२ नोव्हेंबर २०१२
मथितार्थ
कव्हरस्टोरी

थरार (लोकप्रभा एक्सक्लुझिव्ह)

अभीष्टचिंतन
प्रवास
स्मरण
कर्मयोगी पांडुरंगशास्त्री आठवले
आमचे सर
कुतुहल
फ्लॅशबॅक
पर्यावरण
नक्षत्रांचे नाते
साधनचिकित्सा
वाचू काही
पुस्तक परीक्षण
कोकणचो डॉक्टर
गुज हुंदक्यांचे
जाहिरातींच जग
सिनेमा आशिया
दुर्गाच्या देशा
पर्यटन
दबंगवाणी
शॉपिंग
वाचक प्रतिसाद
भविष्य
संपर्क
मागील अंक

स्मरण
कर्मयोगी पांडुरंगशास्त्री आठवले | आमचे सर

कर्मयोगी पांडुरंगशास्त्री आठवले
आमोद दातार

२५ ऑक्टोबर हा स्वाध्याय परिवाराचे प्रणेते पांडुरंगशास्त्री आठवले यांचा स्मृतिदिन. त्यानिमित्त त्यांच्या कार्याची ओळख.

पांडुरंगशास्त्री आठवले म्हणजेच दादांचा जन्म १९ ऑक्टोबर १९२० या दिवशी रायगड जिल्ह्य़ातील रोहा इथे झाला. हा दिवस आता मनुष्य गौरव दिन म्हणून साजरा केला जातो.
दादांच्या व्यक्तिमत्त्वाची तसेच त्यांनी उभारलेल्या स्वाध्याय परिवाराच्या रचनात्मक कार्याची जडणघडण एका व्यथेतून झाली. समाजात पसरलेली विषमता, भेदाभेदाच्या भिंती याचे मनस्वी दु:ख त्यांना होत असे. आपल्या देशाची अशी दुरवस्था का? गीतेसारखे तेजस्वी तत्त्वज्ञान ज्या भूमीत निपजले तिथली माणसे रडकी का? चेहरे पडलेले का? लाचार का? बापुडी का? असे नाना प्रश्न त्यांना नेहमी सतावीत असत. तेव्हा दादांनी ठरवले की, मी ही परिस्थिती बदलवीन, काही तरी घडवून दाखवीन. त्यांना माहीत होते की, माणसाचे स्वत्व आणि सत्व जागृत करावे लागेल. अशा वेळी त्यांनी गीतेचा रस्ता उचलला. गीतेतील हृदयस्थ भगवंताची (Indwelling God) संकल्पना माणसाला अस्मिता देऊ शकते, मी हलका नाही ही खुमारी माणसात आणू शकते, हे त्यांनी ओळखले. भगवंत माझ्याबरोबर आहे, माझ्यात आहे, माझ्या सर्व सुखदु:खांचा साक्षीदार आहे, हा विचार जर रु जला, बुद्धीत उतरला तर त्यातून व्यक्तिपरिवर्तन व पर्यायाने समाजपरिवर्तन नक्की होईल, हा दादांचा विश्वास होता. दादा नेहमी म्हणत की, अहं ब्रह्मास्मि हा केवळ साधकांच्या अनुभूतीचा विषय नाही, तर सर्वसामान्य माणसाला त्याचा काठीसारखा उपयोग होतो. अर्थात वेदशास्त्रसंपन्न असूनही, प्रकांड बुद्धिशाली व असामान्य विद्वत्ता असूनही, पांडुरंगशास्त्री कधीच लेख, पुस्तके, ग्रंथ, कोश लिहीत बसले नाहीत, तर ईश्वराचे अधिष्ठान व माणसाच्या विकासाबद्दल वाटणारी तळमळ घेऊन ते अव्याहत चालत राहिले. माणसामाणसाला निरपेक्षपणे ऊब देण्यास्तव भेटत राहिले. भगवंत सतत माझ्याबरोबर आहे, तो माझा सक्रिय भागीदार आहे हे समजले तर माणसाची वर्तणूक बदलेल, त्याची कृतीच बदलेल. भगवंत कोणत्याही अपेक्षेशिवाय माझ्याकरिता राबतोय हा विचारच कृतज्ञता आणतो. जो विभक्त नाही तो भक्त व त्याची कृतज्ञतापूर्वक आठवण करणे म्हणजे भक्ती. मी त्याचा अंश आहे व त्याला गरज आहे म्हणून तो मला उठवतोय हा विचारच सहस्र हत्तींचे बळ देऊन जातो. या व अशा अनेक प्रेरणादायी व प्राणवान विचारातून दादांनी लाखो लोकांचा समूह कोणाच्याही मदतीशिवाय, कोणाचेही मिंधे न होता उभा केला.
पण आज खरे तर व्यक्तिपरिवर्तनावर कोणाचा विश्वास आहे की नाही, हा प्रश्न आहे, कारण एक तर तो खूप लांबचा पल्ला आहे व ज्याचे यश झटकन मापता येत नाही. दुसरे असे की, आजचा समाज, मग तो बुद्धिवंतांचा असो, मान्यवरांचा असो वा जनसामान्यांचा असो, सर्वाची ही भ्रांत समजूत आहे की, कायदा करून माणसाचे अंतरंग बदलता येईल; पण कायदा सुयोग्य व अपेक्षित व्यक्तिपरिवर्तन करण्यास असमर्थच ठरतो आहे, कारण शेवटी मी कसे वागायचे, कसे वर्तन करायचे, हा माझा वैयक्तिक प्रश्न आहे. तेजस्वी विचारांशिवाय माझे वर्तन बदलणे कठीण आहे. आज दुर्दैवाने बुद्धिवंतांकडे माणसाच्या रोगाबद्दलचे निदान आहे, पण उपचार करायची पद्धत आहे की नाही, हा प्रश्नच आहे. अशा वेळी जर भगवद्शक्ती माझ्यात बसली आहे हे बुद्धीत उतरले तर व्यसन का नाही सुटणार? दुराचारापासून माणूस का नाही परावृत्त होणार? हाच रस्ता दादांनी उचलला, तो उचलण्याची व त्याच्या अपेक्षित परिणामांची वाट पाहाण्याची हिंमत दाखवली. आज एकदोन नाही, तर शेकडो स्वाध्यायी गावांतून व्यसने हद्दपार झाली, तंटे मिटले, भेदाभेद मिटले; ते काही आंदोलने करून अथवा दमदाटीने नव्हे, तर केवळ हृदयस्थ भगवंताच्या जाणिवेतूनच. समाजातून भगवंताला वजा केले, की भेद काढायचा मुळी रस्ताच खुंटला. भगवद्संबंध हा एकच एक संबंध असा आहे, की जो दरी व दुरी दूर करू शकतो, सर्व मानवमात्राला एकत्र आणू शकतो. दादांनी केवळ हे प्रतिपादित केले असे नाही, तर ते करून दाखवले. भक्तीचे व अहं ब्रह्ममास्मिसारख्या विचारांचे सामाजिकीकरण हे दादांचे फार मोठे योगदान आहे असेच म्हणावे लागेल. व्यक्ती व समाज या दोन्ही घटकांना हातात हात घालून घेऊन जाईल असा शाश्वत रस्ता दादांनी दाखवला. गीतेच्या अजोड तत्त्वज्ञानावर आधारलेला ऋषीप्रणीत रस्ता स्वीकारला व आज स्वाध्याय परिवार त्याच मार्गाने चालण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहे.

आज दुर्दैवाने बुद्धिवंतांकडे माणसाच्या रोगाबद्दलचे निदान आहे, पण उपचार करायची पद्धत आहे की नाही, हा प्रश्नच आहे. अशा वेळी जर भगवद्शक्ती माझ्यात बसली आहे हे बुद्धीत उतरले तर व्यसन का नाही सुटणार?

तद्वतच मनुष्य गौरव हेही दादांचे आणखी मोठे योगदान. गौरवशाली परंपरा लाभलेल्या या देशातील माणूस आत्मगौरवरहित का? माणूस विकला का जातो? माणूस, मग तो कितीही मोठा का असेना, आज विकत घेऊ शकणारी वस्तू बनला आहे (purchasable commodity) या आत्यंतिक व्यथेचे केवळ चिंतन न करता अशी एक विचारधारा उभी केली की, ज्यामुळे माणूस दुसऱ्या माणसाला कोणत्याही बाह्य अलंकाराशिवाय आपला म्हणू शकेल. रक्ताच्या नव्हे तर रक्त बनवणाऱ्याच्या संबंधाने एकत्र येईल, जोडला जाईल. विश्व चालवणारी शक्ती माझ्यात येऊन बसली आहे या जाणिवेतून चैतन्य येईल, अस्मिता येईल, आत्मगौरव व आत्मसन्मान उभा राहील. आज दुर्दैवाने समाजात बाह्य आभूषणांशिवाय गौरवच मिळत नाही. ज्याच्याकडे वित्त आहे, सत्ता आहे, विद्या आहे, कीर्ती आहे त्यालाच किंमत मिळते, पण ही सर्व आभूषणे नसतील तर माणसाला किंमतच नाही? ज्या माणसांकडे या भौतिक गोष्टी नसतील त्यांनी आपला गौरव कशात मानायचा? समाजातील ९० टक्क्यांपेक्षा जास्त लोकांकडे विद्या, वित्त, सत्ता, कीर्ती यातील काहीच नाही व ते नसल्यामुळे जर त्यांना किंमतच मिळणार नसेल, गौरव प्राप्त होणार नसेल तर आपण कुठल्या सुधारलेपणाच्या गप्पा मारतो आहोत? समाजातील ५-१० टक्के लोकांना या सर्व शक्ती, ही सर्व आभूषणे असल्यामुळेच किंमत आहे व उरलेल्या सर्वसामान्यांना या सर्व शक्ती नसल्यामुळे किंमतच नाही, हे काय उन्नत माणसाचे लक्षण आहे? सारांश काय, तर माणसाला त्याच्यामनुष्यत्वामुळे किंमतच नाही. त्याला किंमत आहे ती केवळ त्याच्या पद, पैसा, प्रसिद्धी, विद्या या आभूषणामुळेच. फक्त post, position, possession मुळेच, पण दादांनी ठामपणे सांगितले की, तुझ्याकडे या प्रस्थापित शक्तींपैकी काहीही नसेल कदाचित, पण तुझ्याजवळ तुझा राम आहे, तो तुझे शरीर चालवतोय. चराचर सृष्टी चालवणारा भगवंत माणसात येऊन राहिला आहे, हाच माणसाचा सर्वात मोठा गौरव आहे. मनुष्याचा हा गौरव उभा करण्यासाठी दादांनी अवघे आयुष्य वेचले. असा गौरववान तसेच दुसऱ्याचाही गौरव मानणारा, म्हणजे आत्मगौरव व परसन्मान यांनी युक्त असा एक वैकल्पिक समाज, स्वाध्याय परिवाराच्या रूपाने उभा केला. अर्थात दादा केवळ विचार देऊन, गौरव उभा करून थांबले नाहीत, तर त्यांनी लाखो स्वाध्यायींना कृतीप्रवण केले. आज दादांचा हा विचार घेऊन नियमितपणे हजारो गावांत निरपेक्षपणे फिरणारे जवळपास २ लाख स्वाध्यायी आहेत. कुठल्याही भौतिक गोष्टीची तर नाहीच नाही, पण आभाराचीसुद्धा अपेक्षा न ठेवता सतत गावागावांतून जाणारे स्वाध्यायी दादांनी उभे केले. गेल्या आठवडय़ातही दादांच्या जन्मदिनाच्या म्हणजे मनुष्य गौरव दिनाच्या निमित्ताने फक्त महाराष्ट्रातील जवळपास २५,००० स्वाध्यायी आपला वेळ, आपला पैसा खर्च करून कोणत्याही प्रलोभनाशिवाय दि. १२ ते १७ ऑक्टोबर या काळात विदर्भातील ८ जिल्ह्यांतील हजारो गावांत दादांचा मनुष्य गौरवाचा हा संदेश देत अव्याहतपणे फिरत होते. आपले वाढदिवस मोठमोठे फलक लावून व थैल्या गोळा करून साजरे करण्याची आजकाल प्रथा पडली असताना, स्वाध्याय परिवार दादांचा जन्मदिवस असा कृतिपूर्ण साजरा करून त्यांच्याविषयी कृतज्ञता अर्पण करतो, हेही दादांच्या विचारधारेचे विशेषत्व.
दादांनी माणसाच्या विकासाकरिता योगेश्वर कृषी, मत्स्यगंधा, वृक्षिमन्दर, अमृतालयम, श्रीदर्शनम यांसारखे अनेक यशस्वी आध्यात्मिक प्रयोगही केले व ते आजही हजारो गावांत डौलाने उभे आहेत. त्यांच्या रचनात्मक कार्याची दखल विश्वाने घेतली, त्यांना मॅगसेसे, टेम्पलटन, पद्मविभूषण आदी अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले. अर्थात कधीही पुरस्कारासाठी, सन्मानासाठी काम न केलेल्या दादांनी भगवंताचे प्रेमपत्र समजून या सर्व पुरस्कारांचा स्वीकार केला. २५ ऑक्टोबर, २००३ रोजी त्यांचे देहावसान झाले, परंतु ते सदैव विचार व कार्याच्या रूपाने आपल्याबरोबर आहेत हे नि:संशय.
response.lokprabha@expressindia.com