२९ जुलै २०११

तथ्यांश
तथास्तु
फुल्या फुल्या डॉट कॉम
आकांत
सुरक्षा
कव्हर स्टोरी
डेस्कटॉप
नाटक
मेतकूट
हास्यकविता
वनपर्यटन
माझी बाहेरख्याली
नॉस्टेल्जिया
खाली पेट
हेल्थ चॅट
दास्ताँ-ए-दख्खन
इतिहास
क्रिकेटनामा
‘जिव्हा’ळा
ऋणानुबंध
एक होती रसिका!
तिच्या फोटोसेशनची गोष्ट
श्रीमान श्रीमती
तडका मारके
शॉपिंग
वाचक प्रतिसाद
भविष्य
संपर्क
मागील अंक

इतिहास

डॉ. यशवंत रायकर
वेदांग ज्योतिष हे व्यक्तीचे भवितव्य वर्तवणारी विद्या नव्हती. ऋतू ठरवणे, नक्षत्रांचा शोध लावणे, दीर्घकाळात नक्षत्रे स्थिर राहत नाहीत हे ओळखणे, त्यावरून काळाचा अर्थ लावणे व काळाचे युगांमध्ये विभाजन करणे, विश्वाच्या उत्पत्तीची संकल्पना सादर करणे आणि विश्वरचना विचारात घेणे या वैदिक आर्याच्या देणग्या होत. त्यांचा धावता आढावा या लेखाच्या माध्यमातून घेण्यात आला आहे.

भारतीय खगोलशास्त्राच्या इतिहासातील सिद्धान्त ज्योतिषाबद्दल बरेच लिहिले जाते. कारण सिद्धान्तींनी खगोलशास्त्राचा गणिती पाया घातला व त्याला जागतिक दर्जा मिळवून दिला. आर्यभट्टापासून वराहमिहीर वगैरे नावे सर्वाच्या तोंडी असतात. पण त्यापूर्वीचा काळ, ज्यात वेदकाळ व हरप्पा संस्कृतीचा काळ मोडतात, तोही महत्त्वाचा आहे. विज्ञानाचा इतिहास म्हणजे बाल्यावस्थेतून प्रौढत्वाकडे विकसत गेलेला ज्ञानाचा इतिहास असतो हे त्यातून स्पष्ट होते. म्हणून त्याचा विचार येथे करू. वेदकाळ म्हणजे ढोबळपणे इ.स.पू. १५०० ते इ.स.पू. ५०० धरायला हरकत नाही. हरप्पा संस्कृतीच्या ऱ्हासापासून मगधाचा उदय होईपर्यंतच्या घडामोडी या काळात घडतात. वेदांग ज्योतिष हा भारतीय खगोलशास्त्रावरील सर्वात प्राचीन ग्रंथ. त्याचा कर्ता लगढ. इ.स.पू. १४०० च्या सुमारास होऊन गेला, पण त्याची उपलब्ध संहिता इ.स.पू. ४०० ची आहे. लोकमान्य टिळकांनी संशोधन करून लिहिलेले वेदांग ज्योतिष त्यांच्या पश्चात १९२५ साली प्रसिद्ध झाले. पण ते विवाद्य आहे. वेदांग ज्योतिष हे कालविधानशास्त्र होते. जो ज्योतिष जाणतो, तो यज्ञ जाणतो. (यो ज्यौतिषं वेद स वेद यज्ञम्) असे म्हटलेले आहे. पशुपालन अवस्थेतील आर्याना अग्नी प्रज्वलित ठेवणे अगत्याचे होते. त्यासाठी यज्ञसंस्था आली. स्त्री, संतती, गोधन, दीर्घायुष्य लाभावे, शत्रूचा नाश व्हावा यासाठी यज्ञ होते. पृथ्वी, आकाश, अंतरिक्ष यातील दृश्य, अदृश्य शक्तींची आराधना करणे, देवांचा राजा इंद्र याला वश करून घेणे हा हेतू होता. कोणतेही महत्त्वाचे कार्य शुभमुहूर्तावर केल्याखेरीज फलदायी होणार नाही, अशी श्रद्धा होती जी आजही टिकून आहे. पण वेदांग ज्योतिष हे व्यक्तीचे भवितव्य वर्तवणारी विद्या नव्हती. ऋतू ठरवणे, नक्षत्रांचा शोध लावणे, दीर्घकाळात नक्षत्रे स्थिर राहत नाहीत हे ओळखणे, त्यावरून काळाचा अर्थ लावणे व काळाचे युगांमध्ये विभाजन करणे, विश्वाच्या उत्पत्तीची संकल्पना सादर करणे आणि विश्वरचना विचारात घेणे या वैदिक आर्याच्या देणग्या होत. त्यांचा धावता आढावा घेऊ. शिवाय हरप्पा संस्कृतीचा खगोलशास्त्रीय वारसा त्यांना लाभला होता काय, हेही पाहू.
वर्षांचे सहा ऋतू फक्त आपल्या उपखंडातच आढळतात. पण त्यांचे आकलन होण्यासाठी भारतीयांना दोन-तीन हजार वर्षे धडपडावे लागले. ऋग्वेदात वसंत, ग्रीष्म व शरद असे तीन प्राकृतिक ऋतू मानलेले आढळतात. प्रत्येक ऋतू चार महिन्यांचा. अथर्ववेदात पाच ऋतू येतात. वसंत, ग्रीष्म, वर्षां, शरद व हेमंत-शिशिर. पुढे यजुर्वेदाच्या तैतिरीय ब्राह्मणात प्रथमच सहा ऋतू व वसंत हा मुख्य असल्याचा उल्लेख आहे. तरी ऋतूंचे यथार्थ आकलन व्हायला आणखी काही शतके जावी लागली. आर्याचे ऋतू नक्षत्रावरून ठरविले जात. २७ नक्षत्रांचा शोध ही त्यांची खास उपलब्धी. नक्षत्रे ही ताऱ्यांचे पुंजके आहेत. त्यातील ताऱ्यांचा एकमेकांशी संबंध नाही. पण कल्पनाशक्तीच्या जोरावर त्यांना सामूहिक ओळख प्रदान करणे व त्यांच्या दिव्यकथा रचणे हे प्रतिभेचे कार्य होते. कालमापनासाठी त्यांना चंद्र फार महत्त्वाचा होता. म्हणून त्याला मासकृत् म्हणजे महिन्यांचा कर्ता म्हटले. अमावास्येला संपणारा अमान्त व पौर्णिमेला संपणारा पौर्णिमान्त अशा महिन्यांच्या दोन पद्धती होत्या. पौर्णिमा म्हणजे सूर्य व चंद्र यातील कमाल अंतर व अमावास्या म्हणजे दोहोंमधील किमान अंतर अशी सोपी व्याख्या गोभिल गृह्य़सूत्रात दिली आहे. राहू व केतू हे अदृश्य बिंदू ओळखणे व त्यांना नावे देणे हेसुद्धा मुळात वैज्ञानिक कार्य होते. चंद्राचा मार्ग क्रांतिवृत्ताला छेदून जातो असे दिसते. ज्या िबदूपासून चंद्र फिरताना क्रांतिवृत्ताच्यावर सरकतो तो राहू व जेथून खाली घसरतो तो केतू. त्यांना शुभाशुभ ग्रह मानणे हा भाग अगदी वेगळा.

विश्वाची उत्पत्ती कशी झाली, हा प्रश्न खगोलशास्त्र, धर्मशास्त्र, अध्यात्म अशा सर्वाचा जिव्हाळ्याचा विषय आहे. याबद्दलच्या दिव्यकथा सर्व धर्मात आढळतात. पण ऋग्वेदात विश्वाच्या उत्पत्तीचे जे अनुमान केले आहे त्याला तोड नाही.

नक्षत्रे ओळखली तरी त्यांना चंद्राच्या पृथ्वीभोवती फिरण्याच्या मार्गातील मैलाचे दगड म्हणून वापरणे ही पुढची झेप होती. चंद्राचा मार्ग सूर्याच्या भ्रमण मार्गाशी म्हणजे क्रांतिवृत्ताशी ५० व विषुववृत्ताशी साधारण १८० कोन करतो. या मार्गातील २७/२८ भागांना नावे देण्यासाठी नक्षत्रे उपयोगी पडली. नक्षत्र स्थिर असते. (नक्षरति तत् नक्षत्रं) त्याच्या आधारे ग्रहांच्या भ्रमणाचे निरीक्षण शक्य झाले व ते कालमापनास उपयुक्त ठरले. राशी (zodiac) चे ज्ञान नव्हते. वैदिक यज्ञ ऋतूंशी निगडित होते. त्यामुळे मासांची पहिली नावे ऋत्वात्मक होती. जसे मधु, माधव वगैरे. नंतर नक्षत्रनामे आली (चैत्र, वैशाख वगैरे) जी आज रूढ आहेत. महिन्याच्या पौर्णिमेस किंवा पौर्णिमेजवळ जे नक्षत्र असेल त्याचे नाव त्या महिन्याला दिले गेले.
पण नक्षत्रे व ऋतू यांचे साहचर्य कायम नसते. पृथ्वी हेलकावे खात असल्यामुळे तिचा आस एकाच (ध्रुव) ताऱ्याकडे कायमचा रोखलेला राहत नाही. त्याची एक गिरकी (अक्षवलन) पूर्ण होण्यास साधारण २६०० वर्षे लागतात हे आपण आज जाणतो. हे ज्ञान तेव्हा नव्हते. पण विशिष्ट दिवशी आकाशात दिसणारा नक्षत्रांचा नकाशा (sky map) हळूहळू बदलत जातो व त्याची पुन्हा तीच स्थिती येण्यास बरीच शतके लागतात हे आर्याना पिढय़ान् पिढय़ा केलेल्या निरीक्षणामुळे लक्षात आले होते. त्यामुळे महिना व ऋतू याचे साहचर्य बदलते, संपात बिंदू पुढे सरकतात व ऋतुचक्र त्याच्या उलट दिशेने फिरते, हेही त्यांना कळले होते. पण मौखिक परंपरेवर विसंबून असल्यामुळे त्यांनी आकाशाचे तक्ते बनवले नाहीत.
वरील ज्ञानसंचयावरून त्यांनी असा निष्कर्ष काढला की पूर्वीही असे घडत आले व पुढेही घडत राहणार. यातून कालचक्राच्या संकल्पनेचा उमग झाला. ज्ञानाकडून अज्ञाताकडे झेप घेतली. अर्थात ती अधिदैविक व आध्यात्मिक पातळीवरची होती. वैश्विक चक्राशी मानवी जीनव जोडून त्यांनी भूतकाळ व भविष्यकाळ यांचा अर्थ लावला. जगात सर्व संस्कृतींना गोलाकार फिरणारा काळ अभिप्रेत होता. काळचक्रातून भारतात युगाची संकल्पना आली. पुन्हा पुन्हा येणारे काळमान ते युग. कृत, त्रेता, द्वापार व कली ही चार युगे. मूळ खगोलशास्त्रीय निरीक्षणांवर आधारलेली संकल्पना पुढे खूपच ताणली गेली. तरी अन्य धर्माना अभिप्रेत नसलेले काळाचे प्रचंड प्राचीनत्व त्यात अंतर्भूत आहे.
विश्वाची उत्पत्ती कशी झाली, हा प्रश्न खगोलशास्त्र, धर्मशास्त्र, अध्यात्म अशा सर्वाचा जिव्हाळ्याचा विषय आहे. याबद्दलच्या दिव्यकथा सर्व धर्मात आढळतात. पण ऋग्वेदात विश्वाच्या उत्पत्तीचे जे अनुमान केले आहे त्याला तोड नाही. ‘नासदासीन्तो सदासिजदानीं’ या सुरुवातीच्या ओळीवरून ते नासदीय सूक्त म्हणून ओळखले जाते. पाश्चिमात्य त्याचा song of creation म्हणून गौरवाने उल्लेख करतात. विश्वाच्या उत्पत्तीचे हे सर्वात प्राचीन व एकमेव अनुमान असून अत्यंत प्रगत आहे. ग्रीसमध्ये निसर्गवादी विचारांची पुसटसुद्धा जाणीव झाली नव्हती, त्याच्या चार-पाचशे वर्षे आधी केलेले हे विधान होय. यात कवी प्रश्नाच्या थेट मुळात शिरतो. विश्व हे एक युनिट असल्याचे मानतो. फक्त पृथ्वीचा विचार करीत नाही. विश्वाच्या निर्मितीचे श्रेय परमेश्वराला देऊन प्रश्न सोडवण्याची पळवाट पत्करीत नाही. हे सूक्त शंका उभ्या करते. स्वत:च्या अज्ञानाची प्रांजळ कबुली देते व काही गोष्टी मानवी बुद्धीला अगम्यच (ultimate unknown) राहणार असल्याचे सांगते. तरी अनुमान करण्याचे धाडस दाखविते, शिवाय आपला निष्कर्ष बिनचूक असण्याचा दावा करीत नाही. अंतरिक्षात बसलेल्या त्या विश्वाच्या अध्यक्षाला तरी ते माहीत आहे की नाही, अशी शंका व्यक्त करते. विश्वारंभी काय अवस्था असावी याचे वर्णन singularity चे कल्पनाचित्र भासते. त्यालाच ब्रह्म म्हटले आहे. विश्व हे पाणिजन्य असल्याचे अनुमान चुकीचे ठरले तरी निसर्गवादी दृष्टिकोनाची साक्ष देते. ब्रह्मामध्ये काम निर्माण झाल्यामुळे पुढचा पसारा जन्मास आला असे सांगणारा चैतन्यवादी दृष्टिकोनही त्यात आहे. म्हणून निसर्गवादी बुद्धिप्रधान व ईश्वरवादी श्रद्धाप्रधान अशा दोन्ही भारतीय परंपरांचा पाया या सूक्ताने घातला. शाम बेनेगल यांच्या ‘भारत एक खोज’ या दूरदर्शन मालिकेचे (१९८८-८९) ते टायटल साँग होते. या सूक्ताचे प्रासादिक हिंदीत रूपांतर करण्याची किमया प्रा. वसंत देव यांची.
आता शेवटचा प्रश्न हरप्पा संस्कृतीच्या वारशाचा. भारतीय खगोलशास्त्राचा आरंभ वैदिक आर्यापासून धरला जातो. पण त्यापूर्वीची सिंधू घाटीची सभ्यता साक्षर, व्यापारी व नागरी होती. जगातील सर्वात प्राचीन नगररचना या संस्कृतीने दिली. असे सुसंस्कृत लोक खगोल निरीक्षणाबाबत अजाण व गाफील राहतील हे शक्य नाही हा सिद्धान्त फिनलंडचे Asko Parpola यांनी १९७३ साली मांडला. असा विचार ऐकला की आपल्यालासुद्धा तो पटू लागतो. सिंधू संस्कृतीच्या ऱ्हासाचा व आर्य टोळ्यांच्या भारतातील आगमनाचा कालखंड एकच होता. म्हणजे दोहोंचा थेट संपर्क झालेला असणार. Parpola यांच्या सिद्धान्ताचा कराची (पाकिस्तान) येथील Syed Mohmmad Ashfaque यांनी पाठपुरावा केला व आपले निष्कर्ष जागतिक स्तरावर विद्वज्जनांपुढे ठेवले (१९७७). विषय अत्यंत क्लिष्ट असल्यामुळे आपण फक्त त्यांच्या कार्याचा ओझरता परिचय करून घेऊ शकतो.

पाच दिवसांचा ‘आठवडा’ही मेसोपोटेमियामधील संकल्पना मेलुहा म्हणजे सिंधू संस्कृतीच्या साम्राज्यात तिकडे गेलेली होय. हरप्पा संस्कृतीच्या मुद्रांवरील चित्रे व खुणा याचा अर्थ लावून हा सिद्धान्त मांडलेला आहे.

ध्रुव तारा हा विश्वाचा केंद्रबिंदू व त्याभोवती नक्षत्रे फेर धरतात हीच सिंधू घाटींतील लोकांची कल्पना होती. पण इ.स.पू. २५०० मध्ये पृथ्वीच्या आसाचा रोख Polaris या आजच्या ध्रुव ताऱ्याकडे नसून Thuban या ताऱ्याकडे होता. (हा आज गणिताने काढता येतो.) तो ध्रुव म्हणून ओळखायला सप्तर्षीचा उपयोग आजच्या इतकाच होणार. सूर्योदयापूर्वी आकाशात कृत्तिका (Pleidades) नक्षत्र दिसले की तो वर्षांरंभ मानायचा व उत्सव साजरा करायचा. हीच प्रथा आफ्रिका, ऑस्ट्रेलिया व अमेरिकेतील वन्य जमातीत आढळून येते. त्यामुळे या तर्काला दुजोरा मिळतो. नक्षत्रांची ओबडधोबड ओळख सिंधू संस्कृतीत होती. वैदिक आर्यानी तिचा विकास केला. महंजोदारो व हरप्पा येथील सार्वजनिक स्नानगृहे ही वर्षांरंभाच्या व अन्य शुभ मुहूर्तावर पवित्र स्नान करण्यासाठी होती. ही प्रथा भारतात आजही चालू आहे. प्राचीन चिनी संस्कृतींतील SIEUS म्हणजे नक्षत्र येथून तिथे गेलेली संकल्पना होय. आकाशस्थ गोल मेरू पर्वताभोवती फिरतात, अशी कल्पना ग्रीकांमध्ये नव्हती, पण इराणी आर्यामध्ये होती. तिचे मूळ हरप्पा संस्कृतीत आहे. पाच दिवसांचा ‘आठवडा’ही मेसोपोटेमियामधील संकल्पना मेलुहा म्हणजे सिंधू संस्कृतीच्या साम्राज्यात तिकडे गेलेली होय. हरप्पा संस्कृतीच्या मुद्रांवरील चित्रे व खुणा याचा अर्थ लावून हा सिद्धान्त मांडलेला आहे. वर उल्लेखिलेले संशोधक हे राष्ट्र व धर्म यांच्यावर उठून विचार करणारे सत्यशोधक आहेत. शिवाय त्यांच्या लिखाणात आवेश, अभिनिवेश कुठेही आढळत नाही. हरप्पा लिपीचे कोडे सुटल्याखेरीज त्यांच्या सिद्धान्तावर शिक्कामोर्तब होणार नाही याची त्यांना जाणीव आहे. विषय आपल्या आवाक्याच्या बाहेरचा आहे. पण अशा ज्ञानसाधनेचा संस्कार कुणावर यातून झाला तर तेही नसे थोडके!
lokprabha@expressindia.com