताना दिसणारे ते दृश्य आज तुम्ही थेट पाहत असता. तेदेखील अगदी आरामात. कारण ग्लायडर आणि आपला संबंध जोडला जातो तो सीट हान्रेसच्या माध्यमातून. हा सीट हान्रेस म्हणजे एक प्रकारची छोटीशी पाय नसलेली जणू खुर्चीच असते. त्यावर तुम्ही चक्क काटकोनात बसून आकाशात भटकंती करीत असता. जणू काही एकटय़ाचं विमानच असावं असंच काहीतरी. विमानात तुमचं नियंत्रण करतो पायलट आणि यंत्र. पण येथे मात्र तुम्हीच पायलट असता. अर्थात येथेही नियंत्रण असतं, मात्र ते निसर्गाचं. त्याला जोड असते ती तुमच्या हातातील ग्लायडरच्या त्या छोटय़ाशा दोऱ्यांची (ब्रेकची). याच ब्रेकच्या आधारे तुम्ही डावी-उजवीकडे वळता. हवेचा रोख पकडून घिरटय़ा घालत वर वर जाता. अगदीच कसबी असाल तर एखाद्या लढाऊ विमानाप्रमाणे डावी-उजवीकडे जवळपास १८० अंशांपर्यंत झुकणं असं सारं जणू काही आपल्या घराच्या अंगणातच खेळत असल्याप्रमाणे हा सारा खेळ सुरू असतो. भरपूर भटकून दमलात (अर्थात यात दमण्यासारखं काहीच नसतं म्हणा) की मग हळूहळू वेग नियंत्रित करीत डोंगरातल्याच विवक्षित जागी लॅण्डिंग करता. हा सारा थरार अनुभवायला मिळतो तो पॅराग्लायिडगच्या साहसी खेळात. पॅराग्लायिडग म्हणजे साहसाची ओढ आणि काही तरी वेगळं करण्याची ऊर्मी यांच्या मिलाफातून तयार झालेला साहसी खेळ!
कधी काळी केवळ डिस्कव्हरी अथवा नॅशनल जिऑग्राफीसारख्या चॅनलवर पहिले जाणारे, त्यांच्या कॅमेऱ्यांतून अनुभवले जाणारे हे थरारक अनुभव गेल्या काही वर्षांत आपल्याला अगदी महाराष्ट्रातदेखील अनुभवण्याची सोय झाली आहे. गेल्या १०-१५ वर्षांत लोणावळ्याजवळच्या कामशेत येथील डोंगररांगा पॅराग्लायडर्सचं माहेरघरच बनल्या आहेत. एक साहसी क्रीडाप्रकार म्हणून तर हा प्रकार रुजला आहेच, पण त्याचबरोबर साहसी पर्यटनाचं केंद्रदेखील बनला आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून अथवा जुन्या मार्गावरून प्रवास करताना कामशेतजवळ हवेत विहरणारे हे मानवी पक्षी सर्वाचंच लक्ष वेधून घेत असतात. पण नेमका हा प्रकार आहे तरी काय, त्यासाठी काही खास प्रशिक्षण आहे का, कोण करू शकते, याची आपल्याला फारशी माहिती नसते. मग आपण फक्त चालत्या गाडीतून अनिमिष नेत्रांनी त्यांच्याकडे पाहत राहतो.
पॅराग्लायिडगचा उगम झाला तो फ्रान्समध्ये. पॅराशूट आणि हँग ग्लायिडग या दोहोंचा मिलाफ यामध्ये पाहावयास मिळतो. पॅराशूटची रचना ही मुख्यत: विमानातून उडी मारल्यावर खाली जाण्यासाठी बनवलेली असते. त्यामध्ये ग्लायडरसारखं वर वर जाता येत नाही आणि स्वच्छंदी भटकतादेखील येत नाही. हँग ग्लायडरमध्ये दोन मोठे िवग्ज असतात. पण हँग ग्लायडर वाहून नेणं, सांभाळणं हे तुलनेने त्रासदायक असल्यामुळे पॅराग्लायडर लोकप्रिय होत गेलं. स्वत:च्या पाठीवरून हे कीट कोठेही घेऊन जाता येते. फ्रान्स, रशियामध्ये साधारण ५०च्या दशकात पॅराग्लायिडगचा चांगलाच प्रसार झाला. पण एकंदरीतच हे प्रकरण थोडं हौशी आणि खíचक असल्यामुळे सर्वसामन्यांत लोकप्रिय झालं नाही. गेल्या २०-२५ वर्षांत भारतात हा प्रकार चांगलाच रुजला आहे. त्यातही महाराष्ट्रात कामशेतजवळच्या डोंगररांगा हे तर पॅराग्लायडिंगचं माहेरघरच झालं आहे.
खरं तर हा प्रकार काहीसा स्टायलिश, थोडासा युरोपीय आणि बऱ्यापकी खíचक अशा प्रकारात मोडतो. संपूर्ण भारतातून कामशेतला येऊन पॅराग्लायिडग करणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. भारतातील पॅराग्लायिडगचा इतिहास फार तर २५-३० र्वष मागे जातो. याचा अर्थ आपल्याकडे साहसी वृत्ती नव्हती असा नाही. पण एक छंद अथवा खेळ म्हणून पॅराग्लायिडगकडे पाहण्याची वृत्ती जोपासली गेली ती साधारण याच काळात. गेल्या दशकात पॅराग्लायिडगचं प्रमाण चांगलंच वाढलं. मुळात पॅराग्लायिडग हा एकटय़ाने करायचा क्रीडाप्रकार. पण सर्वानाच ते शिकणं शक्य नसतं. पण त्याने काही फरक पडत नाही. कधी तरी आकाशात पक्ष्याप्रमाणे विहरण्याची आपली इच्छा प्रशिक्षित पॅराग्लायडर्सच्या मदतीने पूर्ण होऊ शकते. अगदी कुणीही पॅराग्लायडिंगचा आनंद घेऊ शकतो. अगदी मनसोक्त. त्याला टॅन्डम पॅराग्लायिडग म्हणतात. यात दोन व्यक्ती एकाच वेळी हवेत भटकू शकतात. यासाठीच्या ग्लायडरची रचनाही पूर्णत: वेगळी असते. एरवी एकच व्यक्ती फ्लाय करू शकणाऱ्या ग्लायडरपेक्षा याची ताकद जास्त असते. याला दोन सीट हान्रेस जोडण्याची सोय असते. आपण पुढे तर आपला पायलट मागे अशी रचना यात केलेली असते. फक्त एकच छोटीशी उणीव म्हणजे आपण ग्लायिडगशी संबंधित काहीच करीत नाही. स्वत:ला स्वत:चे ग्लायडर घेऊन जर आकाशात फिरायचं असेल तर मात्र त्यासाठी पॅराग्लायिडग शिकणं गरजेचं ठरतं.
पॅराग्लायिडग शिकायचंय?
आपल्या देशात पॅराग्लायिडग शिकण्यासाठी सिमला, कुलू-मनाली, सिक्कीम, कामशेत आणि केरळ (काही प्रमाणात) येथे अनेक पॅराग्लायिडग स्कूल आहेत. पण या सर्वात प्राधान्य आहे ते कामशेतला. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे येथील भौगोलिक परिस्थिती. पॅराग्लायिडगसाठी वारा हा खूप महत्त्वाचा घटक आहे. वारा पडून चालत नाही किंवा फार वेगाने वाहणेदेखील उपयोगाचं नसतं. असा वारा आणि त्याला पूरक अशा डोंगररांगा हे समीकरण कामशेत येथे चांगलेच जुळून आले आहे. अर्थात ही परिस्थिती इतर ठिकाणीदेखील आहे. पण तिकडे वर्षांतून खूप कमी काळ हवामान पूरक असते. फार फार तर २ ते ३ महिने. पण कामशेतला मात्र ऑक्टोबर ते मे असा आठ महिन्यांचा अनुकूल काळ मिळतो.
ग्लायिडग शिकण्यासाठी साधारण चार दिवसांचा प्रशिक्षण वर्ग असतो. पहिल्या दिवशी ग्लायडर पाठीला बांधून डोंगरपायथ्यालाच फक्त धावण्याचा सराव करायचा असतो. कारण ग्लायडर घेऊन टेक ऑफ आणि लॅण्डिंग करताना दोन्ही वेळेला ग्लायडरसहित धावायचं असतं. तसेच जेव्हा उंचावरून तुम्हाला टेक ऑफ करायचं असतं तेव्हा संपूर्ण किट पाठीवर घेऊन डोंगर चढून जायचं असतं. हे वजन सुमारे १६-२० किलो असते. या किटमध्ये खाण्या-पिण्याच्या तसेच इतर आवश्यक वस्तूदेखील राहू शकतात. त्यामुळे पहिल्या दिवसाचा हा सर्व सराव काहीसा घाम काढणारा ठरू शकतो. दुसऱ्या दिवशी तुम्ही थोडय़ाशा उंचीवरून अगदी १०-२० फुटांपर्यंत फ्लाय करता. तिसऱ्या दिवशी छोटय़ाशा टेकडीवरून (सुमारे १०० मीटर) तुम्ही उड्डाण करता आणि दोन-तीन वळणं घेत लॅण्डिंग करता. चौथ्या दिवशी मात्र तुम्हाला डोंगरावर नेलं जातं (सुमारे ४००-५०० मीटर). येथे मात्र तुम्ही उंचावर फ्लाय करू शकता. अर्थात तुम्ही प्राथमिक पातळीवर असल्यामुळे तुमचे प्रशिक्षक तुम्हाला जमिनीवरून वायरलेसच्या माध्यमातून दिशादिग्दर्शन करीत असतात. यानंतर तुम्ही सोलो पायलट बनता. अर्थात कोणत्याही प्रकारात सराव महत्त्वाचा असल्यामुळे येथेदेखील त्याची नितांत गरज असते. चार दिवसांच्या प्रशिक्षणासाठी साधारण १६,००० रुपये खर्च येतो. त्यानंतर तुम्ही ग्लायडर भाडय़ाने घेऊन उड्डाण करू शकता. स्वत:चे ग्लायडर विकत घेऊ शकता. त्याची किमान किंमत दोन लाख रुपये आहे. तसेच त्याचा वापर आणि निगा राखणंदेखील तितकंच महत्त्वाचं असतं. १६ वर्षांवरील कोणतीही सक्षम व्यक्ती पॅराग्लायिडगचं वरील प्रशिक्षण घेऊ शकते. (पॅराग्लायिडगसंदर्भात सध्या तरी आपल्याकडे अधिकृत नियम नाहीत. पण पॅराग्लायडिंग शिकवणाऱ्या सगळ्या प्रशिक्षण संस्था आंतरराष्ट्रीय नियमावलीचं पालन करीत असतात.) एकदा तुम्ही पॅराग्लायडिंग शिकलात की मग तुम्ही क्रॉसकंट्री भटकंती करू शकता.
अर्थात तुम्हाला एवढा उपद्व्याप करायचा नसेल आणि एकदा तरी हवेत उडण्याचा अनुभव घायचा असेल तर टॅन्डम पॅराग्लायिडग तुमच्या दिमतीस आहेच. वर उल्लेख केलेल्या अनेक ठिकाणी टॅन्डम पॅराग्लायिडगच्या अनेक साइटस् तयार आहेत. तेथे जाण्याचंच कष्ट फक्त तुम्हाला घ्यायचे असतात. (काही ठिकाणी डोंगरावर जाण्यासाठी वाहन सुविधादेखील आहे.) १० मिनिटांच्या एका टॅन्डम सफरीसाठी सुमारे २५०० रुपये (महाराष्ट्रात) खर्च येतो. पण त्या दहा मिनिटांत तुम्ही जो अनुभव घेता तो मात्र अवर्णनीय असाच असतो.

महाराष्ट्रातील पॅराग्लायडिंग
संजय पेंडुरकरने महाराष्ट्रातील पॅराग्लायिडगची सुरुवात केली असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. संजय हाडाचा गिर्यारोहक. सुमारे २० वर्षांपूर्वी त्याची सह्यद्रीतील भटकंती आणि हिमालयातील शिखर आरोहण अगदी जोरात सुरू होते. त्याच दरम्यान मनाली येथे एका ब्रिटिश पॅराग्लायडरने या अनोख्या विश्वाची त्याला ओळख करून दिली. आणि तो ग्लायडरमध्ये पुरता गुरफटला. एक एक करीत त्याला साथीदार मिळत गेले. कामशेतची डोंगररांग त्याचे दुसरे घरच बनले. पॅराग्लायिडगमध्ये एक एक टप्पे ओलांडत त्याचे आकाशातील विहरणे सुरू झाले. भारतात बीर बििलग, सिक्कीम, मनालीबरोबरच भारताबाहेर त्याने फ्रान्स, टर्की, चीन, नेपाळ, बल्गेरिया, जपान अशा सर्व ठिकाणी मिळून आजवर २५०० तास पॅराग्लायिडग केले आहे. चायना येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पध्रेत त्याने भारताचे प्रतिनिधित्व केले होते. या स्पध्रेत भारतीय टीमला कांस्यपदक मिळाले होते. महाराष्ट्रात त्याने कामशेतबरोबरच पाचगणी, आंबोली या ठिकाणीदेखील पॅराग्लायिडग केले आहे. रायगडावरून टेक ऑफ करून तो पायथ्याच्या छत्री निजामपुरात उतरला तेव्हा गावकऱ्यांना शिवकाळातील छत्रीबरोबर उडत आलेल्या शिवरायांच्या सेवकाचीच आठवण झाली. आज भारतातील पॅराग्लायडर्समध्ये त्याचे सहावे स्थान आहे. राहुल गांधींनादेखील त्याने पॅराग्लायिडग शिकवले आहे. एक मराठी माणूस संपूर्णत: अनोळखी अशा जगावेगळ्या क्षेत्रात प्रवेश करतो आणि तेथे आपले स्वतंत्र अस्तित्व निर्माण करतो, ही निश्चितच अभिमानाची बाब आहे.

स्थानिकांना रोजगार
गेली दहा-पंधरा वष्रे येथे कार्यरत असणारे योगी आणि पंकज सांगतात की, आम्हाला पॅराग्लायडिंगची आवड होती. त्यातून आम्ही शिकत गेलो. आज आम्ही येथे प्रशिक्षणार्थीना शिकवतोच पण टॅन्डमदेखील करतो. आम्हाला तर उत्पनाचे साधन मिळालेच पण त्याचबरोबर वाहन व्यवस्था, चहा, नष्टा, जेवण यासाठी स्थानिकांची मदत, ग्लायडर वाहून नेण्यासाठी मुले, अशा छोटय़ामोठय़ा साहाय्यभूत उद्योगांच्या माध्यमांतून अनेक स्थानिकांना रोजगाराचे साधन उपलब्ध झाले आहे.