११ जानेवारी २०१३
मथितार्थ : अभाव ‘सामुदायिक जीवना’चा!
चित्रकथी : चित्रवीण!
कव्हर स्टोरी
क्रीडा : कल खेल में हम हो न हो..
प्रासंगिक

सादरीकरणाची कला आपल्या रक्तातच!
विकेट ‘कीपर’

संगीत : आठवणी वाद्यवृंदाच्या!
थोडी सजगता आणि पथ्य
सेकंड इनिंग : भीष्मासारखं वार्धक्य!
आरोग्यम् : पोलिओ पॉलिटिक्स
चटक-मटक : चवदार, चटपटीत
युवा : जग थिरकतंय ‘गंगन्म स्टाइल’वर..
भंकसगिरी : थोरांचे संमेलन झाले त्याची गोष्ट..
विज्ञान तंत्रज्ञान : टेक फेस्ट टेक्नॉलॉजीची आषाढी
कवितेचं पान : पहिली गाजलेली कविता

शब्दरंग : आम्हा घरीं धन

एकपानी : बी अ कॅलेंडर!
सिनेमा : मराठी सिनेमात नव्या वर्षांत नव्या जोडय़ा
लग्नाची वेगळी गोष्ट : जीवनात ही घडी..
लग्नाची वेगळी गोष्ट : बायका त्या बायकाच..
पाठलाग :एकच प्याला..
माझं शेतघर : फार्म हाऊस पाहावे घेऊन..
संख्याशास्त्र : मूलांक म्हणजे काय?
भन्नाट : आकाशाला गवसणी
केल्याने रेषाटन
वाचक प्रतिसाद
भविष्य
संपर्क
मागील अंक

आरोग्यम्

पोलिओ पॉलिटिक्स
डॉ. प्रदीप आवटे

response.lokprabha@expressindia.com
अतिशय प्रगत अशी अमेरिका असो, आपल्यासारखा विकसनशील देश असो किंवा पाकिस्तानसारखा मागास देश असो.. आरोग्यासारख्या अतिशय मूलभूत महत्त्वाच्या प्रश्नावर सगळ्यांनाच राजकारण करायचं असतं.

दिनांक १३ जानेवारी २०११ पासून मागील दोन वर्षांत भारतात पोलिओचा एकही रुग्ण सापडलेला नाही. जागतिक आरोग्य संघटनेने पोलिओग्रस्त देशांच्या यादीतून भारताचे नाव पुसले आहे. नायजेरिया, पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या तीन देशांमध्ये आज मुख्यत्वे पोलिओची समस्या उरली आहे. २०११ मध्ये जगभरात पोलिओचे ६५० रुग्ण आढळले होते. २०१२ मध्ये या रुग्णसंख्येत दोन तृतीयांशने घट झाली आहे. जग पोलिओ मुक्तीच्या उंबरठय़ावर उभे आहे. या पाश्र्वभूमीवर पाकिस्तानात नुकत्याच घडलेल्या घटनांनी पोलिओमुक्तीच्या या वाटचालीत गंभीर अडथळा निर्माण केला आहे. डिसेंबरच्या दुसऱ्या पंधरवडय़ात पोलिओ निर्मूलन मोहिमेत काम करणाऱ्या नऊ स्वयंसेवकांची तालिबान अतिरेक्यांनी निर्घृण हत्या केली. अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने या हत्या करण्यात आल्या असून या स्वयंसेवकांपकी बहुसंख्य महिला आहेत. हत्या करण्यात आलेल्या सर्वात लहान महिला स्वयंसेविकेचे वय अवघे १७ आहे.
पाकिस्तानातील कराची, पेशावर या शहराच्या आसपास पाकिस्तानातील आदिवासी पट्टय़ात या घटना घडल्या आहेत. या हिंसक घटनांमुळे पाकिस्तान सरकारने सध्या सुरू असलेली पोलिओ लसीकरण मोहीम थांबवली आहे. येथून पुढे पोलिओ लसीकरण मोहिमेसाठी काम करणाऱ्या स्वयंसेवकांना पोलीस संरक्षण देण्याची वेळ येणार की काय, असे त्या देशातील चित्र आहे. मुस्लिम जगताचा पोलिओ लसीकरणास असलेला विरोध ही नवी गोष्ट नाही. पोलिओ लसीचे थेंब म्हणजे भावी मुस्लिम पिढीला नपुंसक बनविण्याचे कारस्थान आहे इथपासून ते ही पोलिओ लस म्हणजे माजी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांचे मूत्र आहे, इथपर्यंत काहीही अफवा या लसीबद्दल पसरविण्यात आल्या आहेत. भारतातही मुस्लिमबहुल प्रदेशात अशा अफवांचे नवे नवे पीक येत असते. या साऱ्यांचा परिणाम म्हणून भारतात उत्तर प्रदेशात तर आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तान, नायजेरिया, अफगाणिस्तान या मुस्लिम प्रदेशांत पोलिओ निर्मूलनाची अंतिम लढाई लढावी लागत आहे.
पोलिओ लसीकरणाच्या या विरोधाला आंतरराष्ट्रीय राजकारणाचा महत्त्वपूर्ण संदर्भ आहे. राजकारण आणि आरोग्य हे विषय वर वर पाहता अगदी वेगळे वाटले तरी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय राजकारण सार्वजनिक आरोग्यावर महत्त्वपूर्ण परिणाम घडवू शकते, हे विसरता कामा नये. कधी कधी सार्वजनिक आरोग्यासंदर्भातील मुद्दे हाताशी घेऊन मुरब्बी राजकारणी आपले डावपेच आखताना दिसतात. बायोटेररिझमवर प्रमाणाबाहेर चर्चा करणाऱ्या आंतरराष्ट्रीय वैद्यकीय मासिकांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे इराक यु्द्धाला हातभार लावला, असा आरोप एका तज्ज्ञाने केला आहे. ''Health is politicall’’, या विधानाचे प्रत्यंतर असे अनेक बाबतीत येत असते. सध्या सुरू असलेली पोलिओ निर्मूलन मोहीम त्याचेच ठळक उदाहरण आहे. जागतिक आरोग्य संघटनेने नव्वदच्या दशकात पोलिओ निर्मूलनाची मोहीम हातात घेतली. ९/११ च्या घटनेनंतर अमेरिका आणि मुस्लिम जगाच्या तणावपूर्ण संबंधाचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष परिणाम पोलिओ लसीकरणावर दिसून येऊ लागला. या मोहिमेला अमेरिकेसह अनेक पाश्चात्त्य आंतरराष्ट्रीय संघटनांचे असलेले आर्थिक पाठबळ मुस्लिम जगतातील मूलतत्त्ववाद्यांना खुपत होते आणि खुपते आहे. अमेरिकन आणि पाश्चात्त्य जगाची कोणतीही मदत पूर्णपणे नाकारण्याच्या वेडेपणातून पोलिओ लसीकरणासह सर्व प्रकारच्या मानवतावादी मदतकार्याला विरोध करण्याचा नतद्रष्टपणा या देशांमधील मूलतत्त्ववादी शक्ती करताना दिसत आहेत. आणि म्हणूनच अशा प्रकारे मानवतावादी मदतकार्यामध्ये काम करणाऱ्या स्वयंसेवकांसाठी पाकिस्तान हा पहिल्या पाच देशांपकी एक असुरक्षित देश आहे. नुकत्याच एका स्वीडिश सामाजिक कार्यकर्तीचा लाहोरमध्ये गोळ्या घालून खून करण्यात आला तर रेड क्रॉसच्या एका डॉक्टरचे अपहरण करून त्याला क्रूरपणे मारण्यात आले. या प्रकारच्या खून अपहरणाचे प्रकार भयावह नियमिततेने पाकमध्ये घडत आहेत. रेड क्रॉससारखी आंतरराष्ट्रीय संघटनादेखील आपले पाकमधील विविध स्वरूपाचे मदतकार्य मर्यादित करते आहे.
या साऱ्या प्रकारामागे आणखी एक महत्त्वपूर्ण कारण आहे. दहशतवादाचा बीमोड करण्यासाठी अमेरिकेने राबविलेले चुकीचे धोरण, या सर्व िहसाचाराला खतपाणी घालते आहे. २००१ पासून अनेक वेळा अमेरिकेने पाकवर ड्रोन हल्ले केले आहेत. मागील सहा वर्षांत हजारो लोक या हल्ल्यांमध्ये मारले गेले आहेत. यामुळे कोणत्याही प्रकारच्या परदेशी मदतीवर येथील लोकांचा विश्वास उरलेला नाही. "The brutal murder this week of five Karachi health workers involved in a UN-backed polio eradication drive says more about the wider effect of misguided US policy in the area than it does anything new about the Pakistani Taliban" हे बेंजामिन गिल्मोर यांचे वाक्य हेच कटू सत्य सांगते. ओसामा बिन लादेनला शोधण्यासाठी अमेरिकन गुप्तहेर संघटना सी.आय.ए.ने डॉ. शकील आफ्रिदी या पाकिस्तानी डॉक्टरच्या मदतीने अबोटाबाद येथे एक फसवी हिपटायटीस बी लसीकरण मोहीम राबविली. या प्रकारामुळे तर स्थानिक लोक प्रत्येक लसीकरण मोहिमेकडे संशयाच्या नजरेने पाहू लागले आहेत. या स्वयंसेवकांची हत्या करणाऱ्या स्थानिक अतिरेक्यांचा योग्य न्यायनिवाडा झालाच पाहिज, पण पोलिओ निर्मूलनात महत्त्वाचा भागीदार असलेला अमेरिका जर त्यांना हवा असणाऱ्या ‘मोस्ट वॉन्टेड’ला पकडण्यासाठी खोटय़ा लसीकरण मोहिमेचा आधार घेणार असेल तर आमच्यावर विश्वास ठेवा, हे आम्ही पाक जनतेला कोणत्या तोंडाने सांगावयाचे? असा रास्त सवाल पाक अ‍ॅम्ब्युलन्स सेवेचे सल्लागार बेंजामिन गिल्मोर यांनी केला आहे.
पोलिओ निर्मूलन हे एकविसाव्या शतकातील आरोग्यविषयक महत्त्वपूर्ण स्वप्न आहे. देवीनंतर जागतिक पातळीवरून नाहीसा होणारा पोलिओ हा दुसरा महत्त्वाचा आजार ठरणार आहे. जवळपास एक शतकापासून मानवजात पोलिओमुक्त जगाच्या रम्य पहाटेचे स्वप्न पाहते आहे. ते साध्य करण्यासाठी पोलिओ निर्मूलनातील सारे छोटे-मोठे भागीदार एकत्र येऊन पाकमध्ये निर्माण झालेल्या या अडथळ्यावर काही मार्ग निश्चितच काढतील. तशा हालचाली सुरूही झाल्या आहेत. लवकरच पाकमधील पोलिओ निर्मूलन मोहीम पूर्वपदावर येईल. पण या घटनेतून काही बोध आपण निश्चितपणे घ्यायला हवा. आपल्या स्थानिक, राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय राजकारणात सार्वजनिक आरोग्यच घायाळ होऊ नये, याची दक्षता आपण घ्यायला हवी. एक चुकीचे राजकीय पाऊल हा कोटय़वधी लहान मुलांच्या मानवी हक्काचा प्रश्न असू शकतो. आज पोलिओ निर्मूलनाची गाडी रुळावरून खाली घसरली तर येत्या दहा वर्षांत पुन्हा लाखो मुले पोलिओमुळे अपंग होऊ शकतात. जे आंतरराष्ट्रीय पातळीवर घडू शकते तेच थोडय़ाफार फरकाने स्थानिक पातळीवरही घडू शकते.

जागतिक पातळीवरून नाहीसा होणारा पोलिओ हा देवीनंतर दुसरा महत्त्वाचा आजार ठरणार आहे.

अगदी गाव पातळीवरील स्वार्थाध राजकारण कोणत्या स्तरावर जाऊ शकते, हे मी स्वत: अनुभवले आहे. एका छोटय़ाशा गावात गॅस्ट्रोची साथ उद्भवली तेव्हाची गोष्ट. मी माझ्या टीमसह त्या गावात पोहोचलो. गॅस्ट्रोची साथ म्हणजे दूषित पाणी, हे ओघाने आलेच. गावच्या पाणीपुरवठा पाइप लाइनला जागोजागी तडे गेलेले, ठिकठिकाणी गळती! या साऱ्या गळत्या लगोलग दुरुस्त करणे, शक्य नव्हते म्हणून मी गावाला तात्पुरता टँकरने पाणीपुरवठा करावा, असे सरपंचांना सुचविले. तसा रिपोर्टही दिला. पण दोन-तीन दिवस झाले तरी टँकर सुरू व्हायचे चिन्ह दिसेना मला सरपंचाचा प्रचंड राग आला, अहो, गावातल्या पन्नासहून अधिक लोकांना गॅस्ट्रोची लागण झाली आहे. तुम्ही एखादा पेशंट दगावण्याची वाट पाहत आहात का? टँकर का सुरू होत नाही अजून? यावर सरपंच जे बोलले ते भीषण होते. ते म्हणाले, ते एखादा पेशंट गचकण्याचीच वाट पाहून राह्य़ल्यात.. मी चमकलोच. नंतर सरपंचांनी नीट समजावून सांगितले आणि गाव पातळीवरील अनारोगी राजकारणाची कल्पना आली. या गावचे सरपंच हे तालुक्याच्या आमदाराच्या विरुद्ध पार्टीचे त्यामुळे या सरपंचाचा नाकत्रेपणा सिद्ध करण्याची आयती संधी या साथीने आमदारांना दिली होती. ही साथ धुमसत राहण्यात त्यांना रस होता. म्हणून ते गावाला टँकर देण्यात चालढकल करत होते. सार्वजनिक आरोग्याचा मुद्दा स्वत:च्या राजकीय स्वार्थाकरता वापरण्याच्या या राजकीय मुत्सद्देगिरीला काय म्हणावे?
सार्वजनिक आरोग्याचे सामाजिक, आर्थिक, मानसिक असे अनेक महत्त्वपूर्ण निर्धारक अखेरीस त्या समाजातील राजकीय व्यवस्थेवर अवलंबून असतात, हे विसरून चालणार नाही. देशातील सार्वजनिक आरोग्य व्यवस्था रसातळाला गेली आहे, असे विधान मध्यंतरी जयराम रमेश यांनी केले आणि मला राम मनोहर लोहियांची आठवण झाली. देशातील राजकीय कार्यकर्त्यांनी, नेत्यांनी स्वत:वरील उपचारासाठी सार्वजनिक आरोग्य यंत्रणेचा वापर केला पाहिजे, याबद्दल ते आग्रही असत. आज किती राजकीय नेते आपल्यावरील उपचारासाठी सार्वजनिक रुग्णालयात येतात? आपण आपल्या उपचारासाठी कुठे जातो, ही एक महत्त्वपूर्ण राजकीय कृती आहे, याचे भान हरवत चालले आहे. या कृतीचा स्वाभाविक परिणाम सार्वजनिक रुग्णालयांच्या गुणवत्तेवर होतो आहे. एकीकडे स्वत: सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचा उपयोग करावयाचा नाही आणि दुसरीकडे आपल्या गावात, मतदारसंघात आरोग्य केंद्र झाले पाहिजे म्हणून भांडावयाचे, असा दुटप्पीपणा मात्र पाहावयाला मिळतो. अगदी ५-१० किलोमीटरच्या टप्प्यात दुसरे आरोग्य केंद्र असले तरी ते आपल्या गावातही हवे, हा प्रतिष्ठेचा मुद्दा करावयाचा, नंतर त्या आरोग्य केंद्राकडे ढुंकनही पाहायचे नाही, तिथे डॉक्टर, इतर स्टाफ राहतो की नाही, याची विचारपूस नाही. ही राजकीय समज (?) आपल्याला ’सर्वासाठी आरोग्या’च्या गावाला कशी घेऊन जाईल? अशा छोटय़ा मोठय़ा स्थानिक प्रश्नापासून ते महत्त्वपूर्ण धोरणापर्यंत राजकारण आपल्या सार्वजनिक आरोग्याचे भवितव्य निश्चित करत आहे. वैद्यकीय शिक्षणाचे अनियंत्रित खासगीकरण आणि सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेमधील डॉक्टरांची रिक्त पदे यामधील कार्यकारणभाव समजण्यासाठी कोणत्याही थोर विश्लेषकाची आवश्यकता नाही. वैद्यकीय संशोधनाचे चुकलेले प्राधान्यक्रम, जीवनावश्यक औषधांच्या अवाच्या सव्वा किमती, कुपोषण, दिवसेंदिवस प्रचंड मोठय़ा प्रमाणावर वाढणारी खाजगी आरोग्य व्यवस्था, तिच्यावरील सुयोग्य नियंत्रणाचा अभाव या सर्व गोष्टी राजकारण आणि सार्वजनिक आरोग्याची नाळ स्पष्ट करणाऱ्या आहेत.
आणि म्हणूनच, पक्षीय अभिनिवेशाच्या पल्याड जाणाऱ्या दूरदृष्टीच्या विधायक राजकारणाशिवाय ‘सर्वासाठी आरोग्या’चे स्टेशन येणे शक्य नाही, मग ती अंजनडोहसारख्या खेडय़ातील गॅस्ट्रोची साथ असो नाही तर पाकिस्तानातील पोलिओ निर्मूलन मोहीम!