२२ जून २०१२
मथितार्थ
पृथ्वी आणि प्रदक्षिणा

प्रतिक्रिया

सिनेमाचे अर्थकारण
प्रांतिक सिनेमा
दुर्ग-संवर्धन
लस आणि सल
सिनेमा
वाचू काही
सामाजिक
फ्रेंच ओपन
क्रीडा
फ्लॅशबॅक
दुर्गाच्या देशा
नुलकरच्या गोष्टी
पाठलाग
सत्कार-सन्मान
मायमराठी
सिनेशताब्दी
पर्यटन
इंग्रजी शब्दसाधना
स्टार्टर
शॉपिंग
दबंगवाणी
केल्याने रेषाटन
वाचक प्रतिसाद
भविष्य
संपर्क
मागील अंक

सिनेमा

काकस्पर्श नावाचे मृगजळ!
अनिरुद्ध भातखंडे

बहुचर्चित ‘काकस्पर्श’ सध्या कौतुकाच्या वर्षांवात न्हाऊन निघत आहे. ‘एक अप्रतिम कलाकृती’ असं या चित्रपटाचं वर्णन होत आहे. मात्र डोळसपणे समीक्षण केल्यास यात प्रसिद्धीचाच भाग अधिक असल्याचं लक्षात येतं. या समीक्षणातून अनेक प्रश्न उभे ठाकतात. यात विलक्षण दूरच मात्र कोणतीही आणि कोणाचीही प्रेमकहाणी आढळत नाही. याशिवाय या चित्रपटात अनेक चुकाही आढळतात. चित्रपटाचे आकर्षक प्रोमोज आणि पडद्यावर दिसणारा चित्रपट यात किती अंतर असते, याचे हा चित्रपट उत्तम उदाहरण ठरला आहे.

मराठी चित्रपटांचा सध्या खूपच बोलबाला आहे. हिंदी चित्रपटसृष्टीत तीन दशके कारकीर्द गाजवल्यानंतर अभिनेता अनुपम खेर याने ‘कशाला उद्याची बात’ या मराठी चित्रपटात काम केले. काही महिन्यांपूर्वीच हा चित्रपट प्रदर्शित झाला. त्यापूर्वी नसिरुद्दीन शाहने ‘देऊळ’मध्ये लहान भूमिका केली. ‘एखादा चांगला विषय मिळाला तर मराठी चित्रपटात अभिनय करायला निश्चितच आवडेल’, असे वाक्य अनेक अमराठी स्टार आजकाल येताजाता फेकत असतात. हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्दर्शक अनुराग कश्यप याने तर या सर्वावर कडी केली. ‘मराठी चित्रपटात सध्या वेगवेगळे विषय हाताळले जात असून चांगले चित्रपट करण्यासाठी मला त्यातूनच प्रेरणा मिळते,’ असे विधान त्याने नुकतेच केले. हे सर्व पाहिले की प्रश्न पडतो की आजचा मराठी चित्रपट खरोखर एवढा दर्जेदार व अन्य भाषकांसाठी इतका प्रेरणादायी आहे का? या प्रश्नाचं होय अथवा नाही असं थेट उत्तर देणं कठीण आहे, अशीच एकंदर परिस्थिती दिसते. मराठी चित्रपटसृष्टीने ‘श्वास’नंतर कात टाकल्ये, नवे-जुने निर्माता-दिग्दर्शक नवनवीन विषय मांडत आहेत, या चित्रपटांना व्यावसायिक यशही मिळत आहे, ते लोकप्रिय ठरत आहेत.. आदी कारणांमुळे या प्रश्नाचे उत्तर नाही असं १०० टक्के देता येणार नाही. विनोदाच्या नावाखाली आचरट चित्रपट बनवणाऱ्यांची दखलच घ्यायला नको. मात्र तथाकथित ‘वेगळे’ चित्रपट खरोखर कसदार आहेत का, प्रसारमाध्यमांकडून या कलाकृतींचं जेवढं कौतुक होतं त्याचं प्रतिबिंब पडद्यावर उमटतं का, याचं समीक्षण केल्यास पदरी निराशाच येते. अलीकडेच प्रदर्शित झालेले देऊळ, शाळा, काकस्पर्श हे चित्रपट याचं उत्तम उदाहरण. यामुळेच वरील प्रश्नाचं उत्तर १०० टक्के होय असं देणंही अवास्तव आणि ढोंगीपणाचं ठरेल!
४ मे या दिवशी प्रदर्शित झालेला काकस्पर्श अजूनही जोरदार गर्दीत सुरू आहे. एकच पडदा असणाऱ्या पारंपरिक चित्रपटगृहांव्यतिरिक्त मल्टिप्लेक्समध्येही या चित्रपटाने बस्तान बसवले आहे. हे यश अतिशय कौतुकास्पद आणि मराठी चित्रपटांच्या पुढील वाटचालीसाठी पोषक असंच आहे. महेश मांजरेकर यांच्या ‘ग्रेट मराठा एंटरटेनमेंट’ (‘ग्रेट मराठा’ला पर्यायी मराठी शब्द नाही का?) निर्मित आणि झी टॉकीज प्रस्तुत या चित्रपटाची दणकेबाज पूर्वप्रसिद्धी करण्यात आली. चित्रपटाला साधारण १९३०च्या कालावधीतील कोकणाची पाश्र्वभूमी लाभली असल्याने आणि प्रोमोजच्या (पूर्वी याला ट्रेलर असं म्हणत असत!) भडीमारामुळे चित्रपटाबाबतची उत्कंठा वाढत गेली. ‘एक विलक्षण प्रेमकहाणी’ अशी टॅगलाइन देण्यात आल्याने आणि पोस्टरवर सचिन खेडेकर, प्रिया बापट व मेधा मांजरेकर यांची छायाचित्रे असल्याने ही प्रेमाच्या त्रिकोणाची कथा असावी, असा सर्वसाधारण समज निर्माण झाला. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरही प्रसिद्धीतंत्राचा चोख वापर करण्यात आल्याने त्याची भरपूर माऊथ पब्लिसिटी झाली. ‘काकस्पर्श’ पाहिला नाही तर फार मोठय़ा कलाविष्काराला आपण मुकू, अशी रसिकांची भावना झाली. (हाच प्रकार माहेरची साडी, हम आप के है कौन वगैरे चित्रपटांच्या बाबतीतही झाला होता.) या वातावरणनिर्मितीमुळे रसिक एका भारावलेल्या मनस्थितीतच चित्रपट पाहायला जातात आणि तो संपल्यावर ‘चांगला आहे, आवडला’ आदी मोघम प्रतिक्रिया देतात. मात्र खोलात जाऊन समीक्षण केले तर हाती फारसे काही लागत नाही. उलटपक्षी असंख्य प्रश्नचिन्हे उभी राहतात.
या चित्रपटात मध्यवर्ती भूमिकेत असणारे हरिदादा (सचिन खेडेकर) मानवतावादी आणि अनावश्यक रूढींना फटकारणारे व्यक्तिमत्त्व आहे. गावातील देवीसमोर म्हशीचा बळी देण्याची प्रथा ग्रामस्थांचा वाईटपणा स्वीकारून मोडणारे हरिदादा, महादेव (अभिजीत केळकर) या आपल्या लहान भावाच्या पिंडाला काकस्पर्श होत नाही तेव्हा अस्वस्थ का होतात? या पिंडाला दर्भाचा कावळा लावण्याची कल्पना धुडकावून भावाच्या आत्म्याला ‘तुझ्या पत्नीच्या अंगाला कोणत्याही पुरुषाचा स्पर्श होऊ देणार नाही’ असं भलतंच आश्वासन का देतात? वास्तविक सुधारणावादी हरिदादाने तुझ्या पत्नीचा योग्य ठिकाणी पुनर्विवाह लावून देईन, असं आश्वासन देणं त्यांच्या वृत्तीशी सुसंगत ठरलं असतं; परंतु १२-१३ वर्षांच्या निष्पाप मुलीचे असे भवितव्य ठरवून हा ‘सुधारक’ मोकळा होतो. ‘तुझ्या पिंडाला काकस्पर्श व्हावा, म्हणूनच मी ही जी प्रतिज्ञा केली आहे, ते फक्त आपल्या दोघांचंच गुपीत हं’ असंही तो भावाच्या आत्म्याला म्हणत नाही. असं असताना ही भीष्मप्रतिज्ञा तो सर्वापासून अखेपर्यंत गुप्त राखतो. हे गुपीत आधीच उघड केलं तर चित्रपट ६-८ रिळांतच संपेल म्हणून ही व्यावसायिक चतुराई केली असावी. याशिवाय सुधारक आणि बंडखोर स्वभावामुळे गावातील ब्रह्मवृंदाने बहिष्कृत केल्यानंतर मुलाच्या मुंजीची वेळ येते तेव्हा हरिदादा अगतिक का होतो? मुलाची मुंज व्हावी, यासाठी काशीतील सर्वोच्च धर्माधिकाऱ्यांची माफी मागणे, दंड भरणे अशी मूळ स्वभावाशी विसंगत कृती तो का करतो, हेही समजण्याच्या पलीकडचेच.

देऊळ आणि शाळाही यथातथाच...
अतिशय सुंदर कलाकृती, अशा चित्रपटांची गरज आहे.. वगैरे वगैरे शब्दांत ‘देऊळ’ची स्तुती झाली. सर्वच आघाडय़ांवर हा चित्रपट चांगला जमला आहे, अशीही भलामण करण्यात आली. यातही प्रसिद्धी तंत्राचाच वाटा अधिक होता. वास्तविक कलात्मकदृष्टय़ा हा चित्रपट यथातथाच आहे. नाना पाटेकर, दिलीप प्रभावळकर, डॉ. मोहन आगाशे, सोनाली कुलकर्णी अशी तगडी स्टारकास्ट असल्याची जाहिरात करण्यात आली. नाना पाटेकर आणि दिलीप प्रभावळकर यांची जुगलबंदी असल्याचेही पोस्टरवर आणि प्रोमोजमध्ये भासवण्यात आले. प्रत्यक्षात चित्रपटात तसे काहीच गवसले नाही. प्रभावळकरांची भूमिका खूपच तोकडी व तोंडी लावण्यापुरती आहे तर नाना पाटेकर यांच्या अभिनयसामर्थ्यांला वाव देणारे पात्र उभे करण्यात लेखक-दिग्दर्शक अपयशी ठरले. मोहन आगाशे आणि नाना यांच्यातील एक प्रसंग धावत्या गाडीत चित्रित करण्यात आला आहे. या प्रसंगात नाना उजेडात आणि मागे बसलेले आगाशे काळोखात दाखवण्याची किमया दिग्दर्शकाने केली आहे. आगाशेंना त्याच शर्टमध्ये त्याच गाडीत ठेवून अन्य कलाकारासोबतचा त्यांचा प्रसंगही उरकण्यात आला आहे. देवळाच्या उभारणीला प्रथम विरोध करणारे आगाशे एकाएकी त्या कल्पनेला पाठिंबा का देतात, याचा खुलासा चित्रपटात कोठेही दिसत नाही. हे सर्व कमी म्हणून ‘नसिरुद्दीन शहा मराठीत प्रथमच’ अशी जाहिरात करणाऱ्या या चित्रपटात नसिरचे दर्शन अखेरीस केवळ एका प्रसंगात काही मिनिटांसाठी होते. चित्रीकरणाचे लोकेशन, कलाकार, गावातील राजकारण आदी सर्व घटकांवर ‘वळू’ची छाप स्पष्टपणे जाणवते. देवळांचे व्यापारीकरण कसे होते हे (आणि केवळ हेच) दाखवण्यासाठी ‘विशिष्ट’ विचारसरणीची मंडळी या चित्रपटासाठी एकत्र आल्याचे दिसते. या व्यापारीकरणाचे समर्थन होऊ शकत नाही, मात्र अनेक मंदिर संस्थानांकडून होणारे समाजकार्य, रुग्णसेवा, गरजूंना आर्थिक सहकार्य या चांगल्या बाजूकडे पूर्ण डोळेझाक करण्यात आली आहे. एखाद्या गोष्टीवर टीका करताना त्यातील सकारात्मक बाबींकडे मात्र सोयीस्कर दुर्लक्ष करायचे, हा प्रकार खटकणाराच.
मिलिंद बोकील यांच्या गाजलेल्या ‘शाळा’वर बेतलेला याच नावाचा चित्रपटही खास जमलेला नाही. या कादंबरीने अनेकांना वेड लावले, आजही ही कादंबरी बहुचर्चित आहे. या कादंबरीवर चित्रपट येतोय समजल्यानंतर सर्वाचीच उत्कंठा ताणली गेली होती. मात्र कादंबरीचा चित्रपट करण्याचे शिवधनुष्य दिग्दर्शकाला न पेलल्याचे चित्रपट पाहिल्यावर लक्षात येते. कादंबरी वाचल्यानंतरचा अनुभव चित्रपट पाहिल्यानंतर अल्पांशानेही मिळत नाही.
या दोन्ही चित्रपटांचे खूप कौतुक झाले, त्यांना विविध श्रेणींसाठी राष्ट्रीय पुरस्कारही मिळाले. मात्र पडद्यावरचे वास्तव वेगळेच आहे.

‘विलक्षण प्रेमकहाणी’ पाहायला गेलेल्या प्रेक्षकांची झालेली फसगत इथेच संपत नाही. विलक्षण, व्यक्त-अव्यक्त, जगावेगळी असे कोणतेच प्रकार या तथाकथित प्रेमकहाणीत आढळत नाहीत. महादेवाच्या आत्म्याला दिलेले आश्वासन पूर्ण करण्यासाठी हरिदादा अखेपर्यंत झटतो. महादेवाच्या पत्नीची काळजी घेतो, तिला झुकतं माप देतो. तो कमालीचा सभ्य आणि सदाचारी असूनही घरातील सर्वजण अगदी त्याची पत्नीही त्याच्या हेतूविषयी शंका घेते. मात्र त्याच्या मनात कधीच पापभावना नसते. पत्नीवियोगानंतर तर तो विरक्त होतो आणि कुटुंबीयांनी मांडलेली पुनर्विवाहाची कल्पना धुडकावून लावतो. त्यामुळे ही हरिदादांची प्रेमकहाणी आहे, असं कोणी म्हणू शकणार नाही. मात्र अन्न-पाण्याचा त्याग केल्याने अंथरुणाला खिळलेल्या उमाला तो भूतकाळातील ते गुपीत सांगतो, भावाच्या आत्म्याला ‘ते’ आश्वासन देऊन आपण हिच्यावर खूपच अन्याय केला आहे, असा साक्षात्कार त्याला होतो आणि लगेचच दुसऱ्या क्षणी एका नातीचा हा आजोबा उमाशी लग्न करण्यास तयार होतो! पुनर्विवाह केल्यानेच उमावरील अन्याय दूर होईल, याची जाणीव झाल्यानंतर ‘मी तुझ्यासाठी चांगला मुलगा शोधेन’ असं त्याने म्हणणे योग्य ठरले असते. मात्र ‘माझा संसाराचा डाव मांडून झाला आहे’ असं आधी म्हणणारे हे आजोबा गुडघ्याला बाशिंग बांधून मोकळे होतात. या तर्कविसंगत आणि विचित्र घटनाक्रमाचा कळसाध्याय उमा रचते. ‘मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे’ असं सांगून बायकोचं मंगळसूत्र घेऊन हरिदादा पाचच मिनिटात उमाजवळ येतो मात्र तोपर्यंत ती प्राण सोडते. ती प्राणत्याग का (व कसा करते कोणास ठाऊक?) करते कोणास ठाऊक? नवऱ्याशी व्रतस्थ राहण्यासाठी ती स्वतला संपवते, की हरिदादांनी आपल्या नवऱ्याला दिलेले वचन खोटे ठरू नये, यासाठी ती प्राणत्याग करते? सारेच अनाकलनीय आणि म्हणूनच कदाचित विलक्षण! वैधव्य आल्यानंतर ‘मी तुमच्याशिवाय अन्य कोणाचाही विचार करू शकत नाही’, असं नवऱ्याला स्मरून बोलताना ती कधीही दाखवलेली नाही. दुसरीकडे सदाचारिणी असलेली ती हरिदादांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत्ये, त्यांच्याविषयी आकर्षण राखून आहे, असंही दिसत नाही. या सर्व मुद्दय़ांचा विचार करता ही विलक्षण प्रेमकहाणी कोणाचीच नाही, किंबहुना यात काही प्रेमकहाणीच नाही, हे सिद्ध होते.
याशिवाय या चित्रपटात अनेक चुका आणि त्रुटीही आहेत. मुंबईत शिक्षणासाठी निघालेला महादेव जाताना घरापासून बैलगाडीत बसून जातो, येताना मात्र तीच बैलगाडी कदाचित घरापर्यंत येऊ शकत नसल्याने तो काही अंतर चालत येताना दाखवला आहे. मुंबईहून परतताना तो तापाने फणफणलेला असतो तरीही बैलगाडी घरापर्यंत का येत नाही, हे दिग्दर्शकालाच ठाऊक. योगायोग असा की जाताना व येताना त्याचे कपडे सारखेच! या आजारी महादेवला ताबडतोब पूजेसाठी बसवण्यात येते, पूजेदरम्यान त्याला ग्लानीही येते, तरीही सुधारक वृत्तीचा त्याचा थोरला भाऊ त्याला तेथून न उठवता घरातील इतरांशी केवळ चेहऱ्याने खाणाखुणा करत राहातो. या प्रसंगातील सदोष मंत्रोच्चारही कानाला खटकतात. महादेवचे निधन झाल्यानंतर उमाला केशवपनाची नव्यानेच ओळख होते. यासाठी योजलेल्या एका स्वप्नदृश्यात केशवपनाला प्रतिकार करत घरातून सैरावैरा पळत सुटलेली उमा थेट रानावनात जाते. तेथे तिचे जबरदस्तीने केशवपन केले जाते वगैरे वगैरे.. या प्रसंगात घरातून अनवाणी धावत सुटलेली उमा रानात पोहोचते तेव्हा मात्र तिच्या पायांत चपला असतात! केशवपन करणाऱ्यांना थोपवत घरातून बाहेर पडल्यावर आधी ती चप्पला घालते आणि नंतर रानाच्या दिशेने पळत सुटते, असा तर्क कोणी करणार असेल तर ते धन्यच! एका प्रसंगात घरातील आत्याबाई उमाला विधवेचं जगणं किती असह्य़, वाईट असतं वगैरे सांगत असते. सर्व चालिरीती पाळणारी ही कर्मठ आत्या या प्रसंगात चक्क तंबाखू खाताना दाखवली आहे! यातून दिग्दर्शकाला काय सुचवायचे आहे ते आकलनाच्या पलीकडचे आहे. एरवी सर्वसामान्य स्त्रीप्रमाणे वावरणारी ही बाई या प्रसंगात उगाचच भीतीदायक दाखवण्यात आली आहे. मी तंबाखू खाल्ली हे कोणाला सांगू नकोस, असंही ती उमाला बजावते. आपलं तंबाखूसेवन सर्वापासून लपवायचं होतं तर उमासमोर तंबाखू चोळण्याची गरजच काय? सर्वसामान्यांना पडणारा हा प्रश्न लेखक-दिग्दर्शकाच्या कदाचित खिजगणतीत नसावा. यानंतर एका प्रसंगात हरिदादाच्या वाईटावर टपलेला गावातील उपाध्याय (वैभव मांगले) भाडोत्री गुंडांना घेऊन अपरात्री हरिदादाच्या घरी येतो आणि बळजबरीने उमाचे केशवपन करू पाहातो, यावेळी शतपावली घालणारा हरिदादा आपला मित्र बळवंत (संजय खापरे) याच्यासह उपाध्यायाला चोप देतो. यावेळी प्रचंड धुमश्चक्री, आरडाओरडा होतो, आश्चर्य म्हणजे हा गदारोळ ऐकून हरिदादाच्या घरातील अन्य कोणीही बाहेर येत नाही, एवढी गाढ झोप त्या सर्वाना लागलेली असते. पूर्वप्रसिद्धीमुळे भारावून न जाता ‘डोळसपणे’ हा चित्रपट पाहिल्यास यासारख्या अनेक लहान-मोठय़ा चुका सहज लक्षात येतात. अतिशय ग्रेट म्हणून गणला गेलेल्या या चित्रपटातील बहुसंख्य प्रसंग हे इनडोअर असल्याने आपण चित्रपट पाहातोय की एखाद्या नाटकाचे शूटिंग असाही प्रश्न पडतो.
(अर्थात, हा चित्रपट न पाहण्याजोगा अथवा सुमार आहे, असं कोणी म्हणू शकणार नाही.)
उंटावरून शेळ्या हाकण्याचा अथवा काठावरून पोहण्याचे सल्ले देण्याच्या मानसिकतेतून हा लेखनप्रपंच केलेला नाही. या प्रकारच्या ‘वेगळ्या’ मराठी चित्रपटांची केली जाणारी पूर्वप्रसिद्धी, प्रदर्शित झाल्यानंतर होणारा गाजावाजा, त्यांना मिळणारे पुरस्कार, त्यांची लोकप्रियता-व्यावसायिक यश याचे प्रतिबिंब चित्रपटगृहाच्या पडद्यावर उमटत नाही, ही खेदाची बाब आहे. प्रसिद्धीमाध्यमांनी रंगवलेले चित्र आणि पडद्यावर दिसणारे चित्र यातील तफावत हा गंभीर मामला आहे. कल्पक निर्माता-दिग्दर्शकांनी यातून बाहेर पडावे आणि अधिक कसदार कलाकृती निर्माण कराव्यात एवढीच अपेक्षा आहे. पूर्वप्रसिद्धीच्या फुग्याला लटकून आपल्या कलाकृतीने फार मोठी उंची गाठली आहे, असं भासवण्यात काय अर्थ? प्रेक्षकांच्या अपेक्षाभंगाच्या सुईमुळे या फुग्यातील हवा कधीही निघू शकते. तसे न झाल्यास या तथाकथित कसदार कलाकृती म्हणजे केवळ मृगजळ असून त्यात ‘पाणी’ नाही, हे प्रेक्षकांच्या ध्यानात येण्यास वेळ लागणार नाही.
aniruddhabhatkhande@expressindia.com