२० जानेवारी २०१२
नक्षत्रांचे नाते
टाक धिनाधिन
परक्या देशात
नर्मदेची भटकंती
बखर खबर
सर्वेक्षण
संक्रमण
डिटेक्टिव्ह डायरी
ज्ञानपीठाचे मानकरी
अर्काइव्हज्
लस आणि सल
संरक्षण
श्रीकांत नुलकरच्या अतर्क्य गोष्टी
फ्लॅशबॅक
क्रिकेटनामा
दुर्गाच्या देशा
धर्मजिज्ञासा
अरुणाज रेसिपीज
सिनेमा
सिनेशताब्दी
मिशन बेबी नेम
आयुष्यावर वाचू काही
माझी फिरस्ती
केल्याने रोषाटन
दबंगवाणी
बुम्बाट न्यूज
शॉपिंग
प्रतिक्रिया
वाचक प्रतिसाद
भविष्य
संपर्क
मागील अंक

नर्मदेची भटकंती

राजस परिक्रमा
अविनाश बिनीवाले

नर्मदा परिक्रमेची सुरुवात परंपरेनुसार दरवर्षी चातुर्मास संपल्यावर होते, आमच्या परिक्रमेची सुरुवातही तशीच झाली, अर्थात् तिचं नियोजन खूप अगोदर म्हणजे सुमारे नऊ-दहा महिने अगोदरच सुरू झालं होतं, कारण ही परिक्रमा एकटे गुरुजी करणार नव्हते तर ते आपल्या इच्छुक साधकांनाही बरोबर घेऊन जाणार होते.

नर्मदा परिक्रमा म्हटल्यावर सामान्यत: झटकन् डोळ्यांसमोर येतो, तो वेगवेगळ्या प्रकारचा खडतरपणा-न संपणारी पायपीट, पाठीवरचं अत्यावश्यक वस्तूंचं ओझं, शूलपाणीच्या जंगलातल्या भिल्लांची मनात घर करून राहिलेली भीती, रोजच्या रोज शोधावा लागणारा रात्रीचा निवारा आणि भल्या सकाळच्या चहापाण्यापासून ते दोन्ही वेळच्या जेवणापर्यंत करावी लागणारी ‘भिक्षां देहि’ वगरे वगरे.
गेल्या दहा-पंधरा वर्षांत महाराष्ट्रातल्या अनेकांनी नर्मदा परिक्रमा करून भटकंतीचा हा धार्मिक/आध्यात्मिक प्रकार लोकप्रिय करून टाकला आहे. अनेक जण तिकडे जाऊन आले. गेल्या काही वर्षांमध्ये सुदैवानं नर्मदा नदीच्या पाण्याचं शास्त्रशुद्ध नियोजन होऊन तिच्यावर अनेक धरणं बांधली गेली, त्यामुळे नर्मदेला नित्यनेमानं येणारे विनाशकारी पूर बंद झाले खरे, पण इकडे महाराष्ट्रातल्या पुस्तक-बाजारात मात्र नर्मदा परिक्रमेवरच्या चित्रविचित्र अशा विलक्षण अनुभवकथनांच्या पुस्तकांचा महापूर आलेला आहे! एखाद-दोन अपवाद सोडले तर बहुतेकांनी ती किती अवघड आहे ह्यची रसभरीत (नि अवास्तव?) वर्णनं केली आहेत, परिक्रमेत आम्हीच कसे भाग्यवान् ठरलो हे रंगवून सांगितलं. अनेकांनी वाटेत (वेळोवेळी?) भेटलेल्या साक्षात् नर्मदा / मारुती / अश्वत्थामा वगरे पौराणिक पात्रांची इतकी चमत्कारिक आणि चमत्कृतीपूर्ण (भाबडी) वर्णनं केली की जणू नर्मदा, अश्वत्थामा, मारुती वगरे मंडळी दिवसभर परिक्रमावासीयांची वाट पाहत बसलेली असतात! अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या अशा पुस्तकांमुळे अनेकांना ही आगळीवेगळी नर्मदा परिक्रमा केलीच पाहिजे, असं वाटायला लागलं. अनेकांना तर ह्य परिक्रमेनं पछाडलंच! (काही महाभाग परिक्रमेनंतरही त्या चक्रातून बाहेर पडत नाहीत!) महाराष्ट्रात अनेक ‘नर्मदाबाबा’ नि ‘नर्मदाबुवा’ तयार झाले आहेत. निदान मारुतिराया भेटावा, अश्वत्थाम्याचा चेहरा तरी दिसावा नि ओलेत्या नर्मदामाईचं दर्शन एकदा तरी घडावं म्हणून लोक नर्मदा परिक्रमेला जाण्याचा विचार करू लागले.
आपल्या परंपरेत सांगितलेल्या यात्रा-तीर्थयात्रा फार महत्त्वाच्या आहेत. खरं तर अशा यात्रा म्हणजे व्यक्तिमत्त्व विकासाचा एक महत्त्वाचा मार्ग आहे आणि हे सूत्र नेमकं ओळखून दत्त संप्रदायातल्या बदलापूरच्या बापट गुरुजींनी गुरुमाऊलीच्या भूमिकेतून आपल्या साधकांसाठी नर्मदा परिक्रमेचं एक आगळं-वेगळं आयोजन केलं नि त्याचं फलित म्हणजे सुमारे चाळीस दिवसांची नर्मदा परिक्रमा. मला ह्य परिक्रमेत सामील होऊन डोळसपणे फिरता आलं आणि रीतसरपणे ती पूर्ण करण्याचं भाग्य लाभलं, म्हणूनच ही संक्षिप्त उजळणी.
नर्मदा परिक्रमेची सुरुवात परंपरेनुसार दरवर्षी चातुर्मास संपल्यावर होते, आमच्या परिक्रमेची सुरुवातही तशीच झाली, अर्थात् तिचं नियोजन खूप अगोदर म्हणजे सुमारे नऊ-दहा महिने अगोदरच सुरू झालं होतं, कारण ही परिक्रमा एकटे गुरुजी करणार नव्हते तर ते आपल्या इच्छुक साधकांनाही बरोबर घेऊन जाणार होते. अर्थात् मूळच्या अंदाजापेक्षा प्रत्यक्षात परिक्रमेला आलेल्या भक्तांची संख्या खूपच अधिक होती-तीनशे.
मागच्या शतकातले एक सत्पुरुष वासुदेवानन्दसरस्वती टेम्बेस्वामी ह्यंनी नर्मदेच्या परिसरात बऱ्याच ठिकाणी वास केला, चातुर्मासाच्या काळात वास्तव्य केलं आणि संस्कृतात आणि मराठीत प्रचंड ग्रंथलेखनही केलं. टेम्बेस्वामींच्या स्पर्शानं पुनीत झालेल्या नर्मदेच्या तीरावरच्या सर्व ठिकाणी जाऊन त्या स्थानांचं दर्शन घेणं हा ह्या परिक्रमेतला एक महत्त्वाचा कार्यक्रम होता.
आमची ही परिक्रमा खरं तर अनेक दृष्टीनं खूप वेगळी होती. ह्यत खडतरपणा मुळीच नव्हता. ह्य परिक्रमेत सहा महिन्यांच्या मुलीपासून ते ऐंशी वर्षांच्या वयस्कांपर्यंत सर्व वयाच्या व्यक्ती होत्या. अनेक लेकुरवाळ्या बायाच नाही तर चाकांच्या खुर्चीवरून आलेल्या दाभाडेबाईही ह्य परिक्रमेत सामील झालेल्या होत्या. रूढार्थानं पंगू असलेल्या दाभाडेबाईंनी मोठय़ाशा जिद्दीनं ही परिक्रमा पूर्ण करून ‘पङ्गु लयते गिरिम्’ हे वचन खरं करून दाखवलं.
ओंकारेश्वराहून निघून नर्मदेला सतत उजवीस ठेवून करायची ही परिक्रमा राजघाट-प्रकाशा-अशा पारंपरिक मार्गानं सुरू झाली. तीनशे परिक्रमावासीयांसाठी सात बसगाडय़ांची व्यवस्था होती. गाडय़ा सतत दिमतीला असल्यामुळे कोणत्याही वयाच्या परिक्रमावासीयाची कधीही, कसलीही गरसोय झाली नाही.
बापटगुरुजींचा भर विविध यज्ञांवर असतो, त्यामुळे संपूर्ण परिक्रमेच्या काळात वेगवेगळ्या प्रकारचे १२ यज्ञ होणार होते, त्यातला एक यज्ञ प्रकाशाला संपन्न झाला. परिक्रमेतलं प्रकाशा हे तसं नर्मदेपासून खूप दूर असलेलं ठिकाण आहे. परिक्रमावासीयांचं स्वागत करायला वाटेतले गावकरी नेहमीच उत्सुक असतात, ह्यचा पहिला अनुभव आला तो प्रकाशाच्या पुढच्या तळोदे गावात. तळोद्यातला अनुभव अविस्मरणीय होता!
प्रकाशानंतरचं ठिकाण होतं नर्मदेच्या तीरावरचं गोरागाँव नि त्यापुढचं ठिकाण होतं भालोद, इथून पुढच्या प्रवास बराचसा नर्मदेच्या जवळून होतो. भालोदमधले घाट छान आहेत, त्यामुळे नर्मदास्नानाचा आनंद मिळाला. एके काळी इथे खूप मराठी कुटुंबं राहत होती, आता मात्र एकमेव मराठी-घर उरलं आहे.
भालोदच्या पुढचा टप्पा जरा मोठा होता. अंकलेश्वरमाग्रे कठपोरला जाऊन तिथून नर्मदा नदी न ओलांडता समुद्रमार्गानं नर्मदेच्या उत्तर तीरावर जायचं होतं. कठपोर हे तांत्रिकदृष्टय़ा बंदरच आहे, पण तिथे धक्का वगरे काहीही नाही. कठपोरच्या तीरावरून भरती-ओहोटीच्या वेळेनुसार नावा सुटतात. भल्या पहाटे म्हणजे साडेतीन वाजताच आम्ही रेताड मार्गानं कठपोरच्या किनाऱ्यावर पोहोचलो. पुरेशी भरती आल्यावर नावेत बसून उत्तर तीरावर जायला निघालो तेव्हा अंधारच होता. हळूहळू दिसायला लागलं तेव्हा नर्मदेच्या मुखापाशी असलेली छोटी-छोटी बेटं दिसायला लागली. मुख्य बेटाला ‘अलिया’ म्हणतात. ह्या समुद्रप्रवासात आमच्या एका नावेतल्या नावाडय़ानं यात्रेकरूंची लुबाडणूक करण्याचा प्रयत्न केला, अर्थात् त्या नावेतल्या यात्रींमध्ये कसलीही घबराट न होता ती नावही सुखरूपपणे किनाऱ्यावर आली. उत्तर तीरावरच्या ‘मिठीतलाई’ बंदरात आम्ही उतरलो. इथेही धक्का नसल्यामुळे नावा बऱ्यापकी खोल पाण्यात उभ्या राहतात नि तिथे आपल्याला उडी मारून नावेतून बाहेर पडावं लागतं. उडी मारल्या मारल्याच आपण अत्यंत मऊ गाळाच्या चिखलात चांगले दोन-अडीच फूट रुततो. त्या भयंकर दलदलीतून मोठय़ा कष्टानं आणि मुश्किलीनं हळूहळू बाहेर येऊन किनाऱ्यावरच्या कोरडय़ा वाळूत आल्यावर बरं वाटतं, तांत्रिकदृष्टय़ा इथे एकचतुर्थाश परिक्रमा पूर्ण झाल्याचं समाधानही असतं.
मिठीतलईला आमच्या बसगाडय़ा आम्हाला न्यायला आलेल्या होत्या. पुन्हा एकदा बसमध्ये बसून आमची परिक्रमा पुढे चालू झाली. भरुचमाग्रे आमचा पुढचा मुक्काम होता तो ‘मोटी करोल’ ह्या गावी. हे ठिकाण नारेश्वरच्या अलीकडे सात-आठ किलोमीटरवर आहे. मोटी करोलमधल्या नर्मदा किनाऱ्यावरच्या पुनीत आश्रमाच्या प्रशस्त, स्वच्छ परिसरात आमचा मुक्काम होता. इथे पुन्हा एक यज्ञ झाला.
नर्मदेवरच्या धरणांमुळे गुजरातमध्ये कशी समृद्धी आली आहे, हे ह्य परिसरातल्या हिरव्यागार शेतांवरून सहज लक्षात येत होतं. ह्यचाच एक परिणाम म्हणजे नर्मदेच्या संपूर्ण परिसरात आता कुठेही भिकारी नाहीत, हे किती छान झालं! ह्य मुक्कामात नारेश्वरदर्शनही अर्थातच घडलं. इथे रंगावधूतांची समाधी आहे. मोटी करोल, नारेश्वर ह्य ठिकाणीही नर्मदास्नानाचा आनंद मिळाला.
आमचा पुढचा मुक्काम होता तिलकवाडा गावात. इथे टेम्बेस्वामींचं स्मृतिमंदिर आहे. अगदी अलीकडेपर्यंत ह्य टुमदार गावात साठ-सत्तर मराठी कुटुंबं राहत असत, पण आता मात्र तिथे एकही मराठी कुटुंब शिल्लक नाही. नर्मदेवरच्या धरणांमुळे नदीकाठच्या गावांमधून येणारे भयंकर पूर बंद झाले आहेत आणि पूर्वीप्रमाणे आता नदी ऐन उन्हाळ्यातही कधी कोरडी पडत नाही. नर्मदेवरच्या धरणांमुळे तिच्या काठच्या गावांचा चेहरामोहराच बदलून गेला आहे. गावागावात समृद्धी आली आहे, पण तिची फळं चाखायला इथे मराठी कुटुंबं मात्र राहिलेली नाहीत.
तिलकवाडा-कोटेश्वर-गरुडेश्वर-माण्डू- सहस्रधारा-महेश्वर-मण्डलेश्वर-बडम्वाह अशा मार्गानं नर्मदास्नान करीत, यज्ञ करत नेमावरला आलो. परिक्रमेतलं हे एक महत्त्वाचं स्थान मानलं जातं, नर्मदेचं नाभिस्थान. नेमावरच्या घाटावरची मंदिरंही महेश्वरसारखीच देखणी आहेत. महेश्वर, माण्डू, नारेश्वर ही ठिकाणं खरं तर चार-आठ दिवस तिथेच मुक्काम करून निवांतपणे बघावीत इतकी भव्य आणि प्रेक्षणीय आहेत, ही ठिकाणं जाता-जाता डोकावून यावं अशी नाहीतच.
बरेलीमाग्रे ब्रह्माण्डघाट (बरमनघाट) आणि पुढे जबलपूरचा गौरी घाट (ग्वारी घाट) हे मुक्कामही नर्मदास्नानाच्या दृष्टीनं खूप छान आहेत. जबलपूरच्या पुढे मात्र आपण नर्मदेपासून जरा दुरूनच जातो, कारण मण्डलामाग्रे जाणं म्हणजे फारच वेडावाकडा रस्ता आहे, त्यामुळे प्रवास खूप वाढतो, त्यामुळे बसप्रवासासाठी जबलपूरहून थेट अमरकंटक गाठणं सोयीचं असतं.
अमरकंटक म्हणजे नर्मदेचं उगमस्थान. विंध्यपर्वतातलं हे ठिकाण सर्वार्थानं वर्षभर रम्य असतं, अगदी धो-धो पावसाळ्यातसुद्धा गजबजलेलं असतं. इथलं नसíगक सौंदर्य अप्रतिम आहेच, पण इथे सध्या चालू असलेलं एका जैन मंदिराचं गुलाबी दगडातलं बांधकामही प्रेक्षणीय आहे. बांधून झालेली मंदिरं आपण नेहमीच बघतो, पण तशा भव्य वास्तू प्रत्यक्ष उभारल्या जात असताना, त्याच्या कोरीव कामाचे दगड घडत असताना पाहणं आणि ते घडवणाऱ्या कारागिरांना छिन्नी-हातोडीनं कोरीवकाम करताना बघणं फारच आनंददायी असतं. अमरकंटकला आपली तीनचतुर्थाश यात्रा पूर्ण होते.
अमरकंटकलाही नर्मदा चुकूनही ओलांडली जाऊन परिक्रमा खंडित होऊ नये, अशी काळजी घेऊन दक्षिण तीरावर जावं लागतं. काळजीपूर्वक दक्षिण तटावर येऊन आमची परिक्रमा पुढे सुरू झाली. वाटेतला महाराजपूरचा मुक्काम नर्मदास्नानाचा आनंद देणारा होता आणि पुढचा मुक्काम होता तो ब्रह्मांड घाटावर. (उत्तर तीरावरचा ब्रह्मांड घाट आणि दक्षिण तीरावरचा ब्रह्मांड घाट हे अगदी समोरासमोर आहेत.)
ह्यानंतरचं मोठं ठिकाण आहे ते होशंगाबाद. इथला जानकी सेठानी घाट खूप विस्तीर्ण आहे. नर्मदेच्या इतर घाटांसारखा हाही अतिशय स्वच्छ आहे. इथे नर्मदेचा प्रवाह जोरदार तर आहेच पण खूप खोलही आहे. होशंगाबाद हे मोठं शहर असल्यामुळे पुन्हा एकदा आपल्या जगात आल्यासारखं वाटायला लागलं होतं! आता आमची परिक्रमाही जवळजवळ पूर्ण होत आली होती, कारण पुढचं ठिकाण होतं ओंकारेश्वर, म्हणजे परिक्रमेची परिपूर्ती.
ठरल्याप्रमाणे ओंकारेश्वरला येऊन दक्षिण तटावरच्या घाटावर सांगता विधी झाला नि बेटावर जाऊन ओंकारेश्वराचं दर्शन घेतलं आणि त्याच पावली ममलेश्वराचं दर्शन घेतलं तेव्हा परिक्रमेची पूर्तता झाली! एक अपूर्व अनुभव आणि त्याचं अपूर्व समाधान!
माझ्या ह्य परिक्रमेचं श्रेय बापटगुरुजींना, त्यांच्या नियोजनाला, त्यांच्या वत्सलभावनेला! बापटगुरुजींचं बळ होतं ते त्यांच्या दिमतीला असलेल्या तरुण स्वयंसेवकांमध्ये. मंगेश साखऱ्यांच्या नेतृत्वाखालचे हे दल कोणालाही हेवा वाटावा असंच होतं! कुठल्याही कष्टासाठी आणि कोणाच्याही मदतीला कोणत्याही वेळी धावून जाणारं हे तरुणांचं दल सतत कार्यरत असायचं. एवढय़ा मोठय़ा गटाची परिक्रमा निर्वघ्निपणे पार पडली ह्यात ह्या उत्साही आणि शिस्तबद्ध तरुणांची भूमिका अतिशय महत्त्वाची होती!
नर्मदेची परिक्रमा कोणालाही सहजपणे करता येण्यासारखी आहे, आपल्या घरच्या मोटारीनंही आरामात करता येईल. दुर्दम्य इच्छा असेल तर ती कोणालाही सहज जमेल! नर्मदेचं निसर्गसंपन्न, संस्कृतिसंपन्न खोरं डोळसपणे बघण्याची संधी जमेल तितक्या लौकर घेऊन नर्मदा आपलीशी करावी.
मला ह्य परिक्रमेत ठिकठिकाणी घडलेलं नर्मदेचं दर्शन तर भावलंच पण तिच्या काठची दाट जंगलं नि समृद्ध शेती पाहून समाधान वाटलं. नर्मदेच्या परिसरातल्या शाळा-महाविद्यालयं बघता आल्या, अनेक अध्यापकांशी-प्राध्यापकांशी बोलता आलं, अनेक वर्गामध्ये जाऊन विद्यार्थ्यांशी मोकळेपणानं संवाद साधून त्यांना काही नवीन सांगता आलं. अनेक स्थानिकांशी परिचय झाला, मंदिरांमधल्या आणि आश्रमांमधल्या सर्व प्रकारच्या कर्मचाऱ्यांशी, साधकांशी, संन्याशांशी संवाद साधता आला, विविध विषयांवर चर्चा करता आल्या, (क्वचित् वादही घालता आले), बरोबरच्या अनेक साधकांशी स्न्ोह जडला.. त्यातून काही मित्रही मिळाले. परिक्रमेचे किती किती लाभ मिळाले ह्याचा हिशेब तसा खूप मोठा नि क्लिष्ट आहे, तो कागदावर मांडणं तसं अवघडच आहे! माझ्या दृष्टीनं हे सगळं पुण्यकार्यच होतं!
response.lokprabha@expressindia.com