१ जुलै २०११
मॉन्सून स्पेशल

चारूशीला कुलकर्णी
lokprabha@expressindia.com

दुगारवाडीचा धबधबा
डोंगरकुशीत वसलेले त्र्यंबकेश्वर धार्मिक कारणांसाठी जगभर प्रसिध्द आहे. वर्षभर भाविकांच्या गर्दीने फुलणारा त्र्यंबकेश्वरचा परिसर पावसाळ्यात निसर्गप्रेमींना खुणावतो. हिरवळीचा साज ल्यालेल्या या परिसरातील ‘दुगारवाडी’ या ठिकाणी तर पावसाळ्यात युवावर्गाची झुंबडच होते. निसर्गाने मुक्तहस्ताने उधळण केलेल्या दुगारवाडी धबधबा परिसरापर्यंत पोहोचण्यासाठी कच्च्या रस्त्यापासून सुमारे दोन किलोमीटर अंतर पायी जावे लागते. अर्थात सोबतीला हिरवागार निसर्ग, कधी रिमझिम तर कधी मुसळधार पाऊस असल्याने थकवा असा जाणवत नाही. दूरवरून धबधब्याचे दर्शन रोमांचकारी वाटत असले तरी जवळ गेल्यावर त्याचा रौद्रपणा जाणवतो. शहरी जीवनातील कामाचा ताणतणाव घालवण्यासाठी, ऐन पावसात मित्र-मैत्रिणींसोबत चिंब भिजण्याची मजा अनुभवयाची असेल तर दुगारवाडीसारखे ठिकाण नाही. इथे येताना मात्र स्वतचे वाहन गरजेचे आहे. त्र्यंबकेश्वरपासून जव्हार रस्त्यावर अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर डाव्या बाजूला दुगारवाडीकडे जाणारा रस्ता लागतो. ढगांची भरलेली शाळा आणि धरतीचा हिरवागार साज, समोर प्रचंड वेगाने कोसळणारा धबधबा, सर्वकाही पाहण्यासारखे, अनुभवण्यासारखे. धबधब्यापर्यंत थेट जाण्यासाठी दरीत उतरण्याचा धोका पत्करावा लागतो. धोका यासाठी की पावसामुळे दगडांना शेवाळं आलेले असते, त्यामुळे पाय निसटण्याची भीती असते. या धबधब्याच्या टेकडीवर चहा किंवा भजी याशिवाय दुसरा पदार्थ मिळत नसल्याने आपली शिदोरी घेऊनच जावे. निवासासाठी त्र्यंबकेश्वर हे जवळचे मोठे ठिकाण आहे. दुगारवाडीला भेट देण्यासाठी जाताना सुरक्षिततेच्या दृष्टीने एकटय़ादुकटय़ाने जाण्यापेक्षा गटाने गेलेले कधीही योग्य.
अंतर : मुंबई ते नाशिक १७१ किमी. नाशिक ते त्र्यंबकेश्वर ३० किमी आणि त्र्यंबकेश्वरपासून जव्हार रस्त्यावर २ किमी अंतर
वाहन व्यवस्था : मुंबईहून नाशिकला येण्यासाठी बस, रेल्वे, टॅक्सीसेवा उपलब्ध आहे. नाशिकहून त्र्यंबकेश्वर परिसरात जाण्यासाठी खासगी वाहनांसह बसचा पर्याय उपलब्ध आहे. मात्र दुगारवाडी परिसरात जाण्यासाठी स्वतचे वाहन असेल तर उत्तम.
त्र्यंबकेश्वरपासून जव्हार रस्त्याने २ किमीवर गेल्यास डाव्या बाजुला दुगारवाडीकडे जाणारा फाटा दिसतो. या रस्त्याने दीड किलोमीटर गेल्यास वाहन पार्क करून साधारणपणे एक ते दीड तासाचे अंतर पायी चालत जावे लागते. मुंबईहून येताना घोटीपासूनही त्र्यंबकेश्वरकडे येण्यासाठी मार्ग आहे. तसेच वाडामार्गेही येता येते. पुण्याहून येण्यासाठी बस, शिवाय पुणे-मनमाड एक्स्प्रेस ही रेल्वे, तसेच पुण्याहून कल्याण किंवा इगतपुरीला उतरून बस, टॅक्सीने त्र्यंबकेश्वपर्यंत जाता येते.