२५ मे २०१२
मथितार्थ
स्टार्टर
कव्हर स्टोरी
आत्मकथन
प्रतिबिंब
गुंता मनाचा

रंगमंच

संगीत
चहा-चर्चा
आरोग्य
संमेलन
सिनेशताब्दी
फ्लॅशबॅक
दखन डाक
इंग्रजी शब्दसाधना
अर्काइव्हज्
नुलकरच्या गोष्टी
क्रिकेटनामा
दुर्गाच्या देशा
वाचू काही
वाचन संस्कृती
पाठलाग
क्रीडा
पर्यटन
शॉपिंग
दबंगवाणी
केल्याने रेषाटन
वाचक प्रतिसाद
भविष्य
संपर्क
मागील अंक

संगीत

गीतशिल्प अजिंठय़ाचे!
अनिरुद्ध भातखंडे

aniruddha.bhatkhande@expressindia.co
गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या ‘बालगंधर्व’ या चित्रपटातील ‘चिन्मया सकल हृदया, आज म्हारो घर आए, परवरदिगार’ ही गाणी खूपच रसिकप्रिय ठरली. या गाण्यांचा संगीतकार कौशल इनामदार याने आता ‘अजिंठा’ या चित्रपटाद्वारे पुढचे पाऊल टाकले आहे. ‘अजिंठा’मध्ये तब्बल १० गाणी असून त्यासाठी कौशलने २० गायक आणि ८० वादकांचा उपयोग केला आहे! मराठी चित्रपटसंगीतातील हा एक विक्रमच ठरावा. ना. धों. महानोर यांच्या उत्कट काव्याला साजेशा या संगीतरचना अवीट गोडीच्या आणि अनवट चालींच्या आहेत. या गीत-संगीताविषयी...

तो एक इंग्रज चित्रकार तर ती एक आदिवासी तरुणी. दोघांमध्ये भाषेचीही अडचण, मात्र कलेच्या दिव्य आविष्काराने ते दोघे जवळ येतात आणि साकारते एक जगावेगळी परंतु अव्यक्त प्रेमकहाणी. औरंगाबादजवळील जगविख्यात अजिंठा लेण्यांच्या पायथ्याशी १८व्या शतकाच्या उत्तरार्धात घडलेली ही प्रेमकहाणी गेल्याच आठवडय़ात पडद्यावर (एकदाची) झळकली. भव्यदिव्य व कल्पक नेपथ्यरचनेमुळे चित्रपटसृष्टीत स्वतंत्र स्थान निर्माण केलेले कलादिग्दर्शक नितीन देसाई यांनी या चित्रपटाद्वारे दिग्दर्शनाच्या क्षेत्रात पदार्पण केले आहे. अभिनयाच्या आघाडीवर सोनाली कुलकर्णी आणि फिलिप वॉलेस यांच्याव्यतिरिक्त अविनाश नारकर, मकरंद देशपांडे, मनोज जोशी, मनोज कोल्हटकर, मुरली शर्मा आदी कलावंत या चित्रपटाला लाभले आहेत. तथाकथित विनोदीपटांच्या पाश्र्वभूमीवर हा चित्रपट वेगळा ठरला असून त्याला प्रेक्षकांनी उचलून धरल्याचे दिसत आहे. या चित्रपटाची अनेक वैशिष्टय़े असली तर त्याचे गीत-संगीत हाच त्याचा यूएसपी मानावा लागेल.
मराठी चित्रपटांना सध्या चांगले दिवस आले असले तरी गाण्यांच्या आघाडीवर आनंदीआनंदच आहे. ओढूनताणून चार-पाच गाणी आजकाल या चित्रपटांत असतात आणि तीही सुमार दर्जाची व अल्पजीवी. हा चित्रपट यास ढळढळीत अपवाद ठरावा. मुळात या चित्रपटाची मध्यवर्ती कल्पनाच ज्येष्ठ कवी ना. धों. महानोर यांच्या याच नावाच्या खंडकाव्यावर आधारलेली आहे. अजिंठय़ाच्या पंचक्रोशीत वाढलेल्या आणि रानकवी अशी उपाधी सार्थपणे मिरवणाऱ्या महानोर यांनी हे खंडकाव्य, ही प्रेमकथा पडद्यावर यावी, असे स्वप्न अनेक वर्षे पाहिले होते. ते स्वप्न आता पूर्ण झाले. खंडकाव्याला चित्रपटाचा साज लाभल्याने त्यांच्या गीतांनाही नवा ‘सूर’ गवसला. नवीन संगीतकारांमधील अतिशय प्रतिभावान आणि अभ्यासू अशा कौशल इनामदारने या चित्रपटाच्या संगीताचे शिवधनुष्य पेलले असून यात ४-५ नव्हे तर तब्बल १० गाण्यांचा नजराणा त्याने रसिकांसमोर ठेवला आहे.
हा चित्रपट अद्याप ज्यांनी बघितला नसेल त्यांनी त्यापूर्वी त्यातील गाणी अवश्य ऐकावीत. ती ऐकल्यानंतर या गीत-संगीताची अनोखी जादू अनुभवता येईल. ‘सरण जळताना नभांगण जळत गेले (पं. सत्यशील देशपांडे), छंद ओठातले (सुरेश वाडकर, हमसिका अय्यर), शब्दात गोठले दुख (सुरेश वाडकर), चैत्याचा रंग संग खेळू दे सावरियाँ (प्रियांका बर्वे, सई टेंभेकर, मधुरा कुंभार, आनंदी जोशी), मन चिंब पावसाळी (हमसिका अय्यर), होरी का त्योहार (अवधूत गुप्ते) ही यातील काही उदाहरणे. डोळे मिटून ही गाणी ऐकली तर प्रत्येक गाण्याचे एक स्पष्ट चित्र नजरेसमोर तरळते, एवढी दृश्यमानता या गाण्यांमध्ये आहे. महानोरांच्या आशयगर्भ काव्याला कौशलने दिलेले संगीत थेट काळजाला भिडणारे आहे. यातील प्रत्येक गाण्याची एक कथा आहे. चित्रपटात त्यांना अनन्यसाधारण स्थान आहे, किंबहुना चित्रपटाचे तेच बलस्थान आहे, तोच या चित्रपटाचा आत्मा आहे.

इतिहासाच्या पाऊलखुणा
अजिंठा लेणी ही भारतीय कलाविष्काराचे संचित मानली जातात. भारतीय चित्रकलेची परंपरा या लेण्यांपासून सुरू होते, असे म्हटले तर ते अतिशयोक्तीचे ठरणार नाही. यातील चित्रांमुळेच त्यांना जागतिक वारसा लाभला आहे. इ.सनपूर्व १५० ते इ.सनपूर्व १०० या कालखंडात हीनयान पंथाच्या कालखंडात या गुंफांची निर्मिती झाली. त्यानंतर तब्बल ५०० वर्षांनंतर येथील उर्वरित गुंफा आकारास आल्या. भगवान गौतम बुद्धांच्या आयुष्यातील काही महत्त्वाचे प्रसंग तसेच काही जातक कथा येथे चितारण्यात आल्या आहेत. काळाच्या ओघात हा परिसर निर्मनुष्य झाल्याने तेथे रान माजले आणि हे स्थान अज्ञात राहिले. १८१९मध्ये जॉन स्मिथ या ब्रिटिश अधिकाऱ्याला येथे शिकार करत असताना योगायोगाने या लेण्यांचा शोध लागला. निजाम सरकारने या परिसराची साफसफाई करण्याचे ठरवले, मात्र अनेक शतके अज्ञात राहिलेल्या या लेण्यांपर्यंतचा मार्ग सुकर करण्यासाठी एक-दोन नाही तर २६ वर्षे जावी लागली.
अजिंठा येथील चित्रशिल्पांचे महत्त्व लक्षात घेऊन त्यांची प्रतिकृती तयार करण्यासाठी इंग्रजांनी १८४४मध्ये त्यांच्या सैन्यातील चित्रकार रॉबर्ट गिल याची नेमणूक केली. ‘रॉयल एशियाटिक सोसायटी’त चित्रकला शिकलेला मेजर गिल हा अजिंठय़ाच्या पायथ्याशी असलेल्या लेणापूर गावी दाखल झाल्यानंतर त्याची भेट पारो या स्थानिक तरुणीशी झाली. लेण्यांचे आणि या चित्रांचे महत्त्व जाणणाऱ्या पारोने त्याला नैसर्गिक रंगसाहित्य पुरवण्यापासून सर्वतोपरी सहाय्य केले. या दोघांत साहजिकच प्रेमाचे अनुबंध निर्माण झाले. मात्र या नात्याला काही नाव नसल्याने ग्रामस्थांकडून त्यांना जोरदार विरोध झाला.. हा संघर्ष या चित्रपटात चितारण्यात आला आहे. या प्रेमी जिवांमध्ये संवादाची भाषा नसल्याने चित्रपटात ही उणीव गीत-संगीताने भरून काढली!

कौशलने हे आव्हान कसे पेलले, या गीतांना स्वरबद्ध करताना त्याने काही वेगळा विचार केला होता का, असा प्रश्न मनात आला. याबाबत कौशललाच विचारले असता त्याने या गाण्यांचा प्रवास उलगडला. ‘रुपारेल महाविद्यालयात असतानाच महानोरांचे हे खंडकाव्य वाचनात आले होते. तेव्हा आम्ही मित्र ते वाचून अक्षरश: थक्क झालो होतो. लेखक-दिग्दर्शक चेतन दातार याला त्या वेळी या खंडकाव्यावर एक नृत्यनाटिका करायची होती, मात्र ते राहूनच गेले. नितीन देसाई यांनी मला या चित्रपटाची ऑफर दिली आणि हा योग जुळून आला. रॉबर्ट गिल आणि पारोची ही अव्यक्त प्रेमकथा महानोरांनी ज्या उत्कटतेने काव्यबद्ध केली आहे, त्याच तोडीची संगीतरचना व्हायला पाहिजे, याकडे माझा कटाक्ष होता. मात्र गमतीची गोष्ट म्हणजे त्यासाठी फार विचार करावा लागला नाही, महानोरांची शब्दकळा एवढी गेयतापूर्ण होती की ते शब्दच सुरांचा हात धरून आले. तुम्हाला खोटं वाटेल मात्र या गाण्यांपैकी ९० टक्के गाण्यांच्या चाली मी केवळ एका दिवसात स्वरबद्ध केल्या. कोणताही संगीतकार ठरवूनही वाईट चाली करू शकणार नाही, अशा या कविता आहेत. माझे अर्धे काम महानोरांच्या काव्यानेच केले. शिवाय हे काम सुरू असताना स्वत: महानोर माझ्यासोबत होते, त्यांच्याकडून हे काव्य अधिक चांगल्या प्रकारे समजून घेता आले.
ही कथा आदिवासी तसेच बंजारा समाजात घडत असल्याने लोकगीते आलीच. त्यामुळे चाली रचताना लोकगीतांचाही विचार होणे स्वाभाविक होते. मात्र मी त्यापलीकडे विचार केला. ही रॉबर्ट आणि पारो अशा परस्परांची भाषा समजू न शकणाऱ्या प्रेमी जिवांची कहाणी. त्यामुळे त्यांच्यात संवादाची भाषा कोणती असेल तर ती संगीताचीच, हे मनाशी पक्के केले. त्यांच्यातील संवादाची उणीव भरून काढण्याची ताकद केवळ संगीतातच असणार. त्यांचं प्रेम हे ज्याप्रमाणे शब्दांच्या पलीकडले तसेच संगीतही शब्दांच्या पलीकडले. हे विचारमंथन सुरू असताना महानोरांच्या खंडकाव्यात कुसुमाग्रजांनी लिहिलेली प्रस्तावना पुन्हा वाचनात आली. खंडकाव्यातील कवी नेहमी तटस्थपणे नॅरेटरच्या भूमिकेतून ती गोष्ट सांगतो, येथे मात्र महानोर तटस्थ नाहीत, पारो, रॉबर्ट गिल, अिजठा लेणी अशा सर्वाचे मनोगत ते व्यक्त करतात.. कुसुमाग्रजांची ही प्रस्तावनाही दिशादर्शक ठरली. महानोर यांच्या काव्याचा दर्जा संगीतात जपायचा या कटाक्षाने मी या रचना केल्या. चित्रपटात गाण्यांच्या जागा निवडण्यासाठीही विशेष कष्ट पडले नाहीत आणि निरनिराळ्या छटांची १० गाणी साकारली. नितीन देसाई यांनी कोठेही हात आखडता न घेतल्याने या रचनांना न्याय देण्यासाठी मी तब्बल २० गायकांना तसेच ८० वादकांना पाचारण केले. गायकांमध्ये अगदी सुरेश वाडकर, पं. सत्यशील देशपांडे, रवींद्र साठे यांच्यापासून अवधूत गुप्ते, मिलिंद इंगळे, जयदीप बगवाडकर, हृषीकेश रानडे, स्वानंद किरकिरे, सावनी रवींद्र, हमसिका अय्यर, तेजस्विनी केळकर, योगिता गोडबोले, अमृता सुभाष, प्रियांका बर्वे, सई टेंभेकर, मधुरा कुंभार, आनंदी जोशी, डॉ. नेहा राजपाल, ऊर्मिला धनगर, कल्याणी साळुंके आणि मी स्वत: एवढय़ा गायकांनी यात गाणी गायली आहेत. याशिवाय अनेक तालवाद्ये, तंतुवाद्ये वापरली. सिंथेटिक संगीतमेळाचाही वापर केला. याचा एकत्रित परिणाम म्हणून ही गाणी अस्सल मातीतील वाटतात. कथेच्या मागणीप्रमाणे बंजारा, आदिवासी, राजस्थानी, मुस्लीम, मराठी अशा सर्व समाजांच्या लोकगीतांचे प्रतिबिंब या गाण्यांमध्ये उतरलंय, असं मला वाटतं. या गाण्यांवर केवळ लोकगीतांचाही शिक्का मारता येणार नाही. आधी म्हटल्याप्रमाणे सर्व छटांची गाणी त्यात आली आहेत. त्यामुळेच या वर्षांतील हा सर्वात रोमँटिक अल्बम ठरेल, असं मला प्रामाणिकपणे वाटतं.’
अजिंठय़ामधील शिल्पं आणि चित्रं ज्याप्रमाणे काळाच्या कसोटीवर उतरली आणि ऐतिहासिक ठरली त्याचप्रमाणे अजिंठय़ाचे हे गीतशिल्पही अजरामर ठरेल यात शंका नाही. हा चित्रपट प्रदर्शनापूर्वी काही गोष्टींमुळे वादग्रस्त ठरला होता, मात्र महानोर आणि कौशल यांच्या प्रतिभेचा हा आविष्कार बावनकशी आणि अस्सल आहे, हे निर्विवाद!