१४ सप्टेंबर २०१२
मथितार्थ

कव्हरस्टोरी
‘चावट’पणाची उलटतपासणी
चावटपणाचे मानसशास्त्र
अश्लीलतेच्या नावानं..

पाठलाग

सिनेशताब्दी

लस आणि सल
स्मरण
मुलाखत
इंग्रजी शब्दसाधना
फ्लॅशबॅक
संग्रहालय
नुलकरच्या कथा
वाचू काही
नक्षत्रांचे नाते
अभिष्टचिंतन
स्टार्टर
उत्सव
चला फिरायला
अनुभव
दुर्गाच्या देशा
पर्यावरण
शॉपिंग
दबंगवाणी
केल्याने रेषाटन
जंगल वाचन
वाचक प्रतिसाद
भविष्य
संपर्क
मागील अंक

कव्हरस्टोरी

चावटपणाचे मानसशास्त्र
डॉ. राजेंद्र बर्वे

विनोदाला माणसाच्या आयुष्यात महत्त्वाचे स्थान आहे. पण तोच विनोद चावटपणाकडे, त्यातही अश्लीलपणाकडे झुकला की तो कमालीचा क्रूर होतो. दुसऱ्याचं अवमूल्यन करतो. दुसऱ्या कुणाचंही अवमूल्यन करायचा कुणालाही काय अधिकार आहे?

एखादी गोष्ट दडवून ठेवायला सुरुवात झाली की, तिच्याबद्दलचं कुतूहल वाढतं हा मनुष्य स्वभाव आहे. आपल्याकडची खजुराहोची शिल्पं, इतरही प्राचीन साहित्य बघितलं तर लैंगिकता ही दडपून ठेवण्याची गोष्ट कधीच नव्हती. अगदी शिल्परूपाने व्यक्त व्हावी इतकी लैंगिकता ही खुली, कलात्मक बाब होती. त्या सगळ्या व्यवहारांमध्ये, त्यासंदर्भातल्या चर्चेमध्ये मोकळेपणा होता. एक निरोगी आविष्कार होता. त्यात कुठेही अश्लीलतेला, चावटपणाला थारा नव्हता. लैंगिकतेला जीवनाचं एक रूप म्हणून स्वीकार केला गेला होता.
आपल्यावर झालेल्या आक्रमणांमधून नंतर वेगवेगळ्या गोष्टींमधले राजकीय, सामाजिक दबाव वाढत गेले. सर्व प्रकारच्या अविष्कारांचं दमन होत गेलं. दमन झाल्यावर ते उफाळून येतं तसं ते सगळं उफाळून येत चावटपणाकडे झुकलं. मोकळ्या खुल्या वातावरणाऐवजी चावटपणाकडे, चटोरपणाकडे कल वाढत गेला.
जी गोष्ट सहज, पटकन मिळत नाही तिच्याबद्दल कुतूहल असतं, उत्कंठा असते. त्यामुळे अतिरंजकता, अनपेक्षितपणा आणि उत्कंठा हे तीन घटक विनोदाचा गाभा म्हणता येईल असे आहेत. हीच गोष्ट चावट विनोदांच्या बाबतीत पण म्हणता येईल. सगळ्या चावट विनोदात अनपेक्षितपणे काहीतरी घडणं हा एक समान धागा असतो. पुरुषाला वाटणाऱ्या मर्दानगीचं त्यात वस्त्रहरण असतं. स्त्री ही लैंगिक बाबतीत अनभिज्ञ असते याचा पर्दाफाश असतो. हे सगळ्या चावट विनोदांमध्ये सापडेल. लैंगिकतेमधला साचेबद्धपणा विनोदामधून मोडून काढला जातो, पण त्याचं जेव्हा अवमूल्यन होतं तेव्हा ते अश्लीलतेकडे झुकतं. त्यातली सूचकता संपते. स्त्री-पुरुषांची अवयवांची वर्णनं, त्यावरून घाणेरडय़ा कॉमेंटस् येतात तेव्हा ते अश्लील होतं. त्यामुळे खेळकर विनोद सुंदर, बुद्धिमान तर अश्लील विनोद घाणेरडा ठरतो. चावटपणात एक सूचकता असते. एक प्रकारची गंमत असते. त्यात बुद्धिमत्ता असते. अश्लील विनोदांमध्ये अशी सूचकता, बुद्धिमत्ता नसते. उलट ते बटबटीत असतात. चांगल्या विनोदात हसत खेळत घेतलेल्या फिरक्या असतात. अशा विनोदांमधून जीवनाच्या विविध पैलूंचं दर्शन घडतं.
अश्लील विनोदांमध्ये अशा हसत-खेळत फिरक्या घेत केलेला निखळपणा नसतो. मुळात अशा विनोदांना इंग्रजीत नॉनव्हेज जोक म्हणतात. त्यातच सगळं आलं. नॉनव्हेज म्हणजेच शिकार, कुणावर तरी केलेली कुरघोडी, आक्रमकता आणि त्याचा घेतलेला आस्वाद हे सगळं आहे. नॉनव्हेज जोक असं म्हणून अशी छुपी आक्रमकता दाखवायची असते.
चावट विनोद शब्दांच्या कोटय़ा करत येतो त्यात गंमत असते. त्यात द्वयर्थ येतो तेव्हा त्याचं अवमूल्यन होतं. दादा कोंडकेच्या सिनेमांमधल्या द्वयार्थातून आपल्याला ते दिसतं. त्यांच्या एका सिनेमात बिनबाह्यंचा ब्लाऊज घालणाऱ्या एका स्त्रीला विचारलेला प्रश्न आहे की, तुला शिंप्याने हात नाही का लावला? जे आहे ते तुम्ही कसं सांगता हेही महत्त्वाचं असतं. पीटर रॉजर केनेडीची स्टँडअप कॉमेडी प्रसिद्ध आहे. या शोसाठी भारतीय, चिनी, जपानी, मलेशियन असे सर्व प्रकारचे लोक येतात. त्यांच्या देशानुसार असलेल्या स्वभाववैशिष्टय़ांना उद्देशून त्यात विनोद सांगितले जातात. लोक ते ऐकतात, एन्जॉय करतात. पण मध्येच एखादा अत्यंत अश्लील म्हणता येईल असा विनोद सांगितला जातो. पण तो अंगावर येत नाही. कारण तो अशा अनेक विनोदांमधला एक म्हणून येत असतो.
चावट विनोदांमध्ये लैंगिक व्यवहारांवर कुरघोडी असते. आपण एक उदाहरण घेऊ. कोणताही सुबुद्ध बरा माणूस पाच मिनिटांत पोर्न फिल्म बघायला कंटाळतो. कारण त्यात तोचतोपणा असतो. माणसाला जगण्यातली गंमत शोधायची असते. अनुभवायची असते. ती त्याला उत्कंठावर्धक वाटत असते. तसंच अश्लील विनोदांचं आहे. माणसाला हवी असलेली उत्कंठावर्धक गंमत त्याला अश्लील विनोदांमधून मिळत नाही तर ती चावट विनोदांमधून मिळते.
तरीही एक गोष्ट आहेच की चावट विनोद ऐकणं, ते एन्जॉय करणं याकडे लोकांचा कल गेल्या काही वर्षांत वाढला आहे. याचं कारण असं की गेल्या पाच दहा वर्षांत लोकांचा कामाचा भार वाढला आहे. त्यातून ताणतणाव वाढले आहेत. आयुष्यातला तोचतोपणा वाढला आहे. त्यामुळे कंटाळा वाढतो. बीपीओसारख्या ठिकाणी कामाचं जे स्वरूप असतं त्यामुळे कंटाळा वाढतो, ताण वाढतो. त्यावरचा उतारा म्हणून चावटपणाकडचा कल वाढला असं होऊ शकतं.
समाजात एक प्रकारचा निकोपपणा असावा अशी आपली इच्छा असते. पण त्याऐवजी येतं काय तर अतिरंजितपणा. ‘एक चावट संध्याकाळ’सारख्या नाटकातून तो स्पष्ट होतो. हे नाटक मी बघितलेलं नाही. पण त्याबद्दल जे ऐकलं आहे, त्यावरून असं नाटक का असावं, असे विनोद रंगभूमीवर का सांगावेत हाच मुळात प्रश्न आहे. कारण हे काही लोकांचं लैंगिक शिक्षण नाही. त्यात काही वास्तव नाही की त्याला काही मूल्यं नाहीत. त्यातून वास्तवाचं भान येतं असंही काही नाही.
पण असे विनोद, अशी नाटकं समाजाचं कॅथर्सिस करतात असं मात्र म्हणता येणार नाही. कारण कॅथर्सिसची गरज कुणाला असते तर ज्या माणसांना अभिव्यक्तीला वाव मिळत नाही त्यांना. कॅथर्सिसमधून वेगळ्या जाणिवा बाहेर पडतात. त्या तशा बाहेर येत असतील तरच ते कॅथर्सिसही महत्त्वाचं असतं. कॅथर्सिसमधून माणूस आपल्या मनातली भीती मोकळी करत असतो. पण ‘एक चावट संध्याकाळ’सारखी नाटकं ही कॅथर्सिस आहे असं म्हणता येणार नाही तर ती नुसती ओकारी आहे.
कोणत्याही विनोदातून जाणीव निर्माण झाली, आपण समृद्ध झालो तर तो विनोद प्रभावी म्हणता येईल. विनोदात क्रूरपणा असतो. आपण तो हलक्याफुलक्या पद्धतीने घेतो. त्यातून विरंगुळा शोधतो. जीवनातल्या विसंगतीला हसतो. ती विसंगती सहन करायला शिकतो. पण अश्लील विनोद हे कमालीचे क्रूर असतात. त्यातून चुकीचे पायंडे तयार होतात आणि तेच ते विनोद पुन्हा पुन्हा केले की ते खरे वाटायला लागतात. हे सगळ्यात भीतिदायक आहे.
चावट, अश्लील विनोद ही एक लाइफस्टाइल आहे. तिला आपण पाठिंबा देतो का, हे लक्षात घ्यायला हवं. ‘एक चावट संध्याकाळ’ हे नाटक फक्त प्रौढ पुरुषांसाठी आहे अशी त्याची जाहिरात केली गेली. त्यात स्त्रियांनी न ऐकण्यासारखे विनोद आहेत असंही संबंधितांचं म्हणणं आहे, पण मुळात हे असं काहीतरी असणं हेच जाम भीतिदायक आहे. स्त्रियांचं यात अवमूल्यन आहे, असं तुम्हीच सांगता. मग तुम्ही मुळात ते करता.. आणि तुम्ही ते खुलेआम जाहिरात करून करत असाल आणि तुम्हाला ते बरोबर आहे असं वाटत असेल तर मग तुमच्या दृष्टीने चुकीच्या, करू नयेत अशा गोष्टी तर कोणत्या आहेत? दुसऱ्या माणसाचं अवमूल्यन करणं हे कधीही चुकीचंच आहे.

‘एक चावट संध्याकाळ’ हे नाटक फक्त प्रौढ पुरुषांसाठी आहे अशी त्याची जाहिरात केली गेली. त्यात स्त्रियांनी न ऐकण्यासारखे विनोद आहेत असंही संबंधितांचं म्हणणं आहे, पण मुळात हे असं काहीतरी असणं हेच जाम भीतिदायक आहे.

दुसरं म्हणजे, प्रौढांसाठीची नाटकं असं म्हणताना तुम्हाला माहीत असतं का आत्ताच्या पिढीच्या हाताशी इंटरनेट आहे आणि ती या सगळ्यात अगदी ग्रॅॅज्युएट आहेत. माझ्याकडे आलेल्या एका क्लाएंटच्या चौथीतल्या मुलाने त्याच्या वयाच्या मुलीला विचारलं, विल यू हॅव सेक्स वुईथ मी.. त्याला बिचाऱ्याला आपण काय विचारतो आहोत त्याचा अर्थ काहीच माहीत नव्हता. पण त्याच्यापर्यंत हे सगळं आदळतं आहे आणि तुम्ही प्रौढांसाठी चावट विनोद असणारं नाटक लिहिता तेव्हा खरोखरच दया येते. हसायला येतं. एक तर असे विनोद लैंगिक चोरटेपणा, चावटपणा, कर्कशा, जाड असणाऱ्या स्त्रिया, बायकोला घाबरणारा नवरा, दारू, धुम्रपान यांच्याशीच संबंधित असतात. मराठी सिनेमे, टीव्ही सीरियल्स, अगदी ते फू बाई फूसारखा कार्यक्रम बघितला तरी हेच सगळं दिसतं. आजची तरुण पिढी या सगळ्याच्या पार पलीकडे गेलेली आहे. तिच्यापासून तुटलेले लोकच हे असं काहीतरी लिहितात.
खरं तर पाश्चात्त्य समाजात विनोदाचा मानसशास्त्राच्या अंगाने खूप अभ्यास झाला आहे. विनोद करताना, ऐकताना मेंदूतल्या बदलांचं स्कॅनिंग करून असं लक्षात आलं आहे की, उजव्या मेंदूचं काम चांगलं असेल तर व्यक्ती विनोदाला प्रतिसाद देते. विनोद करते. तिची वृत्ती विनोदी असते. विनोद तुम्हाला सगळ्या गोष्टींकडे सर्वसमावेशक दृष्टीतून बघण्याची क्षमता देत असतो. तुम्हाला निरोगी ठेवत असतो. पण ते सगळं चावटपणाकडे आणि त्याहीपेक्षा अश्लीलतेकडे झुकलं की किळसवाणं होतं हे लक्षात घ्यायला हवं.
याचाच आणखी एक पैलू म्हणजे स्त्रियांना विनोदबुद्धी नसते असं सर्रास मानलं जातं. पण स्त्रियांवर क्रूर विनोद करून तुम्ही त्यांचं सतत अवमूल्यन करणार आणि त्या विनोदांना त्या प्रतिसाद देत नाहीत तेव्हा त्यांना विनोद कळत नाही असं म्हणणार? तुम्ही केलेल्या त्यांच्या या प्रकारच्या पिळवणुकीला त्यांनी का म्हणून हसायचं? एक गोष्ट लक्षात घ्या की शोषित समाज कधीही हसत नाही. तो गातो. त्यामुळेच आपलं जीवन मांडणारी स्त्रियांची गाणी खूप मोठय़ा प्रमाणावर आहेत. तशी पुरुषांची गाणी नाहीत. त्यांचे विनोद जास्त आहेत. म्हणूनच इथून पुढे तरी त्यांनी ते जबाबदारीने, स्त्रियांचं अवमूल्यन होऊ न देता करायला हवेत.
response.lokprabha@expressindia.com