२५ नोव्हेंबर २०११
सिनेमा

तुकया अमृतात न्हाला
अनिल दामले

तुकाराम चित्रपटाची चर्चा प्रथम सुरू असता प्रभातकारांनी हा विषय बाजूला ठेवला होता. टाळ कुटणाऱ्या ह्य़ा संतपटात चमत्कार खूप दाखवावे लागतील. ते तर प्रभातकारांच्या ध्येयात बसणारे नव्हते. चित्र रेखाटायचं ते प्रेक्षकांना जवळचं आणि आपुलकीचं वाटणारं असावं असावं असा त्यांचा आग्रह होता. संसारात राहून भक्तीमार्ग अनुसरणारा संत तुकाराम रेखाटण्याचे ठरले. कमीत कमी खर्चात, कमीत कमी वेळात निर्माण केलेल्या ह्य़ा चित्रपटाने प्रभातला अमाप धन, नाव आणि लौकिक मिळवून दिला. प्रभातला स्थैर्य मिळालं. दामले-फत्तेलाल ह्य़ा दिग्दर्शकांनी एक अजरामर कलाकृती निर्माण केली.

प्रभात चित्रच्या संत तुकारामच्या प्रदर्शनाला ७ नोव्हेंबर २०११ रोजी ७५ वर्षे झाली. तुकयाचा हा अमृतमहोत्सव.
तुकया अमृतात न्हाला ।
तुकया अमृतमय झाला ।।
त्यानं अवघा मराठी प्रेक्षक गेले ७५ वर्षे खिळवून ठेवला.
साधारणपणे प्रभातचे चित्रपट प्रथम मुंबईत प्रदर्शित होत. परंतु १९३६ दरम्यान मुंबईत जातीय दंगल उसळली. त्यामुळे सदर बोलपट पुण्यातील प्रभात चित्रपटगृहात ७ नोव्हेंबर १९३६ रोजी प्रदर्शित झाला. तुकाराम पुण्यात प्रदर्शित झाला. सुरुवातीला थंड स्वागत झालं. बाबूराव पै प्रभातचे वितरक. त्यांनी शक्कल लढवली. पुण्याच्या आजूबाजूकडून छकडे, बैल गाडय़ा येत. त्यांच्या गाडय़ांच्या तट्टय़ावर तुकोबा भजनात दंग असलेली पोस्टर्स त्यांनी चिकटवायला सुरुवात केली. बघता बघता तुकोबा वाडय़ावाडय़ांवर वस्त्यांवर पोहोचले. छकडेवाले पोस्टर्स मागून नेऊ लागले. थिएटरवर भक्तांचा महापूर लोटू लागला. तब्बल ४० आठवडे हा चित्रपट प्रभातमध्ये चालला. चाळीसाव्या आठवडय़ात सुद्धा प्रभातवरची गर्दी हटत नव्हती. परंतु प्रभातचाच पुढचा चित्रपट ‘कुंकू’ तयार होऊन प्रदर्शनाच्या प्रतिक्षेत होता. त्याचं प्रदर्शन आणखी पुढे ढकलणं योग्य नव्हतं. म्हणून तुकाराम ४० आठवडय़ानंतर प्रभातमधून अन्यत्र नेला गेला.
पुढे १२ डिसेंबर १९३६ रोजी संत तुकाराम मुंबईतल्या सेंट्रल सिनेमात प्रदर्शित झाला. मुंबईलाही सुरुवातीला गर्दी होत नव्हती. पहिल्याच दिवशी एक वृद्ध पारशी चित्रपट पाहून एवढा भारावला की, मध्यंतरात उठून उभा राहिला आणि सर्वाना उद्देशून म्हणाला, ‘‘अरे दुसरे कोन कोन पिक्चर बनवते ना त्येंला म्हणाना या अन पहा पिक्चर! हेला म्हणतात पिक्चर. वारे प्रभात कंपनी. शाब्बास!’’ पारशीबाबा रोज आठवडाभर येत राहिले. पाहता पाहता पारशी, बोहरा, गुजराती कुटुंबच्या कुटुंब चित्रपटास येऊ लागली. अखंडितपणे ५७ आठवडे तुकाराम सेंट्रलमध्ये चालला.
अलोट गर्दी पुण्याच्या प्रभात आणि मुंबईच्या सेंट्रलमध्ये लोटत होती. दोन्ही ठिकाण जणू विठ्ठलभक्तीचा महापूर उसळत होता. लाहोर, बंगलोर, मद्रास, दिल्ली आदि बिगर मराठी शहरांतही तुकाराम चार-चार आठवडे चालला. इंग्लंड, चीन, पश्चिम आशियाई देशांतूनही ‘संत तुकाराम’ला मागणी होती.
‘संत तुकाराम’ हा प्रभातचा आठवा चित्रपट. पहिल्या १६ चित्रपटांना व्ही. शांतारामांचं दिग्दर्शन होतं. १९३४ साली ‘अमृतमंथन’ आणि त्यानंतर ‘चंद्रसेना’ प्रदर्शित झाला. पुढचा एखादा संतपट करावा असा प्रभातकारांना मानस होता. तेव्हा तुकारामाचा विचारही झाला. परंतु त्याच सुमारास राजापूरकर मंडळींचा आणि मास्टर अ‍ॅण्ड कंपनीचा ‘तुकाराम’ झळकला होता. त्या दोनही चित्रपटांना यश लाभलं नव्हतं. म्हणून तुकाराम विषय मागे पडला आणि प्रभातने ‘धर्मात्मा’ केला. पुढे ‘रजपूत रमणी’ आणि ‘अमरज्योती’ हे चित्रपट झाले. पण अजूनही प्रभातला म्हणावं तसं आर्थिक स्थैर्य मिळालं नव्हतं. यानंतर थोडक्यात होईल असा चित्रपट करावा असं ठरलं. परत तुकयाचा विचार सुरू झाला.
महाराष्ट्र फिल्म कंपनीत दामल्यांनी दिग्दर्शन, चित्रीकरण, पटकथा लेखन, कलादिग्दर्शन अशी चित्रपटांची सर्व अंग सांभाळली होती. परंतु प्रभातच्या उभारणीत नंतर ध्वनीमुद्रणात ते गर्क होते. पुढचा चित्रपट दामले-फत्तेलालांनी दिग्दर्शित करावा असं ठरलं. ‘संत तुकाराम’ या विषयाची निवड झालीच होती. या साध्या भोळ्या संताचं भक्तीरसानं ओथंबलेलं जीवन. साध्या, सोप्या आणि वास्तव्यकारक पद्धतीनं सादर करायचं ठरलं.
अनेक संतपटांची निर्मिती विविध चित्रपट संस्थांनी आजपावेतो केली आहे. पण प्रभातच्या संत तुकारामाचेच फोटो संत तुकाराम म्हणून लावले गेले आहेत. संत तुकाराम पडद्यावर पाहायला येणारा प्रेक्षक मंदिरातच आपण जातोय अशा समजुतीने पादत्राणे बाहेर ठेवून चित्रपटगृहात यायचा. तुकोबा वैकुंठास जातात हे दृश्य पाहून प्रेक्षक पडद्याच्या दिशेने फुलं, पैसे उधळीत, नारळ चढवत. महाराष्ट्रातील अनेक नव्याने सुरू होणाऱ्या चित्रपटगृहांनी हा चित्रपट दाखवून शुभारंभ केलेला आहे. ठाणे जिल्ह्य़ात आदिवासी समाज हा चित्रपट पाहण्यास परत परत येत. तिकिटाचे पैसे जमविण्यास ते घरातील भांडी-कुंडी विकत, गहाण ठेवत. ते पाहून जिल्हाधिकाऱ्यांनी ह्य़ा चित्रपटावर बंद घातली होती.
संत तुकारामच्या पूर्वी सेंट्रल सिनेमात फक्त इंग्रजी चित्रपट प्रदर्शित होत. संत तुकारामने ३२ आठवडय़ांचा विक्रम केल्यावर २२ जुलै १९३७ रोजी सेंट्रल सिनेमात एक खास समारंभ आयोजित करण्यात आला. थिएटरतर्फे सर्व प्रमुख कलाकारांना तुकारामांच्या चांदीच्या मूर्ति सर फिरोज शेठना यांच्या हस्ते भेट म्हणून दिल्या गेल्या. आजही आमच्या (दामल्यांच्या) घरी ती रेखीव मूर्ती जतन करून ठेवली आहे. पुढे ५७ आठवडे मुक्काम टोकून तुकोबांनी जागतिक विक्रम केला.

१९३७ साली व्हेनिस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात संत तुकाराम जगातील तीन उत्कृष्ट चित्रपटांपैकी एक म्हणून सन्मानीत झाला. हा सन्मान भारतीय बोलपटांना मिळवून देणारा संत तुकाराम हा पहिला बोलपट.

सामान्यपणाचा स्रोत
माझी आजी पार्वतीबाई दामले. तिच्या हस्ते १९२९ साली कोल्हापुरात प्रभात फिल्म कंपनीच्या स्थापनेचा कलश ठेवला गेला. ती २००१ सालांत ९१ वर्षे वयाची होती. तिला बोलतं करून तिच्या तोंडून जुन्या आठवणी ऐकायच्या आणि रेकॉर्ड करायचं ठरवलं. तल्लख बुद्धी आणि आठवणींचा खजिना तीत उलगडला.
तिच्या संसाराची ओढग्रस्त स्थिती तुटपुंजी मिळकत. घरात खाणारी सहा ते आठ तोंडं. दोनही वेळेस पोटभर जेवण नव्हतं. पण घरात म्हैस सांभाळली होती. तिच्या कपाळावर चंद्रकोरीसारखी खूण होती. ‘चाँद’ म्हणता म्हणता तिचं नाव झालं चांदी. मिणमिणत्या कंदिलाचा नाहीतर चिमणीचा उजेड. जेवण झाल्यावर म्हणजे खरं तर पोटभर जेवण नसायचंच. त्यानंतर ती मुलांना सांगायची, ‘‘खरकटं वाया घालवू नका. चांदीच्या पातेल्यात टाका.’’
चांदीचं पातेलं म्हणजे चांदी म्हशीचं पातेलं. मुलांना हे सांगताना कुणी ऐकलं तर वाटेल घरात धड जेवण नाही. मग चांदीचं पातेलं कुठून आलंय. घर सारवायला लागायचं. त्याचा घाण वास मुलांना आवडायचा नाही. मग ती पहाटे चार वाजता खोलीचा अर्धा भाग सारवायची. मुलं झोपलेली असायची.
दामले मामांनी (माझे आजोबा) अशी ओढग्रस्त स्थिती स्वत:च्या घरी अनुभवली. तीच वास्तवता चित्रपटात मांडली. सामान्य जीवनांची अचूक मांडणी केली. तुकोबा सामान्य संसारी होते. ओढग्रस्त परिस्थितीत तुकोबांची पत्नी संसार गाडा ओढत असते. तुकोबा भक्तीमार्गात गुंग असतात. इतिहासाला माहीत नाही की आवलीच्या घरात म्हैस होती का नाही पण ‘संत तुकाराम’ चित्रपटांतील सामान्यपणा असामान्य ठरला.

संत तुकारामने १९४० मध्ये ७,९१,३१८ रुपयांचं उत्पन्न मिळवून दिलं. अतिशय कमीत कमी वेळात कमीत कमी खर्चात निर्मिती केलेल्या ह्य़ा साध्या-सोज्ज्वळ चित्रपटांनी प्रभातला आर्थिक स्थैर्य मिळवून दिलं.

प्रभात टॉकीजला तुकाराम रौप्य महोत्सव केल्यानंतर गोरगरिबांना पोतीच्या पोती धान्य वाटले होते. संत तुकाराममुळे किती तरी थिएटर मालकांना पैसा मिळवून दिला. जालना येथील सिकंदर थिएटर. कलंदरखानचं हे थिएटर सुरू झाल्यापासून तीन वर्षे धड चालत नव्हतं. तुकाराम तिथं लागला. कलंदरखान लखपती झाला. प्रभात कंपनीने त्याचाही सत्कार केला. खानसाहेबांनी तुकारामच्या तसबीरी ऑफिसात लावल्या. मनोभावे तो वंदन करू लागला. महाराष्ट्रातील अनेक चित्रपटगृहांचा शुभारंभ तुकाराम चित्रपटांनी केला गेला. सोलापूरच्या प्रभात टॉकीजचे उद्घाटन एप्रिल १९३७ मध्ये संत तुकारामने झाले. चित्रपटगृहाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षी म्हणजे १९८७ मध्ये ह्य़ा चित्रपटगृहाचे पूर्णपणे नूतनीकरण केले गेले तेव्हा संत तुकारामनेच उद्घाटन केले होते.
तुकोबा आणि पागनीस
तुकारामाच्या भूमिकेसाठी विचार सुरू होता. काही नावे पुढे आली. पागनीसांचंही नाव निघालं. ते चांगले गाणारे, दिसायला सात्विक, सौम्य भजन म्हणणारे होते. एकदा दामले मामा कामानिमित्त मुंबईला गेले होते. न्यू चर्नीरोडवरून ते जात असताना त्यांच्या कानी हाक आली, ‘‘अहो, दामले मामा!’’ पागनीस पेटकर मंडळींच्या विष्णूपंत पागनीसांनी ती हाक मारली होती. ‘‘मी तुमचीच आठवण काढत होतो आणि तुम्ही समोर दिसलात. काय योगायोग आहे पाहा. मला पहाटे स्वप्न पडलं की मी एका पांढऱ्या घोडय़ावर स्वार आहे. त्या घोडय़ाचा लगाम तुमच्या हातात आहे.’’ ते ऐकून दामले मामा म्हणाले, ‘‘पांडुरंगाची कृपा असेल तर तसे होईल!’’ पुढे पागनीसांची तुकारामाच्या भूमिकेसाठी निवड झाली. ते अंतर्बाह्य़ तुकाराम वाटले. सात्विक भाव. विठ्ठल भक्ती आणि सहजसुंदर नैसर्गिक अभिनय त्यामुळे पागनीसांनी तुकारामांची भूमिका अजरामर केली.
तुकोबांच्या मुलाची महाद्याची भूमिका माझ्या काकांनी वसंत ऊर्फ पंडित दामल्यांनी केली आहे. ते आठवण सांगतात की, ‘‘अप्पा (म्हणजे दामलेमामा) कधीच अभिनय करून दाखवत नसत. नाटकीपणा अभिनयात नसावा म्हणून ते दृश्य समजवून सांगत. त्या दृश्यास, गोष्टीस साजेसं तू काम कर. जणू ते दृश्य स्वतच्या आयुष्यातलचं आहे असं समज. म्हणून सदर चित्रपटातील एकूण एक दृश्य हृदयाला भिडणारं ठरलंय.
सालोमालोची भूमिका करणाऱ्या काका भागवतांच्या मुलीने तुकोबाच्या मुलीची काशीची भूमिका केली आहे. प्रत्येक कलाकाराने भूमिकेत जीव ओतून काम केलं आहे. म्हणूनच तुकाराम आजही ७५ वर्षांनी परत परत पाहिला जातो. इतक्या वेळा चित्रपट पाहिला तर प्रत्येक वेळेस डोळे पाणावतात. आम्ही टीव्हीवर चित्रपट कितीदा पाहिलाय, पण तुकाराम आणि प्रभात इफेक्ट म्हणजे गार पाण्याने परत परत डोळे धुवावे लागतात. नाकाचा लाल शेंडा गार पाण्याने थंड करावा लागतो. प्रत्येक प्रसंग वाक्य, शब्द मनात घर करत जातं. दोन तास तुकामय होऊन जातो.

संत तुकाराम फॅक्टशीट
प्रदर्शन तारीख - ७ नोव्हेंबर १९३६, प्रभात चित्रपटगृह,पुणे
मुंबईच्या सेंट्रल सिनेमात ५७ आठवडे हा चित्रपट चालला. हा जागतिक उच्चांक होता.
१९३७ साली व्हेनिस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात संत तुकाराम जगातील तीन उत्कृष्ट चित्रपटांपैकी एक म्हणून सन्मानीत झाला. हा सन्मान भारतीय बोलपटांना मिळवून देणारा संत तुकाराम हा पहिला बोलपट.
संत तुकारामने १९४० मध्ये ७,९१,३१८ रुपयांचं उत्पन्न मिळवून दिलं. अतिशय कमीत कमी वेळात कमीत कमी खर्चात निर्मिती केलेल्या ह्य़ा साध्या-सोज्ज्वळ चित्रपटांनी प्रभातला आर्थिक स्थैर्य मिळवून दिलं.
दामले कुटुंबियांनी प्रभातच्या सर्व चित्रपटांच्या डी.व्ही.डी. काढल्या आहेत. परंतु तुकारामच्या डीव्हीडींचा सर्वात जास्त खप आहे.
स्वा. वि. दा. सावरकरांनी संत तुकारामचे लेखक शिवराम वाशिकरांचा सुवर्णपदक देऊन गौरव केला होता.
प्राविण्य मासिकाने सवरेत्कृष्ट चित्रपट लेखनाचा पुरस्कार १९३७ साली संत तुकारामला दिला होता.
संत तुकाराम बोलपट राजकपूरचा सर्वात आवडता चित्रपट होता.
सत्यजीत रे यांनी मुलाखतीत म्हटलं होतं की, ‘‘वास्तवता यासाठी संत तुकाराम हा चित्रपट आदर्श आहे.’’
शाम बेनेगल म्हणतात, ‘‘संत तुकारामइतका दुसरा वास्तववादी चित्रपट नाही.’’
ऋषिकेश मुखर्जीनीही हा चित्रपट तीनवेळा पाहिला आहे.

मुंबईच्या सेंट्रल सिनेमात ५७ आठवडे हा चित्रपट चालला. हा जागतिक उच्चांक होता.

संत तुकारामचे संवाद लिहिले शिवराम वाशीकरांनी. रोज सायंकाळी वाशीकरांनी लिहिलेल्या संवादांवर आणि दृश्यावर दामल्यांच्या घरी चर्चा रंगत वाद-विवाद होत आणि नंतर संवाद लेखन पसंतीस उतरे आणि नक्की होई. तुकारामाच्या अद्भुत यशानंतर वाशीकरांनी ३० मे १९३७ च्या ‘चित्रा’ मासिकातील मुलाखतीत म्हटलं होतं की, ‘‘दिग्दर्शकांनी तुकारामच्या कथानकात एवढी ढवळाढवळ केली नसती तर हा चित्रपट इतका चांगला झाला नसता.’’ दामलेमामांनी वाशीकरांच्या लेखणीतून अशा प्रकारे उत्तमोत्तम चित्रपट संवाद लिहून घेतले.
तुकाराम चित्रपट निघालाच नसता तर!
तुकाराम चित्रपटाची चर्चा प्रथम सुरू असता प्रभातकारांनी हा विषय बाजूला ठेवला होता. टाळ कुटणाऱ्या ह्य़ा संतपटात चमत्कार खूप दाखवावे लागतील. ते तर प्रभातकारांच्या ध्येयात बसणारे नव्हते. परंतु ह्य़ा विषयाचा फार विचार केल्यावर दामले-फत्तेलालांना जाणवली की तुकारामाच्या घरी घडलेल्या हृदयस्पर्शी घटनांच्या वर आधारीत चित्रपट घ्यायचा. अवाजवी चमत्कार टाळायचे. तुकोबा हा मानव आहे. त्याचं संसार चित्र रेखाटायचं ते प्रेक्षकांना जवळचं आणि आपुलकीचं वाटेल. संसारात राहून भक्ती मार्ग अनुसरून परमेश्वराकडे जाणारा मार्ग दाखवणं उचित ठरेल; ह्य़ा कल्पनेने तुकाराम करायचा निर्णय झाला. भूतो न भविष्यती असा हा चित्रपट चालला. कमीत कमी खर्चात, कमीत कमी वेळात निर्माण केलेल्या ह्य़ा चित्रपटाने प्रभातला अमाप धन, नाव आणि लौकिक मिळवून दिला. प्रभातला स्थैर्य मिळालं. दामले-फत्तेलाल ह्य़ा दिग्दर्शकांनी एक अजरामर कलाकृती निर्माण केली.
अचाट कल्पना नाहीत, भव्यतेचा भपका नाही, पण मनाची पकड घेणारे साधे, सोपे कथानक, समर्पक रसाळ संवाद, सहज सुंदर अभिनय, वातावरणातील खरेपणा, स्वाभाविक व भावस्पर्शी दिग्दर्शन या सर्वामुळे संत तुकाराम कलाकृती अजरामर ठरली आहे.
असं संत तुकारामाने चित्रपटात निरोप घेऊन ७५ वर्षे पूर्ण झाली असली तरी त्याची मोहिनी व गोडी कायम आहे. आजही तुकारामचा चाहता आणि अभ्यासूंचा वर्ग फार मोठा आहे. संत तुकाराम चित्रपट अनेक दिग्दर्शकांना प्रेरणा देणारा चित्रपट समजला जातो.
lokprabha@expressindia.com