८ जून २०१२
मथितार्थ
कव्हर स्टोरी

मतमतांतरे

खगोलविश्व
जंगल आणि माणूस
निसर्गठेवा
चढाई
सिनेशताब्दी
मायमराठी
पाठलाग
लस आणि सल
मार्गदर्शक
इंग्रजी शब्दसाधना
नुलकरच्या गोष्टी
दुर्गाच्या देशा
वाचू काही
फ्लॅश बॅक
ग्लॅमरस
भ्रमंती
नक्षत्रांचे नाते
अभिनव
फुलपाखरांची बाग
स्टार्टर
शॉपिंग
दबंगवाणी
केल्याने रेषाटन
वाचक प्रतिसाद
भविष्य
संपर्क
मागील अंक

मायमराठी

मराठीतले द्वैभाषिक शब्दकोश
अविनाश बिनीवाले

महाराष्ट्र राज्याच्या साहित्य संस्कृति मण्डळातर्फे ‘मराठी-डॉइच (जर्मन) शब्दकोश’ लौकरच प्रकाशित होत आहे. भारतीय प्रादेशिक भाषांमध्ये द्वैभाषिक शब्दकोशांची मुहूर्तमेढ खऱ्या अर्थाने मराठीतूनच रोवली गेली. दोन्ही भाषांचा शब्द, उच्चार, आघात, प्रयोग, व्याकरण, दोन्ही भाषिकांची संस्कृती अशा अनेक पातळ्यांवर शब्दकोशामध्ये विचार होणे आवश्यक असते. मराठी-डॉइच शब्दकोशाच्या निमित्ताने द्वैभाषिक शब्दकोशावर एक वस्तुनिष्ठ चर्चा.

भारतीय सन्दर्भात विचार केला तर मराठीतलं सन्दर्भसाहित्य खूप चांगलं आहे, समृद्ध आहे असं म्हटलं जातं नि (संख्येचा विचार करता) ते खरंही आहे. ज्ञानकोशकार श्रीधर व्यंकटेश केतकरांनी आधुनिक भारतातला पहिला ज्ञानकोश स्वत: रचून स्वत:च प्रकाशित करून बाजी मारली होती, असं काम त्या काळी हिन्दीतही झालेलं नव्हतं. मराठी ही एक केवळ संख्येनं मोठीच नव्हे तर एक समर्थ भाषा आहे हे त्या काळी ज्ञानकोशकार केतकरांनी सिद्ध करून दाखवलं होतं. कोशांसारखं ज्ञानसाधनं निर्माण करण्याचं काम सुदैवानं पुढेही चालू राहिलं, त्यातलं एक दालन आहे ते द्वैभाषिक शब्दकोशांचं.
संख्येचाच विचार करायचा झाला तर ‘इंग्लिश-मराठी’ शब्दकोशांची संख्या प्रचण्ड आहे आणि ‘मराठी-इंग्लिश’ असे शब्दकोशही कमी नाहीत. संख्येत आणि बाजारातल्या खपात ह्य दोन प्रकारच्या शब्दकोशांचा क्रम पहिला असला तरी इथे त्यांचा विचार आत्ता करणार नाही, त्याचं एक कारण म्हणजे प्रचण्ड खप असूनही म्हणावा असा चांगला शब्दकोश एकही नाही असं खेदानं म्हणावं लागतं (ह्यला ऑक्सफर्डचा कोशही दुर्दैवानं अपवाद नाही.) मराठी-इंग्लिश शब्दकोशांची स्थिती तर आणखी वाईट आहे. ते शब्दकोश म्हणजे खरंतर शब्दांच्या याद्या आहेत असं म्हणणंच योग्य होईल. शब्दकोशांची / द्वैभाषिक शब्दकोशांची साधी-साधी तत्त्वंही तिथे लक्षात घेतलेली दिसत नाहीत. ह्य याद्याही इतक्या ढोबळ आहेत की त्याचा नक्की कोणाला नि किती उपयोग आहे ह्याचा सम्पादकांनी काही विचार केला होता की नाही, अशी शंका येते.
मुळात आपल्या भाषेतून दुसऱ्या भाषेत असलेल्या द्वैभाषिक शब्दकोशांची गरजच काय, हा प्रश्न लक्षात घेतला तर जाणवतं की आपल्या मनातली गोष्ट दुसऱ्या भाषेत सांगताना म्हणजे लिहिताना किंवा बोलताना त्यासाठी योग्य असलेला प्रतिशब्द मिळणं आणि मग त्याचा उपयोग करून एखादी अभिव्यक्ती करणं. कोश बघणाऱ्याला खरंतर केवळ एखादा शब्द नको असतो तर तो योग्य प्रकारे, चांगल्या प्रकारे कसा वापरावा हे हवं असतं कारण ती त्याची स्वत:ची भाषा नसते (म्हणूनच तो कोशाचा आधार घेत असतो) आणि इथेच कोणत्याही द्वैभाषिक शब्दकोशाची परीक्षा होत असते (आणि आपल्याकडचे बहुतेक सगळे द्वैभाषिक शब्दकोश या पहिल्या चाचणीतच साफ अनुत्तीर्ण होतात. या चाचणीत काही मराठी-हिन्दी शब्दकोशही नापास आहेत!) ज्या शब्दकोशाचा जिज्ञासूला उपयोग होत नाही तो कोश काय कामाचा? तेव्हा आपण इंग्लिश-मराठी नि मराठी-इंग्लिश शब्दकोश काही काळ बाजूला ठेवूया! (त्यांचा विचार पुढे केव्हातरी नक्की करूया!)
इंग्लिशशी सम्बन्धित शब्दकोशांचा ढिगारा बाजूला केला की मग हिन्दी-मराठी, मराठी-हिन्दी, गुजराथी-मराठी, कन्नड-मराठी, मराठी-कन्नड, तमिळ-मराठी असे काही शब्दकोश येतात. अशा अतिशय महत्त्वाच्या कार्यात महाराष्ट्र राज्याच्या ‘साहित्य आणि संस्कृती मण्डळानं’ केलेलं कार्य अतिशय महत्त्वाचं आहे आणि आकाराच्या दृष्टीनंही खूप मोठं आहे. साहित्य संस्कृती मण्डळाचे पहिले अध्यक्ष माननीय लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्यापासूनच विश्वकोशाच्या बरोबरीनं द्वैभाषिक शब्दकोशांच्या कार्याची सुरुवात झाली. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवन्तराव चव्हाण आणि लक्ष्मणशास्त्री जोशी या जोडीनं खूप महत्त्वाची कामं केली ती याच काळात. सुदैवानं आजचे अध्यक्ष श्री. मधु मंगेश कर्णिक यांच्यापर्यन्त ते कार्य अव्याहतपणे चालू आहे हे निश्चितच उल्लेखनीय आणि कौतुकास्पद आहे! (ते यापुढेही असंच चालू राहील अशी आपण अपेक्षा करूया!)
इथे एक गोष्ट आवर्जून सांगण्यासारखी आहे ती म्हणजे, अशा तऱ्हेची संस्कृती-साहित्यसंवर्धनाची कामं करण्यासाठी अशाच प्रकारच्या संस्था, मण्डळं, अकादम्या वगरे भारतातल्या इतर राज्यांमध्येही स्थापन झाल्या होत्या/आहेत, पण त्यातल्या कोणत्याही राज्याच्या कोणत्याही संस्थेनं अशा प्रकारचं द्वैभाषिक शब्दकोशांचं काम हाती घेतलं नाही या एकाच गोष्टीवरून तीव्रतेनं जाणवतं की तेव्हाचे मुख्यमंत्री मा. यशवन्तराव चव्हाण आणि अध्यक्ष मा. लक्ष्मणशास्त्री जोशी यांनी पुढारलेल्या, सुसंस्कृत अशा आधुनिक महाराष्ट्राचं स्वप्न किती समर्थपणे आणि कृतिशीलतेनं पाहिलं होतं हे सिद्ध होतं.
महाराष्ट्र राज्याच्या साहित्य संस्कृती मण्डळानं आत्तापर्यन्त गुजराथी-मराठी, उर्दू-मराठी, तमिळ-मराठी, कन्नड-मराठी, मराठी-कन्नड असे द्वैभाषिक शब्दकोश प्रकाशित केलेले आहेत. मण्डळानं अनेक भाषांचे कोश करण्याचं नियोजन केलं होतं. लक्ष्मणशास्त्र्यांच्या सुरुवातीच्या काळात तर खुद्द अध्यक्षांचाच इतका उत्साह होता की एखाद्यानं काम करण्याचा प्रस्ताव स्वीकारला की शास्त्रीबुवा उदारपणे त्या व्यक्तीला त्याचं मानधन आगाऊ देऊन टाकत असत! (आपण असे कर्मदरिद्री की अनेकांनी असे पसे घेतले पण काम कधी केलंच नाही. रूसी-मराठी शब्दकोशासाठी एका सद्गृहस्थांना पूर्ण मानधन आगाऊ देण्यात आलं होतं, पण त्यांनी ते काम कधीच पूर्ण केलं नाही आणि मण्डळानंही कामच न केल्यामुळे दिलेली रक्कम त्यांच्याकडून कधी वसूल केली नाही. माझी ही माहिती ऐकीव नाही तर खुद्द त्या व्यक्तीनंच ही मला सांगितली, जिनं रूसी-मराठी शब्दकोश करण्यासाठी आगाऊ पसे घेतले होते! रूसी-मराठी शब्दकोशाचं काम मण्डळाकडून अद्यापि झालेलं नाही.)
द्वैभाषिक शब्दकोशांमध्ये काम करताना पहिली गोष्ट म्हणजे तिथे शब्दापुढे प्रतिशब्द द्यायचा असतो आणि तो शब्द वापरण्याच्या दृष्टीनं शब्दकोशाचा उपयोग करणाऱ्याला मदत करायची असते. दोन भाषांमधले प्रतिशब्द देणं अवघड काम असतं आणि त्याचा पुढचा भाग म्हणजे रचनेच्या दृष्टीनं त्या दोन भाषा जेव्हा खूप वेगळ्या असतात तेव्हा उपयोग करणाऱ्याला मदत म्हणून काय दिलं जातं हे खूप महत्त्वाचं ठरतं. अशा प्रसंगी तो शब्दकोश नक्की काय देतो आणि कसं देतो यावरूनच त्याची उपयुक्तता ठरते. द्वैभाषिक शब्दकोशांची अनेक तत्त्वं आहेत, पण हे एकच तत्त्व आपण असलेल्या शब्दकोशांना लावून पाहिलं तर काय दिसतं? जाडजूड असलेले हे कोश त्या-त्या भाषेतला मजकूर समजून घ्यायला थोडी मदत करतात, पण त्यात शब्दांच्या निवडीचं तत्त्व न पाळल्यामुळे कोश उगाचच अवजड झाले आहेत. त्यात भाराभर शब्द आहेत, पण उपयोगाचं फारच कमी.
ह्यतला दुसरा भाग म्हणजे मराठी माणसाला इतर कोणती भाषा चांगली बोलता यावी, लिहिता यावी यासाठी मराठी-गुजराती, मराठी-बाङ्ग्ला, मराठी-तमिळ असे कोश होण्याची आवश्यकता असते, पण ‘मराठी-कन्नड शब्दकोश’ वगळता असे कोश झालेच नाहीत. हे काम होण्याची गरज आहे. मसूरच्या सेण्ट्रल इन्स्टिटय़ूट ऑफ इण्डियन लँग्वेजेस (सी.आय.आय.एल.) ही केन्द्र सरकारची संस्था आहे, पण त्यांनी अशा प्रकारची कामं केलेली नाहीत. अलीकडच्या भाषेत सांगायचं झालं तर एकुणात हे कोश पाहिजे तसे यूज़्‍ार-फ्रेण्डली झाले नाहीत.
शब्दकोशात कोणत्या शब्दांचा समावेश करायचा ह्यचा निर्णय घेणं हे तसं कठीण काम असतं. त्यासाठी काय निकष वापरायचे हे अगोदर ठरवणं आवश्यक असतं, असं झालं नाही तर दिसेल तो शब्द घेतला जातो. पण प्रत्यक्षात चतुर सम्पादक (?) एकदम शॉर्टकट मारतात! एखादा तयार (बऱ्याचदा तथाकथित जाडजूड) शब्दकोश घेऊन कसलाही विचार न करता त्यातले शब्द घेतले जातात, म्हणजे कॉपी केली जाते, त्यामुळे त्याचं जे काय (वाटोळं) व्हायचं ते होतंच. अनेकांना मोल्सवर्थचा शब्दकोश म्हणजे वेदवाक्य वाटतं (शेवटी तो गोरा साहेब होता ना, मग ‘गोरासाहेबवाक्यं प्रमाणम्’ आलंच. तो कोश आता भाषेच्या दृष्टीनं जुना(ट) झालेला आहे आणि मूलत: तो मराठी शिकू इच्छिणाऱ्या इंग्लिश भाषिक इंग्रजांसाठी होता / आहे हेच लक्षात घेतलं जात नाही.) दुर्दैवानं भारतीय भाषांचे जे द्वैभाषिक कोश झालेले आहेत त्यात हाच महत्त्वाचा दोष आढळतो.
उदा. ‘आम्ही तावांगला जाताना वाटेत सेला खिण्ड लागली होती.’ असं मला हिन्दीत म्हणायचं आहे / लिहायचं आहे. सरावामुळे मला थोडंफार हिन्दी येतं, पण मला खिण्ड हा शब्द अडलेला आहे. मी मराठी-हिन्दी शब्दकोशात खिण्ड शब्द पाहिला तर तिथं दिलेलं आहे ‘खिण्ड- दो पहाडमें के बीच में से गुज़्‍ारनेवाली सडम्क’ आता ह्य एन्ट्रीचा उपयोग करून मी हिन्दीत काही बोलायचं / लिहायचं म्हटलं तर ते हास्यास्पदच होईल की नाही? तेव्हा ह्य कोशाचा मला काहीही उपयोग नाही, कारण तो मला मदत करू शकत नाही.
ज्या दोन भाषांचा कोश असेल त्या दोन्ही भाषांची रचना सारखी असेलच असं नाही. खरंतर कोणत्याही दोन भाषांची रचना अगदी सारखी असूच शकत नाही! पण सम्बन्धित भाषांच्या रचनांचा विचार केला नाही तर पुन: तेच होतं - उपयोग करणाऱ्याला प्रत्यक्षात त्याचा काहीच उपयोग होत नाही. उदा. जर्मन आणि इंग्लिश ह्यंच्या रचनांमध्ये बरंच साम्य आहे, पण मराठी नि इंग्लिश ह्यंच्यात साम्यस्थळं फारच थोडी आहेत, किंबहुना नाहीत. त्यामुळे ज्या प्रकारे इंग्लिश-जर्मन, जर्मन-इंग्लिश शब्दकोश असेल त्या सरधोपट पद्धतीनं मराठी-जर्मन किंवा जर्मन-मराठी शब्दकोश होऊ शकणार नाही.
भारतीय भाषांमध्येही तशी खूप विविधता आहे. उदा. मराठी, हिन्दी, गुजराती, सिन्धी, पंजाबी ह्यंच्या क्रियापदांमध्ये खूप साम्यं आहेत, पण त्याच बाबतीत कन्नड, तमिळ किंवा बाङ्ग्ला, असमीया ह्य भाषा खूप वेगळ्या आहेत. त्यामुळेच भाषांच्या रचनांचा विचार न करता सम्पादित (?) केलेले शब्दकोश म्हणजे शब्दांच्या निव्वळ याद्या आहेत.
अनेकदा दोन भाषांची संस्कृती वेगळी असते, उदा. डबा आणि डबी हे दोन मराठी शब्द. हे शब्द कन्नडमध्येही आहेत, पण त्यांचा उपयोग भिन्न असतो. उदा. मराठीत आगगाडीचा ‘डबा’ असतो तर कन्नडमध्ये आगगाडीची ‘डबी’ असते. लाडवाचा ‘डबा’, तपकिरीची ‘डबी’, गाडीचा ‘डबा’. मालगाडीची ‘वाघीण’ असे बारकावे इतर भाषांमध्ये कसे आहेत हे कळणं आवश्यक असतं. असा महत्त्वाचा भाग मराठी-कन्नड शब्दकोश देतो का? अशा अनेक गोष्टी असतात नि ज्या कोशात येणं आवश्यक असतं. तसं झालं नाही तर त्या कोशांचा उपयोग नसल्यामुळे वापर होत नाही.
गेल्या शम्भर-सव्वाशे वर्षांच्या काळात युरोपात इंग्लिश, फ्रेंच, जर्मन आणि रूसी ह्य चार भाषांच्या सन्दर्भात शेकडो उत्तमोत्तम एकभाषिक आणि द्वैभाषिक शब्दकोश (आणि ज्ञानकोश) तयार झाले. सुदैवानं त्यातले बरेचसे कोश भारतात उपलब्ध आहेत, अनेक ग्रन्थालयांमधून ते गेली अनेक दशकं आहेत, पण असे चांगले-चांगले कोश प्रत्यक्ष पाहूनही आपल्याकडे तसे, तशा तऱ्हेचे, त्यांच्या किमान आसपास जाऊ शकतील असे कोश निर्माण झाले नाहीत. ह्य वस्तुस्थितीचा आपण गाम्भीर्यानं विचार करून त्यावर परिणामकारक उपाय शोधून त्यानुसार कामं करण्याची गरज आहे. संगणक आले तरी त्यावर कोशसाहित्य सहजपणे बघता येत असलं तरी मुळात ते कोणी तरी उत्तम प्रकारे करण्याची गरज असते. ऑक्सफर्ड, कॅसल, लारूस, डूडन, लाङ्न्शाइट अशा अनेक संस्था द्वैभाषिक कोशांसाठी जगात प्रसिद्ध आहेत, त्यांच्या तोडीच्या संस्था भारतातही निर्माण झालेल्या बघण्याची ओढ लागली आहे!
response.lokprabha@expressindia.com