नाते
बोलता बोलता
म्हणाला चुलता
पुतण्या भलता
त्रासदायी
किती केले आम्ही
बघा त्याच्यासाठी
तरी तोच काठी
उगारतो
‘गोपी’ म्हणे ‘नाथ’
दुफळी घरात
वेदना उरात
साठलेली
माझेच ‘कमळ’
हुंगतात ‘टगे’
बघतात बघे
हाल माझे
‘बारा-मती’ मंद
बघा त्यांची एकी
नाही वजाबाकी
केली त्यांनी
त्यांचे ‘भुजबळ’
अजून कायम
त्यांना हा नियम
लागू नाही
पुतण्याने तेव्हा
व्यक्त केला त्रागा
म्हणे आम्ही दगा
नाही दिला
मनात आमुच्या
विचार सारखे
आम्हाला परके
समजती
माझे बाबा किती
विद्वान ‘पंडित’
त्यांनाही कोंडीत
पकडले
म्हणुनिया केला
नवा घरा ठाव
सांगा तुम्ही राव
चुकले का?
‘सेनापती’सुद्धा
सांगतात आता
मनातले ‘राज’
जनतेला
‘मातोश्री’सारखा
जीवही लावला
सदैव ठेवला
काळजात
वैरी झाला ‘बाण’
आता ‘धनुष्या’चा
नाही मनुष्याचा
भरवसा
‘इंजिना’ला डबे
नाही तू जोडले
नातेच तोडले
कायमचे
पुतण्याची तेव्हा
झाली तगमग
त्याने लगोलग
सांगितले
सांगता येईना
सहन होईना
अशी माझी दैना
झाली होती
अजब ‘उद्धवा’
तुझे सरकार
माझेसाठी दार
बंद केले
वैतागला जीव
कासावीस प्राण
हे नवनिर्माण
म्हणूनच
भांडणे बघून
गहिवरे मन
वाटले आपण
बोलू काही
सखा म्हणे देवा
असे कसे होते
तुटू नये नाते
कुणाचेही
अॅड. अनंत खेळकर |