२३ सप्टेंबर २०११
तथ्यांश
तथास्तु
प्रतिसाद
मार्केट
डेस्कटॉप
कव्हर स्टोरी
प्रासंगिक
फुल्या फुल्या डॉट कॉम
मेतकूट
हास्यकविता
मुंबई टॉकिज
क्रीडा विश्व
क्रिकेटनामा
स्त्री-जगत
आरोग्य
विशेष कथा
सिनेगप्पा
खाली पेट
माझी बाहेरख्याली
सामाजिक
शो टाइम
भ्रमंती
तडका मारके
श्रीमान श्रीमती
शॉपिंग
वाचक प्रतिसाद
भविष्य
संपर्क
मागील अंक

मुंबई टॉकिज

अरुण पुराणिक
दादरचा भव्य कोहिनूर स्टुडिओ १९२३ मध्ये आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. त्यानंतर माणेकलाल सेठने कोहिनूर सोडून कृष्णा मूव्हीटोन आणि भारत मूव्हीटोन अशा दोन सिनेनिर्मिती संस्था काढल्या. १९२३ मध्येच गिरगावचे दुभाष नाटय़गृह विकत घेऊन त्याचे कृष्ण सिनेमा थिएटरमध्ये रूपांतर केले. यानंतर १९३४ मध्ये कृष्ण सिनेमा हे थिएटर फेमसच्या बाबुराव प यांनी चालवायला घेतले.

गिरगाव रोडवरील अ‍ॅल्बेस बाग, पोर्तुगीज चर्च, पोलीस कोर्ट आणि खेतवाडी बॅक रोडवरील कामा बाग या पुरातन वास्तू! या परिसरात मराठी, गुजराती, पारशी, मस्लिम लोकांची संमिश्र वस्ती आणि तुरळक प्रमाणात वेश्या होत्या. या कामा बागेच्या समोरच्या भूखंडावर १९ व्या शतकाच्या अखेरीस दुभाष नामक पारशाने दुभाष हे नाटय़गृह बांधले. इथे गुजराती, उर्दू नाटकांचे प्रयोग होत.
१९१९ मध्ये सेठ द्वारकादास संपत यांनी सेठ माणेकलाल पटेलना घेऊन भागीदारीत कोहिनूर फिल्म कंपनी काढली. ही कंपनी त्यांच्या मूकपटात खरेखुरे दागिने, भरजरी कपडे, लाकडी सेट व रंगीत पडदे वापरीत असे. त्यांच्या ‘सती अनसूया’ (२१) या मूकपटात सकिनाबाईने एक नग्न शॉट दिला होता. सेन्सॉरच्याही हे ध्यानातही आले नव्हते. जालीयनवाला बाग हत्याकांडानंतर ब्रिटिश सरकारविरु द्ध आपला असंतोष व्यक्त करण्यासाठी, १९२१ मध्ये ‘भक्त विदूर’ या मूकपटात, महात्मा गांधींसारखी सडपातळ शरीरयष्टी असणाऱ्या संपतने गांधी टोपी आणि खादीचा सदरा असा पेहराव केला होता. हैदराबादमध्ये या मूकपटावर बंदी घालण्यात आली होती. १९१९ ते १९२९ या काळात कोहिनूरने जवळजवळ शंभर मूकपटांची निर्मिती केली. दादर पूर्वेस स्टेशनबाहेरच हा भव्य स्टुडिओ होता. वरळी-माहिम रस्त्यावर दादर पश्चिमेला कोहिनूर मिल होती. त्या काळी दादरमध्ये कोहिनूर या नावाची लोकप्रियता इतकी वाढली होती की कान्हेरे यांनी आपल्या नवीन सिनेमागृहाचे नावही कोहिनूर सिनेमा असेच ठेवले. प्रिन्सिपॉल मनोहर जोशींनी कोहिनूर क्लासेसची निर्मिती करुन नव्वद वर्षांची ती परंपरा अखंडित ठेवली आहे. जसं मॅजेस्टिक म्हणजे गिरगाव तसंच कोहिनूर म्हणजे दादर!
कोहिनूरच्या आवारात स्टुडिओचे प्राणीसंग्रहालय होते. १९२३ मध्ये दादरचा हा भव्य कोहिनूर स्टुडिओ आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. त्यात संपत सेठने पाळलेला त्यांचा लाडका वाघही जळून गेला. माणेकलाल सेठने कोहिनूर सोडून कृष्णा मूव्हीटोन आणि भारत मूव्हीटोन अशा दोन सिनेनिर्मिती संस्था काढल्या. १९२३ मध्येच गिरगावचे दुभाष नाटय़गृह विकत घेऊन त्याचे कृष्ण सिनेमा थिएटरमध्ये रूपांतर केले. त्यांनी हातीमताई या विषयावर अनेक मूकपटांची मालिका तयार केली.
१५ मार्च १९३२ मध्ये माणेकलाल सेठने ‘संत सखुबाई’ या मराठी संतपटाची निर्मिती केली. यामध्ये दुर्गा केळेकर आणि दुर्गा शिरोडकर अशा दुर्गा नावाच्या दोन नटय़ा काम करीत असल्याने माणेकलालने दुर्गा केळेकर यांचे ज्योत्स्ना हे नामकरण केले. हीच ज्योत्स्ना पुढे ज्योत्स्ना भोळे म्हणून प्रसिद्धीस आली. डिसेंबर १९३२ मध्ये, ट्रिक फोटोग्राफी असलेला प्रभातचा ‘माया मिच्छद्र’ इथे प्रदíशत झाला.
यानंतर १९३४ मध्ये कृष्ण सिनेमा हे थिएटर फेमसच्या बाबुराव प यांनी चालवायला घेतले. नंतर ते केकी मोदींच्या वेस्टर्न इंडिया या सिनेवितरण कंपनीने घेतले. बाबुराव इथे भागीदार होते. बाबुराव प यांनी आपला ‘सुवर्ण मंदिर’ (३४) हा मराठी चित्रपट कृष्णमध्ये प्रदíशत केला. मराठी रंगभूमीवरील प्रख्यात नट गणपतराव बोडस व गानहिरा हिराबाई बडोदेकर यांच्या भूमिका असलेला हा पहिला मराठी चित्रपट होता. मराठीबरोबरच हा चित्रपट हिंदीतही काढण्यात आला होता.
अस्पृश्योद्धार विषयाला चालना देण्यासाठी, बालगंधर्वाच्या अफाट लोकप्रियतेचा फायदा उठविण्यासाठी प्रभातने संत एकनाथांच्या जीवनावर ‘धर्मात्मा’ चित्रपटाची निर्मिती केली. १९३५ मध्ये गंधर्व नाटक मंडळी बंद झाली होती. तेव्हा या चित्रपटातून मिळणाऱ्या पशातून बालगंधर्वाना त्यांच्या आíथक अडचणीत मदत होईल असाही यामागे सुज्ञ हेतू होता. यामध्ये बालगंधर्वानी पुरुष भूमिका केली होती. उत्तम पटकथा, संवाद, श्रुतिमधुर संगीत असूनसुद्धा ‘धर्मात्मा’ सिनेप्रेक्षकांना म्हणवा तसा आवडला नाही. कदाचित रंगभूमी आणि सिनेमा या दोन्ही माध्यमांतील फरकाचे आकलन बालगंधर्वाना झाले नसावे. मात्र मास्टर छोटूने रंगविलेला श्रीखंडय़ा आणि वासंतीने केलेली जाई या राणू महाराच्या मुलीची भूमिका प्रेक्षकांना मनापासून भावली.
प्रभातने नारायण हरी आपटे यांच्या ‘न पटणारी गोष्ट’ या कादंबरीवर ‘कुंकू’ चित्रपटाची निर्मिती करून जरठकुमारी विवाह ही त्या काळातील ज्वलंत समस्या चव्हाटय़ावर मांडली. प्रभातने प्रथमच केलेल्या ‘कुंकू’ सिनेमाच्या ट्रेलरमुळे सिनेप्रेक्षकांची उत्सुकता कमालीची ताणली गेली होती. लाँग फेलोची आंग्ल पद्धतीची कविता, पाश्र्वसंगीतासाठी वाद्यांऐवजी नसíगक ध्वनींचा कल्पकतापूर्वक प्रयोग, या परशुरामचे ‘मन सुद्ध तुझं..’ हे लोकप्रिय गाणे, शांता आपटेंनी केलेला मीरेचा सहजसुंदर अभिनय, केशवराव दातेंनी रंगविलेला जरठ काकासाहेब, शांतारामबापूंचे कल्पक निर्देशन यामुळे ‘कुंकू’ आणि हिंदीतील ‘दुनिया ना माने’ हा चित्रपट सिनेउद्योगातील मलाचा दगड ठरला. १९३७ साली विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर मुंबईत कृष्ण सिनेमात ‘कुंकू’ प्रदíशत झाला. गिरगाव रोडच्या सेंट्रलमध्ये ‘संत तुकाराम’ने तर कृष्ण सिनेमात ‘कुंकू’ने आपले बस्तान ठोकले. ‘कुंकू’ हा कृष्ण सिनेमाच्या इतिहासातील सर्वाधिक गाजलेला चित्रपट म्हणून नोंद झाला. ‘दुनिया न माने’ हा एक्सेलसियरला लागलेला पहिला हिंदी चित्रपट होता. देवकी बोस यांनी दिग्दíशत केलेला शांता आपटे आणि पाणीदार डोळ्यांच्या चंद्रमोहननी भूमिका केलेला ‘आपले घर’ (४२), दामुअण्णा आणि जोग या जोडगोळीचा, नवयुग निर्मित ‘सरकारी पाहुणे’ (४२), लता मंगेशकरनी भूमिका केलेला मा. विनायकचा गजाभाऊ, दादा साळवी आणि हंसा वाडकर यांच्या अप्रतिम भूमिका असलेला वसंत प्रभूंच्या संगीताने नटलेला, दिनकर द. पाटील यांचा ‘पाटलाचा पोर’ (५१) प्रदíशत झाले. राष्ट्रपतींच्या हस्ते सवरेत्कृष्ट चित्रपट म्हणून गौरविण्यात आलेला, पहिल्या सुवर्णपदकाचा मानकरी, प्र. के. अत्रे यांचा साने गुरुजींच्या कथेवर आधारित असलेल्या ‘श्यामची आई’ (५३) चित्रपटाने तर इथे रेकॉर्ड ब्रेक धंदा केला. सुशीला पवार ऊर्फ वनमाला आणि माधव वझे यांची अभिनयाची जुगलबंदी, वसंत देसाई यांचे संगीत, विशेषत: त्यातील राजकवी यशवंत यांचे ‘आई म्हणोनी कोणी आईस हाक मारी..’ हे गाणे ऐकत असताना डोळे पाणावत असत. कृष्ण सिनेमा म्हणजे, कृष्णा, भारत मूव्हीटोन, प्रभात, न्यू थिएटर्स आणि नवयुग यांच्या वैभवशाली कारकीर्दीचा एक मूक साक्षीदार होता. त्यामुळे कृष्ण या नावाने जो आपलेपणा जपला होता तो पुढे ड्रीमलॅण्ड झाल्यावर राहिला नाही. आता कृष्णला प्रदíशत झालेले हिंदी चित्रपट आणि त्यांच्या हृद्य आठवणी..
नारायण हरी आपटे यांच्या ‘भाग्यश्री’ कादंबरीवर प्रभातने ‘अमृतमंथन’ (३४) चित्रपटाची निर्मिती केली. सुविद्य नटी नलिनी तर्खडने यात राणी मोहिनीची भूमिका केली. चित्रपटाच्या शेवटी तत्त्वासाठी अंध झालेला राजगुरू देवीसमोर स्वहस्ते आपले शिर कापून अर्पण करतो असा क्लायमॅक्स आहे. हिंदीमध्ये राजगुरूची ही आव्हानात्मक अवघड भूमिका भेदक आणि पाणीदार डोळ्याच्या चंद्रमोहनने केली होती. सुमित्राच्या भूमिकेतील शांता आपटेची गाणी संपूर्ण हिन्दुस्थानात लोकप्रिय झाली होती. ‘अमृतमंथन’च्या दिग्दर्शनासाठी व्ही. शांताराम यांना, तर उत्कृष्ट अभिनयासाठी चंद्रमोहन यांना गोहर सुवर्ण पदक देऊन सन्मानित करण्यात आलं होतं. ‘अमृतमंथन’ची हिंदी आवृत्ती कृष्णमध्ये एकोणतीस आठवडे चालली. त्या काळी चित्रपटांचे रौप्य महोत्सव इतक्या सहजासहजी होत नसत. कलामहर्षी बाबुराव पेंटर यांनी दिग्दíशत केलेला पहिला हिंदी बोलपट ‘उषा’ (३५) इथेच प्रदíशत झाला. बाबुराव पेंटर यांनी रंगविलेले ‘उषा’ चित्रपटाचे बुकलेट म्हणजे त्या काळातील एक कलेक्टर्स आयटेम होता.
प्रभातच्या ‘रजपूत रमणी’त मानसिंहाची भूमिका नानासाहेब फाटकांनी तर सौदामिनीची भूमिका नलिनी तर्खडने केली होती. केशवराव धायबरने दिग्दíशत केलेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपशेल आपटला. यानंतर धायबरांनी नलिनी तर्खड यांच्याशी विवाह केला आणि प्रभातला रामराम ठोकला. दर्यावर्दी जीवनाची पाश्र्वभूमी लाभलेला प्रभातचा ‘अमरज्योती’ (३६) त्यातील तांत्रिक करामती (बॅक प्रोजेक्शन आणि नुकतीच आलेली प्लेबॅक पद्धत), दुर्गा खोटेंनी सादर केलेली लुटारू ललना, तडफदार सौदामिनी, भेदक, भेसूर नजरेचा, क्रूर लंगडा दुर्जय (चंद्रमोहन) आणि नंदिनीच्या भूमिकेत शांता आपटेंनी गायिलेल्या ‘सुनो, सुनो बन के प्राणी..’ व ‘अब मंने जाना है..’ या गाण्यांमुळे विशेष लक्षात राहतो. स्टुडिओत उभारलेल्या जहाजावर याचे चित्रीकरण झाले होते. हरिभाऊ मोटे यांच्या प्रतिभा या पाक्षिकात अमरज्योतीचे परीक्षण करताना शामराव ओकांनी लिहिले होते की, या चित्रपटात दरिया फक्त वर्दी देण्यासाठी येतो. दुसऱ्या महायुद्धाच्या काळांत प्रत्येक निर्मात्याने वॉर प्रपोगंडा चित्रपट निर्माण केलाच पाहिजे अशी सक्ती ब्रिटिश सरकारने केली होती. त्याशिवाय निर्मार्त्यांना कच्च्या फिल्मचा कोटा (रॉ स्टॉक) मिळत नसे. म्हणून प्रभातने चाकोरीबाह्य़ ‘चांद’ (४४) चित्रपटाची निर्मिती केली. याच चित्रपटाद्वारे अभिनेत्री बेगमपाराचे रुपेरी पडद्यावर आगमन झाले. तसेच संगीतकार हुस्नलाल-भगतराम या पहिल्या जोडीचाही हा पहिलाच चित्रपट होता. ‘घुंघरू’चे (बलकराम) मंजूने गायलेले ‘दो दिलों की ये दुनिया मिलने ही नहीं देती..’ हे गाणे त्या काळात खूप लोकप्रिय झाले होते.
मिनव्‍‌र्हाच्या ‘जेलर’ची (३८) कथा आणि गीते कमाल अमरोहींनी लिहिली होती. आपली पत्नी तिच्या तरुण प्रियकराबरोबर (सादिक अली) पळून गेल्यामुळे, किंचित वेडसर, विक्षिप्त झालेल्या, विद्रूप जेलरची भूमिका सोहराब मोदींनी केली होती, तर लीला चिटणीसनी त्यांच्या बेइमान पत्नीची भूमिका केली होती. जेलरचा शुभारंभाचा मुहूर्त लाहोरला करण्यात आला होता आणि मुंबईत तो कृष्णमध्ये प्रदíशत झाला. मिनव्‍‌र्हाच्या या चाकोरीबाह्य़ चित्रपटाने जबरदस्त धंदा केला.
देवकी बोसने दिग्दíशत केलेल्या, न्यू थिएटर्सच्या ‘पूरन भगत’ (३३) मध्ये वीस गाणी होती. संगीताच्या अतिरेकामुळे यातील भावनिक नाटकीय प्रसंग तितकेसे उठावदार झाले नाहीत, पण त्या काळात हीच पद्धत होती. बंगाली फिल्म ‘दीदी’ (३९) वरून नितीन बोसनी ‘प्रेसिडेण्ट’ (३७) चित्रपटाची निर्मिती केली. एका कापड गिरणीची मालकीण कमलेश कुमारी, गिरणीतील एका डिझायनरच्या सगलच्या प्रेमात पडते. तिची छोटी बहीण लीला देसाई हीसुद्धा सगलवरच प्रेम करते, असं कथानक होतं. पाश्र्वसंगीत हे एक स्वतंत्र शास्त्र आहे हे प्रेसिडेण्टमध्ये नितीन बोस यांनी दाखवून दिले आहे. मिलमध्ये अपघात होतो, तेव्हा कर्कशपणे वाजणारा गिरणीचा भोंगा, रुग्णवाहिकेचा सायरन, गिरणी कामगारांची कुजबुज, धावपळीचा आवाज त्या प्रसंगाची दाहकता वाढवतो. सांगीतिक वाद्य्ो वाजवून हा परिणाम साधता आला नसता. हा जवळजवळ पाऊणशे वर्षांपूर्वीचा प्रयोग आहे हे ध्यानात घेतले पाहिजे. त्यातील सगलनी गायलेले, ‘इक बंगला बने न्यारा..’ गीत आजही बालपणींच्या आठवणींना उजाळा देते, इतके परिणामकारक आहे. चित्रपटात जुना काळ उभा करण्यासाठी राज खोसलाने ‘दो रास्ते’ (६९) चित्रपटात या गाण्याचा कल्पकतापूर्वक वापर केला होता. विशेष म्हणजे हे गीत कथेचा अविभाज्य भाग बनून गेले होते. नवयुगचा ‘पन्ना’ (४४) हा वॉर प्रपोगंडा चित्रपट होता. गुलाम हैदरचा पुतण्या अमीर अलीने याला संगीत दिले होते. चित्रपटातील गाणी शमशाद बेगमनी गायली होती, परंतु त्याच्या ध्वनिमुद्रिका राजकुमारीच्या आवाजात निघाल्या होत्या. गवयांनीही दखल घ्यावे असे खमाज रागावर त्यात एक गाणे आहे. ‘सावरिया रे, काहे मारे नजरिया’ यात चंद्रकांत गोखलेंनीसुद्धा गाणे गायल्याचे आठवते.
१९४५ मध्ये निर्मला आणि अरुण आहुजा यांचा ‘चालिस करोड’ प्रदíशत झाला होता. तेव्हा हिंदु-मुस्लिम दंगलीत दंगेखोरांनी कृष्णचा पडदा फाडला होता. अनंत ठाकूर याचा पगडी (४८) गोप आणि दीक्षित या विनोदवीरांमुळे लक्षात राहिला होता. यातील सितारा कानपुरीची गाणीही लोकप्रिय झाली होती.
न्यू थिएटर्सचे ‘आंधी’ (४०), ‘काशीनाथ’ (४३), मिनव्‍‌र्हाचा ‘भक्त रामदास’ (४३), नवयुगचा ‘कमरा नं. ९’ (४६), रंजनाची दुहेरी भूमिका असलेला ‘साजन का घर’ (४८), फिल्मीस्तानचा ‘श्रीमतीजी’ (५२), बलराज सहानीचा ‘आकाश’ (५९), दिनकर द. पाटलांचा ‘घरबार’ (५३), फेमस पिक्चर्सचा ‘नíगस’ (४६), सी. रामचंद्र यांच्या संगीताने नटलेला ‘संगीता’, उषा किरणचा ‘अयोध्यापती’ (५६), सगल, सुरैयाचा ‘नदबीर’ (४५), स्नेहप्रभा प्रधान व परेश बॅनर्जीचा ‘दिनरात’ आदी चित्रपट कृष्णमध्येच प्रदíशत झाले होते.
लाहौरचे दलसुख पंचोली म्हणजे पंजाबी फिल्मी उद्योगाचे भीष्म पितामह! पंजाबी चित्रपट ‘यमला जट’ (४०), ‘चौधरी’, ‘गुल बकावली’ सुपरहिट होताच पंचोलीनी ‘खजांची’ (४१) या हिंदी चित्रपटाची निर्मिती केली. शमशादच्या ‘सावन के नजारे हैऽऽऽ’ या गाण्याने तर संपूर्ण हिन्दुस्थानात धुमाकूळ घातला. यातील गुलाम हैदरच्या संगीताने त्या काळातील पारंपरिक गाण्यांचा ट्रेंडच बदलला. चित्रपटाची नायिका रमोला आपल्या मत्रिणींना घेऊन, सायकलवर सहलीला निघाली आहे ही कल्पनाच त्या काळच्या कर्मठ वातावरणाच्या दृष्टीने नावीन्यपूर्ण व धाडसी होती. त्यातील सहज, उत्स्फूर्त, स्त्रीसुलभ शब्दोच्चार रसिकांच्या मनाला भावले. गुलाम हैदरच्या संगीतात जोश, जवानी, सळसळते तारुण्य होते. त्यांच्या पंजाबी ढोलकमध्ये वेगळा नखरा होता. ‘द वे ऑफ ऑल फ्लेश’ या हॉलिवूडच्या इंग्रजी सिनेमावरून पंचोलीनी ‘खजांची’ चित्रपटाची निर्मिती केली होती. हा मूळ इंग्रजी चित्रपट जेव्हा हिन्दुस्थानात प्रदíशत झाला तेव्हा येथील प्रेक्षकांनी त्याचे ‘इंग्रजी खजांची’ म्हणून स्वागत केले. शमशाद बेगम, बदरुबाई मुल्तानवाली, नूरजहाँ, उमराजिया बेगम, महंमद रफी आदी पंजाबी कलाकारांचा शोध घेऊन मास्टर गुलाम हैदरनी सिनेसंगीत समृद्ध केले. मजा म्हणजे लाहौरच्या दलसुख पंचोलीकडे ‘खजांची’ मुंबईत प्रदíशत करण्यासाठी कुणी वितरक नव्हता आणि रमोला व नारंगला इथे कुणी ओळखतही नव्हते. बाबुराव पैंनी जोखीम स्वीकारून ‘खजांची’च्या वितरणाचे हक्क घेतले. कृष्णमध्ये ‘खजांची’ने अक्षरश: इतिहास घडविला.
ख्वाजा अहमद अब्बासचा ‘मुन्ना’ (५४) हा गीतविरहित चित्रपट होता. वाडिया मूव्हिटोनच्या ‘नौजवान’ (३७) नंतरचा हा दुसरा गीतविरहित चित्रपट होता. आपल्या आईचा शोध घेणाऱ्या एका लहान मुलाची ही कहाणी होती. पुंगी वाजवून, दोर उभा करून, त्याला धरून वर आकाशात जाऊन तिथे आपल्या आईला भेटता येईल असा त्याला विश्वास असतो. असे मजेशीर तसेच, हृदयस्पर्शी प्रसंग त्यामध्ये होते. मुल्कराज आनंद यांच्या ‘एक कली और दो पत्तीयाँ’ कादंबरीवर अब्बासने देव आनंद व नलिनी जयवंतला घेऊन ‘राही’ (५३) चित्रपटाची निर्मिती केली. चहाच्या मळ्यातील मलेरियाग्रस्त शेतमजूर व त्यांना वेळोवेळी चाबकाने फोडून काढणारा जुल्मी ओव्हरसिअर यांची ती कथा होती. शेवटी ते दीनदुबळे शेतमजूर अन्यायाविरुद्ध बंड पुकारतात. अनिल विश्वासने लाजवाब आसामी संगीत या चित्रपटाची जमेची बाजू होती. ‘जुल्म ढाले..’ या गीतातून शेतमजुरांची व्यथा बोलकी होते. ‘एक कलि और दो पत्तियाँ’, लताचे करुणरसपूर्ण, ‘रुक जाना ओ जानेवाले राही, एक पल रुक जाना..’ गाणे मन बेचन करून टाकते. अब्बासचा हा चाकोरीबाह्य़ चित्रपट बुिद्धवादी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला.
देव आनंद व निगार सुलतानाच्या ‘खेल’ (५०) ची कथा, पटकथा झिया सरहदी यांची होती, तर संगीत दिग्दर्शन सज्जाद हुसन यांचे होते. लता सज्जादकडे सर्वप्रथम ‘खेल’ चित्रपटासाठी गायली. सज्जादच्या संगीताचे वैशिष्टय़ म्हणजे गाण्यांचा सुरेल ठेका (ऱ्हिदम)! ते बायाचा म्हणजे डग्ग्याचा, डाव्या बाजूने तालवाद्यावर आघात करून निघणाऱ्या ध्वनीचा प्रामुख्याने उपयोग करत असत. त्यांच्याकडे जमाल सन नामक गुणी ढोलकवादक होता. ‘खेल’मधील लताची ‘भूल जा ए दिल मुहब्बत का फसाना..’ आणि ‘जाते हो तो जाओ, हम भी यहॉं वादो के सहारे जी लेंगे..’ ही दोन गाणी खूप लोकप्रिय झाली होती.
देवेन्द्र गोयलचा ‘वचन’ (५५) हा संगीतकार रवी आणि अभिनेता राजेन्द्रकुमार यांचा प्रथम चित्रपट! रवीच्या खारच्या बंगल्याचे नावही वचन आहे. यातील भिकाऱ्याच्या तोंडी असलेले ‘एक पसा दे दे बाबू..’ त्या काळात खूप लोकप्रिय होते. लोक गमतीने त्यांना भिकाऱ्यांचा संगीतकार म्हणत. रविशंकर शर्मा संगीत रवी या नावाने देत तर पाश्र्वगायन रविशंकर नावाने करत. भारतभूषण, निरुपा रॉय यांच्या कवी कालिदास (५९) ची गीते भरत व्यासने लिहिली होती, तर संगीत एस. एन. त्रिपाठी यांचे होते. त्यातील रेडिओवर कानाला बरे वाटणारे, लता-रफी यांचे ‘उन पर कौन करे जी विश्वास..’ पडद्यावर प्रत्यक्ष पाहताना आधुनिक कालिदास हे गीत गात आहे असे वाटले होते. शम्मी कपूरचा ‘ब्लफ मास्टर’ (६३) हा कृष्णला पाहिलेला मी शेवटचा चित्रपट! त्यातील ‘गोिवदा आला रे..’ गाण्याचे चित्रण गिरगावच्या रस्त्यावरच झाले असल्याकारणाने पब्लिकने तो पाहायला तुफान गर्दी केली होती.
चाळीस-पन्नास वर्षांपूर्वीचा कृष्ण सिनेमाचा परिसर आजही डोळ्यांसमोर तसाच उभा आहे. कृष्णला चांगले लोकप्रिय चित्रपट प्रदíशत होत. करंटला त्यांची तिकिटे कधीच मिळत नसत. सिनेमाचे तिकीट मिळण्याचे खात्रीशीर ठिकाण म्हणजे समोरचा इराणी! तिथे बसलेल्या, सावजी-मावजीकडून दो का तिकीट पाच रुपये में लेने का। अनेक वष्रे या दोन बंधूंची तिथे मोनोपॉली होती. आनंद मांजरेकरचाही त्या परिसरात खूप दरारा होता. पण त्याचे पत्त्यांचे क्लब होते. महालक्ष्मी रेसकोर्सवर एकेकाळी घोडय़ांच्या रेसचे बेटिंग घेणारे फक्त दोन मराठी जिगरबाज तरुण होते. एक आनंद आणि दुसरा राम दांडेकर!
मुंबईत भेलपुरी खावी तर ती कृष्ण सिनेमासमोर कृष्ण भेलपुरी हाऊसमध्ये. तीही रस्त्यावर उभे राहून, गिरगाव चौपाटीला, तारा बागेच्या दरवाजात, फार तर ठाकूरद्वारला उत्तम भेलपुरी हाऊसमध्ये! बाकी फोर्टचा विठ्ठल भेलपुरीवाला यांच्यापुढे पानीकम!
पंढरपूरहून अनवाणी पायाने चालत आलेला तरुण मकबूल १९४०-४५ च्या दरम्यान कृष्ण सिनेमासमोरच, खेतवाडीमध्ये प्रभाकर सदनमधील जयहिंद स्टुडिओत भगवान सिंहकडे दीड रुपया रोजावर काम करीत असे. पोस्टरवरील एका मुंडीला (म्हणजे चेहऱ्याला) पाच आणे हा त्या वेळचा रेट होता. रस्सीला कोळसा घासून, तिने कागदावर चौकोन पाडून मकबूल आधी चित्र काढत असे, मग त्यात रंग भरत असे. दिवसा स्टुडिओमध्ये किंवा ऑल्फ्रेड टॉकीजच्या मुतारीमागे होर्डिग्ज व मध्यरात्री ट्राम बंद झाल्यावर नॉव्हेल्टीसमोर रस्त्यावर सहा शीटर पोस्टर रंगवीत बसलेला दिसे. जयिहदचा पगारी नोकर असल्याने पोस्टरवर त्याची स्वाक्षरी नसे. हाच खेतवाडीतील दाढीवाला मकबूल फिदा हुसन पुढे एम. एफ. हुसन नावाने आंतरराष्ट्रीय कीर्तीचा पेंटर झाला. बाळाराम स्ट्रीटवरच्या बदर बागेतील बोहऱ्यांच्या वस्तीत दरवर्षी जेवणावळी घालत असे. त्यांची आई हिंदू पद्धतीचे नऊवारी लुगडे नेसून तिथे वावरत असे.
गीतकार कैफी आजमी, सादिक अली एकेकाळी खेतवाडीतील अरब बंगल्यात राहात असत. शबाना आजमीचे बालपणही इथेच सरले. खेतवाडी म्हणजे एकेकाळचा कम्युनिस्टांचा बालेकिल्ला होता. पत्रकार अप्पा पेंडसे, लालजी पेंडसे, डॉक्टर मंडलिकही याच परिसरातले! सिनेनिर्माते मनमोहन देसाई ११ व्या गल्लीच्या कोपऱ्यावरच राहात असत. मुंबई द्विभाषिक राज्याचे शेवटचे आणि महाराष्ट्र राज्य विधानसभेचे पहिले सभापती सयाजीराव सिलम इथेच १२ व्या गल्लीत राहात होते. पुढे पॉण्डेचरीचे गव्हर्नर झाले. त्यांचा नातू हेमंत सिलम माझ्याच वर्गात शिकत होता.
कुप्रसिद्ध जमना मॅन्शन ही कृष्णसमोरच चौदाव्या गल्लीत उभी आहे. आधुनिक मुंबईचे शिल्पकार म्हणून गौरवण्यात येणाऱ्या जुन्या पारशी-इराणी जमातीच्या पाऊलखुणा या परिसरात पाहण्यास मिळतात. पारशांची नाक्यावरची कामा बाग, शेजारचे रेल्वे हॉटेल आणि रेल्वे बेकरी अडजानीयाचा पेट्रोल पंप, या पारशी सद्गृहस्थाने मुंबईत बॉिक्सगचा खेळ लोकप्रिय केला. अग्यारीसमोरचे दाराज याझदानी इथे रोज सायंकाळी सलीम दुराणी आणि कुस्तीगीर किंगकाँग येऊन बसत. बसस्टॉपजवळचे गुडमन इराणी रेस्टॉरंट म्हणजे गिरगाव रोडची शान होती.
आपल्या मनासारखा गाण्याचा, गोड आविष्कार केला म्हणून, संगीतकार दत्ता कोरगावकरांनी, तिरुकलल्ला, गाए लता गा ए लता या ‘दामन’ (५१) मधील या गाण्याच्या ध्वनिमुद्रणानंतर लता मंगेशकरना खास या गुडमनमध्ये पार्टी दिली. शकुंतलाबाई परांजपे यांचेही हे खास आवडते हॉटेल होते. गुडमनचे पारशी मालक पुढे जागा विकून कॅनडात स्थायिक झाले. पुढचे ग्रॅण्ट रोडचे नाक्यावरचे ओरिजिनल पíशयन ब्रून पाव मस्का व खारी बिस्कीट यासाठी संपूर्ण मुंबईत मशहूर होते. आता त्या जागेवर बुटांची शोरूम आहे, पण मागच्या बाजूला बेकरी अजूनही आहे. कृष्ण सिनेमाजवळच्या धनाजी या भंडाऱ्याच्या मांसाहारी खानावळीचा गौरवपूर्वक उल्लेख केल्याशिवाय हा लेख अधुरा आहे याची मला कल्पना आहे. समोरची पंडोलची सोडावॉटरची फॅक्टरी, सिनेमाची चोपडीवाला बुऱ्हानपूरवाला, वेश्यांची सिंप्लेक्स बििल्डग आणि त्रिभुवन रोडचा बाकी परिसर स्वस्तिकवरील लेखामध्ये घेत आहे. तब तक हमें आज्ञा दिजिए!
arun.puranik@gmail.com