१७ डिसेंबर २०१०
श्रीमान श्रीमती

आदेश बांदेकर

जन्मतारीख : १८ जानेवारी
लग्नाचा वाढदिवस : १४ नोव्हेंबर
शाळेचं नाव : शिवाजी विद्यालय, अभ्युदय नगर
कॉलेज : रुपारेल महाविद्यालय
शिक्षण : बी.कॉम.
पेट नेम : काहीच नाही.
पहिली कमाई : वय वर्ष १५ असताना अभ्युदय नगरमध्ये मिरवणुकीत ढोल वाजवला होता. त्याचे मला चक्क पंधरा किंवा अठरा रुपये मिळाले होते. त्या पंधरा रुपयांचं मोलच काही वेगळं होतं. आता या पैशाने मी माझ्या चुलत बहिणींना किंवा भावंडांना काहीतरी गिफ्ट देऊ शकेन हाच आनंद माझ्यासाठी खूप महत्त्वाचा होता.
आवडता टाइमपास : सोहम आणि सुचित्राबरोबर वेळ घालवणे.
ऑल टाइम फेवरिट फूड : समोर येईल ते सर्व.. पण सर्वात फेवरिट म्हणजे वडा पाव.
फेवरिट आइस्क्रीम : नॅचरल्सचं कुठलंही
सुचित्राने केलेला फसलेला पदार्थ ?
अमेरिकन चॉप्सी.. चॉप्सीसाठी लागणारी सर्व तयारी तिने केली होती. तितक्यात मी घरी आलो. त्या वेळी मी चित्रपटाची तिकिटं काढली होती. आमच्याजवळ केवळ पंधरा मिनिटं होती. मी तिला म्हटलं हे जे सर्व कापून ठेवलंयस ते सर्व एकत्र टोपात घाल आणि शिजव. तिने ते तसं केलं आणि त्या पदार्थाची खरोखरच माती झाली होती.
सुचित्राचा वाढदिवस लक्षात राहतो का ?
हो नक्कीच. न चुकता लक्षात राहतो.
सुचित्राची आवड-निवड कशी जपतोस ?
मी काहीच करत नाही फक्त गप्प बसतो.
कठीण प्रसंगात सुचित्राने दिलेली साथ-एखादा अनुभव : सुचित्राने माझ्याकडे काही नसताना मला हो म्हटलं हीच खरंतर माझ्यासाठी मोठ्ठी गोष्ट होती. मुख्य म्हणजे संसारात असे प्रसंग अनेकदा आले की ते खरोखर कठीण होते, त्या वेळी सुचित्रा माझ्या कायम बरोबर होती. तिने खंबीर साथ दिलेली आहे. कुठलीही गोष्ट असो किंवा व्यवसाय असो त्यावेळी खिशात काही नव्हतं; पण तू कर हे असं तिने कायम सांगितलं. आता कुणाकडे बघावं ही वेळ आल्यावर सुचित्रा कायम माझ्याबरोबर असते. कधीही तू हे करू नको, तुला जमणार नाही, असं तिने कधीच केलं नाही. ती कायम मला प्रोत्साहन देत होती आणि ते अगदी आजतागायत कायम आहे.
जवळचे मित्र : सोहम माझा मुलगा आणि माझ्या कठीण प्रसंगात ज्यांनी मला मोलाची साथ दिली ते सर्व. माझा लाडका पग.. सिम्बा. कुठल्याही गोष्टीची अपेक्षा नसलेला हा एक मुका प्राणीही माझा मित्र आहे.
कलाकार नसतास तर..?
..बृहन्मुंबईच्या भाभा हॉस्पिटलमध्ये केस पेपर तयार करत असतो. प्रमोशन नक्कीच झालं असतं पण तिथेच असतो.
तुमच्या दोघांमध्ये कुठल्या कारणांवरून भांडण होतं?
वेळ न देण्यावरून बऱ्याचदा. मी सगळ्यांच्या बाबतीत वेळा पाळतो पण त्यांच्या बाबतीत पाळत नाही म्हणून भांडणं होतात.
सुचित्राचा मूड बिघडलाय हे कसं ओळखतोस?
चेहरा आणि आवाज. एरव्ही फोन जरी आला किंवा केला तरी बोल रे बाबा असं बोलते. पण मूड बिघडल्यावर मात्र हा बोल.. किंवा बोल रे.. त्या वेळी बाबा वगैरे काहीच नसतं. हा आवाजच सर्व काही सांगतो.
टीव्ही पाहताना रिमोट कुणाच्या हाती असतो?
सोहमच्या, म्हणजे माझ्या मुलाच्या.
सुचित्राचा आवडणारा गुण : स्पष्टवक्तेपणा. आणि हाच अतिस्पष्टवक्तेपणा तिचा दोषही आहे.
कुठल्या विषयावर तुम्ही दोघे उत्तम चर्चा करू शकता?
अनेक विषय आहेत त्यावर आम्ही तिघे उत्तम चर्चा करू शकतो. एखाद्या चित्रपटावरून काय बोध घेतला इथपासून ते खूप विषयांवर आम्ही उत्तम चर्चा करू शकतो.
सुचित्रा कधी टोमणे मारते का?
छे.. टोमणे मारणं हे तिच्या स्वभावतच नाही. जे काही असेल ते अगदी डायरेक्ट बोलणं..

सुचित्रा बांदेकर

जन्मतारीख : १० ऑक्टोबर
लग्नाआधीचे नाव : सुचित्रा गुडेकर
शाळा : बालमोहन विद्यामंदिर
कॉलेज : रुपारेल महाविद्यालय
शिक्षण : बी.ए.
पेट नेम : चित्रा म्हणतात काहीजण.. बाकी तसं काहीच नाही.
फेवरिट टाइमपास : झोपणं..
फेवरिट फूड : फिश
फेवरिट आइस्क्रीम : नॅचरल्सचं कुठलंही..
लग्न कसं ठरलं ?
आम्ही पळून जाऊन लग्न केलं.. आमचं लग्न म्हणजे एक मोठ्ठी स्टोरी आहे. माझ्या घरी आमचं प्रेमप्रकरण पसंत नव्हतं. याचं मुख्य कारण म्हणजे त्या वेळी आदेश काहीच करत नव्हता. त्यामुळे आम्ही पळून जाण्याचा निर्णय घेतला. क्लासच्या निमित्ताने घराबाहेर पडून मी आदेशला बांद्रा कोर्टात भेटले, तिथे लग्न केलं आणि घरी कळवलं.. त्यानंतर मात्र जे काही झालं ते न सांगितलेलंच बरं.. आमच्या लग्नाचा खर्च म्हणजे निव्वळ ५० रुपये होता.
आदेशला सरप्राईज गिफ्ट देतेस का ?
सरप्राईज गिफ्ट नाही, पण एकदा मी आणि माझ्या घरातल्यांनी मिळून त्याला सरप्राईज वाढदिवसाची पार्टी मात्र दिली होती. त्याच्या वाढदिवशी आम्ही संध्याकाळी जेवायला म्हणून घराबाहेर पडलो. मुलुंडच्याच बाजूला जेवायला जाऊया असं मी त्याला सांगितलं. मुलुंडला पोहोचल्यावर माझ्या जावेचा आदेशला फोन आला, फोन आल्यावर ती केवळ इतकंच म्हणाली, अरे शारंग कॉलेजमधून काहीतरी मारामारी करून आलाय तू पटकन घरी ये.. असं म्हटल्यावर आदेश आणि आम्ही सर्व ठाण्यात दीरांच्या घरी गेलो. आमचा आधीच प्लान होता. तिथे माझे आई-वडील, आदेशचे आई-बाबा सगळे एकत्र जमले होते. ते बघून आदेश खरंच सरप्राइज्ड झाला.
आदेशचा मूड बिघडलाय कशावरून ओळखतेस ?
खूप अलिप्त राहतो..
आदेशने केलेला आवडता पदार्थ : खूप आहेत. तो कोलंबी भात आणि नूडल्स अतिशय उत्तम करतो. पण अलीकडे त्याला किचनमध्ये जायला वेळ नसतो. आदेशला घरचंच जेवण अधिक आवडत असल्यामुळे तो वरण भात किंवा बटाटय़ाच्या काचऱ्या यांसारखे पदार्थ घरात कुणी नसताना एकटय़ाने करून खातोही. त्याची एक अट मात्र असते की, किचनमध्ये कुणी यायचं नाही.
आदेश घरी असल्यावर कशात अधिक वेळ घालवतो : फोनवर बोलण्यात..
आदेशची बायको म्हणून येणारा गमतीशीर अनुभव : तुमचा नवरा आम्हाला खूप आवडतो, अहो तो तुम्हालाही घरात वहिनी म्हणतो का.. असं जेव्हा भेटणाऱ्या बायका म्हणतात ते खरंच गमतीशीर असतं. मी ‘वाऱ्यावरची वरात’ हे नाटक करत असताना ट्रेनमधून माझा अनेकदा प्रवास व्हायचा. संपदा जोगळेकर मला या नाटकाच्या वेळी ठाण्याला ट्रेनमध्ये भेटायची तिथून आम्ही पुढे जायचो. त्या वेळी आदेश आणि संपदा ‘ताक धिना धिन’ कार्यक्रम करत होते. एकदा एका बाईने आम्हाला दोघींना ट्रेनमध्ये पाहिल्यावर त्या संपदाकडे ताक धिना धिनची खूप स्तुती करायला लागल्या आणि त्यांनी शेवटचा प्रश्न संपदाला विचारला की, ते बांदेकर तुमचे मिस्टर का.. त्यावर संपदा केवळ इतकंच म्हणाली, ‘‘माझे नाही, पण हिचे आहेत..’’ त्यावर त्या बाईंचा चेहरा बघण्यासारखाच झाला होता.
संसारातील काही अविस्मरणीय आठवणी : २० वर्षांत खूप काही आठवणी आहेत. सुरुवातीला खूप स्ट्रगल केलं. माझं शूटींग वरळीला असायचं. पॅकअप खूप उशिरा व्हायचं. मग त्या वेळी आदेश न्यायला यायचा. बस बंद झालेल्या असल्या तर मी व आदेश वरळीहून काळाचौकीला चालत जायचो. लग्नानंतर स्टोव्हवर मला काम करावं लागत होतं. त्या वेळी आदेश केवळ म्हणायचा की, स्टोव्ह केवळ मी घरात असल्यावरच लावायचा. तो मला स्टोव्ह पेटवूच देत नसे. आज जेव्हा या सर्व गोष्टींकडे मागे वळून बघते तेव्हा असं वाटतं की त्या परिस्थितीवर मात केली म्हणूनच आज हे खूप चांगले दिवस आलेत.
जवळचे मित्र-मैत्रिणी : क्षिती जोग, ऐश्वर्या नारकर, दीपाली विचारे
आदेशचा आवडणारा गुण : सतत हसरा असतो.
त्याच्याशी भांडतेस तर कशावरून ?
घरात तो अस्ताव्यस्त वागतो. पूर्वी हे आवडायचं नाही मात्र आता सवयीचं झालंय हे. आता आमचं भांडण होतं तर ते केवळ तो पुरेसा वेळ देत नाही म्हणून.
तुम्ही मेड फॉर इच अदर आहात असं वाटतं का ?
हो नक्कीच. स्ट्रगलच्या काळात आम्ही एकमेकांना कायम कॉम्प्लिमेंटरी वागलोय. त्या काळात दोघंही एकमेकांना सांभाळून घेत होतो. तेव्हा जर तुला हवं तसं तू वाग, मला हवं तसं मी वागेन असं आम्ही केलं असतं तर आम्ही कधीच यशस्वी झालो नसतो.

संकलन : प्रभा कुडके
prabha.kudke@expressindia.com