२ मार्च २०१२
मथितार्थ
नक्षत्रांचे नाते
वेध राजकारणाचा
सत्ताकारणाचे शहाणपण...
विचार पक्का, पण दिशा अनिश्चित रिपब्लिकन राजकारणाचा खेळखंडोबा
विज्ञान दिन विशेष
मराठी विज्ञान परिषद वसा विज्ञान प्रसाराचा!
भारतातून दोन मराठी तरुणांनी घेतला धूमकेतूंचा धांडोळा
विज्ञान समजून घ्या
विज्ञान दिनाचे ‘आयुका’ मॉडेल!
वैज्ञानिक दृष्टिकोन काळाची गरज
रोजच राष्ट्रीय विज्ञान दिन हवा!
विज्ञान म्हणजे काये रे भाऊ?
इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र बचावली हजारो झाडे!
गोष्ट परिष्कृत गॅसिफायरची
पुस्तकं-बिस्तकं
टाक धिनाधिन
हॉकी
दुर्गाच्या देशा
फ्लॅशबॅक
अरुणाज रेसिपीज
सिनेशताब्दी
आयुष्यावर वाचू काही
श्रीकांत नूलकरच्या अतक्र्य कथा
क्रिकेटनामा
सीमापल्याड
शिल्प
शॉपिंग
केल्याने रोषाटन
दबंगवाणी
वाचक प्रतिसाद
भविष्य
संपर्क
मागील अंक

विज्ञान दिन विशेष
मराठी विज्ञान परिषद वसा विज्ञान प्रसाराचा! | भारतातून दोन मराठी तरुणांनी घेतला धूमकेतूंचा धांडोळा | विज्ञान समजून घ्या | विज्ञान दिनाचे ‘आयुका’ मॉडेल! | वैज्ञानिक दृष्टिकोन काळाची गरज | रोजच राष्ट्रीय विज्ञान दिन हवा! | विज्ञान म्हणजे काये रे भाऊ? | इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र बचावली हजारो झाडे! | गोष्ट परिष्कृत गॅसिफायरची

रोजच राष्ट्रीय विज्ञान दिन हवा!
अ. पां. देशपांडे

राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करणे आणि त्या निमित्ताने देशभर विज्ञानाचे वातावरण निर्माण करणे, लोकांना विज्ञानाचे महत्व समजावून सांगणे हा एक प्रयत्न आहे. आज एकविसाव्या शतकातील पहिले दशक उलटून गेले असताना जगातल्या पुढारलेल्या देशांप्रमाणेच भारतातही सर्व आधुनिक गोष्टी वापरात आल्या आहेत.

सुप्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉ. वसंतराव गोवारीकर १९८७ साली भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान खात्याचे सचिव असताना त्यांनी ज्या विविध योजना सुरू केल्या त्यातील एक योजना म्हणजे देशात विज्ञानाचे वातावरण निर्माण करण्यासाठी दरवर्षी २८ फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करणे. राष्ट्रीय विज्ञान दिनासाठी कोणती तारीख निवडावी यासाठी तेव्हा खूप मोठा खल झाला. २ ऑक्टोबर ही गांधी जयंती घ्यावी की १४ नोव्हेंबर ही नेहरू जयंती घ्यावी असा एकूण चच्रेचा सूर असताना एकदम डॉ. वसंतराव गोवारीकरांच्या मनात आले की अरे! हा तर राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यासाठी दिवस शोधायचा आहे आणि भारतात विज्ञानाचा एकमेव नोबेल पुरस्कार डॉ. सी. व्ही. रामन यांना मिळाला आहे, तर त्यांच्याशी संबंधितच तो दिवस असावा. शिवाय तो त्यांचा जन्म अथवा मृत्युदिन निवडण्यापेक्षा त्यांनी ज्या दिवशी त्यांचा निबंध जगप्रसिद्ध ‘नेचर’ या विज्ञान मासिकाला पाठवला आणि ज्याला पुढे १९३० साली नोबेल पुरस्कार मिळाला ती तारीख का निवडू नये? अखेर ती तारीख निघाली २८ पेब्रुवारी व तीच मुक्रर झाली. तोच हा राष्ट्रीय विज्ञान दिन.
का हे विज्ञानाचे वातावरण निर्माण करायचे? जगातल्या विकसित देशांना अशी गरज भासत नसताना भारतालाच ते का जाणवावे? पुढारलेल्या देशांना त्याची गरज भासत नाही कारण तेथे अंधश्रद्धा नाहीत असे नाही पण त्या कमी मात्र नक्कीच आहेत. तेथील लोक कार्यकारणभाव समजावून घेणारे दिसतात. पण भारतात ती परिस्थिती आणण्यासाठी आपल्याला खटपट करावी लागणार आहे. त्या प्रयत्नातील राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करणे आणि त्या निमित्ताने देशभर विज्ञानाचे वातावरण निर्माण करणे, लोकांना विज्ञानाचे महत्त्व समजावून सांगणे हा एक प्रयत्न आहे. आज एकविसाव्या शतकातील पहिले दशक उलटून गेले असताना जगातल्या पुढारलेल्या देशांप्रमाणेच भारतातही सर्व आधुनिक गोष्टी वापरात आल्या आहेत. १२० कोटी लोकसंख्येच्या या देशातील निम्मे लोक आज मोबाईल फोन वापरत आहेत. त्यातही टच स्क्रीनसारखे मोबाईल फोन वापरणारी तरुण पिढी आहे. एवढेच नव्हे तर अंगावर फाटके कपडे असले तरी आमचे शेतकरी मुंडाशात मोबाईल फोन ठेवून असतात आणि बाजारभाव काय आहे हे आधी विचारून मगच आता आपला माल बाजारात नेऊ लागले आहेत. बाजाराला किती मालाची मागणी आहे हे अगोदर विचारून मगच वसईचा शेतकरी हवा तेवढा माल घेऊन मुंबईला जातो. लांबून येणारा कोणीही माणूस ज्याच्याकडे जायचे त्याची उपलब्धता अगोदर फोनवर ठरवून घेऊन मगच त्याच्याकडे जातो. ‘या बाजूला सहज आलो होतो, तुम्ही आहात का ते पाहावे म्हणून सहज डोकावलो’चे दिवस आता संपले.आता तर दोघा तरुण नवरा-बायकोला दिवसभर आपल्याजवळ मोबाईल हवा असल्याने घरी आता ‘लँड लाईन’ असण्याचे दिवस संपले आहेत. हे लोण आता तीन-चार वर्षांच्या मुलांपर्यंत पोहोचले असून त्याला खेळण्यातही मोबाईल फोन हवा असतो. घराघरात मिक्सर, मायक्रोवेव्ह ओव्हन, इलेक्ट्रिक कूकर, ताक घुसळण्याची इलेक्ट्रिक रवी, रेफ्रिजरेटर, टीव्ही, वॉिशग मशीन, गिझर इत्यादी अनेक उपकरणे आली आहेत. पण ती कशी चालतात, ती किरकोळ बिघडली तर कशी दुरुस्त करायची याची तसदी आपण कोणी घेत नाही. हा प्रश्न आपण आपल्याकडे उपलब्ध असलेल्या मनुष्यबळाशी जोडून देऊन आपण मोकळे होतो. म्हणजे असे की आपल्याकडे सुतार, इलेक्ट्रिशियन, प्लंबर (खरा उच्चार प्लमर), रंगारी असे अनेक लोक उपलब्ध असल्याने आपण त्या गोष्टी आपल्या हाताने तर करीत नाहीच, पण त्या कशा करायच्या हेही समजावून घेत नाही. परदेशात माणसांचा एकूणच तुटवडा असल्याने तेथे बाजारात उपलब्ध असलेल्या गोष्टी घरी नेऊन लोक नट-बोल्टच्या सहाय्याने जोडतात. त्यासाठी अनेक गॅजेटबरोबर दिलेली माहितीपत्रके लोक नीट वाचून त्याप्रमाणे त्या गोष्टी जोडून चालू करतात. आपल्या येथल्यासारखे कोणी ‘डेमो’साठी येत नाहीत. डेमोसाठी कंपनीचा माणूस आला नाही तर लोक महिनोन् महिने त्या वस्तू वापरत नाहीत. वस्तुत: त्या त्या वस्तूंबरोबर माहितीपत्रक असतेच. औषधाच्या बाटलीबरोबर आलेले पत्रक आपल्यापकी किती जण वाचतात? औषध विकत घेताना त्या बाटली किंवा गोळ्यांच्या स्ट्रिपवरील ‘एक्स्पायरी डेट’ही आपण वाचत नाही. ही का आपली साक्षरता? ज्या गोष्टी आपल्या जिवाशी ‘खेळ’ करू शकतात त्याही आपण पाळत नाही.
काही ठिकाणी मात्र ग्रामीण भागातील लोक विचार करू लागले आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने शेत-तळे करून पावसाचे पाणी साठवले. ते किती आहे ते पाहून आपल्याला अर्धा एकर जमिनीत कोणते पीक काढता येईल याचा हिशेब करून त्याने टोमॅटो लावला आणि त्यातून ४० हजार रुपये मिळवले. मात्र येथे आणखी एक धोका जाणवतो, तो असा की एकाला टोमॅटोमधून बऱ्यापकी फायदा मिळाला हे पाहून बाकीचे लोकही टोमॅटो लावतात आणि गावात खूप टोमॅटो पिकल्यावर भाव मग एकदम पडतो. तसे होऊ नये म्हणून ग्रामसभेत लोकांना पिके जर वाटून दिली तर प्रत्येकाला पसा मिळेल आणि भाव पडणार नाही. काही वर्षांपूर्वी अमरावतीजवळील मेश्राम नावाच्या एका शेतकऱ्याने शेतीसाठी पाणी नाही म्हणून स्वस्थ बसण्याऐवजी गावातील सांडपाणी नगरपालिकेकडून मागून घेतले व ते संत्र्याच्या बागेसाठी वापरले. त्याला त्याच्या इतर शेतकरी मित्रांनी खूप दोष दिला की अशा घाण पाण्यावर संत्री येणार नाहीत आणि जर ती आली तर कोणी विकत घेणार नाही. पण त्या पाण्यावर संत्री खूप तजेलदार आली आणि सर्व संत्री उत्तम भाव मिळवून विकली गेली. माझी खात्री आहे की आता तेथे सांडपाण्यासाठी मारामारी होत असेल. कोल्हापूर जिल्ह्यातील गडिहग्लजला गावातले सगळे सांडपाणी एकत्र करून त्यावर छोटीशी प्रक्रिया करुन ते पुरेल तितक्या शेतीला देतात. असे पाणी शेतकऱ्याला १२ महिने उपलब्ध होते व नगरपालिकेला त्या पाण्यातून पसाही मिळतो. बाकीच्या नगरपालिकांनी हा कित्ता गिरवल्यास महाराष्ट्रात हुकमी पाण्याखाली असलेली १६ टक्के जमीन २०-२२ टक्क्यांपर्यंत सहज जाईल व तीही बिनखर्चाने.

का हे विज्ञानाचे वातावरण निर्माण करायचे? पुढारलेल्या देशांमधील लोक कार्यकारणभाव समजावून घेणारे दिसतात. पण भारतात ती परिस्थिती आणण्यासाठी आपल्याला खटपट करावी लागणार आहे.

रविवार दि. १२ फेब्रुवारी, २०१२ रोजी एका राजकीय पक्षाची मिरवणूक निवडणुकीच्या प्रचारासाठी कळव्यातून निघाली असताना काही तरुणांनी हातात लोखंडी पाइप घेऊन त्याला पक्षाचे झेंडे लावले होते. ते झेंडे उंचावून ही माणसे घोषणा देत चालली असताना एका भागातील विजेच्या तारांजवळ हे झेंडे (लोखंडी पाइप) आले, ते प्रत्यक्षपणे विजेच्या तारांना टेकले नव्हते. पण ते तारांच्या जवळ येण्याने ठिणग्या (फ्लॅश) उडून उच्च दाबाचा विजेचा प्रवाह त्या लोखंडी पाइपामार्फत ते झेंडे हातात धरणाऱ्यांच्या शरीरात शिरला व ते जळून मेले (इलेक्ट्रोक्यूटिंग). त्यांना सोडवायला गेलेले लोक त्यांच्या हातातील झेंडे हिसकावून घेत होते, तेही झेंडय़ाच्या पाइपला चिकटून जळून मेले. या सगळ्या गोष्टी शाळेत शिकवल्या जातात, पण या गोष्टी त्या त्या परीक्षांच्या वेळी घोकलेल्या असतात, परीक्षा झाली की त्या विसरून जाण्यासाठीच जणू असतात. खरे म्हणजे हे जीवन शिक्षण असते. ते आयुष्यभर लक्षात ठेवून वापरायचे असते. तीन वर्षांपूर्वी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा एक गट अमरावतीला सहलीसाठी गेला होता. परतीच्या वाटेवर ते विद्यार्थी असताना अमरावती स्टेशनात आले. एका कोणाच्या तरी मनात या सगळ्या विद्यार्थ्यांचा उंचावरून फोटो काढावा असे आले. एक विद्यार्थी कॅमेरा घेऊन प्लॅटफॉर्मवर उभ्या असलेल्या गाडीच्या टपावर उभा राहिला आणि बाकी सगळ्यांना त्याने प्लॅटफॉर्मवर उभे राहायला सांगितले. वरून त्याने फोटो काढायच्या वेळेला गाडी तिच्या डोक्यावरील ज्या विजेच्या तारातून वीजप्रवाह घेते तेथून या कॅमेऱ्यामार्फत फ्लॅिशग झाले आणि तो विद्यार्थी जळून मेला. मुंबईत दर महिना एकदोन माणसे लोकलच्या टपावर बसल्याने इलेकट्रोक्यूट झालेली अथवा घसरून खाली पडलेली आपण पाहतो अथवा वर्तमानपत्रातून वाचतो. लोकलच्या दरवाजाबाहेर लटकलेली माणसे रेल्वे लाइनीतील खांबावर आपटून मेलेले ऐकतो. या सर्व गोष्टींसाठी सरकारने, रेल्वेने नियम करायचे म्हणजे किती करायचे? आपण काहीच करणार नाही का?
एखादे गॅजेट कसे चालते हे समजावून घेण्याबरोबरच रस्त्यावर कचरा टाकू नये, थुंकू नये, रेल्वेच्या-एसटीच्या गाडीतून खाल्लेल्या पदार्थाची आवरणे टाकू नयेत, बस-रेल्वेत आपल्या मोबाईलवर हळू आवाजात बोलावे, रस्त्याने चालताना मोबाईलवर बोलण्याने आपल्याला धोका संभवतो (नुकताच एक महाविद्यालयीन विद्यार्थी कानात आय-पॉडच्या वायरी घालून रेल्वे रूळ ओलांडताना मेल्याचे आपण वाचले आहे), आय-पॉडमुळे आपल्याला एकदाच मिळालेले कान बधिर होतातरु ग्णालयात मोबाईल फोन वापरल्याने रुग्णांवर चालू असलेल्या उपचारांना धोका संभवतो. या गोष्टी सुशिक्षितांना केव्हा समजणार ते समजत नाही.
राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्ताने असे अनेक कार्यक्रम करून केवळ शालेय मुलांचेच नव्हे तर तमाम जनतेचे लक्ष वेधायला हवे. समाज केवळ शिक्षित करून भागत नाही असे आता लक्षात आले असून तो सुसंस्कृत करण्याची गरज आहे.आणि त्यासाठी केवळ २८ फेब्रुवारी या एकाच दिवशी विज्ञान दिन साजरा करून पुरेसे नाही तर वर्षांचे ३६५ दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्याची गरज निदान भारतात तरी आहे.
response.lokprabha@expressindia.com