११ नोव्हेंबर २०११
व्यक्तिमत्व

गर्दीची नशा, हशा-टाळ्यांची झिंग!
श्रीरंग गायकवाड
महाराष्ट्रातल्या जनसागराला भरती आणण्याचं काम एका वक्त्यानं केलं. त्याचं नाव, आचार्य प्रल्हाद केशव अत्रे! गर्दीचं व्यसन लागलेला वक्ता आणि त्याच्या भाषणाची चटक लागलेली, हशा-टाळ्यांचा गजर करणारी मराठमोळी गर्दी. महाराष्ट्रातल्या प्रमुख मदानांवर ५० वर्षांपूर्वी हे अभूतपूर्व दृश्य सर्रास दिसे. आपली पन्नाशी अर्थात सुवर्णमहोत्सव साजरा करताना महाराष्ट्र राज्याच्या डोळ्यासमोर हे दृश्य नक्की तरळलं असणार.

‘‘त्यांचे व्याख्यान जाहीर झाले म्हणजे लक्षावधी श्रोतृवृंद तासन् तास मार्गप्रतीक्षा करीत बसतो. चंद्रोदय होण्याआधीच जनसागराला भरती आलेली असते आणि प्रत्यक्ष व्याख्यानाला सुरुवात झाली म्हणजे हास्यरसांच्या लाटांवर लाटा उसळू लागतात. हशा आणि टाळ्यांच्या गर्जनांनी आसमंत निनादून जातो..’’
- एस. एम. जोशी
‘‘त्यांचा प्रत्येक शब्द, प्रत्येक कोटी, प्रत्येक इशारा नि प्रत्येक धमकी श्रोत्यांच्या कानात सारखी घुमत, गुणगुणत जाते आणि प्रत्येकाच्या जिभेवर त्यांचे साद पडसाद घरीदारी उमटत राहतात. शिवाय त्यांचा विनोद! नवनव्या कोटय़ा करून श्रोत्यांना रंजविण्याचे त्यांचे हजरजबाबी कौशल्य, मऱ्हाठदेशीयांच्या हमखास कौतुकाचे श्रद्धास्थान बनले आहे म्हणा ना..’’
- प्रबोधनकार ठाकरे
‘‘अस्सल मराठी िपडाची काळीसावळी आबालवृद्ध मंडळी त्यांच्या व्याख्यानातून उदंड तकवा घेऊन जातात. उघडय़ा मदानात बसून त्यांचे व्याखान ऐकून ज्यांनी मोकळ्या हसण्याचा आनंद एकदाही घेतला नाही आणि बेहोश होऊन टाळ्या वाजवल्या नाहीत, असा सुशिक्षित मराठी माणूस एक तर बहिरा असावा किंवा सुशिक्षित नसावा. असल्यास मराठी नसावा आणि सुशिक्षित व मराठी असूनही मोकळेपणाने हसला नसल्यास माणूस तरी नसावा..’’
- पु. ल. देशपांडे
‘‘अखंड जनता संपर्कामुळे त्यांची जनतेशी विलक्षण दिलजमाई झालेली आहे. त्यांची जनतेवर अमर्याद भक्ती. भक्तीचे सामथ्र्य मोठे दांडगे आहे. नामदेव कीर्तन करीत असताना समोर पांडुरंग नाचत असे. साहेब भाषण करीत असताना जनताजनार्दन डोलतो आणि सहस्र हातांनी टाळ्या वाजवतो..’’
- दत्तू बांदेकर
वरच्या परिच्छेदांमधला हा वक्ता-श्रोत्यांचा आनंद सोहळा वर्णनं केलाय, महाराष्ट्रातल्या थोर माणसांनी. आणि ज्याच्या भाषणांनं जनसागराला उधाण येत असे त्या वक्त्यानं आत्मविश्वास आणि तुडुंब समाधान व्यक्त करताना पुढील शब्द वापरलेत.
‘‘दोन तास मी एकसारखा बोलत होतो. हास्यांच्या आणि टाळ्यांच्या पर्वतप्राय लाटा माझ्याभोवती उसळत होत्या. वक्तृत्वाचे सारे चमत्कार त्या व्याख्यानात मी करून दाखवले. माझ्या म्हणण्यातला शब्द न् शब्द, अक्षर न् अक्षर मी श्रोत्यांच्या गळी उतरवले. प्रतिपक्षाने घेतलेल्या आक्षेपांच्या आणि टीकेच्या मी अगदी चिंधडय़ा न् चिंधडय़ा उडवून टाकल्या. व्याख्यानाच्या अखेरीस मी माझ्या वक्तृत्वाचा पारा असा काही चढवीत नेला की शेवटचे वाक्य संपवून खाली बसताच साऱ्या वातावरणामधून टाळ्यांचा आणि जयघोषांचा प्रचंड ध्वनी उमटला. शेकडो लोक व्यासपीठावर धावत आले आणि एखाद्या पलवानाने कुस्ती जिंकली म्हणजे लोक त्याचा गौरव करतात, त्याप्रमाणे अनेकांनी मला कडकडून मिठय़ा मारून अभिनंदन केले. आखाडय़ातल्या गर्दीतून बाहेर पडायला मला पाऊण तास लागला. त्या दिवशी पुणेकरांना बोलायला दुसरा विषय नव्हता. दुसऱ्या दिवशी पुण्यातली वृत्तपत्रे माझ्या व्याख्यानाच्या वर्णनाने आणि वृत्तांताने शिगोशीग भरून वाहत होती..’’
उसळणाऱ्या या जनसागराचं नाव महाराष्ट्र आणि त्यांना भरती आणणाऱ्या वक्त्याचं नाव, आचार्य प्रल्हाद केशव अत्रे! गर्दीचं व्यसन लागलेला वक्ता आणि त्याच्या भाषणाची चटक लागलेली, हशा-टाळ्यांचा गजर करणारी मराठमोळी गर्दी. महाराष्ट्रातल्या प्रमुख मदानांवर ५० वर्षांपूर्वी हे अभूतपूर्व दृश्य सर्रास दिसे. आपली पन्नाशी अर्थात सुवर्णमहोत्सव साजरा करताना महाराष्ट्र राज्याच्या डोळ्यासमोर हे दृश्य पुन्हा तरळलं असणार.
गर्दी अत्र्यांच्या अन् अत्रे गर्दीच्या नसानसांत भिनले होते. अत्र्यांनी गर्दीला झुलवलं, भुलवलं. गर्दीनंही अत्र्यांना वेड लावलं. या गर्दीच्या हशा-टाळ्यांच्या बेहोश करणाऱ्या नशेतच ते जगले.
अत्र्यांच्या मुलुखमदानी तोफेनं मऱ्हाठी मुलुखाला गदागदा हलवून जागं केलं. भानावर आणलं. अत्र्यांनी लेखणी, वाणीची बत्ती दिली न् जनक्षोभाचा वणवा धडाडून पेटला. इतिहास घडला. मुंबईवर मराठीचा झेंडा फडकला. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र अस्तित्वात आला.
एखाद्या माणसाच्या हाकेसारखी इतकी मुंग्यांएवढी माणसं कशी जमत असतील? उधाणलेल्या जनसागरावर हा माणूस कोणती मोहिनी टाकत असेल? त्याच्या शब्दाशब्दाला हशा-टाळ्यांचा पाऊस का पडत असेल? असे प्रश्न हल्लीच्या सोशल नेटवर्किंगच्या जगात वावरणाऱ्यांना, सव्‍‌र्हे करणाऱ्यांना आणि टीआरपी मोजणाऱ्यांना नक्कीच पडत असेल.
पुण्याजवळच्या सासवडसारख्या खेडय़ातून एका छकडय़ात बसून शहरात आलेला प्रल्हाद केशव अत्रे नावाचा दहा वर्षांचा मुलगा. पुढची साठ वष्रे महाराष्ट्राचं समाजजीवन व्यापून राहिला. मराठी मनांवर त्यानं अधिराज्य गाजवलं. कविता, कथा, विडंबन, विनोदी लेखन, नाटक, सिनेमा, पत्रकारिता, शिक्षण, व्याख्यान, राजकारण अशा विविध क्षेत्रांमध्ये त्यानं उत्तुंग शिखरं गाठली. सहसा कोणाच्याही आहारी न जाणारी, इथल्या राकट-कणखर देशातली माणसं त्याच्यावर भाळली. बाजरीची खरपूस भाकरी आणि ठेचा खाऊन दोन घेणारी आणि दोन देणारी ही रांगडी माणसं त्याचं मन लावून ऐकू लागली. याचं कारण अत्रे त्यांच्या मनातलं बोलत होते.

अत्र्यांनी लेखणी, वाणीची बत्ती दिली न् जनक्षोभाचा वणवा धडाडून पेटला. इतिहास घडला. मुंबईवर मराठीचा झेंडा फडकला.

निरूकाकीचा नातू
समाजाशी एकरूप होण्याचं हे बाळकडू अत्र्यांना घरातून मिळालं होतं. आचार्य अत्रे जन्मले सासवडमधल्या कोढीत, गावचं कुळकर्णीपद सांभाळणाऱ्या अत्रे कुटुंबात. हे कुटुंब होतं गावकीचं कारभारपण करणारं आणि त्याचं चालकत्व होतं निरूकाकी या अत्र्यांच्या धिप्पाड कर्तबगार आजीकडं.
गावाच्या अडीनडीला धावणारी ही निरूकाकी जात-पात न पाहता पंचक्रोशीतल्या अडलेल्या बायकांना सोडवी. वाकडं पाऊल पडलेल्या विधवेच्या पाठी भक्कमपणे उभी राही. प्लेगच्या रोग्याचीही बेधडक सेवा करे. गावाचा प्रत्येक कार्यक्रम तिच्या कारभाराखाली पार पडे. तिचाच वारसा अत्र्यांच्या वडिलांकडं आला. कोढीत गावापासून ते सासवडच्या नगरपालिकेपर्यंत त्यांनी सासवडकरांचं पुढारपण केलं. त्यांचे गुण अत्र्यांमध्ये पुरेपूर उतरले आणि स्वकर्तृत्वाने अत्रे पुढे महाराष्ट्रात प्रसिद्ध झाले.
काळाचा आवाज
किंबहुना त्या काळाचा अत्रे आवाज बनले. त्याच काळात जग बदलवून टाकणारं पहिलं महायुद्ध झालं. या युद्धानंतर स्वातंत्र्य आणि समतेचा मंत्र जगभर पसरला. समाजजीवन मोकळेपणासाठी धडपडू लागलं. रूढींच्या जाचातून सुटका करून स्त्रिया झगडू लागल्या. कामगारांचा आíथक समतेचा लढा अधिक आक्रमक झाला. रशियातल्या कम्युनिस्ट क्रांतीनं आणि समाजवादी विचारांनी जगावर प्रभाव टाकला. साहजिकच भारतात आणि महाराष्ट्रातही हे सुधारणेचं वारं आलं.
स्त्री-पुरुष पाश्चात्त्य पेहराव वापरू लागले. खाण्यापिण्यात मोकळेपणा आला. चनीच्या वस्तूंचा वापर वाढला. मुली शिकून नोकरी करू लागल्या. सोवळ्याओवळ्याच्या कल्पना कमी होऊ लागला. धार्मिक अवडंबरही ओसरू लागलं.
रस्त्यांवर कॉलेजात जाणारे अवखळ तरुण-तरुणी दिसू लागल्या. गांधीजींना फॉलो करणारा वर्ग तयार होऊ लागला. पांढरपेक्षा समाजात या घडामोडी सुरू असताना समाजाचे इतर घटकही जागे होऊ लागले होते. डॉ. आंबेडकर मागास जनतेत हक्कांबाबत जागृती निर्माण करीत होते. मंदिरप्रवेश, झुणकाभाकर, सहभोजनं वगरे चळवळी सुरू झाल्या होत्या. त्याच वेळी िहदुत्ववादी विचारसरणीचा प्रसार होत होता. शिक्षणाचा प्रसार होत होता. अत्रे या काळात वाढत होते. भोवताल समजावून घेत घडत होते. अशा काळात समाजाच्या भावनांना उद्गार देणाऱ्या एका अवलियाची गरज होती. अत्र्यांच्या रूपानं त्यांना तो मिळाला.
मैदानात गरजणारा सिंह
१९३१ पासून अत्र्यांची भाषणं पुण्यातल्या ज्ञानप्रकाश वृत्तपत्रात अगदी हशाटाळ्यांसह सविस्तरपणे छापून येऊ लागली. अच्युतराव कोल्हटकरांच्या भाषणाची विनोदी आणि शेवटी शिखर गाठणारी शैली अत्र्यांनी आत्मसात केली.
या प्रभावी वक्तृत्वानं अत्र्यांना लोकप्रिय केलं
अत्यंत साधी सोपी भाषा, लोकांना कळेल, पटेल आणि रुचेल असा युक्तिवाद, त्यांची मनं भरून टाकणारं चतन्य, त्यांना स्फुरण चढवणारी ओजस्विता आणि त्यांना सतत प्रसन्न, हसत-खेळत ठेवणारा विनोद यांनी त्यांचं वक्तृत्व नटलेलं असे. गर्दी खेचून घेण्याचं आणि तिला खिळवून ठेवण्याचं विलक्षण सामथ्र्य त्यात होतं.
सुरुवातीला साहित्यिक म्हणून व्याखाने देत तेव्हा ती शेकडय़ांनी मोजता येई. पण राजकारणात उतरले तेव्हा मदानातली गर्दी मोजता येईनाशी झाली. संयुक्त महाराष्ट्राच्या लढय़ात तर ही गर्दी मदान ओसंडून वाहू लागली. कधी कधी अत्र्यांच्या सभा लाखा लाखाच्या होऊ लागल्या.
अत्र्यांच्या आक्रमक आणि प्रतिपक्षाचे वाभाडे काढणाऱ्या वक्तृत्वाला अनुकूल परिस्थिती संयुक्त महाराष्ट्राच्या काळात निर्माण झाली. अत्र्यांचं भाषण ऐकण्यासाठी सुशिक्षित, अशिक्षित कामगार, शेतकरी, पांढरपेशे स्त्रिया आणि मुलं हजारोंच्या झुंडीनं मदानात जमत.
बुलंद आवाजातल्या ते ठणाणारं मदानी वक्तृत्व संतापलेल्या, ज्वालाग्रही मनांना क्षणार्धात चेतवून देई. योद्धय़ाला साजेल असा धिप्पाड देह, ठणठणीत आवाज, जळजळीत संताप, वाघाच्या नखांसारखी विनोदबुद्धी, नि:शंक आत्मविश्वास, आक्रमक आणि लढाऊ वृत्ती आणि वादांतून तावूनसुलाखून निघालेलं हे वादपटुत्व संयुक्त महाराष्ट्राच्या सभांमध्ये गर्जू लागलं. या सभांमधून ते लोकांच्या हृदयाला हात घालत. त्यांना मंत्रमुग्ध करीत. त्यांच्या अंतरीच्या भावना आणि संताप व्यक्त करीत.
आपल्या वक्तृत्वाविषयी अत्रे म्हणतात, ‘‘आत्तापर्यंत शेकडो व्याख्याने देऊन महाराष्ट्राला मी हसविले आहे. नाचविले आहे. लेखणी श्रेष्ठ की वाणी, या नादात मी पडणार नाही. पण लिहिण्याच्या नादापेक्षा व्याख्यानाची नशा अधिक आहे, यात शंका नाही. यशस्वी वक्ता होण्यासारखा आनंद नाही या आयुष्यात. माझी कल्पना सारखी हेच चित्र रेखाटत असते की, माझ्या व्याख्यानाची आगाऊ जाहिरात झालेली आहे. श्रोत्यांची गर्दी उसळलेली आहे. थोडय़ाशा उशिराने मी सभागृहात पाऊल टाकताच टाळ्यांचा प्रचंड गजर होतो आहे. मी एकसारखा बोलतो आहे. श्रोत्यांनी सभागृह डोक्यावर घेतले आहे. इतके की शेवटी अध्यक्षांचे भाषणदेखील कोणी ऐकून घेण्यास तयार नाही. आणि मग श्रोत्यांच्या प्रचंड गर्दीतून मुश्किलीने वाट काढीत काढीत मी बाहेर पडतो आहे..’’

‘‘आत्तापर्यंत शेकडो व्याख्याने देऊन महाराष्ट्राला मी हसविले आहे. नाचविले आहे. लेखणी श्रेष्ठ की वाणी, या नादात मी पडणार नाही. पण लिहिण्याच्या नादापेक्षा व्याख्यानाची नशा अधिक आहे, यात शंका नाही.

अत्र्यांमध्ये दोषही होते. ते त्यांनी जाहीरपणेही मान्य केले होते. पण लोकांनी ते स्वीकारले होते. अत्र्यांना सर्व गुन्हे माफ होते. त्यांच्या वागण्याबद्दलच्या हकिकती आणि आख्यायिका लोक चवीचवीनं एकमेकांना सांगत.
संयुक्त महाराष्ट्राच्या प्रचारसभेत एका श्रोत्याला अत्र्यांनी त्यांना जाहीर प्रश्न विचारायची परवानगी दिली. त्याने स्टेजवर येऊन ध्वनिक्षेपकावरून अत्र्यांच्या पूर्वाश्रमीच्या काही प्रसिद्ध दुर्वर्तनांचा पाढा वाचला. आणि त्याच्या प्रत्येक मुद्दय़ाला अत्रे ‘हो हो हो’ म्हणत त्रिवार मान्यता देत होते. शेवटी तो श्रोता म्हणाल, ‘काय अत्रे साहेब, नको त्या गोष्टी करता आणि खुशाल त्याची जाहीर कबुली देता..’ त्यावर अत्रे त्याला पुन्हा बाजूला सारून म्हणाले, ‘‘अहो, या सगळ्या गोष्टी मी केल्यात हे खरे आहे, पण त्या वेळी मी काँग्रेसमध्ये होतो!’’ सभा हास्यकल्लोळात बुडून गेली.
काँग्रेसचे नेते विठ्ठलराव गाडगीळ एकदा म्हणाले, अत्र्यांचे सगळे चांगले आहे, पण काही वेळा ते फार अतिशयोक्ती करतात. तिकडे दुर्लक्ष करायचे. त्यावर अत्रे म्हणाले, ‘‘जीवनात मला जे दिसतं, जे मी पाहतो, तेच मी बोलतो अन् लिहितो. त्यात कसली आली आहे अतिशयोक्ती? आता विठ्ठलराव गाडगीळ हे काकासाहेब गाडगीळांचे चिरंजीव आहेत, ही काय अतिशयोक्ती झाली?’’
िहदू महासभेच्या ढमढेरे नावाच्या उमेदवाराची खिल्ली उडवताना ते म्हणाले, ‘‘ज्याच्या नावात दोन ‘ढ’ आणि एक ‘मढे’ आहे हे काय आडनाव आहे?’’ असे बोचकारे काढणारी अत्र्यांची भाषा एखाद्याचा गुणगौरव करताना बहरून येई.
एसएम जोशी संयुक्त महाराष्ट्राचे नेतृत्व करत होते. तेव्हा त्यांच्या भव्य सत्काराच्या भाषणाचा शेवट करताना अत्रे म्हणाले होते,
‘‘एसएम म्हणजे सौजन्य आणि माणुसकी,
एसएम म्हणजे सौंदर्य आणि मांगल्य,
एसएम म्हणजे समाजवाद आणि मानवतावाद,
एसएम म्हणजे, संयुक्त महाराष्ट्र!’’
अत्रे म्हणत, ‘‘उत्तम वक्ता व्हावयाचे असेल तर, शुद्ध आणि सोपे मराठी बोलता आले पाहिजे. मराठी भाषा वाटेल तितक्या सोप्या शब्दांमध्ये परिणाम होईल, अशा पद्धतीने बोलता येणे. आता विद्वानांचा काळ संपलेला आहे. सामान्य माणसांचा काळ आलेला आहे. आज गण्या, गोंद्या आणि गोप्या यांना जागृत करावयाचे आहे. लोकमान्य टिळक एवढे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे विद्वान, पण स्वातंत्र्याचे राजकारण ते शेतकऱ्यांना अगदी त्यांच्या भाषेत आणि कल्पनेत समजावून देत. त्यांनी एकदा स्वातंत्र्याची व्याख्या केली. स्वातंत्र्य म्हणजे काय? तर साहेबाला आपल्या देशात जसे वाटेल, तसे तुम्हा आम्हाला आपल्या देशात वाटले पाहिजे.’’

काँग्रेसचे नेते विठ्ठलराव गाडगीळ एकदा म्हणाले, अत्र्यांचे सगळे चांगले आहे, पण काही वेळा ते फार अतिशयोक्ती करतात. तिकडे दुर्लक्ष करायचे. त्यावर अत्रे म्हणाले, ‘‘जीवनात मला जे दिसतं, जे मी पाहतो, तेच मी बोलतो अन् लिहितो. त्यात कसली आली आहे अतिशयोक्ती?

चारचार पाचपाच दिवसांपूर्वी जाहीर सभांत दिलेली आपली व्याख्याने, घरी आल्यावर अत्रे जशीच्या तशी शब्दश: अगदी बिनचूक लिहून काढत आणि छापत.
पु. ल. देशपांडेंनी आचार्याच्या व्यक्तिमत्त्वाचं नेमकं वर्णन केलं आहे.
‘‘अत्र्यांच्या धिप्पाड देहात धिप्पाड मन दडलेले आहे. त्यांच्या मराठी मित्रांनाच काय, पण शत्रूंनादेखील त्या धिप्पाड मनाचे कौतुक आहे. अत्र्यांच्या दांडगाईने रागावलेला माणूसदेखील मनातल्या मनात म्हणत असतो, हे शब्द आहेत की गोफणीचे गुंडे? त्यांच्या वाणीला आणि लेखणीला कुचकुच करीत लिहायची वा बोलायची सवयच नाही. भरमसाटपणा हा त्यांचा महान गुण आणि महान दोष. गरीब-श्रीमंतीचे सर्व नमुने चाखलेले अत्रे बोलण्याच्या ओघात म्हणाले होते, आमचा पसा आमच्याकडे येतानाही आगीच्या बंबासारखा ठणाणा करीत येतो आणि जातानाही ठणाणा करीत जातो. आमच्या खिशालाही चोरकप्पे नाहीत आणि मनालाही. त्यांच्या जीवनातले सारे अनुभव ठणाणा करत त्यांच्यापाशी येतात आणि लेखणीतून ठणाणा करत बाहेर पडतात. म्हणून त्यांच्या भाषेत झिगकाम नाही. प्रत्येक लेख म्हणजे सरळ ठसठशीत रंगाच्या धारवाड खणांची नऊ तुकडय़ांची चोळी. त्या भाषेला काशिद्याबिशिद्याची नजाकत नाही. परंतु हा ठसठशीतपणा, मराठी मनाला आवडणारी ही दांडगाई अत्र्यांपाशी भरपूर आहे.
जातीच्या या वारकऱ्याला तुकाराम कोणता आणि सालोमालो कोणता हे चटकन उमगते.
अत्र्यांना सदाशिव पेठ चांगली ठाऊक होती. आणि भवानी, गंज, निहाल या उपेक्षित पेठांतून तर त्यांनी ज्ञानज्योत पेटवली. महाजन समाजाइतकाच नव्हे, त्याहूनही अधिक बहुजन समाजाशी त्यांचा घनिष्ठ संबंध होता.
धिप्पाड व्यक्तिमत्त्वाच्या चुकाही धिप्पाड, पण त्यांच्या जीवनाचा जमाखर्च मांडणाऱ्याला हे नक्की उमगेल की, महाराष्ट्राच्या नशिबाने लाभलेल्या या अफाट माणसाने आम्हाला उदंड आनंदच दिला. अन्यायाविरुद्ध झुंजण्याचे सामथ्र्य दिले. लेखणीला केवळ वीणावादिनी सरस्वतीच केली नाही, तर उग्रचंडी चामुंडीही केली.
भूमिका बदलल्या, निष्ठा कायम
आदर्शाची पायमल्ली, मनाविरुद्ध मते मांडली की तुटून पडणे, चारित्र्यहनन, माहितीची शहानिशा करून न घेता प्रहार करणे, अशा अनेक उणिवांवर बोट ठेवले जाते. असे असले तरी अत्र्यांच्या काही निष्ठा पक्क्या होत्या. त्यापकी एक म्हणजे सामाजिक बांधीलकी. समाजातील दुर्बल घटक, गोरगरीब, तळागाळातील माणसं, अज्ञजन, उपेक्षित, दलित यांचा आपल्या सामर्थ्यांनिशी अत्र्यांनी सतत कैवार घेतला. अत्र्यांच्या या प्रखर जीवननिष्ठेमागे बहुसंख्य जनतेच्या हिताची पोटतिडीक होती. यात दांभिकता नव्हती. जोतिबा फुले, गोपाळ गणेश आगरकर, अण्णासाहेब कर्वे, बाबासाहेब आंबेडकर वगरे समाजसुधारकांच्या पुरोगामी विचारांचा, आचरणाचा फार मोठा प्रभाव अत्र्यांच्या वैचारिकतेवर होता.
अत्रे बोलके नव्हे तर कत्रे सुधारक होते. जेव्हा समाजात आंतरजातीय विवाह त्याज्य मानला जाई, त्या वेळी अत्र्यांनी मिश्रविवाह केला. सहभोजनांमध्ये हिरीरीने भाग घेतला. पुण्याच्या पूर्व भागात मागासलेल्या मुलांसाठी शाळा काढली. मुलींसाठी स्वतंत्र शाळा काढून तिला समाजसुधारक आगरकरांचे नाव दिले आणि महाराष्ट्रात त्यांचे पहिले चिरस्थायी स्मारक केले. रे मार्केटला महात्मा फुल्यांचे नाव, त्यांच्या जीवनावर सिनेमा हे त्याचेच उदाहरण.

‘महाकवी कालिदास’ आणि ‘गानअवलिया तानसेन’ अशी दोन नाटके ते बालगंधर्वासाठी लिहिणार होते. ‘संत नामदेव’, ‘संत जनाबाई’ ही नाटके छोटा गंधर्व आणि जयमाला शिलेदार यांच्यासाठी आणि ‘शाहीर सगनभाऊ तुकाराम िशदे व मेघमाला संजीवनी बीडकरसाठी लिहिणार होते. दत्ता भट यांच्यासाठी ‘महात्मा फुले’ हे नाटक ते लिहिणार होते.

शेवटच्या काळात अत्र्यांना शाहीर सगनभाऊ नाटक लिहायचं होतं. चार्वाक या प्राचीन काळातल्या प्रचलित समाजव्यवस्थेविरुद्ध बंड करून उठलेल्या एका तत्त्ववेत्त्यावरही नाटक लिहायचं होतं. त्यासाठी त्यांनी माहिती गोळा करायलाही सुरुवात केली होती.
अत्र्यांनी ‘तुकाराम’ नाटक लिहायचं ठरवलं होतं. त्याबाबत ते नटवर्य बापू मानेंना म्हणत, ‘‘मी देहूला जाणार, तिथं व्रतस्थ होऊन देवळाच्या ओवरीत राहणार. पहाटे इंद्रायणीवर स्नान करणार. स्वत:चे अन्न स्वत:च शिजवून खाणार. एकभुक्त राहणार. सकाळी, रात्री प्रार्थना, अभंग म्हणणार. मृगाजिनावर झोपणार आणि फावल्या वेळात महाराजांचे नाटय़मय चरित्र रंगभूमीवर आणणार..’’
‘महाकवी कालिदास’ आणि ‘गानअवलिया तानसेन’ अशी दोन नाटके ते बालगंधर्वासाठी लिहिणार होते. ‘संत नामदेव’, ‘संत जनाबाई’ ही नाटके छोटा गंधर्व आणि जयमाला शिलेदार यांच्यासाठी आणि ‘शाहीर सगनभाऊ तुकाराम िशदे व मेघमाला संजीवनी बीडकरसाठी लिहिणार होते. दत्ता भट यांच्यासाठी ‘महात्मा फुले’ हे नाटक ते लिहिणार होते. वासुदेव चंद्रचूडसाठी ‘पुंडलिक’ ठरवला होता. ‘शिवसमर्थ’ नाटकाचा तर एकदीड अंकही त्यांनी लिहिला होता. नानासाहेब शिरगुपीकर यांच्या ‘तुका म्हणे मी वेगळा’ नाटकाचे अध्यक्ष व्हायचं त्यांनी कबूल केलं होतं.
मराठीचा ध्यास, महाराष्ट्र श्वास
अत्र्यांचा मोठा मानिबदू म्हणजे, महाराष्ट्र. भारतात जन्माला येणे दुर्लभ असेल तर महाराष्ट्रात जन्माला येणे दुर्लभतर आहे, असे अत्रे म्हणत. महाराष्ट्रावर इतक्या उत्कटतेने आणि प्रामाणिकपणे प्रेम केलेला दुसरा माणूस सापडणे विरळाच. महाराष्ट्र या नावाचाही त्यांना प्रखर अभिमान होता. हे नाव शोधून काढणाऱ्या कोणा अनामिकाच्या कल्पनाशक्तीचे, द्रष्टेपणाचे त्यांना कोण कौतुक होते.
अत्रेप्रेमी सुधाकर वढावकर त्यांच्या या महाराष्ट्रप्रेमाचं सुंदर वर्णन करतात.
‘‘महाराष्ट्र हे नाव उच्चारताच या प्रदेशाचा इतिहास, भूगोल अन् संस्कृती कशी चटकन् डोळ्यासमोर उभी राहते. महाराष्ट्र म्हटला की उठलेच अत्र्यांच्या अंगावर आनंदाचे रोमांच. फुगलीच त्यांची छाती. केलाच त्यांनी महाराष्ट्राच्या राष्ट्रप्रेमाचा, तेजस्वी परंपरांचा, साहित्याचा आणि कलेचा. गायलीच त्यांनी स्तोत्रं सह्य़ाद्रीच्या आणि सातपुडय़ाच्या कडय़ाकपारींची. ओवाळलीच आरती महाराष्ट्रातील वंद्य पुरुषांची. आणि अशा या प्रिय महाराष्ट्रावर कोणी काही बोललं, लिहिलं, की कडाडलीच अत्र्यांची वाणी आणि त्यांच्या लेखणीची तलवार. दिल्लीश्वरांनी संयुक्त महाराष्ट्र देण्याचे ठरवले तेव्हा नव्या राज्याचे नाव मुंबईच ठेवावे असे सुचवले.
यशवंतरावांनी याबाबतीत एस. एम. यांचेही मन वळवले. ते अत्र्यांना म्हणाले, बाबुराव, आता मुंबईसह महाराष्ट्र मिळतोय ना, मग महाराष्ट्र नावाचा आग्रह सोडायला काय हरकत आहे? त्यावर अत्रे एकदम उसळून म्हणाले, अण्णा म्हणजे काय? अहो, मग एवढं महाभारत आपण कशासाठी केलं? जर नव्या राज्याला महाराष्ट्र नाव दिलं नाही, तर मी तुमच्यासकट कोणालाही स्वस्थ बसू देणार नाही.. अत्र्यांच्या हट्टामुळं नवीन राज्याला महाराष्ट्र नाव मिळालं. ठिकठिकाणी महाराष्ट्र नावाच्या पाटय़ा पाहून आमच्या अंगावर आनंदाचे चोरटे रोमांच कसे उभे राहतात, याची कल्पना आम्ही इतरांना कशी करून देणार? असं अत्रे म्हणत.

इतिहासच सांगतो की, महाराष्ट्राने राष्ट्रहितासाठी राजकारण केले. भारताचे राजकारण हेच महाराष्ट्राचे राजकारण होते. ‘‘शिवाजीराजांनी िहदवी स्वराज्याची स्थापना केली महाराष्ट्राच्या स्वराज्याची नाही. मराठे वीरांनी तळहातावर शिर घेऊन दिल्लीपर्यंत आणि अटकेपर्यंत घोडदौडा केल्या त्या काय फक्त महाराष्ट्राच्या रक्षणार्थ?

इतिहासच सांगतो की, महाराष्ट्राने राष्ट्रहितासाठी राजकारण केले. भारताचे राजकारण हेच महाराष्ट्राचे राजकारण होते. ‘‘शिवाजीराजांनी िहदवी स्वराज्याची स्थापना केली महाराष्ट्राच्या स्वराज्याची नाही. मराठे वीरांनी तळहातावर शिर घेऊन दिल्लीपर्यंत आणि अटकेपर्यंत घोडदौडा केल्या त्या काय फक्त महाराष्ट्राच्या रक्षणार्थ? अठराशे सत्तावन साली इंग्रजांची सत्ता उलथवून टाकण्याचा मराठय़ांनी जो अचाट प्रयत्न केला तो काय फक्त महाराष्ट्र स्वतंत्र व्हावा म्हणून? स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, अशी सिंहगर्जना करून लोकमान्य टिळकांनी ब्रिटिशांच्या छातीत जी धडकी भरवली ती कशासाठी? महाराष्ट्राला स्वातंत्र्य मिळावे म्हणून की िहदुस्थानला स्वातंत्र्य मिळावे म्हणून? मराठी जनतेला संयुक्त महाराष्ट्रासाठी संग्राम करावा लागला कारण, महाराष्ट्रावर घोर अन्याय केला म्हणून.’’
िहदवी स्वराज्याचे संस्थापक जसे शिवाजी महाराज तसे मराठी भाषेचे संस्थापक ज्ञानेश्वर महाराज. सातशे वर्षांपूर्वी त्यांनी आपल्या मराठी भाषेची स्थापना केली, असं ते अभिमानानं सांगत.
‘‘महाराष्ट्राच्या भूगोलाप्रमाणेच मराठी माणसांची मने ओबडधोबड बनली आहेत. तथापि, मराठय़ांइतके राष्ट्रप्रेम, स्वातंत्र्यप्रियता भारतातील इतर कोणत्याही भाषकांत नाही. महाराष्ट्राला काही काळ परकीयांचे दास्य पत्करावे लागले तरी, ते आपले स्वातंत्र्य पुन्हा खेचून आणू शकतात. व्यक्तिस्वातंत्र्य मराठी माणसाला प्राणप्रिय आहे. तो साधा, प्रामाणिक निग्रही, करारी स्वभावाचा आहे. त्याचा स्वाभिमान, बाणेदारपणा अपवादात्मक आहे.’’, असे अत्रे म्हणत.
जीवनाच्या विविध क्षेत्रांतून अत्रे िहडून आले. खांद्यावरची पताका वारंवार बदलली. पण अत्र्यांच्या मनातले चांगुलपणाचे देवटाके कधी आटले नाहीत. ते तुडुंब भरून वाहतच राहिले. हे कशामुळे याचा शोध त्यांचे जीवलग स्नेही महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदारांना लागला होता. ते म्हणतात, ‘‘संतवाणीच्या प्रसादामुळे अंत:करणाची शुद्धी अत्र्यांच्या ठायी स्थिर झाली. ‘अंतरी निर्मळ वाचेचा रसाळ, त्याचे गळा माळ असो नसो’, हे तुकोबांचे वर्णन त्यांनी हृदयावर कोरून ठेवले होते. त्यांचे मन शेवटपर्यंत उदार आणि उदात्त राहिले. क्षुद्रता, कटुता असल्या गोष्टी त्यांच्या अंतरंगात प्रवेश करू शकल्या नाहीत. ते थोर आणि उदारच राहिले.’’
महाराष्ट्रपंढरीचा हा वारकरी अखेपर्यंत मायमराठीचा झेंडा नाचवत, जयघोष करत राहिला. भोवती जमलेले हजारो टाळकरी बेभान होऊन त्याला साथ देत राहिले.
lokprabha@expressindia.com