३१ डिसेंबर २०१०
श्रीमान श्रीमती

‘मी माझा’ या चारोळ्यांनी अवघ्या तरुणाईला वेड लावणारा चंद्रशेखर गोखले आणि उमा गोखले सांगताहेत त्यांच्या सुखी संसाराची गुपितं..
चंद्रशेखर गोखले
जन्मतारीख- ८ जानेवारी १९६२
लग्नाचा वाढदिवस कसा साजरा करता- २३ डिसेंबर ही तारीख म्हणजे आम्हा दोघांसाठी हँगआऊटचा दिवस असतो. आम्ही नाटक पाहतो, देवळात जातो आणि मस्तपैकी गप्पा मारत जेवणावर आडवा हात मारतो. यादिवशी आम्ही शक्यतो बाहेरच्या कुणाला भेटत नाही. तो दिवस फक्त आमचा आणि फक्त आमचाच असतो.
शाळेचं नाव- पार्ले टिळक विद्यालय
कॉलेज- जे जे स्कूल ऑफ आर्टस्
शिक्षण- पूर्ण नाही केलं.
पेट नेम- ओळखीचे लोक मला चंगो म्हणतात. पण अगदी जवळचे लोक मला चंदू म्हणतात.
पहिली कमाई- मी मॉडेल कोऑर्डिनेटर होतो. विक्स वेपोरबची जाहिरात होती, त्यात माझे दोन मॉडेल सिलेक्ट झाले होते. ती माझी पहिली कमाई म्हणजे साधारण दीड ते दोन हजार रुपये होती. २६ वर्षांपूर्वी दीड हजार खूप मोठी रक्कम होती माझ्यासाठी.
आवडता टाइमपास- फिश टँकमधील मासे पाहाणं.
ऑल टाइम फेवरिट फूड- आंबट वरण, भात आणि त्याबरोबर तळलेला बोंबिल.
फेवरिट आइस्क्रीम- व्हॅनिला आणि चोकोबार
उमाने केलेला फसलेला पदार्थ- उकड हा पदार्थ कोकणस्थ ब्राह्मणांची खासियत आहे. एकदा तिने उकड केली पण तो पदार्थ काही वेगळाच झाला होता.
उमाचा वाढदिवस लक्षात राहतो का- हो नक्कीच.. आणि त्यादिवशी पाच मिनिटं आधी तिला मी सर्वाच्या आधी विश करतो. त्याकरता घरातले फोन मी काढून बाजूला ठेवतो. म्हणजे इतर कुणी तिला फोन करायच्या आधी मी तिला विश केलेलं असतं.
उमाची आवड निवड कशी जपतोस- अगदी छोटं उदाहरण सांगतो की, उमाला तिच्या झोपण्याच्या गादीवर कुणी बसलेलं आवडत नाही. मी स्वत: तर हे कटाक्षाने पाळतोच, पण इतर कुणालाही गादीवर बसू देत नाही. मी टीव्ही पाहात असताना तिच्या आवडीची एखादी गझल लागली तर लगेच तिला आतून बोलावतो. या गोष्टी छोटय़ाशा असल्या तरी आमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत.
कठीण प्रसंगात उमाने दिलेली साथ एखादा अनुभव- जेव्हा आम्ही घराबाहेर पडलो तेव्हा आम्ही गोरेगावला गोकुळधाममध्ये राहायला होतो. तर त्यावेळी माझ्याकडे काहीच काम नव्हतं. त्यावेळी ‘मी माझा’ आणि ‘पुन्हा मी माझा’ या दोन पुस्तकाचं प्रकाशन झालं होतं. तेव्हा त्या पुस्तकांच्या रकमेवरच फक्त आमचं घर चालत होतं. त्याकाळात जवळपास एक वर्षभर उमाने तेलपोळ्या करून विकल्या होत्या.
जवळचे मित्र-मैत्रिणी- सर्वात जवळची मैत्रिण उमा. जिथे गप्पांना फुल स्टॉप मिळत नाही असे संध्या जयकर, आशीष सोमपुरा, शेखर पदे, निर्मिती सावंत, अरुण भडसावळे.
कवी नसतास तर- डान्सर झालो असतो. मी लहानपणी भरतनाटय़म शिकत होतो, त्यात मला गतीही होती. पण ते पुढे मात्र मला सुरू ठेवता आलं नाही.
तुमच्या दोघांमध्ये कुठल्या कारणांवरून भांडण होतं- हिंदुत्वावरून. ती कट्टर हिंदुत्ववादी आहे. पण माझं म्हणणं केवळ एकच असतं की जगणं सर्वात महत्त्वाचं आहे एखाद्या धर्मापेक्षा.. यावरून आमच्यात अधेमधे नक्कीच भांडणं होतात. आम्ही हनिमूनलाही याच विषयावरून वाद घातला होता.
उमाचा मूड बिघडलाय हे कसं ओळखतोस- एकदम गप्प होते. आपल्याकडे मराठीत एक वाक्प्रचार आहे ‘तिचा नाक डोळा बोलतो’ अशी तिची अवस्था त्यावेळी असते.
टीव्ही पाहताना रिमोट कुणाच्या हाती असतो.. मी टीव्ही जास्त पाहातच नाही.
उमाचा आवडणारा गुण- ती खूप प्रामाणिक आहे.
कुठल्या विषयावर तुम्ही दोघे उत्तम चर्चा करु शकता- मराठी साहित्यावर. आजच्या घडीला आमच्याकडे २ हजारांच्यावर पुस्तकं आहेत. यातली काही पुस्तकांची तर आम्ही दोघांनी मिळून अक्षरश: पारायणं केली आहेत.
उमा कधी टोमणे मारते का- अजिबात नाही. तिला खणखणीत बोलायची सवय आहे. कुणालाही आणि कुठेही..

उमा गोखले
जन्मतारीख- ५ सप्टेंबर ६४
लग्नाआधीचे नाव- नीना सुधाकर चिटणीस
शाळा- बालमोहन विद्यामंदीर, डी.एस. हायस्कूल
कॉलेज- एसआईएस
शिक्षण- बीए
पेट नेम- नाही काहीच नाही.. माझं नावच इतकं छोटं आहे अजून काय त्याला लहान करणार..
फेवरिट टाइमपास- गाणी ऐकणं, वाचन करणं, गूळ शेंगदाणे वाटीत घेऊन खाणं.
फेवरिट फूड- मासे खाणं
फेवरिट आइस्क्रीम- मी आइस्क्रीमपासून गेली कित्येक र्वष लांबच आहे. कारण मी गाते.
लग्न कसं ठरलं- मिलिंद इंगळे हा आमच्या दोघांचा कॉमन मित्र. त्याच्याच घरी मी शेखरला पहिल्यांदा पाहिलं. पाहता क्षणीच मला हा आवडला होता. झाडावरून प्राजक्त ओघळतो.. ही चारोळी मी वाचली होती. इतक्या सुंदर भावना मांडणारा हा मनानेही तितकाच स्वच्छ असणार असं मला वाटलं. त्याने मात्र लग्न न करण्यासाठी अनेक कारणं सांगायला सुरुवात केली. मी मात्र याचा पिच्छाच सोडला नाही. त्या वेळी त्याचा केवळ ‘मी माझा’ हा चारोळीसंग्रह आला होता. तो सेटल नव्हता म्हणून तो लग्न करण्याची तयारी दाखवत नव्हता.
शेखरला सरप्राईज गिफ्ट देतेस का- छे छे.. त्याला मासे खाऊ घाला तो केव्हाही खायला तयार. नाही तर हॉटेलात जेवायला न्या. हेच त्याच्यासाठी खूप असतं.
शेखरचा मूड बिघडलाय कशावरून ओळखतेस- बापरे बाप! त्याचे डोळे बोलतात की..
शेखरने केलेला आवडता पदार्थ- तो काहीच करत नाही. चहाशिवाय त्याला कुठलाही पदार्थ करता येत नाही.
शेखर घरी असल्यावर कशात अधिक वेळ घालवतो- लेखन आणि देवाचं नामस्मरण. आध्यात्मिक गोष्टींमध्ये तो पूर्वीपासूनच खूप रमतो. त्याशिवाय डिस्कव्हरी चॅनेल बघणं आणि फिश टँकमधील मासे एकटक पाहात बसणे..
शेखरची बायको म्हणून येणारा गमतीशीर अनुभव- मला ज्या वेळेस भेटला तो, त्या वेळेस त्याची ‘मी माझा’ची ३० हजार पुस्तकं विकली गेली होती. त्यानंतर मला त्याचे फॅन्स किती आहेत याची कल्पना येऊ लागली. लग्नाआधी आम्ही एकमेकांना भेटू शकायचो नाही इतके त्याचे फॅन्स गराडा घालायचे. आमचं लग्न ठरल्यावर अनेक मुलींनी माझ्या घरी फोन करून विचारलं होतं की, खरंच तुमच्या मुलीशी चंद्रशेखरचं लग्न ठरलंय का.. ती काय करते, कशी दिसते..
संसारातील काही अविस्मरणीय आठवणी- खूप आहेत. माझ्या पाठीशी तो प्रत्येक ठिकाणी उभा राहिला. आम्ही घर सोडलं त्या वेळी माझ्यामुळे आम्ही वेगळं झालोय, हे कधीही त्याने जाणवू दिलं नाही. तू रोजचा स्वयंपाक नाही केलास तरी चालेल पण तुझा रियाज मात्र व्हायला हवा, असं तो सांगायचा. मी अॅक्टिंग क्षेत्रात यावं म्हणून त्याने कायम मला प्रोत्साहन दिलंय. मधला एक काळ असा होता की, दिवसातले २४ तास आम्ही एकमेकांसमोर केवळ बसून होतो. आम्हा दोघांकडे काहीच काम नव्हतं. पण या काळात आमच्या तोंडून कधीही आलं नाही की, उगाचच तुझ्याशी लग्न केलं वगैरे वगैरे..
जवळचे मित्र-मैत्रिणी- आम्हीच एकमेकांचे जवळचे मित्र आहोत. मधला काळ असा होता की, आम्हाला मित्र किंवा मैत्रिणी करणं हे परवडणारंच नव्हतं. माझी आई माझी व शेखरची जवळची मैत्रीण आहे आणि संध्याताई जयकर.
शेखरचा आवडणारा गुण- अत्यंत स्वच्छ माणूस आहे तो. प्रसिद्धीच्या शिखरावर होता तेव्हा तो भर कार्यक्रमात सांगायचा की, शाळेत मी ढ होतो. मला शिक्षक बैलोबा बोलायचे. मला असं वाटतं की, हे सांगायलाही धैर्य लागतं. त्याकरता स्वच्छ मनच हवं. त्या वेळी मी त्याला बोलायचेही तू असं का सांगतोस. त्यावर तो म्हणायचा, अगं माझ्यासारखी मुलं असतीलच ना.. त्यांना असं कधीही वाटायला नको की आपण मागे राहू.
त्याच्याशी भांडतेस तर कशावरून- भरपूर.. कशावरूनही.. त्यासाठी कुठलंही एक कारण नाही. सुरुवातीला अगदी लग्न ठरल्यावरही काही कुरबुरी व्हायच्या पण त्या वेळी मी त्याच्याशी भांडायला घाबरायचे. शेवटी एक दिवस तो मला म्हणाला, अगं भांड मी तुला सोडून कुठेही जात नाही.. मग तर काय मी भांडायला तत्परच झाले.
तुम्ही मेड फॉर इच अदर आहात असं वाटतं का- नक्कीच. पण मला आतून स्वत:ला असं कायम वाटतं की शेखरची योग्यता खूप मोठ्ठी आहे. मी त्याच्या योग्यतेची नक्कीच नाही. अर्थात असं असूनही आम्हा दोघांना एकमेकांशिवाय कुणीच सहन करू शकणार नाही. पैसा नव्हता, काम नव्हतं, लोकांच्या रोखलेल्या नजरा, त्याच्या चेहऱ्यावरचे प्रश्नचिन्ह, आम्ही न केलेल्या गुन्ह्यांची उत्तरं द्यावी लागायची. पण देवाची कृपा आम्ही एकमेकांनी हार मानली नाही. यामुळेच नातं अधिक स्ट्राँग झालं.