२५ मार्च २०११

तथ्यांश
तथास्तु
हास्यकविता : शिमगा
आरोग्य
डेस्कटॉप
शिमगा स्पेशल : आमच्या होलिकोत्सवाची पोलिटिकल रंगचित्रे
शिमगा स्पेशल : छपरी खुर्चीचा वग
शिमगा स्पेशल : काटा रुते कुणाला..
शिमगा स्पेशल : ती पुल-कित भेट
शिमगा स्पेशल : साहेब आणि गोळी!
शिमगा स्पेशल : पोलिटिकल पाइप आन् सोशल चोकप!
शिमगा स्पेशल : विनोद - हसवणारे आणि न हसवणारे
शिमगा स्पेशल
शिमगा स्पेशल : रंग माझा वेगळा
शिमगा स्पेशल : मुलाखतीचा शिमगा
पर्यटन
माझी बाहेरख्याली
वन दिन
जागतिक वन दिन
माइल स्टोन
दास्ताँ-ए-दख्खन
तडका मारके
शॉपिंग
भविष्य
संपर्क
मागील अंक

दास्ताँ-ए-दख्खन

धनंजय कुलकर्णी
रामदासांचा मुस्लिम भक्त- दखनचा शाह तुराब ! शाह तुराब संत रामदासांना कधीच भेटला नव्हता. त्याचा ना महाराष्ट्राशी संबंध होता ना मराठी भाषेशी. तो जन्मानं मुसलमान. तरीही शाह तुराब समर्थ साहित्यानं अपार प्रभावित झाला होता. इतका की, अडीचशे वर्षांपूर्वी तुराबने रामदासांच्या ‘मनाचे श्लोक’चे स्वैर रूपांतर चक्क दखनीत करून टाकले! ‘मन-समझावन’ या नावानं!

तीन शतकांपूर्वी ‘उदंड देशाटन’ केलेले संत रामदास, आजच्या भाषेत बोलायचे झाल्यास, विलक्षण मोबाइल व्यक्तिमत्त्व म्हणावं लागेल. ‘महाराष्ट्र धर्म वाढवावा’ या आपल्या उक्तीची साक्षात प्रचीती आपल्या सर्वदूर भ्रमणातून देणाऱ्या या क्रियाशील उपासकाचं नियमित स्मरण दासनवमीच्या रूपात आजही होतंच. दासनवमी नुकतीच साजरी झाली. महाराष्ट्र व बाहेरही त्यानिमित्तानं ठिकठिकाणी दासबोध पारायण-कीर्तन-प्रवचनादी कार्यक्रम पार पडले.
दरवर्षी समर्थ महिमा वर्णीला जाताना आठवतो तो रामदासांचा मुस्लिम भक्त- दखनचा शाह तुराब (१६९५-१७८३)! शाह तुराब संत रामदासांना कधीच भेटला नव्हता. तो समर्थाचा समकालीनही नव्हता. रामदासांच्या निर्वाणानंतर तो १६ वर्षांनी जन्मला. त्याचा ना महाराष्ट्राशी संबंध होता ना मराठी भाषेशी. तुराब जन्मानं मुसलमान. धर्माने इस्लाम धर्म अनुयायी; तर संप्रदायानं सूफी. महाराष्ट्रापासून शेकडो कोस दूर खाली दक्षिणेत त्याचं वास्तव्य होतं. तरीही शाह तुराब समर्थ साहित्यानं अपार प्रभावित झाला होता. इतका की, अडीचशे वर्षांपूर्वी तुराबने रामदासांच्या ‘मनाचे श्लोक’चे स्वैर रूपांतर चक्क दखनीत करून टाकले! ‘मन-समझावन’ या नावानं! दखनी ही साहित्य-संस्कृतीचा चारशे वर्षांचा समृद्ध इतिहास लाभलेली दखनची लोकबोली. गोवळकोंडा साम्राज्याचा काळ (१५१८-१६८७) हा दखनी साहित्याचा सुवर्णकाळ! तत्कालीन सर्वसमावेशक समाज-संस्कृतीचं दखनी हे प्रतीक होतं. सहसा उर्दू लिपीतून ती लिहिली जाई. पण दखन प्रांतीच्या या जनबोलीचं महत्त्व ओळखून नामदेव-रामदासांसह अनेक मराठी संतांनीही दखनीतनं रचना केल्या होत्या. अर्थात देवनागरीतून. तर समर्थाच्या कर्तृत्व-कृतींनी भारावलेल्या शाह तुराबने ‘मनाचे श्लोक’चे स्वत:च्या भाष्यासह दखनीकरण केलं इ.स. १७५८ मध्ये. दखनीतील ती शेवटची महत्त्वाची साहित्यकृती!
काळ बदलतो! अगदी खरंय! ग्लोबलायझेशनच्या आजच्या जमान्यात १७ व्या शतकातील समाज-संस्कृतीचा परिवेश नक्कीच विसंगत वाटेलही, पण प्रगतीच्या नवनव्या वाटांनी उजळलेल्या सध्याच्या हायटेक युगात राजकीय- सामाजिक- सांस्कृतिक सहिष्णुतेच्या कक्षाही विस्तारताहेत का, याचे उत्तर देण्याची गरज नसावी! समर्थाच्या १७ व्या शतकातील या यावनी अनुयायाची कृती म्हणूनच आजही वेगळी वाटेल! ‘मन-समझावन’च्या आरंभीच पुढील चरण येतो :
अलक नाम अल्ला, निरंजन, हरी,
निराकार निरगुण वो परमेश्व्री है,
सिफत (अस्तित्व) ऊसकी हर शै में दायम (नेहमी),
वो गंगा, वो जमुना,वो गोदावरी है..

अल्ला, हरी व निरंजन हे सर्व एकच असून त्यांचे गुण चराचरात दाटले आहेत. मग ती गंगा-यमुना असो वा गोदावरी! ईश्वराची धर्मातीत एकात्मता वारंवार अधोरेखित करणारा शाह तुराब स्वत:ला हुसेनी ब्राह्मण माने! राजस्थानच्या पुष्कर गावी साधूंचा एक गट आजही स्वत:ला हुसेनी ब्राह्मण म्हणवतो! शाह तुराब मूळचा कोण, कुठला या विषयी कोणतीही माहिती उपलब्ध नाही. तो विजापूरकडचा असल्याचं काही तज्ज्ञ मानतात. तर, काहींच्या मते त्याचा संबंध गुलबर्गा वा हैदराबादेशी असावा. त्याच्या भावाचा मृत्यू एलुरू (सध्या आंध्र प्रदेश) येथे झाल्याची नोंद मात्र आहे. गुरूंच्या उपदेशानुसार शाह तुराब सूफी संप्रदायाच्या प्रचारार्थ दक्षिणेत आधी तिरून्नमलाई (तामिळनाडू) व पुढे कर्नाटकात गेला. तिरून्नमलाई येथे शाह तुराबने सूफी मठाची स्थापनाही केली.
दक्षिण भ्रमंतीत शाह तुराब तंजावरला पोहोचला तेव्हा तिथं प्रतापसिंगराजे भोसले (१७३९-६३) यांचं अधिपत्य होतं. समर्थ शिष्य सेतुभाव स्वामी त्यांचे राजगुरू. याच सेतुभाव स्वामींनी सज्जनगड मठाधिपतींच्या विनंतीवरून तंजावरला श्रीरामांच्या मूर्ती बनवून घेतल्या आणि १७६३ च्या सुमारास त्या सज्जनगडला रवाना केल्या. आजही त्या तिथेच आहेत. तंजावर वास्तव्यात शाह तुराब तेथील रामदासांच्या मठात गेला. तिथंच मनाच्या श्लोकाची पोथी त्याच्या पाहण्यात आली. त्यानं ती वाचून काढली अन् तो प्रफुल्लित झाला :
तंजावर में जिस दिन हुआ दाखल,
सीतारामदास की तो पोथी है फाझील (विद्वत्तापूर्ण)
गय सुन खुशिसे दिल का कवल (कमळ) खिल!

त्यानं मनाचे श्लोक दखनीत आणण्याचा तात्काळ निर्णय घेतला. तो अमलातही आणला. तंजावर मुक्कामीच तुराबने ‘मन-समझावन’ पुर्ण केले.
‘मन-समझावन’ हे ‘मनाचे श्लोक’चे शब्दश: भाषांतर नाही. मूळ कृतीचे ते स्वैर रूपांतर आहे. शाह तुराबने ‘मनाचे श्लोक’चा गाभा कायम ठेवत स्वत:च्या धारणांची जोड रूपांतराला दिलेली आहे. त्याचबरोबर, मनाला उद्देशून केलेला उपदेश, हा रामदासांच्या कृतीचा केंद्र बिंदू होता, याचे भान तुराबला सदैव होते. ‘मनाचे श्लोक’ची वृत्तरचना ‘मन-समझावन’मध्ये तुराबने कायम ठेवली. ‘अरे मना’हे श्लोकाचे पालुपदही त्याने बदललं नाही. आशयात देखील फारसे फेरफार केले नाहीत. राम महात्म, द्वैताचा अभाव, जगाची नश्वरता, निर्गुणोपासना इ. समर्थ तत्त्वांना ‘मन-समझावन’मध्येही ठळक स्थान आहेच. ‘मन-समझावन’चं स्वरूप तुराब आरंभीच स्पष्ट करतो :
ऐ ऊसकी पोथी का जवाब है
के जिसका रामदास जग में किताब है
मरेही (मराठी) बात में पोथी वो बोल्या
मैं उसका रम्झ (रहस्य) सब दखनी में बोल्या
उसका नाम मन-समझावन राखा..

रामदासांनी मराठीत लिहिलेल्या मनोबोधाच्या पोथीचं रहस्य आपण दखनीत ‘मन-समझावन’ या नावानं उकलीत आहोत, हा या ओळींचा ढोबळ अर्थ!
नको रे मना क्रोध हा खेदकारी।
नको रे मना काम नाना विकारी।
नको रे मना लोभ हा अंगिकारू।
नको रे मना मत्सर दंभभारू।

या समर्थाच्या प्रसिद्ध श्लोकाला तुराबने चढविलेला दखनी वेश पहा :
बुरा घुस्सा का सांगात (संगत) मत कर
करोध (क्रोध) काम, और लोव (लोभ)
का पाप मत कर!

रामदासांनी ‘मनाचे श्लोक’मधून मानवी मनाला विविध प्रकारांनी सावध करण्याचा प्रयत्न केलाय. अचपल व अस्थिर मनावर ताबा मिळविण्यासाठी तऱ्हेतऱ्हेचे उपदेश समर्थ देतात. लोभ-अहंकारला थारा न देण्यावर त्यांचा भर आहे. मनाभोवती केंद्रित समर्थ प्रबोधनास शाह तुराब आपल्या शैलीने दखनीत व्यक्त करतो :
बड़ा शेख चंचल व अचपल बना है -मन,
ये सारा परपंच झुटा जमाना
अरे मन, नको रे नको हो दिवाना!
रामदासी पद्धतीने तुराबही बजावतो :
अरे मन! ये धन मान पर ना अकडना,
है आखीर तुझे कल को माटी में गिरना!
त्याच ओघात तो पुढं सांगतो :
अरे मन! तुझे बोल तेरा ठिकाना
कहा से हुआ कहा तेरा आना
न तेरा यहां खीश (आप्त) न कोई बेगाना (परका)

अशा नश्वर जगात मग ईश्वराला शोधायचं कुठं? समर्थाच्या प्रेरणेने तुराब सुचवितो :
नको राम को ढुंढ चमन चमन में
न समुंदर में है; ना सातों गगन में,
जगा ज्योत उसका च है सब सखान (चेहेरा) में!
भऱ्या आत्माराम हर एक तन में,
जिनने आत्माराम का घर पछाना,
अरे मन नको रे नको हो दिवाना-

‘निराकार आकार ब्रह्मादिकाचा जया सांगता शिणली वेद वाचा’, हे निर्गुण ब्रह्मोपासक रामदासांचेही प्रसिद्ध वचन आहेच. ‘जिसे देव कहते सो परघट में बसे रे’, (ईश्वर विश्वरूपात प्रकटतो) असे जाहीर करणारा शाह तुराब अल्ला आणि सोहम अभेद्य असल्याची ग्वाही देतो- ‘वही अल्ला वही सोहम, हरिनाम!’ त्यालाही सर्वत्र अद्वैताची अनुभूती येतेच :
जहां एक अपना, वहां तो हमतुम नही है’
दुई का तो हरगीज तकलूम नही है!

व्यावहारिक पातळीवर शाह तुराबनेही रामाचा महिमा गाईला आहे. ‘प्रभाते मनी राम चिंतित जावा’ या श्लोकाचे हे दखनी रूप पाहा :
सिफन (स्तुती) कर अव्वल (प्रथम)
ऊसकी जो राम है, गा,
उसी नाम के संग संग्राम है गा,
सदा राम के नाम सों काम है, गा
हमें ध्यान उसका सूभै-श्याम है, गा!

समर्थाच्या आत्मबोधाचा त्याला विसर पडलेला नाही. ‘मन-समझावन’मध्ये त्यानं जीवनाचं सार नेमकं व्यक्त केलंय :
हमी हमको हम देखने जग में आये।
हमी हम को देख हम को गंवाये।

रामदासांपासून प्रेरणा घेतलेला असा हा शाह तुराब! ‘मनाचे श्लोक’सारख्या चिरंतन रचनेचे दखनीत रूपांतर करण्याची निकड त्याला अडीचशे वर्षांपूर्वी वाटली. त्यामुळं रामदासांचं तत्त्वज्ञान व्यापक पातळीवर पोहोचलं. आज दखनी भाषा-साहित्याच्या इतिहासात ‘मन-समझावन’ ही महत्त्वाची कृती मानली जाते. धार्मिक कट्टरतेने भारलेल्या तात्कालिक वातावरणात शाह तुराबने ‘मनाचे श्लोक’ दखनीत आणले ही बाब आजच्या संदर्भात अर्थपूर्ण म्हटली पाहिजे. समर्थ निर्वाणानंतर सात एक दशकांत ‘मनाचे श्लोक’ दखनीत पोहोचले. त्याच्या आगे-मागे दासबोधाचे तामिळमध्ये रूपांतर झाले. तत्कालीन सामाजिक-सांस्कृतिक अभिसरणावर प्रकाश टाकणारी ही बाब! मर्यादित संपर्क साधने असतानाही ही परस्पर देवाण-घेवाण घडली, हे विशेष. अनेक मराठी संतांनीही हिंदी सदृश जन-भाषेतून रचना केल्या होत्याच.
सध्या संपर्काची मुबलक साधने उपलब्ध आहेत. जग लहान झाल्याची विधाने आपण नेहमी व्यासपीठांवरून ऐकतो. तरीही, शेजारी राज्यातील साहित्य-समाज-संस्कृतीबद्दल जिज्ञासेची सर्वत्र वानवाच जाणवते. तेलुगूतील पाच नव्या-जुन्या कवी-साहित्यिकांचा नाम-परिचयही महाराष्ट्रातील प्रबुद्ध मंडळींना असण्याची शक्यता कमी! आंध्रमध्ये स्थिती वेगळी नाही! म्हणूनच शाह तुराबच्या ‘मन-समझावन’चं मोल आज अधिक वाटतं!
lokprabha@expressindia.com