६ एप्रिल २०१२
मथितार्थ
  कुतूहल
  स्टार्टर
केल्याने रेषाटन

IPL विशेष
IPL आणि मी
IPL पर्दाफाश
IPL सबकुछ
IPL संस्कृती
IPL यशाचा फॉम्र्युला
IPL ब्रँडिंग
IPL चीअरफुल
IPL इंटरॅक्शन
IPL स्पॉटलाइट
IPL पुणे
IPL विवाद

आठवणी ग्रेसच्या
दुर्गाच्या देशा
सांस्कृतिक
सिनेआशिया
पर्यावरण
क्रिकेटनामा
जंगल वाचन
वाचक प्रतिसाद
भविष्य
संपर्क
मागील अंक

सांस्कृतिक

मना घडवी संस्कार
संपदा वागळे

आजचे विद्यार्थी हे आपल्या देशाचे भावी आधारस्तंभ आहेत. ते सुसंस्कृत, स्वाभिमानी तसेच देशभक्त बनावेत यासाठी आपण सर्वच सातत्याने प्रयत्न करत असतो. त्याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून विद्यार्थ्यांना ‘वाल्मीकी रामायण’च्या माध्यमातून भारतीय संस्कृतीचा परिचय करून द्यावा व त्यायोगे त्यांच्यावर उत्तम संस्कार करावेत या विचाराने १९८५ मध्ये विश्व हिंदू परिषदेच्या ‘रत्नागिरी’ शाखेत ‘संस्कार शिक्षण योजना’ सर्वप्रथम सुरू झाली.

श्रीमद् रामायण आणि महाभारत हा आपला सांस्कृतिक ठेवा आहे. रामायणात माणसाने कसे वागावे याचे चित्र आहे, तर महाभारतात माणसे कशी असतात याची उदाहरणे आहेत. रामायणाची लोकप्रियता एवढी की ‘वाल्मीकी रामायण’ या ग्रंथाखेरीज आणखी चाळीस रामायण ग्रंथ व चारशे छोटी रामायणे निर्माण झाली. त्यापैकी एकटय़ा मोरोपंतांनीच १०८ रामायणे लिहिली. ग.दि.मां.च्या ‘गीतरामायणा’ने रामकथा घरोघर पोहोचली. काही वर्षांपूर्वी रामानंद सागरांनी दूरदर्शनवर सादर केलेल्या ‘रामायण’ या मालिकेने तर साऱ्या भारतालाच वेड लावलं होतं.
रामायणातील कथा पूर्वी एकत्र कुटुंबपद्धतीत आजी-आजोबा आपल्या नातवंडांना खुलवून अगदी परिणामकारक पद्धतीने सांगत. शालेय अभ्यासक्रमातही रामायणातील कथांना स्थान होते. या गोष्टी ऐकताना मुलांची अगदी सहजतेने मानसिक, सांस्कृतिक जडणघडण होत असे. कारणपरत्वे ते आता शक्य होत नाही.
आजचे विद्यार्थी हे आपल्या देशाचे भावी आधारस्तंभ आहेत. ते सुसंस्कृत, स्वाभिमानी तसेच देशभक्त बनावेत यासाठी आपण सर्वच सातत्याने प्रयत्न करत असतो. त्याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून विद्यार्थ्यांना ‘वाल्मीकी रामायण’च्या माध्यमातून भारतीय संस्कृतीचा परिचय करून द्यावा व त्यायोगे त्यांच्यावर उत्तम संस्कार करावेत या विचाराने १९८५ मध्ये विश्व हिंदू परिषदेच्या ‘रत्नागिरी’ शाखेत ‘संस्कार शिक्षण योजना’ सर्वप्रथम सुरू झाली. १९८६ मध्ये रत्नागिरीमधील परिषदेचे एक ज्येष्ठ कार्यकर्ते दादासाहेब कयाळ ठाण्यात आले होते. त्यांनी दिलेल्या माहितीमुळे प्रभावित होऊन ठाण्यातील उत्साही कार्यकर्त्यांनी ठाणे विभागात लगेचच ‘रामायण कथा अभ्यास’ समितीची स्थापना केली.
या समितीत ठाण्यातील काही शाळांचे मुख्याधिकारी सामील झाले. सर्वानुमते असं ठरलं की, ‘इयत्ता ६वीच्या विद्यार्थ्यांना सांस्कृतिक तासाला, शिक्षकांनीच रामायणातील कथा सांगाव्यात आणि ५-६ महिन्यांनंतर नोव्हेंबर-डिसेंबरच्या सुमारास त्यावर मुलांची १०० गुणांची लेखी परीक्षा घ्यावी, त्यातील उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे व विशेष श्रेणीत आलेल्यांचा पारितोषिक देऊन गौरव करावा.’
पहिल्या परीक्षेच्या प्रचारासाठी ३०-४० कार्यकर्ते शाळाशाळांमधून फिरले. त्यांच्या कष्टांचं फलित म्हणजे ठाण्यातील पहिली परीक्षा २९ नोव्हेंबर १९८६ रोजी पार पडली. या परीक्षेला २२०० विद्यार्थी बसले होते. या घटनेला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने अलीकडेच संस्थेचा ‘रौप्यमहोत्सवी सोहळा’ ठाण्याच्या गडकरी रंगायतनमध्ये मोठय़ा दिमाखात साजरा झाला.
‘रामायण’ हा काही धार्मिक ग्रंथ नाही. ते एक महाकाव्य आहे. राम-रावण युद्ध म्हणजे माणसाच्या राक्षसी प्रवृत्तीविरुद्धचा लढा आहे. रामायणातील बंधुप्रेम, स्वामिनिष्ठा, मातृपितृभक्ती..इ. संस्कार मुलांवर घडवण्यासाठी साध्या, सोप्या, सरळ भाषेत लिहिलेल्या पुस्तकाची गरज होती. कार्यकर्त्यांच्या विनंतीनुसार ठाण्यातील ज्येष्ठ कवी ‘कै. म. पा. भावे’ यांनी अवघ्या दीड महिन्यात २८ गोष्टिंचं ‘कथारूप रामायण’ हे अत्यंत ओघवत्या भाषेतील व संवादात्मक शैलीतील पुस्तक लिहून पूर्ण केलं, जे मुलांबरोबर पालकांच्याही पसंतीला उतरलं. या पुस्तकाची आत्ता १५वी आवृत्ती निघाली असून, त्याचे इंग्रजी, हिंदी व गुजराथी भाषांमधून अनुवादही करून घेण्यात आले आहेत. या पुस्तकाचं वैशिष्टय़ म्हणजे प्रत्येक गोष्टीनंतर शेवटी ठळक अक्षरात त्यातून ग्रहण करण्यायोग्य सुविचार ठळक अक्षरात लिहिला आहे. प्रश्न मात्र कोठेही नाहीत, त्यामुळे ‘उत्तरापुरतं वाचन’ ही संकल्पनाच उरत नाही.
या वर्षी ठाणे महानगर परिसरातील १०० शाळांमधील ४५०० विद्यार्थी या परीक्षेला बसले होते. त्यातील १५२ विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले. विशेष म्हणजे ठाण्यातील ‘सुलोचनादेवी सिंघानिया हायस्कूल’सारख्या प्रतिष्ठित शाळेनेही हा उपक्रम उचलून धरलाय. शाळाशाळांमधील हिंदू मुलांबरोबर अनेक मुस्लीम मुलंही रामकथांचा अभ्यास आवडीने करताहेत. या उपक्रमाचं नियोजन करणारे द. र. सरपोतदार, वि. ह. दामले, नाना ओजाळे.. असे १५-१६ कार्यकर्ते ७० ते ८० वयोगटातील आहेत. मोहन बलेकर हे तर स्थापनेपासून म्हणजे गेली २५ वर्षे कार्यरत आहेत. शिवाय गेली कित्येक वर्षे प्रश्नपत्रिका तयार करण्याचं काम बाळासाहेब भागवत आनंदाने करत आहेत. या मंडळींचा उत्साह बघताना, त्यांची मनं आजही पंचविशीतील तरुण आहेत असं वाटतं.
मुंबई शहरात याच कार्याला जून २००३ पासून ‘संस्कृती संवर्धन प्रतिष्ठान’ या नावाने सुरुवात झाली. आणि हा पसारा आज ५०७ शाळा, १,०८,००० विद्यार्थी आणि ३००-४०० कार्यकर्ते एवढा व्यापक झाला आहे. मोहन सालेकर, प्रसाद संसारे, नम्रता पुंडे.. इत्यादींच्या कल्पक व धडाडीच्या नेतृत्वाखाली वर्षभर विविध उपक्रमांची धामधूम सुरू असते.
गुरुपौर्णिमेला म्हणजेच महर्षी व्यासांच्या जन्मदिवशी ‘रामायण’ व ‘महाभारत’ या ग्रंथांची पूजा करून प्रारंभ होतो. नंतर ऑगस्टमध्ये शिक्षकांची कार्यशाळा, ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात विद्यार्थ्यांसाठी कथाकथन, प्रश्नमंजूषा, रामरक्षापठण.. अशा स्पर्धा, जानेवारीत परीक्षा आणि फेब्रुवारीत पारितोषिक वितरण समारंभ अशी आखणी असते. संस्कृती संवर्धनचं वैशिष्टय़ म्हणजे जानेवारीत घेतली जाणारी परीक्षा सर्वच्या सर्व ५०७ शाळांमध्ये एकाच दिवशी, एकाच वेळेला घेतली जाते. या दिवशी किमान २००० कार्यकर्ते आपला वेळ देतात.
कामाची व्याप्ती वाढल्याने ‘संस्कृती संवर्धन प्रतिष्ठान’ने मुंबईतील शाळांचे २३ भाग पाडले आहेत. त्या त्या भागातील कार्यकर्ते एकमेकांना आठवडय़ातून एकदा भेटतात. शाळा संपर्क, कार्यक्रमांची आखणी.. यासाठी महानगर ग्रुप बनवला आहे. ही मंडळीही दर आठवडय़ाला एकत्र येतात. झालंच तर ट्रस्टींची तीन महिन्यांतून एक मीटिंग होते. अशा रीतीने हे काम तीन पातळ्यांवरून चालतं. अर्थात सेवाभावी वृत्तीने, आपापली नोकरी, कामधंदा सांभाळून. आता मुंबईपाठोपाठ कर्जत, शेगाव, नागपूर या ठिकाणीही प्रतिष्ठानचं काम सुरू झालं आहे.
संस्कृती प्रतिष्ठानने रामायणाबरोबर, महाभारत व क्रांतिवीरांच्या गाथा ही पुस्तकेसुद्धा अभ्यासासाठी ठेवली आहेत. यांच्या किमती अत्यंत माफक आहेत. त्यांची योजना ५वी ते ८वीच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. मुंबई महानगरपालिकेने हा उपक्रम आपल्या शाळांमधून चालवण्यासाठी हिरवा कंदील दिल्याने कार्यकर्त्यांचा हुरूप वाढला आहे. मराठी, हिंदी, इंग्रजी व गुजराती अशा चार भाषांतून घेतल्या जाणाऱ्या परीक्षांमधून दरवर्षी १०००च्या वर मुलांना बक्षिसं दिली जातात. त्याचबरोबर उल्लेखनीय शाळा, आदर्श शाळा, आदर्श शिक्षक व विशेष शिक्षक हे पुरस्कार मिळण्यातही चढाओढ लागते.
तनमनधन वेचून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची फौज असली तरी अशा उपक्रमांसाठी लागणाऱ्या पैशाचं पाठबळ हा नेहमीचा यक्षप्रश्न. परंतु हेतू शुद्ध असेल तर कोणी ना कोणी पाठीशी उभं राहतं या वचनाची प्रचीती संस्थाचालकांना येत आहे. म्हणूनच या रोपटय़ांचा आज वटवृक्ष झालेला दिसतो.
रत्नागिरीत जिथे या उपक्रमाचं बीज पेरलं गेलं तिथे मात्र आज ‘अविनाश लेले’ हा एकांडा शिलेदार लढतोय. शिरगावमध्ये राहून लांजा, राजापूर व रत्नागिरी परिसरांतील सतरा शाळांमधून किल्ला लढवणाऱ्या या लढवय्याच्या चिकाटीला दाद द्यायला हवी.
रामायणाचं आकर्षण भारतापुरतंच मर्यादित राहिलेलं नाही हे म्हणण्याचं कारण म्हणजे केरळमधील ‘बालगोकुलम्’ या नावाजलेल्या संस्थेने असाच एक उपक्रम संयुक्त विद्यमाने इंग्लंड व अमेरिकेतही सुरू केला आहे आणि तिथेही त्याला भरभरून प्रतिसाद मिळत आहे.
नुसत्या गोष्टी सांगून, ऐकून संस्कार होतात का या प्रश्नावर रामायण कथा अभ्यास समितीच्या कार्यकर्त्यांनी विद्यार्थ्यांनी पाठवलेल्या (जे आता सुजाण नागरिक बनले आहेत.) पत्रांची एक फाईलच पुढे केली. त्यामधील बी.ई व एम.बी.ए. डीग्री घेऊन सिंगापूरमध्ये स्थायिक झालेल्या प्रसाद बलेकरचं म्हणणं.. रामायणाचा अभ्यास हा एक वेगळा अनुभव होता. सर्वच व्यक्तिरेखांमधून काही ना काही शिकण्यासारखं आहे. महर्षी वाल्मीकींच्या पत्नी ‘वार्षिणी’चे समाजावर फार मोठे उपकार आहेत. कारण तिने आपल्या पतीला, मी तुमच्या पापात सहभागी होणार नाही असं ठणकावून सांगितल्यामुळेच ‘वाल्याचा वाल्मीकी’ झाला. असे जर आज समस्त महिलांनी आपल्या पतीला-भावाला सांगितले असते तर जगाने आपल्या देशाकडे ‘एक आदर्श’ म्हणून आदराने पाहिले असते.
संस्कृती संवर्धनचे कार्यकर्ते तर आपल्या शिक्षकांकडून नेहमीच फीडबॅक घेत असतात. त्यापैकी ‘छाया किसन वाजे’ या घाटले येथील उ. प्रा. मराठी शाळा क्र.१च्या मुख्याध्यापिका आपल्या पत्रात लिहितात.. माझ्या शाळेतील विद्यार्थी तळागाळातून येतात. त्यांना घडवण्याची जबाबदारी पूर्णपणे आमच्या शिक्षकांवर असते. रामायणातील गोष्टी, त्यावरील चर्चा, यामुळे आमच्या विद्यार्थ्यांच्या वृत्तीत बराच फरक पडलाय. कष्टांना पर्याय नाही, शब्दांना जागणे, कोणालाही कमी न लेखणे (खारीची गोष्ट).. असे संस्कार रामायणाचे चिंतन, मनन केल्यामुळे मुलांच्या मनात रुजू लागले आहेत. यासाठी आपले मन:पूर्वक आभार!
वरील दोन प्रातिनिधिक पत्रे या उपक्रमाचं यश आणि गरज सांगण्यासाठी पुरेशी आहेत. बरोबर ना?
response.lokprabha@expressindia.com