१४ जानेवारी २०११
श्रीमान श्रीमती

त्यागराज आणि वीणा खाडिलकर या दोघांच्याही संसारात सूरांचं स्थान खूप महत्त्वाचं आहे. या दोघांच्या सूरमयी संसाराची काही खास गुपितं..

त्यागराज खाडिलकर

जन्मतारीख : ११ जून १९६७
लग्नाचा वाढदिवस कसा साजरा करता : १३ मे हा आमच्या लग्नाचा वाढदिवस. मे महिना असल्यामुळे मला काहीतरी कार्यक्रम असतोच. पण बहुतेकवेळा वेगवेगळ्या गावी आणि वेगवेगळ्या मंडळींसमवेत लग्नाचा वाढदिवस साजरा होतो.
शाळेचं नाव : कोल्हापूरमधील प्रायव्हेट हायस्कूल आणि लोहिया हायस्कूल. त्यानंतर पुण्यातील मॉडर्न हायस्कूल.
कॉलेज : मॉडर्न कॉलेज, पुणे
शिक्षण : बी.कॉम.
पेट नेम : मनीष.
पहिली कमाई : माझी पहिली कमाई हाही एक आनंदाचा क्षण होता. अंदाजे पाचव्या-सहाव्या वर्षी मी ‘स्वयंवर’ नाटकातलं ‘मम सुखाची ठेव देवा’ हे नाटय़गीत गायलं. माझ्या आजीचा इंदिराबाई खाडिलकरांचा कोल्हापुरात केशवराव भोसले नाटय़गृह येथे कार्यक्रम होता. मी मागे लागलो होतो मलाही गायचंय म्हणून. त्यावेळी मला समजावलं की मोठय़ांचा कार्यक्रम आहे. पण बालहट्टापुढे कुणाचं काही चाललं नाही अखेर मला गाण्याची संधी मिळाली. स्टेजवर अनाऊन्स केलं. मला त्यावेळी प्रेक्षकांकडून बक्षिसं मिळाली होती. रक्कम मला आत्ता आठवत नाही. पण माझ्यासाठी तो आनंद काही वेगळाच होता.
ऑल टाइम फेवरिट फूड : महाराष्ट्रीयन पद्धतीचं काहीही.
फेवरिट आइस्क्रीम : मिक्स फ्लेवर
वीणाने केलेला फसलेला पदार्थ : पिझ्झा.
वीणाचा वाढदिवस लक्षात राहतो का : हो नक्कीच.. वर्षांचा पहिला दिवस म्हणजे १ जानेवारीला तिचा वाढदिवस असतो. आणि नेमकं ३१ डिसेंबरच्या रात्री माझा कुठेतरी कार्यक्रम असतो. मग कार्यक्रमाच्या शेवटी रसिकांसमोर तिला शुभेच्छा देऊन रसिकांसाठी आणि खासकरून तिच्यासाठी एक गाणं गातो.
वीणाची आवड निवड कशी जपतोस : आमच्या बहुतेक सर्व आवडीनिवडी जुळतात.
कठीण प्रसंगात वीणाने दिलेली साथ एखादा अनुभव : मी एकदा मध्यरात्री रेकॉर्डिग संपून अडीच वाजता येत होतो. त्यावेळी रिक्षावाला आडवा आल्यामुळे माझी गाडी रोड डिव्हायडरवर जाऊन उलटी पालटी होऊन तिचा चक्काचूर झाला होता. पण माझं नशीब बलवत्तर म्हणून मी त्यातून सहीसलामत बाहेर आलो. घरी पोहोचल्यावर आता हिला काय इतक्या रात्री सांगायचं म्हणून मी गप्प बसलो. पण रात्री झोप काही लागेना. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून वीणाने मला फक्त इतकंच विचारलं, गाडी नाही दिसत आहे पार्किंगमध्ये.. मी झालेला प्रकार तिला सांगितला. अशा वेळी जनरल रिअ‍ॅक्शन म्हणजे काय गरज होती इतक्या रात्री यायची, तुझंच लक्ष नसेल, वेंधळेपणाने फार रॅश ड्रायव्हिंगची सवय आहे त्यामुळे असं होणारच, किती मोठ्ठं नुकसान झालं अशी असते. पण त्यावेळी मात्र अशी प्रतिक्रिया अजिबात आली नाही. याउलट तुला काही झालं नाही ना.. चल आपण दोघे मिळून गॅरेजमध्ये जाऊ आणि त्यानंतर विमा कंपनीकडे जाऊया, प्राणापेक्षा काही महत्त्वाचं नाही असं वीणाने म्हटलं. हा प्रसंग खरोखरच कठीण होता. तो केवळ तिने म्हणूनच सांभाळून घेतला.
जवळचे मित्र-मैत्रिणी : माझा भाऊ नटराज, माझी पत्नी वीणा आणि माझी बहिण अमृता नातू
गायक नसतास तर : पाचव्या वर्षांपासून इंदिराबाई खाडिलकर, पणजोबा नाटय़ाचार्य खाडिलकर, माझी आई मंजुश्री खाडिलकर उत्तम कीर्तनकार आहे. त्यामुळे लहानपणापासून आजीच्या मैफिली, आईचं कीर्तन ऐकत आलोय. घरामध्ये मी पाहायचो तेव्हा सतत कुणाचा तरी रियाज सुरू आहे. आजीमुळे कोल्हापूर आणि सांगलीच्या घरात सतत मोठय़ा मंडळींचा राबता असायचा. भीमसेनजींपासून छोटा गंधर्व, रामदास कामत सर्व मोठ्ठी मंडळी मी लहानपणापासून पाहिली होती. या वातावरणानेच मला घडवलं. मी सातव्या-आठव्या वर्षांपासून भीमसेनजींसमोर बसून त्यांची गाणी गाऊन दाखवायचो त्यामुळे गायक म्हणून मी इतर कुठल्याही गोष्टीचा विचारच मी करू शकत नाही.
तुमच्या दोघांमध्ये कुठल्या कारणांवरून भांडण होतं : मी लवकर उठत नाही म्हणून.
वीणाचा आवडणारा गुण : ती खूप प्रेमळ आणि कुटुंबवत्सल आहे. पुण्याला आम्ही एकत्र राहात होतो तेव्हा माझ्या धाकटय़ा भावाला सकाळी उठून डबा करून देणं, अमृताचा कार्यक्रम आहे तर तिच्या कपडय़ाला इस्त्री करून देण्यापर्यंत सगळं केलं. शिवाय कार्यक्रमावरून आम्ही रात्री आल्यावर ती आम्हाला गरम पोळ्या रात्री एक किंवा दीड वाजता वाढत असे. तिला आम्ही अनेकदा म्हटलंही अगं आम्हाला याची सवय नाही.
कुठल्या विषयावर तुम्ही दोघे उत्तम चर्चा करू शकता.. : संगीतावर उत्तम चर्चा करू शकतो.
महाराष्ट्रातील आवडतं पर्यटनस्थळ आणि का.. :
कोकण. कारण आम्हाला समुद्र अतिशय आवडतो. पण तो समुद्र शांत आणि गर्दीमुक्त असेल तर अधिकच चांगलं.
तुम्ही मेड फॉर इच अदर आहात असं वाटतं का.. :
हो शंभर टक्के. क्षेत्र दोघांचं एक आलं योगायोगानं. माझी आई कीर्तनकार आणि वीणाचे वडील कीर्तनकार. आमचं अरेंज मॅरेज. दोन्ही घराण्यांचा घरोबा लग्नाआधीपासून होता. माझं प्रोफेशन काय आहे त्यातल्या काळावेळाची गणितं तिला माहीत आहेत. माझ्या ओळखीचे बरेच अभिनेते किंवा संगीत क्षेत्रातले मित्र आहेत ज्यांना सिद्ध करावं लागतं की, खरंच त्यांचं शूटिंग होतं, रेकॉर्डिग होतं. आमचा एक संगीतकार मित्र तर रात्री बायकोला रेकॉर्डिग स्टुडिओमधून मी आता रेकॉर्डिगच करतोय हे ऐकवतो. हे वीणाने खूप उत्तम समजावून घेतलंय.

वीणा खाडिलकर

जन्मतारीख : १ जानेवारी १९७४
लग्नाआधीचे नाव : वीणा नरहरी अपामार्जनी
शाळा : कोशिटवार दौलत खान विद्यालय, यवतमाळ
कॉलेज : श्रीमती वत्सलाबाई नाईक महाविद्यालय
शिक्षण : एम.ए. इन म्युझिक
फेवरिट टाइमपास : संगीत ऐकणं
फेवरिट फूड : चायनिज त्यातही खासकरून शेजवान नूडल्स.
फेवरिट आइस्क्रीम : मिक्स फ्लेवर आणि सीताफळ
लग्न कसं ठरलं : आमचं लग्न पुण्यातच १९९६ साली झालं. एकमेकांना दाखवण्याचा कार्यक्रम पंधरा मिनिटांचा झाला. या पंधरा मिनिटांमध्ये आमची भेट मात्र पाचच मिनिटांची. तेवढय़ात एकमेकांची पसंती दर्शवली. आमची पहिली भेट म्हणजेही एक किस्साच आहे. माझ्या सासूबाई उत्तम कीर्तनकार आहेत. वडील महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार आहेत. त्यामुळे कीर्तनाच्या निमित्ताने त्यांच्या सतत भेटीगाठी होत असायच्या. वडिलांमुळेच मला संगीताचं बाळकडू मिळालं. त्यांच्याबरोबर मी सतत असायचे. त्यांना साथ- संगत करायचे. शेंडेफळ म्हणून तेही मला सोबत ठेवायचे. त्यांच्या सहवासाने संगीताचे संस्कार माझ्यावर जास्त झाले. पेटीची साथ करणं, कीर्तन करणं या सर्व गोष्टी ओघाने आल्या. ज्या क्षणाला माझ्या वडिलांच्या मनात विचार आला की, वीणा आता बी.ए. होतेय, आता तिच्या लग्नाचं बघूया. त्यावेळी त्यांनी हा मानस जवळच्या कीर्तनकारांना बोलून दाखवला. त्यावेळी इतर म्हणाले, ‘‘अहो, मंजुश्रीताईंचा मुलगा, त्यागराज उत्तम गातो, तो बघा.’’ आम्ही त्या कीर्तनाच्या कार्यक्रमावरून घरी आलो तेव्हा पुण्यावरून एक पत्र आलं, ते होतं त्यागराज यांच्या घरून. माझ्या सासऱ्यांचं. आमचा यंदा त्यागराजच्या लग्नाचा विचार आहे. तेव्हा तुमची मुलगी त्याला एकदा बघायचीय. योग असा की, बाबांना पुढचं कीर्तन पुण्यातच होतं. मला नेहमीसारखी साथसंगत असावी म्हणून बाबा घेऊन गेले. मला काहीच कल्पना नव्हती. बाबांनी खाडिलकरांच्या घरी भेटायला नेलं, लगेच पसंती झाली आणि होकारही मिळाला.
त्यागराजने केलेला आवडता पदार्थ : फ्राइड भाज्या आणि पावभाजी
त्यागराज घरी असल्यावर कशात अधिक वेळ घालवतो : वाचन करण्यात. तो अक्षरश: पुस्तकांचा फडशा पाडतो.
त्यागराजची बायको म्हणून येणारा गमतीशीर अनुभव.. : मला भेटणारे अनेक जण म्हणतात की, तू त्यागराजची बहीण दिसतेस.
संसारातील काही अविस्मरणीय आठवणी :
त्यागराजने लग्नानंतर ‘वाऱ्यावरची वरात’ या नाटकात काम केलं होतं. सर्व मंगेशकर कुटुंबीय त्यावेळी तिथे आले होते. मोहन वाघ, राज ठाकरे, सर्व मंगेशकर भगिनी एकत्र होत्या. हृदयनाथजी होते. या सर्वानी दिलखुलास प्रतिसाद दिला होता. मी त्यागराजसाठी बॅकस्टेजला जी धावपळ करत होते, त्याला काय हवंय नको हे पाहत होते; त्यावरून या मंडळींनी मी त्यागराजची पत्नी आहे हे ओळखलं होतं. मी श्रोत्यांमध्ये बसायला जाणार इतक्यात त्यांनी मला त्यांच्या जवळ बसवले. तेव्हा माझ्या डोळ्यात अक्षरश: पाणी आलं. तिथे मी मनातूनच त्यांना साष्टांग नमस्कार घातलाच होता. हा सन्मान केवळ त्यागराजची पत्नी म्हणून मला मिळाला. त्याच्या परफॉर्मन्सला स्टॅण्डिंग ओव्हेशन मिळालं. हे सर्व पाहून खूप भरून आलं.
जवळचे मित्र-मैत्रिणी : शामल राजे.
त्यागराजचा आवडणारा गुण : तो आपला परफॉर्मन्स अत्यंत उत्तम व्हावा म्हणून खूप प्रयत्न करत असतो. त्यात अधिकाधिक नावीन्य यावं याकरता खूप अभ्यासही करतो.
त्यागराजने कुठली सवय बदलायला हवी असं तुम्हाला वाटतं : त्याने लवकर उठायला हवं असं मला वाटतं.
महाराष्ट्रातील आवडतं पर्यटनस्थळ : कोकणातलं गुहागर..

संकलन : प्रभा कुडके
prabha.kudke@expressindia.com