२७ जुलै २०१२
मथितार्थ
कव्हर स्टोरी
अनियमितता असली तरी. पाऊस येणारच!
फुलले जीवन .. पर्जन्य स्पर्श होता’ |
श्रद्धांजली

संगीत

ऑलिम्पिकचे शिलेदार
गूज हुंदक्याचे
मान्सून डायरी
खुसखुशीत
आयडिया
दुर्गाच्या देशा
साधनचिकित्सा
कोकणचो डॉक्टर
फ्लॅशबॅक
सिनेमा आशिया
नक्षत्रांचे नाते
पुस्तक परीक्षण
वाचू काही
मातीचं आकाश
जंगल वाचन
दुर्गाच्या देशा
श्रद्धांजली
स्टार्टर
शॉपिंग
दबंगवाणी
केल्याने रेषाटन
वाचक प्रतिसाद
भविष्य
संपर्क
मागील अंक

कव्हर स्टोरी
अनियमितता असली तरी. पाऊस येणारच! फुलले जीवन .. पर्जन्य स्पर्श होता’ |

अनियमितता असली तरी. पाऊस येणारच!
निम्मा जुलै संपला तरी राज्यभरात पावसाचा पत्ता नाही. पाऊस पडला नाही तर काही खरं नाही, ही चिंता आता सगळीकडे व्यक्त व्हायला लागली आहे. परिस्थिती खरोखरच गंभीर आहे की, मान्सूनच्या लहरीपणाची ही एक झलक आहे? पाऊस अशी हुलकावणी का देतो आहे?
‘भारतीय हवामान विभागा’चे माजी महासंचालक डॉ. रंजन केळकर यांची प्रज्ञा शिदोरे यांनी मान्सूनच्या विविध पैलूंसंदर्भात घेतलेली सविस्तर मुलाखत..

मान्सून म्हणजे नेमकं काय?
मान्सून म्हणजे दिशा बदलणारे वारे. हे वारे सहा महिने एका दिशेने वाहतात आणि पुढचे सहा महिने ते उलट दिशेने वाहतात. वराहमिहीरनं म्हटलं होतं, आदित्यात जायते वृष्टि:.. भारतीय हवामान विभाग म्हणजेच आय. एम. डी.चंही तेच ब्रीदवाक्य आहे. त्याचा अर्थ असा की सूर्य हा पर्जन्याचा जनक आहे, म्हणून जोपर्यंत सूर्य आहे तोपर्यंत पृथ्वीवर पाऊस पडेल.
पृथ्वी सूर्याभोवती फिरत असल्यामुळे मान्सूनच्या वाऱ्यांची दिशा बदलते. जमिनीचं आणि समुद्राचं तापमान वेगवेगळं असतं. तापमानातल्या या तफावतीमुळे (थर्मल कॉन्ट्रास्ट) मुळे वारे वाहू लागतात. उन्हाळ्यात आशिया खंड खूप तापतो आणि हिंदी महासागराचं तापमान त्या मानानं कमी असतं तेव्हा वारे समुद्राकडून जमिनीकडे वाहतात. उलट हिवाळ्यात आशिया खंड थंड होतो आणि हिंदी महासागर तितका थंड झालेला नसतो तेव्हा वारे जमिनीकडून समुद्राकडे वाहतात. पृथ्वीच्या सूर्याभवतीच्या प्रदक्षिणेमुळे ही परिस्थिती निर्माण होते.
मान्सून हा वैश्विक वातावरणीय प्रकियेचा एक महत्वाचा घटक आहे. हा फक्त भारतातच आहे असं नाही. तो मध्य अमेरिकेत, ऑस्ट्रेलियात, पूर्व आफ्रिकेतसुद्धा आहे. पण मान्सूनचे वारे भारतावर पाऊस घेऊन येतात. इतर देशांमध्ये असं होत नाही. आपल्या पावसासारख्या धो-धो कोसळणाऱ्या धाराही कुठे अनुभवायला मिळत नाहीत. अनेक देशांमध्ये पाऊस हा भुरभुरणाराचं असतो. शीतकटिबंधातील देशांत, उदाहरणार्थ युरोपमध्ये पाऊस वर्षभर पडत असतो.
पूर्वीपासून नेमेचि येतो मग पावसाळा असं जे म्हटलं गेलं आहे, त्यातला नियमितपणा किती खरा आहे?
पूर्णपणे खरा आहे. मान्सून हा नियमितपणेच येतो. अगदी कालिदासानेसुद्धा ‘मेघदूत’ या त्याच्या प्रसिद्ध महाकाव्यात ‘आषाढस्य प्रथम: दिवसे’ असं म्हटलं आहे. याचा अर्थ अगदी १६०० वर्षांपूर्वीसुद्धा मान्सून आषाढाच्या पहिल्या दिवशी रामटेकला येऊन ठेपला होता. आपल्याकडे अगदी तेव्हापासूनची आकडेवारी नसली तरी गेल्या १०० वर्षांची तरी नक्की आहे. त्या आकडेवारीनुसार दर वर्षी आपल्याकडे मान्सून अगदी नियमितपणे आला आहे. म्हणूनच आपली शेती टिकून आहे आणि आपण टिकून आहोत. एखाद्या वर्षी मान्सून आलाच नाही असं घडल्याची नोंद नाही. त्यामुळे मान्सून हा दरवर्षी नियमितपणे येतो म्हणजे येतोच.

पण मग त्याचं आगमन लांबतं, त्याचं काय?
आपल्याकडे मान्सून महत्वाचा असतो, पण तो चार दिवस उशिरा आला की आपण सगळेच एका सामूहिक चिंतेत पडतो. समजा तो एक जूनऐवजी चार जूनला आला, तर खरंच काही बिघडतं का? तर नाही. पण लगेचच मोठी चिंता व्यक्त व्हायला लागते. दुष्काळ पडणार, पाणी नाही वगरे चर्चा सुरू होते. खरं तर तसं काही होत नसतं. सामान्यत १५ जुलपर्यंत मान्सून अख्खा देश व्यापतो म्हणजे केरळ ते राजस्थान असा त्याचा दीड महिन्याचा प्रवास असतो. या वर्षी मान्सून राजस्थानला चार दिवस आधीच पोचला. पण तो लवकर पोहोचल्यावर कोणी त्यावर बोलत नाही. कारण मग ती बातमी होत नाही.

आपली संपूर्ण अर्थव्यवस्था ही पावसावर अवलंबून आहे. एखाद्या वर्षी दुष्काळ असूनही आपल्याला धान्याची कोठारं भरलेली दिसतात, पण त्याचं कारण हा आदल्या वर्षीचा चांगला पाऊस असतो. एखाद्या वर्षी पाऊस कसाही पडला तरी आपण तग धरून राहू शकू, अशी आपली अजूनही परिस्थिती नाही. आपण मान्सूनवर फारसे अवलंबून नाही, असं आपल्याला वाटायला लागलं की मान्सून लगेच आपल्याला त्याचं अस्तित्व दाखवून देतो.

एक गोष्ट आपण लक्षात घ्यायला पाहिजे ती म्हणजे मान्सून नियमितपणा पाळत असला तरी त्याचं वेळापत्रक एखाद्या शाळेच्या वेळापत्रकसारखं नसतं. सर्वसाधारणपणे मान्सून एक जूनच्या सुमारास केरळमध्ये येऊन दाखल होतो. पण तो या तारखेच्या साताठ दिवस मागेपुढेही येऊ शकतो. आगमनाची तारीख ठरवायचं स्वातंत्र्य मान्सूनला आहे. त्यामुळे काही दिवस मागेपुढे झाले तरी मान्सून येईल की नाही अशी काळजी करणं आपण सोडून दिलं पाहिजे. ६-७ जूनपर्यंत पाऊस आला नाही तर लोकांना वाटतं की निसर्गाचं काहीतरी बिघडलं असावं. पण तसं नाही. मान्सूनला स्वत:च्या काही मर्यादा आहेत त्या मर्यादांमध्ये राहून तो आपलं काम करत असतो. पण तो दर वर्षी येईल आणि जोपर्यंत सूर्य आहे तोपर्यंत तो येत राहील, हे मात्र निश्चित.
पण तरीही आपण चिंता करत राहतो कारण आज माणसाचं रोजचं जीवनच हे खूप गुंतागुंतीचं आणि त्यामुळेच ते खूप तणावपूर्ण झालं आहे. आपल्याला सगळ्यांनाच सगळ्याची घाई आणि प्रचंड असुरक्षितता आहे. म्हणून आपण पावसालाही आपल्या तालावर नाचवायचा प्रयत्न करतो.

शेती उत्पादन आणि मान्सून

आपण जर शेती उत्पादन आणि मान्सून असा आलेख पाहिला तर पावसाचे चढ-उतार हे शेती उत्पादनाशी कायम मिळतेजुळते असतात. पण हरितक्रांती नंतर पिकांच्या प्रमाणात खूप वाढ झाली आहे. हरितक्रांतीच्या आधी आपल्याला फक्त दर गुरुवारी रेशन मिळायचं पण आता दुष्काळी परिस्थितीतही आपले बाजार भरलेले असतात. आपलं खरीप उत्पादन पावसावर अवलंबून आहे रब्बी थोडंसं कमी पण तरीही भारतातली शेती ही आजही खूप प्रमाणात पावसावर अवलंबून आहे असं नक्कीच म्हणता येईल.

पण मग काही ठिकाणी पाऊस खूप पडतो तर काही ठिकाणी कमी पडतो. या घटकाकडे कसं बघायचं?
मान्सूनच्या पावसाचं वितरण अनिश्चित आहे, हे खरं आहे. आपल्या देशाचा आकार हा एखाद्या महाखंडासारखा आहे. इथे जगातलं सर्वात जास्त पाऊस पडणारं चेरापुंजी आहे, जिथे वर्षांला ११०० सेंमी पाऊस पडतो आणि त्याचबरोबर राजस्थानचं वाळवंटही आहे जिथे वर्षांला १० सेंमी पाऊस पसतो. हे दोन्हीही प्रदेश आपल्याकडच्या सर्वसाधारण मान्सूनच्याचं प्रदेशात येतात. कदाचित याच बाबीमुळे आपल्याला सतत चिंता लागून असते. अगदी महाराष्ट्रातच बघायचं तर कोकणात पश्चिम घाटामुळे खूप पाऊस पडतो, पुण्यासारख्या ठिकाणी तसा पडत नाही. मुंबईमधल्या पावसाचं रूप तर इतरत्र कुठेच बघायला मिळत नाही. तर औरंगाबाद, बीड, मराठवाडा, विदर्भाचा काही भाग, सोलापूर, सातारा इथे कायमच दुष्काळ सदृश परिस्थिती असते. देशाच्या पातळीवर बघायचं तर दरवर्षी आसाममध्ये ब्रम्हपुत्रेला येणारा पूर, बिहारमधली पूरस्थिती, कुठे जोरदार पाऊस आणि कुठे तुलनेत कमी पाऊस असा प्रादेशिक असमतोल दिसतो. पण तो मान्सूनच्या सामान्य परिस्थितीचाच भाग आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे.
पावसाळ्याच्या चार महिन्यांच्या कालावधीमध्ये तो टप्प्या-टप्प्यांनी पडतो. ही खरंतर निसर्गाने आपल्यासाठी केलेली सोयच आहे. पाऊस चार महिने अखंड धो-धो पडत राहिला तर कठीणच होईल. शेतीलाही पेरणीनंतर उघडीप लागतेच. त्यामुळे या सगळ्याला अनियमितता असं म्हणता येणार नाही.
इंग्रजांच्या काळात आपल्याकडे दोन भीषण दुष्काळ पडले होते, ज्यांत लाखो लोकांचे भूकबळी गेले. हे १८९९ आणि १९१८ चे दुष्काळ. पण त्या वर्षीही पाऊस शून्य नव्हता तर तो सरासरीच्या ७०% पडला होता. आतापर्यंत आपण सर्वात जास्त म्हणजे ३०% एवढीच पावसाची कमतरता अनुभवली आहे.

पण यावर्षी अजून पुरेसा पाऊस झालेला नाही. म्हणजे सुरूही झालेला नाही..
आपल्या देशात मागच्या दोन वर्षांचं अन्यधान्याचं उत्पन्न जवळजवळ २५० मिलियन टन एवढं होतं. या वर्षी उत्पन्नात भारताने उचांक गाठला. का? कारण मान्सून नोव्हेंबपर्यंत रेंगाळला. हा रेंगाळणारा पाऊस खरंतर सामान्य मान्सूनचे लक्षण नाही. पण त्याने सर्व धरणे भरली. त्यामुळे जमिनीत मुरलेल्या पाण्यावर वाढणारं रब्बी पीक खूप प्रमाणात घेता आलं. त्यामुळे पंजाबमध्ये गहू, महाराष्ट्रात ज्वारी बाजरी याचं भरघोस पीक आलं. म्हणून या वर्षी जरी दुष्काळ पडला तरी आपल्याला चिंता करायचं कारण नाही कारण आपली कोठारं भरलेली आहेत.
त्याउपर मान्सून हा चार महिन्यांचा असतो, अजून फक्त ४५ दिवस झाले आहेत. अजून अडीच तीन महिने आहेत आणि त्यात राहिलेली तूट भरून निघण्याची मोठी शक्यता आहे.
हवामान खातं जेव्हा म्हणतं की एकूण चार महिन्यात मान्सून सामान्य राहणार आहे, तेव्हा आपण या चार महिन्यांच्या काळातला हा भाग विसरतो. याचा अर्थ असा की मान्सूनमध्ये रोज चांगला पाऊस नाही पडत. मान्सूनचा इतिहास पाहिला तर असं दिसून येतं की जेव्हा जेव्हा जून आणि जुल मध्ये पाऊस कमी पडला आहे तेव्हा तेव्हा निसर्गाने ऑगस्ट- सप्टेंबरमध्ये चांगला पाऊस दिला आहे. राजस्थानमध्ये काही ठिकाणी चार महिन्यांत फक्त १५ सेंमी पाऊस पडतो. त्यात शेतीही व्यवस्थित होते. पण कधीकधी हा १५ सेंमी पाऊस एकाच दिवशी पडून जातो. पण हवामान खातं मात्र म्हणतं की, त्या भागातला वार्षकि पाऊस हा सामान्यच झाला आहे. अशी ही मान्सूनची परिवर्तनशीलता आहे आणि आकडेवारी ही कधी कधी फसवी असू शकते. या आकडेवारीचं योग्य विश्लेषण व्हायला हवं.

शेतकऱ्याला आय. एम. डी. चा कसा आणि किती उपयोग होतो?
नसíगकरीत्या शेती ही एका विशिष्ठ प्रकारच्या मान्सूनशी मिळतीजुळती असते. त्याला अनुसरून आपल्याकडे काही म्हणीही आहेत की ‘पडशील हस्ता, तर खाशील खस्ता’.. आपल्या शेतीचं एका विशिष्ठ प्रकारच्या मान्सूनची नातं जुळलं आहे आणि ते मान्सून उशिरा आला असला की बिघडतं. पण आता आय.एम.डी देशातल्या हजारो शेतकऱ्यांना दररोजचा अंदाज एस.एम.एस द्वारे कळवत असते. त्या एस.एम.एसना शेतकरी उत्तरही देतात. त्यामुळे शेतकरी फक्त त्याच्या पारंपारिक ज्ञानावरच अवलंबून आहे अशी काही परिस्थिती राहिलेली नाही. अनेक शिक्षित शेतकरी आय.एम.डीचे संकेतस्थळ बघूनसुद्धा अनेक निर्णय घेत असतात. आपली शेतीसुद्धा तशी लवचिक असते. शेतकऱ्यालाही बरचसं स्वातंत्र्य आणि आपल्याला जितकं वाटतं तितका तो बांधलेला नाही.
मे महिना आला की, कोरडय़ा जमिनीवर बसलेला आणि निरभ्र आकाशाकडे डोळे लावलेला एक चिंतातूर शेतकरी सर्व वृत्तपत्रात बघायला मिळतो. पण शेतकऱ्याचं ज्ञान आपण कमी लेखू नये. शेतकऱ्याच्या पारंपारिक ज्ञानाचा आणि हवामानशास्त्रज्ञांकडे असलेल्या आधुनिक तंत्रज्ञानाचा आणि माहितीचा मेळ घालून निर्णय घेतेले गेले पाहिजेत. या निर्णय प्रक्रियेसाठीही अनेक पर्याय उपलब्ध आहेत की जे आधी उपलब्ध नव्हते. आज बाजारात विविध प्रकारची बियाणे उपलब्ध आहेत की जी वेगवेगळया वातावरणीय परिस्थितीत तग धरून राहू शकतात, काही उशिरा पेरायच्या जाती असतात, काही कमी पाण्यावर वाढणाऱ्या जाती असतात. मान्सूनचे स्वरूप पाहून पिकांची निवड करता येते.

पण हवामानाचे अंदाज का चुकतात?
जगातला कोणताही शास्त्रज्ञ आज एखाद्या शेतकऱ्याच्या शेतासाठी चार महिन्यासाठी अंदाज वर्तवू शकणार नाही. ‘मान्सून संपूर्ण देशामध्ये सामान्य राहील,’ असा राष्ट्रीय पातळीवरचा अंदाज बरोबर येण्याचं प्रमाण बरंच अधिक असतं. तुम्ही जसजसे लहान प्रदेशाकडे येता तसा तुमचा अंदाज चुकण्याची शक्यताही वाढत जाते. एखाद्या शेतकऱ्याने सांगितलं की त्याला चार महिन्याचा पावसाचा घटनाक्रम आखून द्या, तर ती एक अशक्य गोष्ट आहे. म्हणून हवामान खातं हे एक साधारण अंदाज मांडतं की अमुक एका भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे. कारण, मान्सून इतक्या मोठय़ा प्रमाणात अनियमित आहे की त्याच्याविषयी तंतोतंत अंदाज करणं ही अशक्य गोष्ट आहे. पण त्याचबरोबर हेसुद्धा लक्षात घेतलं पाहिजे की मान्सूनच्या नियमितपणामध्ये स्वातंत्र्य आहे तसंच त्याच्या अनियमितपणालाही काही मर्यादा आहेत.
या वर्षीचा पाऊस सरासरीपेक्षा २०% कमी झाला आहे असं आपण ऐकत असतो. पण तात्विकदृष्टय़ा बघितलं तर ८०% पाऊस पडला आहे, हे आपण विसरत असतो. मग या ८०% पावसाचं काय झालं, त्याचा कोणी विचार करत नाही. हे ८०% प्रमाणही भरपूर आहे, एवढय़ा पावसाच्या आधारेही बऱ्याच गोष्टी करता येतात.
मुंबईत सर्वत्र भरपूर पाऊस पडला नाही, पण पाणीपुरवठा करणाऱ्या चार तळ्यांच्या परिसरात पुरेसा पाऊस पडला तरी मुंबईचा पाणीप्रश्न सुटू शकतो. पण ती ठिकाणं वगळता इतरत्र पडला, तर मात्र प्रश्न गंभीर होऊ शकतो.

मे महिना आला की, कोरड्या जमिनीवर बसलेला, निरभ्र आकाशाकडे डोळे लावलेला एक चिंतातूर शेतकरी सर्व वृत्तपत्रात बघायला मिळतो. पण शेतकऱ्याचं ज्ञान आपण कमी लेखू नये. शेतकऱ्याच्या पारंपारिक ज्ञानाचा आणि हवामानशास्त्रज्ञांकडे असलेल्या आधुनिक तंत्रज्ञानाचा आणि माहितीचा मेळ घालून निर्णय घेतेले गेले पाहिजेत.

पण हवामानचे तंतोतंत अंदाज सांगणं शक्य आहे का?
त्यासंदर्भातल्या घटकांकडे तुम्ही कसं पाहता यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. कोणत्याही हवामान शास्त्रज्ञाला योग्य हवामानाचे, योग्य निदान करायचं असेल तर तुम्हाला हवामानाबरोबर जगायला पाहिजे. आत्ताची पिढी, सगळी कामं संगणकावर करते. मला त्यासाठी तिला दोष द्यायचा नाही पण मी त्यांना कायम सांगत असतो की जरा खिडकी उघडून बाहेर जाऊन बघा. ज्या लोकांनी मान्सून पहिला नाही त्यांनी तयार केलेल्या मॉडेल्स वर काम करता? तुम्हाला पावसात भिजल्याशिवाय पावसाचं योग्य निदान करता येणार नाही. आज आपल्याकडे जगातल्या कोणत्याही प्रगत देशाकडे जसं तंत्रज्ञान असायला हवं तसं तंत्रज्ञान आहे. आपल्याकडे स्वयंचलित रडार आहे, हवामानाचे अंदाज बांधण्यासाठी उपग्रह आहे पण आपण वापरतो ती मॉडेल्स बाहेरच्या लोकांनी बनवलेली आहेत. ज्यांना इथल्या पावसाशी घेणं देणं नाही अशांनी बनवलेली मॉडेल घेऊन इथल्या हवामानाच निदान कसं काय करता येणार? ज्यांना इथला हिमालयसुद्धा माहीत नाही त्यांच्याकडून आपण योग्य निदानाची अपेक्षा नक्कीच करू शकणार नाही. यातली आणखी एक खेदाची बाब अशी की आपली हुशार मुलं तिथे जाऊन ती मॉडेल्स बनवतात. पण ती इथे बसून तसं काम करायला तयार होत नाहीत. आपण त्यांना इथेच थांबवू शकलो तर गोष्टी खूपच बदलतील.

ही मॉडेल्स आपल्यासाठी पुरेशी योग्य नाहीत असं तुम्ही म्हणत आहात, ते कशामुळे?
पावसाचा अंदाज व्यक्त करताना सगळ्यांचे हेतू हे शुद्ध असतातच असं नाही. अमेरिकेला भारतातल्या मान्सूनचं महत्व का वाटावं? भारतातल्या लोकांच्या भल्यासाठी नव्हे, तर जर इथला मान्सून खराब होणार हे आधीच कळलं तर ते त्यांच्या वस्तूंच्या किंमती वाढवून ठेवतील, धान्य उत्पादन करून ठेवतील. आज आपल्या बाजारपेठा इतक्या एकमेकांशी संबंधित आहेत की एकाची अर्थव्यवस्था गडगडली तर त्याचा परिणाम अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेवर होत असतो. आपल्याकडे दुष्काळ पडला की तुलनेनं अमेरिकेची अर्थव्यवस्था सुधारणार. हे सगळंच एकमेकांशी इतकं जवळचा संबंध असलेलं आणि त्यामुळेच गुंतागुंतीचं झालं आहे

की प्रत्येकालाच चिंता आहे की दुसरीकडे नक्की काय चाललं आहे?
दुर्दैवाने आज आपल्याकडे देशाबाहेर तयार झालेली मॉडेल्स वापरली जातात. अनेक पाश्चात्य मॉडेल्स आपल्या सर्व भौगोलिक परिस्थितीचं योग्य निदान करू शकत नाहीत. मग ते त्या गोष्टी सरळ गाळून टाकतात आणि मॉडेल बनवतात. महाराष्ट्रातला पश्चिम घाट आणि त्याच्याच पायथ्याशी पर्जन्य छायेतला प्रदेश याकडे तुम्ही डोळेझाक केलीत तर नक्कीच तुमचं पावसाचं गणित चुकणार. अर्थात प्रत्येक वेळी असं करतातच असं नाही

बाहेच्या या मॉडेल्सना मान्सूनचे निदान करण्यात नेमका अडथळा कशाचा येतो?
मान्सूनचे निदान करण्यासाठी सर्वात मोठा अडथळा म्हणजे एखाद्या ढगातून किती पाऊस पडेल याचा अंदाज करता येत नाही. जगातल्या अनेक हवामान शास्त्रज्ञांपुढे आज हा प्रश्न उभा आहे. कारण एका ढगात कोट्यावधी कण असतात. त्याच्या भोवती साचलेल्या बाष्पाचं पाणी व्हायला पाहिजे, मग ते थेंब मोठे व्हायला पाहिजेत आणि मग ते पावसाच्या रूपात खाली पडायला पाहिजेत. हा सगळा तुम्ही हिशोब लावला तर या ढगात इतके कोटी कण होते, त्यांच्याभवती एवढं बाष्प साठलं आणि त्याच्या एवढा पाऊस पडू शकतो. हे झालं गणित. पण हे कधीच बरोबर येत नाही कारण त्या ढगात किती कण आहेत हे आपल्याला कधीच कळू शकत नाही. आपल्याला कायमच त्याचा अंदाज बांधावा लागतो.
या मॉडेल्समधले हे प्रतिबंध आपला अंदाज चुकवतात. परदेशात हा प्रश्न बऱ्याचदा येत नाही. कारण त्यांच्याकडे आपल्यासारखा भूप्रदेश नाही. उंचसखल भाग नाही. म्हणून ते आपल्याकडचा पावसासाठीचा अत्यंत महत्वाचा असा भूप्रदेश केवळ एक किरकोळ बाब म्हणून सोडून देतात.

आपल्याकडे मान्सूनचा अंदाज बांधण्यासाठी कोणती मॉडेल्स वापरली जातात?
आपल्याकडे आज मान्सूनचं निदान करण्यासाठी दोन प्रकारची मॉडेल्स वापरली जातात. एक म्हणजे संख्याशास्त्रीय आणि दुसरं म्हणजे डायनॉमिकल मॉडेल. संख्याशास्त्रीय मॉडेल म्हणजे कावळा बसायला आणि फांदी तुटायला असं आहे. यातल्या घटकांमध्ये परस्परसंबंध निश्चित नसतो. जर ५०% चं आपण नक्की सांगू शकणार असू तर अशी मॉडेल्स अचूक निदान करायला योग्य नाहीत. यामध्ये मान्सूनच्या काही महिने आधी मान्सूनवर परिणाम करणाऱ्या घटकांचा परस्परांशी संबंध लावला जातो. जसं एल निनो. सुरवातीला असं वाटायचं की जितक्या जास्त घटकांचा आपण अभ्यास करू शकू तितकं आपलं मॉडेल भक्कम होईल. पण हे पुढे चुकीचं ठरलं. कारण हे घटक हे खरंतर एकमेकांवर अवलंबून असतात. म्हणून जास्त घटक घेऊन आपण आपल्या मॉडेलमध्ये कोणतीही गुणात्मक वृद्धी करत नाही. आधी गोवारीकरांचं १६ घटकांच मॉडेल होतं ते बरंच गाजल होत. त्यानंतर आम्ही आठ घटकांचा अभ्यास करू लागलो. आणि आता तर हे घटक पाचवर आणले आहेत.
परत, ही सर्व आकडेवारी आहे. जसं युरोपात बर्फ पडला किंवा एल-निनोचा परिणाम वाढला तर त्याचा मान्सूनवर विपरीत परिणाम होतो इत्यादी. हे फक्त संख्याशास्त्रीय संबंध आहेत. यामागचं भौतिकशास्त्र समजत नाही, हा यातला सर्वात मोठा दोष. कधीकधी त्यामागचं भौतिकशास्त्र कळत असतं पण मग आकडेवारी पूरक नसते. हे संबंध सतत बदलत असतात, पण त्यामागचं कारण माहीत नाही. म्हणून ही मॉडेल्स ही कायमस्वरुपी होऊ शकत नाहीत. त्यामुळे ती सतत बदलावी लागतात. मॉडेल्स सतत बदलली तर विश्वासार्हता कमी होते. म्हणून दोन्ही बाजूंनी आपण कोंडीत सापडतो. म्हणून ही मॉडेल्स तयार करायला तुलनेत सोपी, पण त्यावर काम करायला अत्यंत अवघड असतात.

आणि डायनामिकल मॉडेल्स कशी असतात?
ही मॉडेल्स बनवायला अत्यंत प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करावा लागतो. यामध्ये संपूर्ण वातावरण हे समीकरणांमध्ये मांडलं जातं. यात पावसाला पूरक असे सर्व भौतिक घटक लक्षात घेतले जाऊ शकतात. तुम्ही ही समीकरणे बनवू शकता आणि सोडवूही शकता. आजची परिस्थिती मांडून उद्याच्या परिस्थितीचा अंदाज बांधला जाऊ शकतो. पण जसं आपण त्या ढगाचं पाहिलं तसं यामध्ये एकावेळेला कोट्यावधी निरीक्षणे मांडवी लागतात. आणि त्यासाठी प्रचंड आकडेवारी लागते.
भारताचा विचार करायचा झाला तर आपल्याला एक साधं डायनामिकल मॉडेल बनवायला ५०० वेधशाळांकडून आकडेवारी मिळू शकते. पण तरी तुमचा अंदाज चुकू शकतो. कारण तुम्हाला यासाठी प्रत्येक एक किलोमीटर मागे आकडेवारी लागेल. ते अशक्य आहे. म्हणून आपल्याकडे एक जटिल मॉडेल आहे ज्यामध्ये तुम्हाला आकडेवारी मिळू शकत नाही आणि एक साधं मॉडेल आहे ज्याची आकडेवारी मिळू शकते. पण हे पर्याय निवडायला कठीण आहे.
तुम्ही एक अत्यंत गुंतागुंतीच एक जागतिक मॉडेल बनवलं तर तुम्हाला साधारण एका मोठय़ा भूभागाचा अंदाज येऊ शकतो पण मग आपल्या पश्चिम घाटासारख्या लहान ठिकाणांचे हवामानाचे अंदाज आपण वर्तवू शकणार नाही. याला पर्याय म्हणून आपण प्रादेशिक मॉडेल बनवलं, तरी त्याला त्याच्या म्हणून मर्यादा आहेतच. एकवेळ जगातल्या भूभागावरची आकडेवारी आपल्याला मिळेलही, पण महासागरामधल्या हवामानाचं काय? जास्त परिणाम तिथल्या हवामानावरच परिणाम होत असतो आणि तिथलीच आकडेवारी मिळणं सर्वात कठीण आहे. कारण उपग्रह खूप अंतरावर असल्याने त्यामार्फत मिळणारी आकडेवारी सदोष असू शकते आणि बोटीतून आकडेवारी घ्यायची झाली तर महासागरात किती बोटी उतरवणार?
म्हणून मॉडेल्स कोणती वापरावीत हे ठरवणं अत्यंत कठीण आहे. कारण तुम्हाला निर्दोष मॉडेल मिळू शकतं पण त्यासाठी लागणारी आकडेवारी सदोष असते, किंवा उलट, सदोष मॉडेल आणि निर्दोष आकडेवारी. या दोन्हीचाही अचूक निदानासाठी उपयोग नाही.
त्यामुळे आज बऱ्याच वेळा अनेक दोषपूर्ण मॉडेल्स घेऊन त्याचं एकत्रित मॉडेल बनवण्यात येतं त्याला मॉडेल ऑनसोम्ब्ल्स असं म्हणतात. या मॉडेलने बरोबर अंदाज मांडावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जाते. या गोष्टीला माझा तात्विक विरोध आहे. कारण कितीही प्रयत्न केले तरी सदोष मॉडेल्समधून निर्दोष अंदाज कसे मांडणार?
म्हणजे आपल्याकडचा मान्सून लक्षात घेऊन त्यानुसार मॉडेल विकसित करण्याची गरज आहे, असं तुम्ही म्हणता आहात..
होय. अशा त्रुटींना छेद द्यायला आज आपल्याला पूर्ण भारतीय बनावटीचं मॉडेल तयार करण्याची गरज आहे. आपल्याकडच्या मान्सून मिशनमध्ये वापरलं जाणारं मॉडेलही अमेरिकन बनावटीचं आहे. खरंतर आपल्याला या मॉडेल्समधून मिळणाऱ्या आकडेवारीचं योग्य विश्लेषण करणाऱ्या लोकांची गरज आहे आणि दुर्दैवाने तेच आपल्याकडे नाहीत. पूर्वी कसे आपल्याकडे फॅमिली डॉक्टर्स असायचे. त्यांना आपली इत्यंभूत माहिती असायची आणि ते पटकन आपल्याला काय झालं असेल तर ओळखायचे. आज डॉक्टर आपल्याला हजार टेस्ट करायला सांगतात आणि रिपोर्ट वाचून काय झालंय ते सांगतात. मग तो रिपोर्ट वाचून मीही सांगेन ना मला काय झालं ते, त्यासाठी मी डॉक्टरकडे कशाला जाऊ? या मॉडेल्सचं तसं झालं आहे. त्यांचा वास्तवाशी खूप कमी संबंध आहे आणि केवळ सद्धांतिक उपयोगासाठी ती बनवली आहेत. योग्य निदानासाठी आपल्याकडच्या मुलांनाच तयार व्हावं लागणार आहे. तसं त्यांना तयार करावं लागणार आहे. ते ते बनवतील ते कदाचित साधं असेल, पण आपला त्यावर विश्वास असायला हवा. आपण ही मॉडेल्स तयार करत असताना मान्सूनवर प्रभाव टाकणारे भारतातले लक्षणीय मुद्दे जसं हिमालय, दक्खनचं पठार, पश्चिम घाट इत्यादी घटकांकडे दुर्लक्ष करता कामा नये. असं करण्यासाठी आपल्याला मनापासून काम करणारी माणसं हवीत. येत्या १०-२० वर्षांत अशी उत्तम मॉडेल्स बनतील, असा मला विश्वास आहे. कारण आज आपल्याकडे बऱ्याच गोष्टी आहेत. आपल्याकडे १५० वर्षांची आकडेवारी आहे. पुण्यातलं जे नॅशनल डेटा सेंटर आहे, ते अक्षरश माहितीचा खजिना आहे. आपल्याकडे हवामानाचा अभ्यास करण्यासाठी उपग्रह आहे. आपल्याकडे तंत्रज्ञानाची कमतरता अजिबातच नाही. फक्त एकच गोष्ट आपल्याकडे नाही ती म्हणजे इच्छा! ही इच्छाशक्ती निर्माण करणं सर्वात कठीण काम आहे. पण समविचारी माणसांना एकत्र आणून आपण हे काम केलंच पाहिजे. ते अवघड आहे, कारण भारतातच राहून काम करणाऱ्यांची संख्याच आज कमी आहे. अर्थात कोणीच नाही असं नाही. ओरिसामधल्या वादळाच्यावेळी गळ्यापर्यंत पाणी आलं असतानाही निरीक्षणं नोंदवणारे लोकं आपल्याकडे आहे. त्यांची संख्या वाढायला हवी.

आपल्याकडचा मान्सून दरवर्षी वेगळा असेल तर दरवर्षीच्या मान्सूननुसारं वेगळं मॉडेल बनवणं शक्य आहे का?
मान्सूनमध्ये तीन गोष्टी असतात. एकतर वारे, ढग आणि सूर्यप्रकाश. पाऊस हा या तिन्हींचा एकत्रित परिणाम आहे. कधीकधी बरोब्बर एक जूनला नर्ऋत्य मोसमी वारे केरळमध्ये वाहायला लागतात. कधीकधी अरबी समुद्राकडून सरळ मान्सून गुजरात पार करून राजस्थानला जातो, मग दिल्लीला जातो. कधीतरी तो आसामहून येतो तेव्हा पश्चिम बंगालला आधी पाऊस मिळतो मग महाराष्ट्राला मिळतो. प्रत्येक वेळेस वाऱ्याची दिशा वेगळी, सूर्यप्रकाशाचं प्रमाण वेगळं आणि त्यामुळेच प्रत्येक वर्षांतला मान्सून वेगळा. त्यामुळे या मान्सूनचं मॉडेल बनवणं ही अशक्यप्राय गोष्ट आहे. कारण प्रत्येकवर्षी मान्सूनचे नखरे वेगळे असतात. एकदा पंडित नेहरू मुंबईचा मान्सून बघायला मुंबईमध्ये आले पण दोन दिवसांनी त्यांनी वर्तमानपत्रात वाचलं की मान्सून येऊन गेला. तेव्हा त्यांनी ‘monsson came like a thief’ असा लेखही लिहिला होता.

हवामानाचा अंदाज व्यक्त करणाऱ्या हवामानशास्त्रज्ञांचं आधुनिक ज्ञान आणि शेतकऱ्याचं पारंपरिक ज्ञान यांचा वास्तवात ताळमेळ आहे का?
आपण अंदाज वर्तवताना आणि त्या अनुषंगाने निर्णय घेताना पारंपारिक ज्ञान आणि शास्त्रीय प्रारूप (मॉडेल) यांची सांगड घालायला हवी. शास्त्रज्ञ फक्त आपलं प्रारूप खरं ठरलं की नाही यातच धन्यता मानतात. प्रत्यक्षात त्याचा काय परिणाम होतो आहे याच्याशी त्याचं घेणं देणं फारच कमी असतं. पण शास्त्रीय आकडेमोड शेतकऱ्याचं समाधान करू शकत नाही. त्याला पाणी पाहिजे असतं. म्हणून शास्त्रज्ञाने कायम वास्तवाचे भान ठेवले पाहिजे. त्याचबरोबर शेतकऱ्यानेही शास्त्रीय माहितीचा उपयोग करून घेतला पाहिजे. आज बरेच तरुण शेतकरी हे करतातही, पण शास्त्रज्ञ आणि शेतकरी या दोघांचीही मानसिकता बदलण्याची गरज आहे.
असंच एकदा ओरिसा मधल्या पुरीच्या समुद्र किनारी फिरत असताना काही मच्छिमार भेटले. ते एका खांबाला टेकून बसले होते. मी त्यांना विचारलं की काय? कसला खांब आहे हा? तेव्हा त्यांनी तो हवामानाचा खांब असल्याचं सांगितलं. पुढे विचारलं तेव्हा ते म्हणाले की जेव्हा इथे वादळ येतं तेव्हा इथला दिवा लागतो आणि एकदम योग्य चेतावणी देतो. मला बरं वाटलं. मग पुढे विचारलं की मग तुम्ही काय करता? तर तेव्हा ते कोळी म्हणाले की तेव्हाच बरोब्बर आम्ही समुद्रात जातो, कारण तेव्हाच आम्हाला सगळ्यात जास्त मासे मिळू शकतात. हवामान खात्याची धोक्याची सूचना बरोबर असली तरी तीच वेळ आहे की त्यांना सर्वात उत्तम मासे मिळतात. ही प्रत्यक्षातली गोष्ट विरुद्धच असते. परत हा मनुष्य जर चार दिवस घरी बसला तर त्याची बायकामुलं खाणार काय? आपली सामाजिक परिस्थितीच अशी आहे की आपण शास्त्रीयदृष्ट्या कितीही प्रगती केली तरी आपल्याला या सामाजिक-आर्थिक परिस्थितीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. तुमचं शास्त्र हे तुमच्या सामाजिक गरजाही पुरवणारं हवं. हे घडेल, पण अतिशय सावकाश..

मान्सूनच्या पावसाचा पूर्ण अभाव या परिस्थितीला दुष्काळ म्हणायचं की..?
आपण सर्वसामान्य मान्सून जर १००% धरला तर ९६% ते १०४% हा सर्वसामान्य पाऊस. ९६% ते ९०% हा सर्वसामान्य प्रमाणापेक्षा कमी पाऊस. आणि ९०% खाली हा दुष्काळ. म्हणजे जर देशभरामध्ये १०% पाऊस कमी पडला तर देशभरात दुष्काळ आहे असं म्हणू शकतो. असंच तुम्ही खालच्या स्तरांवर गेलात तर देशाच्या छोट्या प्रदेशांवर २०% पाऊस कमी पडला तर त्याला दुष्काळ म्हणतात. आणि हे ही मान्सूनच्या शेवटी. खरंतर मला आपण जेव्हा देशभरात ९०% पाऊस पडला तरी दुष्काळ जाहीर करतो ते शास्त्रीयदृष्ट्या पटत नाही. पण खरं कारण असं आहे की ९०% पडला तरी जेव्हा तुम्हाला हवा होता तेव्हा पाऊस पडला नाही म्हणून दुष्काळ जाहीर करतात. म्हणजे पेरण्या केल्या पण पाऊस झाला नाही, धरणं भरली नाही तरी त्याला आपण दुष्काळ म्हणतो. पण हा दुष्काळ पावसाच्या प्रमाणाचा नसून असलेल्या पावसाचं योग्य नियोजन न केल्यामुळे आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. याने जो शेतकरी फक्त पावसावर अवलंबून आहे त्याला फटका बसू शकतो. आपल्या देशामध्ये आता सिंचन करण्यायोग्य जागा शिल्लक नाही. आपण हे समजून घेतलं पाहिजे की पाऊस कितीही पडला तरी सिंचनाचं प्रमाण काही वाढणार नाही. त्यामुळेच आपल्याला स्थानिक उपायांवर भर दिला पाहिजे. पण महाराष्ट्रात तांत्रिक आणि भौगोलिक त्रुटींमुळे आपण सिंचन वाढवू शकणार नाही.

म्हणजे दुष्काळ पावसाच्या अभावामुळे नसतो तर मानवनिर्मित असतो असं तुम्हाला म्हणायचं आहे..
होय. ब्रिटीशकाळी दुष्काळासाठी संकेत होता. त्यामध्ये दुष्काळी परिस्थितीमध्ये जिल्हाधिकाऱ्यांना विशेष अधिकार कधी द्यायचे याचे काही संकेत ठरले होते. त्यामध्ये ३१ जुलपर्यंत वाट बघितल्याशिवाय दुष्काळ जाहीर करायचा नाही, असा संकेत होता. आता आपण मार्चमध्येच दुष्काळ जाहीर करून टाकतो. मार्च ते मे हे सामान्यात: कोरडेचं महिने असतात. याचा पावसाच्या न येण्याशी काहीही संबंध नाही. याचा संबंध मागच्या मान्सूनच पाणी तुम्ही व्यवस्थित वापरू शकला नाहीत या वस्तुस्थितीशी आहे आणि ही परिस्थिती पूर्णपणे मानवनिर्मीत आहे. हा दुष्काळ पाण्याच्या व्यवस्थापनात त्रुटी राहिल्यामुळे आलेला दुष्काळ आहे. याला कोणताही शास्त्रीय आधार नाही.
पडलेला पाऊस आपण वाहून जाऊ दिला तर त्या पावसाचा काहीच उपयोग नाही. पाणीसाठा वाढवण्यासाठी आपण स्थानिक उपायांवर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. पंजाबमधल्या शेतकऱ्यांनी भूगर्भातलं इतकं पाणी उपसून ठेवलं आहे की थोड्याच वर्षांत तिथे पाण्याचा मोठा तुटवडा जाणवायला लागणार आहे. ऑस्ट्रेलियामध्ये अनेक वर्ष दुष्काळ आहे, आणि त्यामुळे तिथे बोअर खणायला सरकारी परवानगी लागते. पण आपल्या इथे आपण कुठेही बोअर खणू शकतो. त्याउपर महानगरपालिका बांधकाम करण्यासाठी तुमचं पाणी तुम्ही उभं करा असं म्हणते. म्हणजे थोडक्यात जमिनीला भोक पाडून भूगर्भातलं अमूल्य पाणी उपसा असंच ना? आपल्या देशात १२ पकी चार महिने पावसाळा असतो आणि आपण उरलेले आठ महिने पाणी साठवून ठेवणं अपेक्षित आहे. तसा संकेतही निसर्गाने आपल्याला या मान्सूनच्या रुपाने दिला आहे. पण आपण त्याकडे दुर्लक्ष करतो आणि साठवलेलं पाणी संपलं की, मान्सूनची वाट पहात राहतो. आणि मॉन्सूननं साथ दिली नाही तर मग आपल्याकडे दुष्काळ पडला आहे, असं म्हणतो. हे योग्य नाही. आपण हे अगदी नीट लक्षात ठेवलं पाहिजे की भारतात मान्सून हा एकमेव पाण्याचा स्त्रोत आहे. त्यामुळे तो आला की त्याचं योग्य नियोजन करणं हे आवश्यक आहे.

मान्सूनचं योग्य नियोजन म्हणजे नेमकं काय?
आपली अर्थव्यवस्था ही संपूर्णपणे मान्सूनवर आधारलेली आहे, पण तरीही आपण आपला अर्थसंकल्प मार्चमध्ये सादर करतो. १९०५ पासून जेव्हा असं म्हटलं गेलं की भारतीय अर्थव्यवस्था ही मान्सूनशी जुगार खेळल्यासारखी आहे, आणि आत्तापर्यंत जेव्हा प्रणब मुखर्जीनी इंद्रदेवातेला प्रार्थना करून आपला अर्थसंकल्प सादर केला, पाऊस इतका महत्वाचा आहे तर, मान्सूनचा रंग बघूनच अर्थसंकल्प सादर केला गेला पाहिजे. हा बदल खूप कठीण आहे. पण आपलं बजेट हे इतक्या शक्यतांवर अवलंबून राहू शकत नाही. म्हणून अर्थसंकल्पच सप्टेंबर- ऑक्टोबरमध्ये मांडला गेला तर आपल्याला दर वर्षीच्या नराश्यातून जावं लागणार नाही. आधी बघा मान्सून कसा आहे, तुमचं शेतीचं उत्पादन कसं आहे, मगच पुढच्या वर्षांचं नियोजन करा. मान्सून आल्यावर देव पाण्यात ठेऊन बसण्यात काय अर्थ आहे? हे अतिशय अवघड आहे, मान्य, पण कधीतरी हा बदल करायला नको का?एवढय़ा सगळ्या गोष्टी विकसित झाल्या आहेत, अभ्यास होतो आहे. तरीही हवामानाचे अंदाज मांडताना संदिग्धता का असते?
हवामानाचा अंदाज वर्तवताना अनेकदा भाषेची अडचण येते. पुष्कळदा हवामानाचा अंदाज बरोबरही असतो पण आपण ज्या भाषेत, ज्या पद्धतीने तो अंदाज वर्तवतो ते हास्यास्पद आहे. अत्यंत जपून, आपण कुठेही अडकलो जाऊ नये अशा न्यायालयीन भाषेत जर आपण अंदाज वर्तवला तर त्याची टिंगलच होणार. पण हे बदललं गेलं पाहिजे. पूर्वी वर्तमानपत्रात हवामानाच्या अंदाजासाठी खूप कमी जागा असायची, पण आज तुम्ही चार कॉलमची विस्तृत, स्पष्टीकरणासकट बातमी देऊ शकता. आणि तशीच दिली गेली पाहिजे. पण हे स्पष्टीकरण सत्याला धरून असायला हवं. आमचं शास्त्र काय सांगतं, आमची आकडेवारी काय सांगते, यावर माझं मत काय अशी विस्तृत माहिती तुम्ही लोकांना द्यायलाच हवी. पण लोकं असं सांगायला तयार होत नाहीत. सगळं ठीक आहे असं म्हणून जर दुष्काळ पडला तर? हे दिशाभूल करणंच नव्हे का? अशा सांगण्याच्या पद्धतीमुळे लोकांसमोर कायमच अस्पष्ट चित्र उभं राहतं आणि आधीच धुसर असलेल्या चित्रामध्ये आणखीन संदिग्धतेची भर पडते.
कृत्रिम पाऊस या संकल्पनेबद्दल तुमचं मत काय आहे?
कृत्रिम पाऊस ही अनेक वेळा राजकीय बाबच असते, मी माझ्या मतदारसंघात पाऊस पाडून दाखवतो मला मतं द्या, एवढाच काय तो त्याचा उपयोग. हा पाऊस पाडायला अत्यंत सोपा पण असा पाऊस पाडण्यामागे अनेक प्रश्न निर्माण होतात. तो न्यायही वाटत नाही. तयार ढगांमध्ये आपल्याला हव्या त्या भागावर तो आला की त्यावर अगदी मिठाच्या कणांचा फवारा केला तरी पाऊस पडतो. पण महाराष्ट्रातला ढग उद्या आंध्र प्रदेशमध्ये जाणार, मग मी जर सगळा पाऊस माझ्या इथे पाडून घेतला तर तिथल्या लोकांनी काय करायचं? या प्रश्नाला उत्तर नाही. याउपर आपण इतक्या मोठय़ा प्रमाणात निसर्गात ढवळाढवळ केली तर त्याचे परिणाम काय होतील हे कोणालाच ठाऊक नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही कोणत्याही नैर्सगिक स्रोतावर संपूर्ण हक्क सांगू शकत नाही. या आणि अशा अनेक कारणांमुळे कृत्रिम पाऊस हा जगभरात कुठेच फार यशस्वी झालेला नाही.
ग्लोबल वॉर्मिगचा मान्सूनवर परिणाम होतो आहे, असं म्हटलं जातं. त्याबद्दल आपण काय सांगाल?

आपल्या सगळ्यांना ही गोष्ट सगळीकडून ऐकायला मिळते की, पृथ्वीचं तापमान वाढतं आहे तर मग मान्सूनचं काय? आपण जर ग्लोबल वॉìमगचे आलेख पाहिले तर ते दोन प्रकारचे असतात. एक, पृथ्वीचं एकूण तापमान वाढतं आहे. ते खरं आहे. पण दुसरा भाग म्हणजे या तापमान वाढीचे क्षेत्रानुरूप आलेख उपलब्ध आहेत. उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्धाचे असेही वेगळे आलेख आहेत. उत्तर गोलार्धामध्ये जमिनीचा भाग मोठय़ा प्रमाणात आहे, तर दक्षिण गोलार्धाचा बराचसा भाग हा महासागरांनी व्यापला आहे. जर आपण या दोन गोलार्धाचे आलेख पाहिले तर असं लक्षात येईल की, महासागरामध्ये तापमान वाढीचं प्रमाण हे जमिनीच्या तापमानवाढीपेक्षा कमी आहे. यामुळे जमीन व समुद्र यांच्यातील तापमानातला फरकही वाढू लागला आहे. पण ही तापमानातली तफावतच मान्सूनला कार्यशील बनवते. म्हणून मी खरंतर असं म्हणेन की ही तफावत भारतातल्या मान्सूनला अधिक सशक्त बनवते आहे. हे कोणत्याही मॉडेलविना काढलेला तर्क आहे. पण, आपण जरी कोणत्याही मॉडेलचा आधार घेतला तरी ती सर्व तुम्हाला एकच सांगतील की ग्लोबल वॉर्मिगमुळे मान्सूनचं भारतीय उपमहाखंडातलं प्रमाण हे पुढच्या १०० वर्षांत वाढणारच आहे. तो किती वाढणार ते काही नक्की सांगता येणार नाही. पण मग मान्सूनच्या कोणत्याही तीव्र घटनेला तापमान वाढीचं-पर्यावरणातील बदलांचं लेबल चिकटवलं जातं. आता मुंबईमधली २६ जुल २००५ची घटना ही ‘न भूतो न भविष्यती’ अशीच घटना होती. अशा घटना परत परत होणार नाहीत. आपली लोकसंख्या वाढते आहे तर आपल्याला जास्त पाण्याची गरजच आहे, मग आपल्याला ग्लोबल वॉर्मिगला दोष देऊन चालणारच नाही. आता प्रश्न असा आहे की, आपली ड्रेनेज व्यवस्था ही जर १८५०च्या लोकसंख्येसाठी बांधली गेली आहे तर ती तुम्हाला कशी पुरे पडणार? म्हणून प्रश्न निर्माण होतो तो दूरदर्शीपणाने पावसाच्या पाण्याच्या व्यवस्थापनाचा.
हवामानशास्त्र कितीही प्रगत झालं तरी आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की माणसाचा आणि मान्सूनचा खूप गहिरा संबंध आहे. अगदी दैनंदिन आयुष्यात तो आपल्याला दिसू शकतो. हवामान खात्याचे अंदाज कसेही असोत माणसाला शेवटी त्याच्या दैनंदिन आयुष्यात हवामानाशी सामना करायचा असतोच आणि तो तो करतोही. म्हणून अंदाज कसेही असोत आपण माणूस म्हणून आलेले ऋतू मनमोकळेपणाने स्वीकारणं आणि त्याचा आनंद लुटायला शिकणं हे महत्त्वाचं आहे.