११ नोव्हेंबर २०११
धार्मिक पर्यटन

शिरकाईचे दर्शन
युवराज पाटील
महाराष्ट्रातील प्रत्येक गावात नवरात्रीचा सोहळा मोठय़ा भक्तिभावाने साजरा केला जातो.. काही ठिकाणी देवींची शक्तिपीठांची ठिकाणं आहेत, त्या ठिकाणी या काळात लाखोंच्या संख्येने भाविक या काळात येतात. नंतरही सुट्टीच्या दिवसांमध्ये ही ठिकाणं गजबजलेली असतात. वेल्हा तालुक्यातील सिरकोली या गावातील शिरकाई हे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले ठिकाण सर्वाना माहीत व्हावे यासाठी प्रत्यक्ष भेट देऊन त्यावर टाकलेला हा प्रकाश...

मराठी संस्कृतीत ‘आई’ हा केवळ एक शब्द नाही.. तर तो एक उर्जेचा स्रोत.. मायेचा झरा.. आणि नतमस्तक व्हावं असं एक ठिकाण असतं. ठेच लागली की आई गं, दुखाच्या क्षणी आई.. तिचं नाव घेतलं की आपलं दुख कमी होत नसतं.. पण त्या नावात मनोबल निर्माण करण्याची शक्ती असते, हे निश्चित.
अशाच एका आईचे दर्शन करण्याची सुवर्णसंधी अलीकडेच सुट्टीच्या निमित्ताने मिळाली. शिरका ‘आई’ म्हणजेच शिरकाई हे सिरकोली ता. वेल्हा जि. पुणे हे सह्य़ाद्रीच्या कुशीत हिरवाईचं दुलई पांघरलेलं एक निसर्गरम्य गावचं दैवत.. त्या गावच्या गावकऱ्यांचीच नव्हे तर लाखो भाविकांची आई.. कुठल्याही आनंदाच्या आणि सुखाच्या क्षणी हिची आठवण काढणाऱ्या भक्तांच्या मनात गेल्या चार शतकांपेक्षा जास्त काळापासून हीच आमची पालनकर्ती असल्याची भावना दृढ झालेली आहे.
या आईच्या संदर्भात आणखी एक मनोरंजक गोष्ट आख्यायिका म्हणून सांगतात. पूर्वी व्यापारी मालांची आवक-जावक बलांच्या पाठीवर ओझे लादून केली जात असे.. हे काम लमानी लोक मोठय़ा कौशल्याने करत असत. व्यापारी मालांची ने-आण करणं हे त्यांच्या दिनचर्येचं एक साधन होतं. याच लमान्यांच्या ओझेवाहू बलावर बसून ही आई इथे आली. आताच्या आलिशान कृत्रिम लवासा शहराच्या डोंगररांगेला लागून एक मोठी खिंड आहे.. तो प्राचीन व्यापारी मार्ग होता, त्याच मार्गाने ती आल्याची आख्यायिका इथले भाविक सांगतात. तिला हे चोहू बाजूंनी सह्य़ाद्रीच्या डोंगररांगांनी व्यापलेलं ठिकाण आवडलं आणि तिने इथेच वास्तव्य केलं, तेव्हापासून ही आमच्या सुखाच्या आणि द:ुखाच्या प्रसंगात आमच्याबरोबर असते.

चैत्रपुनवेला शिरकाईची मोठी यात्रा इथं भरते. ‘अगं बाई अरेच्च्या’ या मराठी चित्रपटात संजय नार्वेकरला देवीच्या बगाडाला बांधलेलं जे दृश्य आहे ते या चित्रपटातलं दृश्य या यात्रेत प्रत्यक्ष पाहायला मिळतं.

सिरकोली हे गाव पानशेतच्या धरणामुळे स्थलांतरित झालेलं आहे. त्याचा एक किस्सा या गावातल्या लोकांनी सांगितला.. हा किस्सा आपल्यासाठी अंधश्रद्धा आहे. पण या भक्तांसाठी या आईबद्दल असलेली अपार श्रद्धा आहे हे दिसून येते. तो किस्सा असा आहे.. १९५९ साली पानशेत धरण बांधून पूर्ण झालं.. तोपर्यंत हे गाव शिरकाईच्या आशीर्वादाने शेकडो र्वष याच मातीवर नांदत होतं. १९६० साली पहिल्यांदा पाणी अडवलं. १९६१ च्या पाण्यात शिरकाईचं मंदिर बुजलं आणि त्याच वेळी पानशेत धरण फुटलं.. पुढे जो हाहाकार झाला.. तो इतिहास पुणेकर अजूनही विसरले नाहीत. या गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार ते रोज या आईची पूजा करायचे. धरणाचे पाणी मंदिरात शिरले आणि पूजा बंद झाली.. त्यावेळी गावकऱ्यांनी आईला म्हटलं आता आम्ही तुझी पूजा कशी करायची.. तुझं तुच बघून घे.. असं सांगितल्यानंतर ही घटना घडली. असं या मंदिराचे आताचे पुजारी सोनबा बोरगे सांगत होते.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांपैकी अतिशय विश्वासू असलेले शिर्के, पासलकर, मानकर हे मावळे मूळचे याच गावचे. गाव स्थलांतरित झाल्यानंतर याच ठिकाणी शिरकाईचं मंदिर बांधलं, ते मंदिर प्रसिद्ध उद्योगपती कै. बी. जी. शिर्के यांनी बांधलं आहे. शिर्केचं गाव पसर्णी असलं तरी त्यांच्या पूर्वजांचं गाव सिरकोली असल्यामुळे शिरकाई त्यांची आराध्य दैवत आहे. आजही महाराष्ट्रात जिथे जिथे शिर्के, पासलकर, मानकर या आडनावाचे लोक राहतात, त्यांचं आराध्यदैवत शिरकाई आहे. आजही या मंदिराच्या न्यासाचे विश्वस्त बी. जी. शिर्के यांचे चिरंजीव आहेत.
चैत्रपुनवेला शिरकाईची मोठी यात्रा इथं भरते. ‘अगं बाई अरेच्च्या’ या मराठी चित्रपटात संजय नार्वेकरला देवीच्या बगाडाला बांधलेलं जे दृश्य आहे ते या चित्रपटात बघितलेलं दृश्य या यात्रेत प्रत्यक्ष पाहायला मिळतं. दरवर्षी चैत्रपुनवेला या बगाडाला बांधून घेण्याचा मान नथू पाटील (पडवळ) यांना आहे. हे बगाड पाहण्यासाठी हजारो भाविक मोठय़ा श्रद्धेने इथे येतात. मिनिटामिनिटाला ठोके वाढविणारं हे दृश्य प्रत्यक्ष पाहण्याचा अनुभव घ्यायचा असेल तर चैत्रपुनवेला आवश्यक या असे निमंत्रणही या गावच्या लोकांनी यावेळी दिलं.
नवरात्रीच्या काळात तर इथे लाखो भाविक या आईच्या दर्शनासाठी येतात. या सिरकोली गावाला जाण्यासाठी पानशेत गावाच्या अलीकडे अर्धा किलोमीटरवरून डोंगरातून रस्ता जातो. पानशेत धरणाच्या पाण्याला लागून जवळपास वीस किलोमीटर अंतर कापताना एका बाजूला हिरव्यागार डोंगररांगा आणि एका बाजूला पाणीच पाणी बघून डोळ्याचं पारणं फिटतं. आताशी हा रस्ताही पंतप्रधान सडक योजनेतून अतिशय चांगला करण्यात आला आहे. पूर्वी इथे जाण्यासाठी फार कष्ट पडत होते. या रस्त्यामुळे पाण्याच्या बाजूला लागून मोठेमोठे रिसोर्ट होत आहेत. काही वर्षांनी हे ठिकाण पर्यटनस्थळ होईल हे आजच्या तिथे चाललेल्या कामावरून लक्षात येतं. पानशेत धरणाच्या पाण्याला लागून असलेलं हे भक्तिस्थळ पर्यटकांना धार्मिक पर्यटन आणि निसर्ग पर्यटनासाठी खुणावत आहे.
lokprabha@expressindia.com