२ मार्च २०१२
मथितार्थ
नक्षत्रांचे नाते
वेध राजकारणाचा
सत्ताकारणाचे शहाणपण...
विचार पक्का, पण दिशा अनिश्चित रिपब्लिकन राजकारणाचा खेळखंडोबा
विज्ञान दिन विशेष
मराठी विज्ञान परिषद वसा विज्ञान प्रसाराचा!
भारतातून दोन मराठी तरुणांनी घेतला धूमकेतूंचा धांडोळा
विज्ञान समजून घ्या
विज्ञान दिनाचे ‘आयुका’ मॉडेल!
वैज्ञानिक दृष्टिकोन काळाची गरज
रोजच राष्ट्रीय विज्ञान दिन हवा!
विज्ञान म्हणजे काये रे भाऊ?
इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र बचावली हजारो झाडे!
गोष्ट परिष्कृत गॅसिफायरची
पुस्तकं-बिस्तकं
टाक धिनाधिन
हॉकी
दुर्गाच्या देशा
फ्लॅशबॅक
अरुणाज रेसिपीज
सिनेशताब्दी
आयुष्यावर वाचू काही
श्रीकांत नूलकरच्या अतक्र्य कथा
क्रिकेटनामा
सीमापल्याड
शिल्प
शॉपिंग
केल्याने रोषाटन
दबंगवाणी
वाचक प्रतिसाद
भविष्य
संपर्क
मागील अंक

सीमापल्याड

तंजावर : मराठी नाममात्र
अभिमन्यू काळे

स्वातंत्र्य मिळाल्यावर अनेक ठिकाणी संस्थानिक राजकारणात स्थिरावले. दुर्दैवाने तंजावरमध्ये असे घडू शकलेले नाही. अर्थात यामागे लोकसंख्या हा महत्त्वाचा घटक आहे, असे तेथील मराठी मंडळींनी लक्षात आणून दिले. तंजावरच्या दोन लाख लोकसंख्येमध्ये आज फक्त ३०० च्या आसपास मराठी घरे आहेत. तिथल्या मराठी माणसाची आजची स्थिती विचारात घेण्यासाठी थोडे इतिहासातच डोकावे लागेल.

‘‘तंजावूरची राजसत्ता गेली
सत्तेविना मालमत्ता गेली
मालमत्तेविना वित्त गेले
वित्ताविना तंजावूरी मराठे खचले
इतके अनर्थ सत्ताहीनतेने गेले.’’

महात्मा फुले यांनी ‘विद्य्ोविना मती गेली’ हा श्लोक लिहिला, त्या वेळी त्यांनी महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेच्या दुस्थितीचे कारण शोधण्याचा प्रयत्न केला. त्या वेळच्या तथाकथित सत्ताधारी वा संपन्न वर्गाच्या तुलनेत सर्वसामान्य शेतकरी, बारा बलुतेदार, दलित यांची स्थिती अत्यंत बिकट होती. त्याच कालखंडात तंजावर या तामिळनाडूमधील संस्थानामध्ये मात्र मराठी माणूस हा सत्ताधारी होता. त्याचे वास्तव्य तत्कालीन तंजावर, कुंभकोणम, मसनगुडी, त्रिची अशा तत्कालीन मोठय़ा शहरांमध्ये उत्तम ठिकाणी होते व शेती आणि नोकरी ही उत्पन्नाची साधने त्याच्या हाती होती.
महात्मा फुले यांनी वर्णन केलेल्या दुस्थितीपासून तो दूर होता. पण काळाचा महिमा अगाध! ब्रिटिश आले आणि राजाश्रय गेला. पुढे स्वातंत्र्य आले. आणि तंजावरचा मराठी समाज एका अर्थाने परतंत्र झाला. तेथील तमिळ मंडळींच्या तंत्रानुसार चालणे त्याला भाग पडले.
तंजावरमधील मराठी माणसाची आजची स्थिती विचारात घेण्यासाठी थोडे इतिहासात जावे लागेल. शिवाजी महाराजांचे सावत्र भाऊ व्यंकोजी राजे यांचे राज्य तेथे होते हे आपण इतिहासात वाचलेले आहे. पण व्यंकोजी तेथे राजा म्हणून गेलेले नव्हते. त्यांना सन १६७५ मध्ये विजापूरच्या आदिलशहाने तंजावरमध्ये राज्य करणाऱ्या त्रिची येथील नायकांना धडा शिकविण्यासाठी पाठविले होते. व्यंकोजीने त्याला खाली खेचले व आदिलशहाच्या मृत्यूनंतर स्वत:ला राजा म्हणून घोषित केले. पुढे शिवाजी महाराजांनी खिळखिळी केलेली आदिलशाही संपुष्टात आली. महाराजांच्या दक्षिण दिग्विजयात त्यांनी जिंजी, अर्कोट याबरोबरच सन १६७६ मध्ये तंजावर जिंकले. पण भावाचा मान राखण्यासाठी त्याला तंजावरचे राज्य परत दिले. आणि येथेच ऐतिहासिक चूक घडली.
सन १६७६ पासून व्यंकोजी व त्याच्या वारसदारांनी तंजावरच्या आजूबाजूच्या सुपीक कावेरी खोऱ्यावर राज्य केले. पण ब्रिटिशांनी सगळा भारत गिळंकृत करताना तंजावरवरही विजय मिळविला. त्यानंतर पुढचे राजे ब्रिटिशांचे मांडलिक होते. त्यांच्या ताब्यात फक्त तंजावूर शहर राहिले. या काळातील लोकोत्तर पुरुष म्हणजे सफरेजीराजे दुसरे (सन १७९८ ते सन १८३२) ह्य़ा राजाने साहित्य, संस्कृती या क्षेत्रात अफाट कामगिरी केली. ते स्वत: उत्तम वैद्य व डोळ्यांचे डॉक्टर होते. त्यांचा कलाकृतींचा खजिना तेथल्या संग्रहालयांमध्ये आहे. पण त्यांची अद्वितीय कामगिरी म्हणजे त्यांनी जमा केलेला अफाट ग्रंथसंग्रह. सुमारे ८० हजार ग्रंथ व हस्तलिखिते इथे आहेत. संस्कृतमधील सुमारे ४० हजार हस्तलिखिते आहेत. त्याचप्रमाणे तमिळ, तेलगूमधील अनेक ग्रंथ आहेत. मोडी, देवनागरी, तमिळ व तेलगू या लिपींमध्ये लिहिलेले मराठी भाषेतील ग्रंथ आहेत. मोडीमध्ये तर ८५० गठ्ठय़ांत बांधलेली अडीच लाखांपेक्षा जास्त हस्तलिखिते जपून ठेवलेली आहेत. या राजाने त्यावेळी लंडन, पॅरीस यांसारख्या शहरात चित्रकार पाठवून त्या शहरांची चित्रे काढून ठेवलेली पाहायला मिळतात. िहदी, तमिळ, तेलगू, बंगाली यांसारख्या भारतीय भाषांबरोबरच हा राजा अनेक युरोपीय भाषा जाणत होता. त्याचा या भाषांतील ग्रंथसंग्रह भरपूर मोठा आहे.
अगदी सन १९४७ सालापर्यंत तंजावरचे राजे मराठी होते. मराठी माणसाला या शिवकालीन इतिहासाचा मोठा अभिमान वाटतो. स्वातंत्र्योत्तर काळात महाराष्ट्राची स्थापना झाली. मराठी भाषेच्या उन्नतीचे प्रयत्न सुरू झाले. त्या वेळी हमखास तंजावरमधील मराठी ग्रंथाच्या हस्तलिखितांचा विषय चच्रेस यायचा.
मराठी माणसाच्या महाराष्ट्रातील भवितव्याबाबत चर्चा करताना तंजावरमधील मराठी माणसांची आठवण येऊन जायची. बरेच दिवस तंजावरमध्ये जाऊन मराठी माणसांचे राज्य पाहावे, असे मनात येत होते. मध्ये एकदा थोडा वेळ मिळाला तेव्हा तंजावरला प्रत्यक्ष जाऊन आलो.
तंजावर शहराची लोकसंख्या सुमारे दोन लाख. आपल्याकडच्या सातारा, संगमनेरसारखे शहर. संस्थान काळातील काही इमारती, थोडेफार नवे बांधकाम. तासाभरात शहर फिरून संपते. तंजावरच्या जिल्ह्यात कावेरीच्या खोऱ्यातील सुपीक जमिनी आहेत. या जिल्ह्याला दक्षिण भारताचे भाताचे कोठार म्हटले जाते.
तंजावर हे मराठी माणसांचे संस्थान म्हणून आपल्या मनात कोरलेले असले तरी आज जगभरात त्याची ख्याती आहे, तेथील बृहड्डेश्वर मंदिरासाठी. युनोतर्फे जगातील सर्वश्रेष्ठ वारसाच्या वास्तूंमध्ये या मंदिराचा समावेश आहे. मंदिराचे वैशिष्टय़ म्हणजे हे प्रचंड मंदिर संपूर्ण पिवळय़ा रंगाच्या ग्रॅनाइटमध्ये दहाव्या शतकात बांधलेले आहे. या मंदिरातील शिविलगावर फुले वाहण्यासाठी राजाला वरच्या मजल्यावर जावे लागायचे. यावरूनच शिविलगाचा व एकूणच मंदिराचा अंदाज यावा.
हा झाला सगळा इतिहास. पण वर्तमान मात्र बदललेले आहे. तंजावरच्या व एकूणच सर्व तामिळ मंडळींना राजराजेश्वर (बृहड्डेश्वर) मंदिर बांधणाऱ्या चोला राजाचे व त्याच्या राजवंशाबद्दल प्रेम व आदर आहे. १३ व्या शतकात चोला घराण्याचे राज्य पांडया घराण्याने जिंकले. पुढे १६ व्या शतकात नायक घराण्याचे राज्य आले. नंतर दुर्बळ झालेल्या नायकांचे राज्य मराठय़ांनी सन १६७५ मध्ये पटकावले. मराठय़ांपूर्वीचे राजे द्रविडी वंशाचे होते. मराठे ब्रिटिशांबरोबर हरले तरी राज्य मात्र त्यांच्याकडेच थेट सन १९४७ पर्यंत राहिले.
मधल्या काळात द्रविड अस्मिता उफाळून आली. ई. व्ही. रामस्वामी (पेरियार) यांनी ब्राह्मणेतर चळवळ उभी केली. दक्षिणेतील श्रीमंत मंदिरे व जमीनदारीच्या आधारे बहुजनांवर राज्य करणाऱ्या समाजघटकांविरुद्ध जोरदार चळवळ उभी राहिली होती. अस्मितेच्या ह्य़ा जोरदार द्रविडी प्रवाहात तंजावरचा मराठी किल्ला टिकणे अशक्य होते.
स्वातंत्र्य मिळाल्यावर अनेक ठिकाणी (उदा. ग्वाल्हेर, बडोदरा ही मराठी संस्थान) तेथील संस्थानिक राजकारणात स्थिरावले. दुर्दैवाने तंजावरमध्ये असे घडू शकलेले नाही. अर्थात यामागे लोकसंख्या हा महत्त्वाचा घटक आहे, असे तेथील मराठी मंडळींनी लक्षात आणून दिले. कारण तंजावरच्या दोन लाख लोकसंख्येमध्ये आज फक्त ३०० च्या आसपास मराठी घरे आहेत. हा आकडा गृहीत धरला तर १५०० लोकसंख्या होईल. तंजावर नगरपालिकेमध्ये एकही मराठी नगरसेवक नाही. अपवाद फक्त तिरपानद्रुती या तेथील १३ कि.मी. अंतरावरील नगरपालिकेचा. तेथे मात्र व्ही.व्ही. गाढेराव हे नगराध्यक्ष पदावर आहेत. त्यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी त्याचे श्रेय तेथील काठावरच्या बहुमताच्या पाश्र्वभूमीला आणि त्यांच्या आजोबांनी केलेल्या कारभाराला दिले.
स्वातंत्र्यानंतर संख्याबळाला महत्त्व आले. सत्तेचा आधार गेल्यामुळे कुळ कायद्यासारख्या कायद्यांमुळे शेती गेली. ज्यांनी वाचवली, त्यातील काही अपवाद वगळता इतरांनी विकून टाकली. माझी अपेक्षा अशी होती की, तेथे थोडेफार तरी मराठी व्यापारी अथवा दुकानदार असतील. पण मोठे शोरूम अथवा कारखाना असलेले मराठी व्यावसायिक आढळले नाहीत. राजघराणे वगळता जी घरे तेथे आहेत, त्यांची आíथक स्थिती यथातथाच आहे. वाडय़ावरच्या (येथे राजवाडय़ाला प्रेमाने वाडा म्हणतात) नोकऱ्या कधीच गेल्या. क्वचित कोणी लायब्ररीत, कलेक्टर ऑफिसला आहेत. बहुतेक जण खाजगी नोकऱ्यांत अथवा किरकोळ व्यवसायात आहेत. काही कुटुंबे मात्र तंजावूर पेंटिंगच्या व्यवसायात शिल्लक आहेत. राजकारणात, स्थावर मालमत्तेत अथवा व्यवसायात फारसे महत्त्व न उरलेला मराठी समाज हे आजचे वास्तव आहे. मात्र तेथील राजघराण्याने सामाजिक क्षेत्रात आपला आदर व महत्त्व टिकवून ठेवलेले दिसले.
अर्थात हे सर्व चित्र तंजावर शहराचे आहे. मग प्रश्न असा पडतो की, कोठे गेली इथली राज्यकर्ती मराठी माणसे? त्याचे उत्तर आपल्याला परत पेरियार यांच्या चळवळीत मिळते. ब्राह्मण व ब्राह्मणेतर वादामुळे मराठी समाजाच्या अस्तित्वावर मोठा आघात झाला.
महाराष्ट्रातून सतराव्या शतकात जेव्हा स्थलांतर झाले, त्या वेळी सर्व व्यवसायांचे, जातीचे लोक संपूर्ण दक्षिण भारतात गेले. तेथे सर्वच जाती व्यवसायानुरूप आपले स्वतंत्र अस्तित्व टिकवून राहिल्या. तेथे ब्राह्मणांना देशस्थ व क्षत्रियांना रयतार किंवा राव म्हणून ओळखतात. मराठी समाजाचा स्थानिक राजाश्रय गेलेला व महाराष्ट्रातील मुळेदेखील तुटलेली. सर्व समाज अशा गत्रेत सापडला की आíथक स्थिती बिकट झाली. याचा विचार होऊन तामिळनाडूमध्ये महाराष्ट्रातून गेलेल्या मराठी मातृभाषेच्या सर्व जाती, पोटजाती मिळून मराठा संबोधल्या गेल्या (melting pot काही फक्त अमेरिकेमध्ये नाही!) व त्यांना राखीव जागा मिळाल्या. मागास जातींच्या अधिकृत यादीत ७३ व्या क्रमांकावर मराठा (ब्राह्मण वगळून) असा उल्लेख आहे. तंजावरचा राज्यकर्ता मराठा समाज आज तेथे अधिकृतरीत्या मागासवर्गीय समाज म्हणून राखीव जागा मिळवतो आहे. ब्राह्मण समाज मात्र त्यापासून वंचित राहिला. मराठी समाज दुभंगलेल्या अवस्थेत आहे.
हा मराठी समाज सतराव्या शतकातच तेथे गेला होता. शिवाजी महाराजांनी व्यंकोजींना वेगळे राज्य वाटून दिले. त्यामुळे सातारा किंवा कोल्हापूरच्या मराठी राज्याशी पुढे तंजावरचा संबंध राहिला नाही. इकडच्या राजकीय दगदगीचा त्यांना त्रास झाला नाही. पण त्यामुळे त्यांचा रोटी, बेटी, व्यवसाय, भाषा महाराष्ट्राशी सगळाच संपर्क तुटला. रोज दोन्ही वेळा भात हे त्यांचे मुख्य अन्न झाले आहे. तेथेच जमलेल्या व वाढलेल्या एक मराठी सासूबाई महाराष्ट्रातून आलेली माझी सूनबाई रोज भाकरी करते व तिने माझ्या गळ्याला त्रास होतो, अशी गळ्याला हात लावून तक्रार करीत होत्या. ३०० वर्षांपूर्वीची मराठी बोलली जाते. पण तमिळी प्रभाव मोठा असल्याने आपल्याला समजणे अवघड जाते. मराठी मंडळाचे कामकाजदेखील तेलगूमध्ये चालते. आज तेथील राजघराणे, थोडीफार शेती असणारी मंडळी सोडली तर महाराष्ट्रात लग्नसंबंध थांबले आहेत. एक तर त्यांची भाषा वेगळी आणि शेवटी इतक्या दूर जाणे-येणे अवघड. (त्यातही ‘पुरोगामी’ महाराष्ट्रातून कोणत्या मुली तिकडे जायला तयार होणार?) महाराष्ट्रातून सूनबाई आणलेल्या दोन-तीन घरी आम्ही गेलो होतो. त्या सुनांना झालेला आनंद सांगता येणार नाही. त्या मराठीतच बोलत होत्या. सध्याचे राजे बाबाजी राजे व त्यांच्या राणीसाहेब मात्र तुलनेने चांगल्या मराठीत बोलत होत्या. आपले मराठी त्यांना चांगले समजते. शिवाजीराजे हे उत्तम मराठी बोलत होते. मात्र संभाजी राजे यांचे मराठी थोडे वेगळे वाटले.
तेथील मंडळींशी बोलताना, अत्यंत गोड अशी जुन्या वळणाची मराठी भाषा कानावर पडते. आपली मराठी समजणे त्यांना जड जायचे. त्यामुळे मी बोलताना खूप हळू बोलायचो. कवतिक (कौतुक), सय (आठवण), यावे यावे (या), कवाड (दरवाजा), स्वल्प (थोडे) असे जुने शब्द समजून घ्यायचो. त्यामुळे बोलत असताना त्यांनी सरोवराचा उल्लेख केला तर तो उल्लेख कोणत्या तरी राजमहालाबाहेरच्या अथवा अरण्यातल्या सरोवराचा नसून हा त्यांच्या जवळच्या सभोवताली छोटी-मोठी घरे असलेल्या साचलेल्या पाण्याच्या तलावाचा उल्लेख आहे हे समजून घेत होतो. पण जेव्हा आमचे एक मित्र ‘‘तुम्ही येथेच थांबा मी बंडी घेऊन येतो.’’ असे म्हणाले तेव्हा मला ज्ञात असलेल्या बंडी या शब्दाचा अर्थ शर्ट समजून घेऊनही गोंधळलो. त्याने दोन-तीन वेळा तेच सांगूनही कळले नाही. अखेर जेव्हा तो त्याची मोटारसायकल घेऊन आला तेव्हा शिवकालात गाडय़ांना बंडी हा प्रतिशब्द होता हे आठवले. मग त्याच्या बंडीत बसून मी फिरलो.
तंजावरचा मराठी समाज काळाप्रमाणे स्वत:ला बदलवत आहे असे दिसले. बाबाजी राजे हे स्वत: इलेक्ट्रॉनिक इंजिनीयर आहेत. विशेषत: बाबाजी राजे यांचा जनसंपर्क फार चांगला आढळला. इतर मराठी मंडळीदेखील शिक्षण घेऊन नोकरीधंद्यासाठी बाहेर जात आहेत. देशस्थ समाज तर चेन्नई, मुंबई अशा महानगरांत आणि परदेशात स्थायिक झाला आहे. म्हणजेच तंजावरमधील मराठी अस्तित्व व महत्त्व कमी होत असले तरी तामिळनाडू राज्यामध्ये हा समाज चांगल्या तऱ्हेने समरस होत आहे असे दिसते. आज तामिळनाडूमध्ये सुमारे एक लाख मराठी समाज असून त्यातील बहुसंख्य चेन्नईमध्ये राहतात.
मराठी मंडळींच्या हितासाठी अनेक संस्था कार्यरत आहेत. तेथील देशस्थ ब्राह्मण समाजाने स्थापन केलेली शैक्षणिक संस्था नावाजलेली आहे. तामिळनाडू, आंध्र व केरळमध्ये प्रशासन व शैक्षणिक क्षेत्रामध्ये अनेक मराठी मंडळी नावाजलेली आहेत. दक्षता आयोगामुळे सुप्रसिद्ध झालेले एन. विठ्ठल हे तंजावर मराठी मंडळींपकीच आहेत. तसेच बी. जी. देशमुख यांच्यापूर्वीचे केंद्र सरकारचे माजी कॅबिनेट सचिव टी. आर. कृष्णस्वामी राव हेही तंजापुरी मराठी आहेत. द्रविडी प्रभावामुळे येथील सर्वच मराठी मंडळींनी टी. शंकरराव, बी. विश्वनाथ राव अशी आपली दक्षिणी प्रकारची नावे स्वीकारली आहेत. आता नावावरूनदेखील तंजावूरचा मराठी माणूस ओळखणे अवघड.
आपण इतिहासात अभ्यासलेले व मराठी मनावर राज्य करणारे तंजावूरचे राज्य आता त्या शहरातील राजवाडा व सरस्वती महाल, लायब्ररीपुरतेच आढळून येते. अर्थात मनाने हे स्वीकारणेच योग्य. कारण पेशवाई तरी भग्नावस्थेतील शनिवार वाडय़ाबाहेर कोठे दिसते आहे ? ‘कालाय तस्म नम:’
response.lokprabha@expressindia.com