२ मार्च २०१२
मथितार्थ
नक्षत्रांचे नाते
वेध राजकारणाचा
सत्ताकारणाचे शहाणपण...
विचार पक्का, पण दिशा अनिश्चित रिपब्लिकन राजकारणाचा खेळखंडोबा
विज्ञान दिन विशेष
मराठी विज्ञान परिषद वसा विज्ञान प्रसाराचा!
भारतातून दोन मराठी तरुणांनी घेतला धूमकेतूंचा धांडोळा
विज्ञान समजून घ्या
विज्ञान दिनाचे ‘आयुका’ मॉडेल!
वैज्ञानिक दृष्टिकोन काळाची गरज
रोजच राष्ट्रीय विज्ञान दिन हवा!
विज्ञान म्हणजे काये रे भाऊ?
इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र बचावली हजारो झाडे!
गोष्ट परिष्कृत गॅसिफायरची
पुस्तकं-बिस्तकं
टाक धिनाधिन
हॉकी
दुर्गाच्या देशा
फ्लॅशबॅक
अरुणाज रेसिपीज
सिनेशताब्दी
आयुष्यावर वाचू काही
श्रीकांत नूलकरच्या अतक्र्य कथा
क्रिकेटनामा
सीमापल्याड
शिल्प
शॉपिंग
केल्याने रोषाटन
दबंगवाणी
वाचक प्रतिसाद
भविष्य
संपर्क
मागील अंक

दुर्गाच्या देशा

बुलंद लोहगड!
अभिजित बेल्हेकर

लोहगाव किंवा लोहगडवाडी, ही गडाची एकेकाळची बाजाराची पेठ. यामुळे गावात आजही जुन्या वाडय़ांचे चौथरे, बांधीव विहिरी, मंदिरे दिसतात. अशा या वाडीत उपस्थित गावक ऱ्यांना ‘राम राम’ करत गडाच्या वाटेला लागावे. गडकोटांच्या या महाराष्ट्रात प्रत्येक दुर्गाला स्वत:ची काही ना काही वैशिष्टय़े आहेत.

इंद्रायणी, पवनेच्या खोऱ्यात हिंडू लागलो, की लोहगड-विसापूर या जोडगोळीला वगळून चालतच नाही. त्यातही लोहगडाचे महत्त्व थोडे काकणभर अधिकच! अजोड, बेलाग बांधणी व वैशिष्टय़पूर्ण भूरचनेमुळे लोहगडाचे ‘दूरदर्शन’च आकर्षित करणारे. यामुळे गडदुर्गाच्या वाऱ्या करणाऱ्यांबरोबरच इथल्या तटा-दगडांचा अभ्यास करणाऱ्यांपर्यंत साऱ्यांचीच पावले नित्य अंतराने या गडावर उमटत असतात.
या दुर्गवारीसाठी पुणे-लोणावळा लोकल मार्गावरील मळवली स्टेशनवर उतरावे. गडावर जाण्यासाठी दोन पायांची अकरा नंबरची बस इथूनच सुरू होते. नवा द्रुतगती महामार्ग इथेच त्याचा रस्ता ओलांडतो. या वेळी त्या पुलावरून या रस्त्यावरील हे भन्नाट धावते जग काळजाचा ठोका चुकवते. आपण मात्र आपले त्या छोटय़ाशा वाटेला भिडत लोहगडाकडे सरकायचे. वाटेत भाजे गाव लागते. स्वत:चे वाहन असेल तर पुणे-मुंबई हमरस्त्या मार्गे या गावापर्यंत येता येते. या गावातून डावीकडे भाजे लेणी आणि विसापूर किल्ल्याकडे, तर उजवीकडे लोहगडाकडे वाट जाते. गाव ओलांडत ही वाट तशीच पुढे भातखाचरांच्या कडेकडेने लोहगडाकडे निघते.
लोहगड-विसापूर दरम्यान जेमतेम एक-दोन किलोमीटरचे सरळ अंतर आहे. यामुळे दोन्हींच्या मध्ये एक खिंडच तयार झाली आहे. या खिंडीला ‘गायमुख खिंड’ म्हणतात. या खिंडीत पोहोचेपर्यंत आपण विसापूरकडेच जात आहोत असे वाटत राहते. पण खिंड गाठली, की आपला अमेरिकेच्या शोधात निघालेला कोलंबस झालेला नाही हे कळते. या खिंडीनंतर विसापूर मागे ठेवत वाट लोहगडाच्या पायथ्याच्या लोहगडवाडीकडे निघते.
या वाटेवर चार पावले चाललो नाही तो एक स्मारक आपली वाट अडवते. घोडे, उंट, हत्ती, अशी नऊ शिल्पे धारण केलेले हे स्मारक ‘कापला’ म्हणून ओळखले जाते. असे म्हणतात, लोहगडाच्या कोणा एका बादशहाला या दोन गडांदरम्यानच्या या चिंचोळय़ा अंतराचे राहून राहून आश्चर्य वाटायचे. मग त्यातून त्याने एकदा हे अंतर दोरावरून पार करण्याची स्पर्धाच लावली. लोहगडाच्या या बाजूच्या डोंगराला एक नेढे आहे. (नेढे म्हणजे डोंगराला पडलेले छिद्र) या नेढय़ातून ओवलेला दोर त्याने विसापूरच्या तटाला बांधला. जो कोणी हे अंतर या दोरावरून पार करेल त्याला अर्धे राज्य इनाम म्हणून जाहीर केले गेले. मग काय, एका साहसवेडय़ा मावळय़ाने हा विडा उचलला आणि जवळजवळ स्पर्धा जिंकत आणली. बादशहाला आता आपल्या जाहीर इनामाची काळजी वाटू लागली. शेवटी त्याने हा दोरच कापला आणि तो वीर या खिंडीतच पडून मरण पावला. तो जिथे पडला तिथे त्याचे स्मारक करण्यात आले. ..हे स्मारक आणि वर झाडीत दिसणारे ते नेढे एकदा पाहायचे आणि मग इतिहास रंजक करणाऱ्या या लोककथांना धन्यवाद देत वाडीकडे सरकायचे.
लोहगाव किंवा लोहगडवाडी, गडाची ही एकेकाळची बाजारपेठ. यामुळे गावात आजही जुन्या वाडय़ांचे चौथरे, बांधीव विहिरी, मंदिरे दिसतात. अशा या वाडीत उपस्थित गावक ऱ्यांना ‘राम राम’ करत गडाच्या वाटेला लागावे. गडकोटांच्या या महाराष्ट्रात प्रत्येक दुर्गाला स्वत:ची काही ना काही वैशिष्टय़े आहेत. लोहगडाचा अद्वितीय असा प्रवेशमार्ग यापैकीच एक! सर्पाकार मजबूत तटबंदीतला हा प्रवेशमार्ग चार दरवाजांमधून जातो. ‘गणेश’, ‘नारायण’, ‘हनुमान’ आणि ‘महादरवाजा’ या अनुक्रमाने येणाऱ्या चार दरवाजांपैकी ‘हनुमान’ तेवढा मूळचा. बाकी सर्व नाना फडणविसांनी इसवी सन १७९० ते १७९४ या कालावधीत बांधलेले. या आशयाचा एक शिलालेखच गणेश दरवाजावर बसवलेला होता. सध्या तो नारायण दरवाजानंतर येणाऱ्या पहारेक ऱ्यांच्या एका खोलीत ठेवलेला आहे. तो याप्रमाणे-
‘श्री गणेशाय नम:
गणेश दरवाजा बा (बां)
धला बाळाजी जनार्दन फडणीस विद्यमान धों
डो बल्लाळ नीतसुरे प्रारंभ शके १७१२
साधारण नाम संवत्सरे अस्वीन शु
ध ९ नवमी रवीवार समाप्त शके
१७१६ आनंदनाम संवत्स
रे ज्येष्ठ सुध त्रयोदशी बु
ध वार कता(र्त) व्य जयाजी
धनराम गव(वं)डी त्रिवकजी सुतार.’
या लेखाच्या खाली दिव्यासाठी एक कोनाडासुद्धा कोरलेला आहे. जणू तो दिवा लावला, की वरच्या या कर्तृत्वावर आपोआपच प्रकाश पडणार! किती सुंदर कल्पना आहे ना!
यातील नारायण आणि हनुमान दरवाजांमध्ये दोन भुयारे आहेत. मराठेशाहीत त्यांचा उपयोग धान्य साठविण्यासाठी केला जात होता, असे म्हटले जाते. पण एवढय़ा हाराकिरीच्या जागी असलेल्या या भुयारात धान्य साठवले जात असावे असे वाटत नाही. नारायण दरवाजाच्या दोन्ही बाजूस ‘शरभ’ या काल्पनिक पशूची शिल्पं बसवलेली आहेत. सिंहासारखा दिसणारा हा काल्पनिक पशू!
एकाच्या माथ्यावर दुसरा अशा रीतीने हे चारही दरवाजे रचले आहेत. प्रत्येकाला तटबुरुजांनी जोडलेले आहे. या तटबुरुजांवर फिरण्यासाठीही स्वतंत्र वाट ठेवली आहे. शत्रूवर मारा करण्यासाठी जागोजागी जंग्या आणि खिडक्या ठेवल्या आहेत. हे अंगावर येणारे दरवाजे, लढाऊ तट-बुरुज आणि त्यातून वळणावळणाने वर चढणारा घडीव दगडांचा मार्ग, हे सारे पाहिले, की मराठय़ांच्या या स्थापत्यकलेचे कौतुक वाटते. लोहगडाच्या या प्रवेशमार्गाचे जतन होणे आवश्यक आहे. इसवी सन १८९६ मध्ये प्रकाशित झालेल्या ‘महाराष्ट्र देशातील किल्ले’ या चिं. ग. गोगटे यांच्या पुस्तकात लोहगडाच्या या चारही दरवाजांची ती भरभक्कम दारे शाबूत असल्याचा उल्लेख आहे. यातील गणेश दरवाजावर तर अणकुचीदार खिळेही ठोकलेले होते. याशिवाय या परिसरात काही तोफाही असल्याचे त्यांनी उल्लेख केला आहे. पण आज यातील एकही दरवाजा तर दूरच, पण त्याची एखादी फळी किंवा खिळाही इथे नाही. तसेच इथे असणाऱ्या त्या तोफांनाही कुठे पाय फुटले हे कळत नाही. गडावरच्या वास्तूबंरोबरच तिथे असणाऱ्या वस्तूंबाबतही अशी होणारी अक्षम्य हेळसांड आणि त्यांची चोरापोरी ही भयानक आहे. मध्यंतरी या दरवाजांच्या मालिकेतील एक बुरूज ढासळला, तटाचेही अनेक चिरे निसटू लागले आहेत. अनेकदा असे वाटते, की असे बुलंद गडकोट पुरातत्त्व विभागापेक्षा लष्कराकडेच सोपवावेत. यामुळे हे दुर्गही टिकतील आणि त्यांचे लष्करी सामथ्र्यही!
लोहगडच्या दरवाजांची ही बेलाग वास्तू; पण मग त्यालाही अरिष्ट, संकटाचे प्रसंग लावत, त्याची महती (?) वाढवण्याचे काम झाले आहे. कडय़ाच्या उभ्या धारेवरील या मार्गाच्या दोन बुरुजांचे काम स्थिर राहात नव्हते. तेव्हा त्यासाठी मग त्या वेळेचा हमखास नरबळीचा मार्ग सुचविला गेला. तत्कालीन समाजव्यवस्थेत असे नरबळी देणारे आणि त्यासाठी स्वत:ची मुले पुरवणारे जागोजागी होतेच. अशांपैकीच एक साबळे नावाची व्यक्ती पुढे आली. त्याचा थोरला मुलगा आणि सून इथेच गणेश दरवाजाच्या डाव्या-उजव्या बुरुजाखाली कुठेतरी जिवंत पुरण्यात आले. ढोल-ताशांच्या गजरात या निष्पाप जिवांचा आक्रोश कोणाच्याच कानात शिरला नाही. दरवाजा, बुरूज उभा राहिला आणि साबळेलाही त्याच्या या अघोरी कामगिरीबद्दल लोहगावची पाटीलकी बक्षीस म्हणून देण्यात मिळाली.
असो! लोहगडाच्या या प्रवेशमार्गाचे दडपण झेलतच गडात प्रवेश करावा. महादरवाजातून आत शिरताच समोर एक मुस्लिम धाटणीची इमारत दिसते. औरंगजेबाच्या मुलीची कबर म्हणून दाखवल्या जाणाऱ्या या इमारतीबाबत संशोधन होणे आवश्यक आहे. या इमारतीला लागूनच गडाची सदर आणि लोहारखान्याच्या इमारतीचे अवशेष आहेत. याच्यामागे टेकडीवर चारचौकी मोठी सदर, किल्लेदाराचा उद्ध्वस्त वाडा आहे. यामागे खडकाच्या पोटात तीन-चार गुहा आणि पाण्याची टाकी आहेत. याच्या आणखी उजव्या बाजूस एका पाठोपाठ दोन विस्तीर्ण लेणीवजा गुहा आहेत. यातली पहिली गुहा खजिनदाराची, तर दुसरी लोमेशऋषींची म्हणून ओळखली जाते. या गुहांसमोरच दोन तोफाही ठेवल्या आहेत. याच्यापुढे वर गेल्यावर एक कबर लागते. इथून समोरचा विसापूर अगदी हाकेच्या अंतरावर दिसतो. जणू अगदी आकडी लावून विसापूरवरची एखादी वस्तू अलगद उचलावी असा. उंची आणि भव्यतेने आलेली ही जवळीकता. मग या जवळीकतेतूनच पुढे कितीतरी वेळ विसापूरला न्याहाळले जाते. शेवटी निघताना पुढच्या वेळी विसापूरला जायचे असे ठरते आणि मग पावले पुढे निघतात.
असेच मागे येत मुख्य वाटेवर आलो, की एक विस्तीर्ण बारव दिसते. नाना फडणविसांनी ही बांधली. या आशयाचा एक अस्पष्ट झालेला शिलालेख आत उतरणाऱ्या पायरीमार्गावरच आहे. या तळय़ाची एक बाजू खजिन्याच्या लोभापायी इंग्रजांनी फोडली. त्या वेळी त्यांना खजिना मिळाला की नाही हे माहीत नाही, पण या लोभापायी खरा ‘खजिना’ (पाणी) मात्र वाहून गेला आणि हे तळे कायमचे कोरडे झाले. या तळय़ालगत पुन्हा एक छोटीशी विहीर आहे, तिला मात्र पाणी आणि तेही कायम लक्षात राहणारे. इथेच त्र्यंबकेश्वर महादेवाचे छोटेखानी मंदिरही आहे.
गडाच्या या भागातूनच आणखी थोडे पुढे गेलो, की पश्चिमेकडे गेलेली ती लांबलचक सोंड आपल्या पुढय़ात येते. लोहगडावर येताना खालपासून ही सतत खुणावत असते. लोहगडाच्या भूरचनेतील हा आगळावेगळा भाग! राजगडाला जशी सुवेळा- संजीवनी, तोरण्याला जशी झुंजार-बुधला तशी लोहगडाची ही माची! विंचवाच्या नांगीप्रमाणे बोरघाटावर नजर आणि धाक ठेवणारी, म्हणूनच नावही ‘विंचूकाटा!’
गडापेक्षा किंचित खाली असलेल्या या सोंडेवर या साऱ्या प्रदेशाच्याच संरक्षणाची जबाबदारी. यासाठी तिला तटबुरुजांनी आणि दूरवर मारा करणाऱ्या तोफांनी सज्ज ठेवलेले आहे. समोरच्या बोरघाटावर जणू ती नजर ठेवून असते. खरेतर या मार्गाच्या संरक्षणासाठीच हा गड बांधला. आजचा हा बोरघाट कधी सातवाहनांपासून व्यापारासाठी वाहता आहे. त्याच्या संरक्षणासाठीच लोहगड-विसापूर जोडीची निर्मिती झाली. मग यातील विसापूरच्या पोटात पुढे भाज्याच्या लेण्यानेही आकार घेतला. लोहगड-विसापूरवरील गुहा आणि अन्य खोदकामेही त्या वेळेचीच! विसापूरवरील एका टाक्यावर तर त्या काळातील ब्राह्मी लिपीतील एक लेखच आहे. एकूणच या दोन्ही गडांच्या वाटचालीला आता दोन हजार वर्षे उलटून गेली. यानंतर चालुक्य, राष्ट्रकू ट, यादव या राजवटीही गडाने अनुभवल्या आणि त्यानंतरचा यवनांचा गुलामीचा काळही सोसला. या नंतर थेट इसवी सन १६४८ मध्ये शिवरायांनी इथल्या आदिलशाहीला हुसकावून लावत लोहगड स्वराज्यात आणला आणि दुरुस्ती करत बुलंद केला. पुढे इसवी सन १६६४ मध्ये सुरतेवरून आणलेली लूट याच बेलाग किल्ल्यात सुरक्षितपणे उतरवली. लोहगडाचे हे महत्त्व जाणूनच मिर्झाराजे जयसिंह यांनी हा गड तहातून मोगलांकडे आणला आणि पुढे पाचच वर्षांनी १३ मे १६७० रोजी मराठय़ांनी तो पुन्हा जिंकला.
पेशवाईत तर या गडाचे महत्त्व अधिक वाढले. त्यातही नाना फडणविसांचा या गडाबरोबरच या साऱ्या प्रदेशावरच खूप जीव होता. त्यांनी या गडावर जशी नवनवी बांधकामे केली तशीच गडाच्या दक्षिण पायथ्याला आंबेगावात एक मोठा वाडा बांधला. पवना नदीस घाट घातला. त्यावर महादेवाचे एक कळशीदार मंदिरही थाटले. वाईच्या मेणवलीची आठवण करून देणारे हे चित्र होते. हे सारे होते, असे अशासाठी सांगतो आहे, कारण पवनेवर धरण झाले आणि या आंबेगावाबरोबरच हे सारे वैभव पाण्याखाली गेले. लोहगडावर उभे राहून हा सारा इतिहास शोधू लागलो, की मग मन त्या पवनेच्या पाण्यात खोलवर जाऊन बुडते.
गडाच्या या भागातून आंदर आणि पवन मावळाचा मोठा भाग नजरेत येतो. पवनेचे विशाल पात्र आणि त्या मागची तुंग-तिकोन्याची दुर्गशिखरे खुणावतात. संध्याकाळी तर या साऱ्या भागालाच जणू एक झळाळी येते. इथली खेडी, रस्ते, शिट्टय़ा मारत धावणारी रूळवाट, भातखाचरे, डोंगर, चमचमते पाणी घेत वाहणाऱ्या नद्या असे सारेच विलोभनीय वाटू लागते. ..या विंचूकाटय़ाच्या मधोमध पाण्याचे एक टाके आहे. संध्याकाळच्या सोनेरी किरणांमध्ये हे टाकेही जास्त उठून दिसते. एवढय़ाशा तळय़ात मावळतीचा सूर्य डोकावू पाहतो. वस्तू लहान असो की मोठी, ती योग्य ठिकाणी असली की तिचे मोल खूपच वाढते, असाच काहीसा हा अनुभव!
abhijit.belhekar@expressindia.com