१४ जानेवारी २०११
कालगणना

रविंद्र द. खडपेकर
१५ ऑक्टोबरच्या ‘लोकप्रभा’त ‘अयने आणि ऋतू’ या लेखात आपण भारतीयांनी आपली विज्ञाननिष्ठ ‘कालगणना’ सोडून दिली याची खंत व्यक्त केलेली आहे. परंतु ती कालगणना पुनरु ज्जीवित करण्याचा प्रयत्न भारताचे पहिले पंतप्रधान स्व. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याकडून कळत, नकळत झालेला होता. आणि अगदी कायद्याने ती पद्धत आज आपल्या भारतात अस्तित्वात आहे. हे कसे?

भारतांत निरनिराळ्या कालगणना चालू होत्या आणि आहेत. इंग्रजी जानेवारी ते डिसेंबर महिन्यांची आपणा सर्वाना माहिती आहे. चंद्राच्या कलांवर (आकारावर) अवलंबून असलेली चैत्र ते फाल्गुन महिन्यांची पद्धतही ठाऊक आहे. आपण आपले सणवार त्याचप्रमाणे साजरे करतो. पण या पद्धतीतही अनेक तऱ्हा आहेत. महाराष्ट्रात आणि दक्षिणेकडे बरेच जण वर्षांरंभ चैत्र शुद्ध प्रतिप्रदा (गुढीपाडवा) मानतात. याला शालिवाहन शकवर्ष म्हणतात तर विंध्याच्या पलीकडे उत्तरेत बरेच जण उज्जनचा राजा विक्रमादित्य याचे संवत्सर वर्ष मानतात. तो वर्षांरंभ कार्तिक प्रतिपदा म्हणजेच बलिप्रतिपदा अथवा दिवाळीचा पाडवा या दिवसापासून असतो. चंद्राचे महिने आपल्याकडे अमावास्या ते अमावास्या असे मोजतात. तर उत्तरेत पोर्णिमा ते पोर्णिमा असे मोजतात. नेहरूंना असे वाटले की संपूर्ण भारतासाठी कालगणनेची कुठली तरी एकच पद्धत हवी. त्यासाठी मग त्यांनी डॉ. मेघनाद साहा सिमिती स्थापन केली.
या समितीने असे ठरवले की, आकाशांत वसंतसंपात (vernal equinox) झाला की त्यानंतरच्या दिवसापासून वर्षांचा आरंभ करायचा. आता वसंतसंपात म्हणजे काय?
‘आकाशात उत्तरायणांत नांदीवृत्त व क्रांतीवृत्त एकमेकांना छेदतात ती जागा’.. कळले का काही? ही खगोलशास्त्राची भाषा सोडून देऊ. साध्या, सोप्या, व्यवहारी भाषेत समजावून घेऊ.
(१) पृथ्वी सूर्याभोवती फिरत असताना तिचा उत्तर ध्रुव सूर्यापासून जास्तीत जास्त दूर असतो ती उत्तरायण आरंभाची जागा.
आकृतीत सूर्याभोवती पृथ्वी फिरताना दाखवली आहे त्याचवेळी पृथ्वी स्वत:भोवतीही फिरत असते. तिचे हे दोन्ही प्रकारचे फिरणे पश्चिम-पूर्व या दिशेने असते. त्या दिशा बाणांच्या टोकांनी स्पष्ट केलेल्या आहेत. (अ) स्वत:भोवती फिरते त्याला परिवलन म्हणतात. त्यामुळे दिन व रात्र निर्माण होतात. जी बाजू सूर्याकडे असते तिकडे दिन आणि उलट बाजूला रात्र. रात्र कुठे असेल ते आकृतीत काळ्या रंगाने दाखवलेले आहे. (आ) पृथ्वी सूर्याभोवती फिरते त्याला परिभ्रमण म्हणतात. असे फिरताना तिचा आस कायम तिरका असतो. एकाच दिशेने. तो दिशा बदलत नाही.
आकृतीत डावीकडे पृथ्वी आहे ती उत्तरायण आरंभाची जागा. कारण तिथे उत्तर ध्रुव सूर्यापासून जास्तीत जास्त दूर आहे. या स्थितीत तुम्हाला असेही दिसेल की मकरवृत्त (tropic of capricorn) सूर्याला जास्तीत जास्त जवळ आहे. म्हणजेच सूर्य तेव्हा मकरवृत्तावर आहे. या आकृतीत पृथ्वीवर मध्ये आडव्या तीन रेघा आहेत. त्यातली मधली सर्वात मोठी म्हणजे विषुववृत्त (equator). त्याच्या उत्तरेला दिसते ते कर्कवृत्त (vtropic of cancer) आणि दक्षिणेला आहे ते मकरवृत्त.
या उत्तरायण आरंभाच्या ठिकाणापासून पुढे पृथ्वी सूर्याभोवती बाणांच्या टोकाच्या दिशने जात राहील. आणि ती अगदी उलट बाजूला म्हणजे आकृतीत उजवीकडे येईल. तेव्हा तुम्हाला काय झालेले दिसते. तर पृथ्वीचा उत्तर ध्रुव जो सूर्याकडून जास्तीत जास्त दूर होता. तो आता सूर्यापासून जास्तीत जास्त जवळ आहे. असे का झाले. आसाने आपल्या तिरकेपणाची दिशा बदललेली नाही म्हणून. पृथ्वीने जागा बदलली. पण आसाने आपला तिरकेपणा त्याच दिशेने किंवा त्याच कोनात कायम ठेवलेला आहे. म्हणून या नव्या ठिकाणी (आकृतीत उजवीकडे) सूर्य कर्कवृत्तावर पोहोचलेला आहे. म्हणजेच दरम्यानच्या काळांत त्याने मकरवृत्त ते कर्कवृत्त असा दक्षिणेकडून उत्तरेकडे प्रवास केला. हेच सूर्याचे उत्तरायण अथवा उत्तर दिशेला जाणे. इथे हेही लक्षात येईल की सूर्य हललेलाच नाही. पृथ्वी तिरक्या आसाने पुढे जाते म्हणून सूर्य दक्षिणेकडून उत्तरेला जातो असे आपल्याला दिसते.
(२) आता सूर्याचे मकरवृत्ताकडून कर्कवृत्ताकडे उत्तरायण होत असतांना तो मधे कधीतरी विषुववृत्तावर येणारच. तो जिथे कुठे आकाशांत विषुववृत्ताच्या बरोबर येतो तीच वसंतसंपाताची जागा. वसंतसंपात असा आकाशात घडतो. संस्कृतमध्ये ‘संपात’ म्हणजे येऊन पोहोचणे. इथे सूर्य विषुववृत्तावर येऊन पोहोचतो. ज्यावेळी हे घडते तो वसंतसंपताचा दिवस. त्याच्या दुसऱ्या दिवसापासून शासनाने वर्षांचा आरंभ मानला. आकृतीत पृथ्वीची ही जागा खालच्या बाजूला दाखविली आहे. तिथे पृथ्वी आली की आकाशात वसंतसंपात घडतो.
या जागेची वैशिष्टय़े काय? (अ) पृथ्वीचे उत्तर व दक्षिण दोन्ही ध्रुव सूर्यापासून सारख्या अंतरावर असतात. (अ) सूर्य नेमक्या पूर्वेला म्हणजे विषुववृत्तावर उगवतो. तो कर्कवृत्ताकडे किंवा मकरवृत्ताकडे झुकलेला नसतो. (इ) दिन व रात्र संपूर्ण पृथ्वीवर समान काळांची असतात. आपल्याकडे १२-१२ तास. ध्रुवावर ६-६ महिने. (ई) सूर्याचे उत्तरायण चालूच असते. अगदी नेमके नाही. पण जवळजवळ अर्धे उत्तरायण होऊन होऊन गेलेले असते. आणि अर्धे अजून व्हायचे असते. (उ) हा दिवस म्हणजे वसंत ऋतूचा मध्यदिवस. याच्या आधीचा एक सौर महिना व नंतरचा एक सौर महिना असादोन सौर महिन्यांचा वसंत ऋतू असतो. (सौर महिना म्हणजे काय ते महिना म्हणजे काय ते आपण समजून घेणार आहोत.) वसंतऋतूतला सूर्य संपाती (विषुववृत्तावर) येण्याचा दिवस तो वसंतसंपात. असाच संपात सूर्य दक्षिणायनात असताना म्हणजे उलट कर्कवृत्ताकडून मकरवृत्ताकडे जातानाही घडतो. त्याला शरदसंपात (Autumnal equinox) म्हणतात. तो शरद ऋतूचा मध्य. आकृतीत पृथ्वीची ती जागा वरच्या बाजूला दाखवलेली आहे.
सूर्य वसंतसंपाती येतो अशा ठिकाणी सुरु वात करून सूर्याला संपूर्ण प्रदक्षिणा घालून पृथ्वी पुन्हा वसंतसंपात होईल अशा ठिकाणी जेव्हा येते तेव्हा भारतीय शासनाच्या दृष्टीने १ वर्ष झाले. शासनाचे वर्ष हे वसंतसंपात, दक्षिणायन आरंभ, शरदसंपात, उत्तरायण आरंभ आणि पुन्हा वसंतसंपात अशा घटनांचे आहे.
सौर महिने
पृथ्वी सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करते तेव्हा ती त्याच्याभोवती ३६० अंशातून फिरलेली असते. वर्षांचे १२ महिने करायला ३६०/१२ केले की ३० येतात. तेव्हा सूर्याभोवती ३० अंश कोनातून फिरायला पृथ्वीला जेवढा वेळ लागतो तेवढा म्हणजे पहिला महिना. नंतरचे ३० अंश म्हणजे दुसरा महिना. याप्रमाणे महिने मोजायचे. मात्र या महिन्यांची नावे ठरवताना शासनाने घोटाळा केला. आपल्या परंपरेत चंद्राच्या महिन्यांची चैत्र, वैशाख वगैरे नावे चालत आलेली आहेत. तीच नावे शासनाने या महिन्यांना दिली. खरे तर या महिन्यांचा चंद्राशी काहीच संबंध नाही. हा फरक स्पष्ट करण्यासाठी शासनाने मग प्रत्येक नावाआधी सौर हा शब्द जोडला. सौर म्हणजे सूर्यावर अधारित महिने. तेव्हा या महिन्यांना सौर चैत्र, सौर वैशाख, सौर ज्येष्ठ असे म्हणत जायचे. या खटाटोपाला वेदकाळातील मधु, माधव इत्यादि नावेच वापरायला हवी होती. कारण ते महिने सूर्यावर आधारितच होते. ही पद्धत आपल्याकडे होतीच. फक्त महिन्यांची नावे निराळी होती. म्हणूनच मी लेखाच्या सुरुवातीला म्हटले आहे की, पंडित नेहरूंकडून कळत नकळत वैदिक कालगणना पुनरु ज्जीवित करण्याचा प्रयत्न झालेला होता.

सूर्य वसंतसंपाती येतो अशा ठिकाणी सुरु वात करून सूर्याला संपूर्ण प्रदक्षिणा घालून पृथ्वी पुन्हा वसंतसंपात होईल अशा ठिकाणी जेव्हा येते तेव्हा भारतीय शासनाच्या दृष्टीने एक वर्ष झाले. शासनाचे वर्ष हे वसंतसंपात, दक्षिणायन आरंभ, शरदसंपात, उत्तरायण आरंभ आणि पुन्हा वसंतसंपात अशा घटनांचे आहे.

बाजूच्या आकृतीत शासनाचे सौर महिने आणि वेदकाळातीलत्यांची मूळ नाते कोणती होती ते दाखवलेले आहे. कोणत्याऋतूत कोणते महिने येतात तेही स्पष्ट केलेले आहे. याच लेखात कोष्टक रूपानेही ते मांडलेले आहे. शासनाने आणखी एक फरक केलाय. सौर मार्गशीर्ष म्हणण्याऐवजी सौर अग्रहायण म्हटले आहे. ते का ते शासनालाच ठाऊक! जेव्हा अयन बदलते त्याआधीचा महिना (अग्र+अयन) या अर्थाने ते असावे.
दिवस
आकृतीत असे दिसेल की सूर्य पृथ्वीकक्षेच्या अगदी मधोमध नाही. थोडा बाजूला आहे. प्रत्यक्ष आकाशातही स्थिती तशीच आहे. त्यामुळे काय होते प्रत्येक महिना ३० अंश कोनाचा असला तरी त्यातले दिवस सारखे नसतात.
ज्या काळात पृथ्वी सूर्यापासून दूर असते त्या काळात मधोमध नाही. (अपसूर्य काळ) ३० अंश कोनातले पृथ्वीचे चालण्याचे अंतर वाढते. तर ती सूर्यापासून जवळ असते त्या काळात (उपसूर्य काळ) ते कमी असते. आकृतीत हे अगदी स्पष्ट दिसेल. सूर्याच्या दूर, जवळच्या गुरु त्वाकर्षणामुळे तिच्या गतीतही फरक पडतो आणि प्रत्येक महिन्याचे दिवस बदलतात. कोणत्या महिन्यात प्रत्यक्ष किती दिवस होतात ते बाजूच्या कोष्टकात आहे. व्यवहारात सोयीसाठी तो महिना जवळच्या पूर्ण दिवसांचा धरतात.

चांद्र महिन्यांची नावे सौर महिन्यांना दिल्यामुळे प्राचीन श्रेष्ठ विज्ञाननिष्ठ परंपरा, खगोल अभ्यासाची परंपरा सांभाळण्याचा, चालू ठेवल्याचा आनंद मिळेल. पण प्रथम आपण शासनाची उपलब्ध आहे, ती पद्धत वापरली पाहिजे.

शासनाच्या या पद्धतीत दिवस मध्यरात्र ते मध्यरात्र असा धरतात आणि ते सरळ १ ते ३०-३१ पर्यंत मोजतात. सौर वैशाख ते सौर भाद्रपद हे ५ महिने प्रत्येकी ३१ दिवसांचे आहेत. तर बाकीचे ३० या पद्धतीत २८-२८ दिवसांचा कोणताच महिना नाही. हे वर्ष वसंतसंपात ते वसंतसंपात असे असल्याने याला सांपातिक वर्ष म्हणतात. हे ३६५.२४२२ दिवसांचे असते. (३६५.२५६३ दिवसांचे नक्षत्रवर्ष वेगळे) सोयीसाठी दरवर्षी वरचे ०.२४२२ दिवस सोडून देतात. ३६५ दिवस पूर्ण झाले की नव्या वर्षांचा आरंभ करतात. आणि मग हे सोडलेले दिवस भरून काढण्यासाठी दर चौथ्या वर्षी सौर चैत्र महिना ३० दिवसांऐवजी ३१ दिवसांचा करतात. त्यामुळे प्रत्येक चौथे वर्ष ३६५ ऐवजी ३६६ दिवसांचे असते.
आजची स्थिती
शासनाने ही कालगणना २२ मार्च १९५७ पासून कार्यवाहीत आणली. म्हणजे काय केले तर प्रत्येक शासकीय पत्रकावर तेव्हापासून इंग्रजी इसवी सन दिनांकाबरोबर हा राष्ट्रीय सौर दिनांकसुद्धा छापला जाऊ लागला. (पण लोकांना याचा पत्ताच नाही.) आपणही बँकेच्या धनादेशावर (चेकवर) हा दिनांक लिहिला तरी चालते. (मी स्वत: लिहितो.) उदाहरणार्थ, २२-१०-२०१० ऐवजी राष्ट्रीय ३० अश्विन शके १९३२ असे लिहिले तरी पूर्णपणे कायदेशीर आहे. या कारणासाठी धनादेश नाकारता येणार नाही. (पाहा रिझव्‍‌र्ह बँक ऑफ इंडिया ग्राहक सेवा पुस्तिका १-०७-२००९ पृष्ठ १२ व १५.)
१९५७ हे वर्ष हे खरे तर शासकीय कालगणनेचे पहिले वर्ष होते. परंतु २२ मार्च १९५७ या दिवसाला सौर चैत्र शके १८७९ असे म्हटले, कारण तेव्हा शालिवाहन शके १९८९ चालू होते. महाराष्ट्रातील पैठणच्या शालिवाहन शके दिल्लीच्या केंद्र शासनाने अधिकृतपणे कायदेशीरपणे घटनात्मक स्वीकारलेला आहे. ही कालगणना तयार करायला डॉ. मेघनाद साहा समिती गठीत झाली. या समितीतील सात सदस्यांपैकी तीन सदस्य मराठी भाषिक होते. तेव्हा ज्या मोठय़ा सभा व्हायच्या तेव्हा त्याला साठ ते सत्तर टक्के उपस्थिती ही मराठी पंचांगकर्त्यांची व ज्योतिष अभ्यासकांची होती. ही पूर्णपणे भारतीय स्वदेशी कालगणना पद्धत होती. आपल्याच शास्त्रज्ञांनी बनवलेली. आपण वापरत नाही हे दु:ख आहे! अशी स्थिती व्हायला शासनही जबाबदार आहे. जशी जुनी नाणी, वजन मापे बंद केली तशी इसवीसन पद्धत बंद करायला हवी होती. मग ही पद्धत आपोआप प्रचारात आली असती. चांद्र महिन्याची नावे या सौर महिन्यांना दिल्यामुळेही प्राचीन श्रेष्ठ विज्ञाननिष्ठ परंपरा, खगोल अभ्यासाची परंपरा सांभाळण्याचा, चालू ठेवल्याचा आनंद मिळेल. पण प्रथम आपण शासनाची उपलब्ध आहे, ती पद्धत वापरायला लागले पाहिजे. महिन्याची नावे नंतर कधीही बदलता येतील. सगळ्याच बाबतीत सवयी बदलणे महत्त्वाचे. रेल आरक्षणावरचे फॉम्र्स (हिंदी किंवा मराठी) लिपीत असतात. पण लोक इंग्रजीत भरतात. धनादेशही देवनागरीत असतात. लोक इंग्रजीत लिहितात. अशा गोष्टींना शासन काय करणार? जनतेने स्वत:ला बदलण्याची इच्छा पाहिजे.
राष्ट्रीय कालगणनेची माहिती मराठी विज्ञान परिषद, ठाणे विभाग दूरभाष (०२२)२५३३१२१२ येथे संध्याकाळी ४ ते ७ वाजेपर्यंत उपलब्ध आहे.
lokprabha@expressindia.com