१७ सप्टेंबर २०१०

तथ्यांश
तथास्तु
पेच पेणच्या मूर्तीचा
शेगावी वसले मानवतेचे मंदिर
झावबावाडीतला गणपती
गणेशाची विविध रूपे
मोरया! आम्हा तुझा छंद
गावाकडचा गणपती!
नगरचे सुबक गणपती
आभूषणांची झळाळी
महिमा अष्टविनायकाचा
घरच्या घरी गणेशपूजन
आरतीची विकृती नको
पौष्टिक गोडवा
गणेशोत्सवात कुठे? काय??
आरोग्यासाठी अगरबत्ती
गणेशप्रिय एकवीस वनौषधींची ओळख
आला आला रे गणपती आला...
गौराई आली माहेरा...
२१ प्रकारचे मोदक
भविष्य
संपर्क
मागील अंक

आगमन!

वाहत्या रस्त्याला लागूनच कमानी उभारलेल्या. झगमगणाऱ्या दिव्यांच्या माळा पिंपळाच्या झाडापासून दिव्याच्या खांबापर्यंत सगळ्याच गोष्टींवर सोडलेल्या. इथूनच आत गल्ली शिरते, ती थेट देवाच्या पायाशीच संपते. तिथं काटकोनात वळायचं- ‘‘बाहेर जाण्याचा मार्ग!’’
लांब टोकाशी जाऊन त्यानं मांडवाकडे फायनल नजर टाकली. देवापर्यंत रांग नेणारे भक्कम बांबू लावून झाले होते. मोठमोठय़ा उजळदिव्यांच्या भोवती किडे घोंघावत होते. मोक्याच्या जागेवर उंच उभे पंखे ठेवलेले. भक्तांना उकडतं रांगेत, ही पंख्याची सूचना खास त्याची. समितीच्या बैठकीत त्यानं मोठय़ा हिरिरीने मांडलेली. बिस्लेरीचं बाटलीबंद पाणीदेखील भक्तांना फुकट पुरवावं, अशी त्याची इच्छा होती.
आठ-आठ, दहा-दहा तास भक्त उभे राहातात रांगेत. नवसाला पावणारा हा गणपती. गर्दी होणारच. रांगेत उभं राहून काही लोक चक्क बेशुद्ध पडतात, हे त्यानं बघितलं होतं. म्हणूनच ही पंखा नि पाण्याची सूचना! पंखे लागले. बाटलीबंद पाण्याचं काही जमू शकलं नाही..
एक समाधानी नजर टाकत तो आसपासच्या पोरांना म्हणाला, ‘‘चला!’’
मूर्ती आणायची होती. अठरा फुटी श्रींची मूर्ती. भव्य. दिव्य, मंगल. सिंदूरचर्चित. गणपती बाप्पा मोऽऽरया!! ट्रक आधीच पोहोचला होता गणपतीच्या कारखान्यात. लोखंडाच्या लोटगाडीवर मूर्ती थेट साकारायची. तीच लोटगाडी ट्रकनं ओढत मांडवात आणायची. विसर्जनाला त्याच लोटगाडीवर बाप्पा जाणार..
वाहतूक सांभाळत पावसापाण्यात मूर्ती आणणं कटकटीचं असलं तरी फार अवघड काम नाही. रात्री उशिरा मूर्ती आणली की प्रश्नच मिटला. वाहतुकीचाही खोळंबा नाही. विचार करत करतच तो कारखान्यात शिरला. पोरं तयारच होती. मूर्तीकाराला ठरलेली बिदागी, मंडळातर्फे शाल, श्रीफळ देऊन त्यानं मूर्तीची लोटगाडी ट्रकला जोडायची खूण केली. आणि ढोलताशांच्या कडकडाटातच मूर्ती तिथून हलली..
‘‘आस्ते रे बाबा!’’, ‘‘एऽऽ बाजूला व्हा रे!’’, ‘‘अरे, देवावरती मेणकापड घाला रे!’’ अशा शंभर सूचनांचा भडिमार करत तो पाऊस अंगावर घेत ट्रकवर चढला होता. कधी नव्हे, तो पावसानं तुफान झड उठवली होती.
सव्वा किलोमीटरचा रस्त्याचा भाग खड्डय़ांनी भरला आहे, हे त्याला आठवलं आणि तो हादरला. काहीही करून मूर्ती सहीसलामत मांडवात पोहोचली पाहिजे. ‘‘बाप्पा, तूच विघ्नहर्ता आहेस, सांभाळून घे!’’ मनातल्या मनात विनवण्या करत तो ट्रकभर मागेपुढे धावत होता.
चार तासाच्या काळजीकाटय़ाच्या प्रवासानंतर मंगलमूर्ती मांडवात विराजमान झाली. आणि त्यानं सुटकेचा निश्वास सोडत घर गाठलं.
मध्यरात्र उलटून गेली तरी घर जागं कसं, या विचारात तो आत आला. तापानं फणफणलेलं त्याचं पोर आत्ताच अॅम्बुलन्समध्ये घालून इस्पितळात नेल्याचं त्याच्या शेजाऱ्यानं सांगितलं.
‘‘अरे, मला मोबाइल करायचा ना!’’ तो चिडचिडून म्हणाला.
‘‘तुमचा पत्ता कुठे आहे दादा गेले दोन दिवस! तुम्ही गणपतीत रमलेले. सौंसाराचा ताप तुम्हाला कुटं लागतोय? आपल्या दारात गनपती येतोय, का मरीमाय, तुम्हाला कशाला दखल?’’ शेजाऱ्यानं टोमणा मारला. तो उगामुगा झाला. आपल्या दारी आगमन नेमकं कशाचं झालं आहे, हे त्याला कळेना. पायरीवर त्यानं बसकण मारली.
pravin.tokekar@expressindia.com