१७ सप्टेंबर २०१०

तथ्यांश
तथास्तु
पेच पेणच्या मूर्तीचा
शेगावी वसले मानवतेचे मंदिर
झावबावाडीतला गणपती
गणेशाची विविध रूपे
मोरया! आम्हा तुझा छंद
गावाकडचा गणपती!
नगरचे सुबक गणपती
आभूषणांची झळाळी
महिमा अष्टविनायकाचा
घरच्या घरी गणेशपूजन
आरतीची विकृती नको
पौष्टिक गोडवा
गणेशोत्सवात कुठे? काय??
आरोग्यासाठी अगरबत्ती
गणेशप्रिय एकवीस वनौषधींची ओळख
आला आला रे गणपती आला...
गौराई आली माहेरा...
२१ प्रकारचे मोदक
भविष्य
संपर्क
मागील अंक

||गणेश विशेष||

विवेक दिगंबर वैद्य
श्रीगजानन महाराज (शेगाव) यांच्या समाधी ग्रहणाला १२ सप्टेंबर रोजी शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. त्यांच्या हयातीत, त्यांच्याच समक्ष आणि त्यांनीच घालून दिलेल्या नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करीत संस्थानही आपल्या शंभर वर्षांचा हा गौरवशाली इतिहास श्रद्धा, सचोटी आणि सेवाकार्यातून जपतंय. त्या कार्याचीच ही वैशिष्टय़पूर्ण ओळख

तीर्थक्षेत्रे आजही इथल्या सश्रद्ध, भोळ्याभाबडय़ा भाविकांच्या धार्मिक मनोवृत्तीचा कानाकोपरा व्यापून उरल्याचे दिसून येते. िहदुस्थानच्या या पुण्यभूमीवर आपल्याला प्राचीन ते अर्वाचीन अशी अनेक देवालयं, अनेकविध संतश्रेष्ठांच्या कर्मभूमी तसंच कित्येक साधुसत्पुरुषांची समाधी मंदिरं दर्शनार्थीच्या गर्दीने व्यापून गेलेली दिसतात. मात्र या सर्वाच्या पाश्र्वभूमीवर आपल्या वेगळेपणाचा ठसा उमटविणारं आणि आपली स्वत:ची वैशिष्टय़पूर्ण ओळख प्रस्थापित करणारं एक अनोखं देवस्थान म्हणजे विदर्भातील प्रख्यात संतसत्पुरुष श्रीगजानन महाराज यांच्या वास्तव्यामुळे प्रसिद्धीस आलेलं बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथील श्रीगजानन महाराज संस्थान.
श्रीगजानन महाराजांचे समाधी दर्शन, तसंच पुढे येथे सेवाकार्य करण्याच्या निमित्ताने अनेकदा शेगाव येथे जाण्याचा योग आला. या कालावधीत श्रीगजानन महाराज संस्थान यांच्या कार्याचा आवाका, जडणघडण आणि प्रगती याविषयीच्या थक्क करणाऱ्या शेकडो गोष्टी दुरून पाहावयास मिळाल्या, आणि पुढे त्या जवळून अनुभवावयासदेखील मिळाल्या. संस्थानची उत्तरोत्तर प्रगती आणि विलक्षण जोमाने चालणारे सेवाकार्य पाहून मन थक्क झालं. याच दरम्यान अनेकदा अनेकविध तीर्थक्षेत्री जाणं झालं, राहणं झालं. तिथली मंदिरं, तिथला कारभार अगदी जवळून पाहता आला. तिथलं वातावरण पाहून मन गढुळलं. कारण प्रत्यक्ष परमेश्वराच्या दर्शनापेक्षाही लक्षात राहिली ती, तिथली बजबजपुरी, अनागोंदी कारभार, भ्रष्ट यंत्रणा आणि स्वार्थी, ऐतखाऊ माणसं. परमेश्वराला काळोख्या गाभाऱ्यात बंदिस्त करून बाहेर दिव्यांची आरास मांडणारी दांभिक पिलावळ पाहून मनास शिसारी आली. तिथली अस्वच्छता पाहिली आणि तिथला अध्यात्माचा बाजारही पाहिला. तेव्हा मनात सर्वप्रथम हाच विचार आला की हे सगळं शेगांवमध्ये कसं नाही? इतका भोंगळ कारभार आणि अनागोंदी शेगांवमध्ये मात्र पाहावयास मिळत नाही. याचं कारण काय असावं? इतकं स्वच्छ आणि पारदर्शक व्यवस्थापन राखणं, यांना कसं बरं जमतं? अचूक नियोजन, नि:स्वार्थ व्यवस्थापन, सक्षम यंत्रणा, सेवाभावी वृत्ती आणि अत्याधुनिक यंत्रणा यांची सांगड घालतानाच सेवा, श्रद्धा आणि समर्पण ही वृत्तीही कायम राखणं संस्थानच्या व्यवस्थापनाला कसं बरं जमतं?
तीर्थक्षेत्र परिसरात असलेला व्यावसायिक वावर, भिकाऱ्यांचा उबग आणणारा पाठलाग, फोटो, तसबिरी विकणारी लोचटपणे मागं मागं फिरणारी लहान मुलं, मुली, टांगावाले, खेळणीवाले, पेढे-बर्फीचे ठेले इथेही आहेत. मात्र गावच्या या परिसरातून मंदिराच्या आवारात प्रवेश केला की चित्र पार बदलून जातं. परिसरात सर्वत्र असलेला नीटनेटकेपणा, स्वच्छता लक्ष वेधून घेते. येथील सेवेकरी हाती झाडू घेऊन सतत आवार, िभती साफ करताना दिसतात. कुणा भक्तानं कचरा, टरफलं, घाण किंवा एखादी निरुपयोगी वस्तू इथे तिथे टाकली की हे सेवेकरी स्वयंस्फूर्तीने क्षणांतच तिथं हजर होतात आणि निमूटपणे तेथील जागा स्वच्छ, साफसूफ करतात. बरं, हे कामही अगदी शांतपणे, कुणाशीही हुज्जत न घालता, आरडाओरड न करता चालतं. ही सेवेकरी मंडळी कुणा भक्ताच्या अंगावर धावून जाताना, उर्मटपणे वागतांना मी गेल्या ३२ वर्षांत पाहिलं नाही आणि श्रींच्या कृपेने तसा योगही येणार नाही याची ठाम खात्री आहे. प्रश्न एवढाच आहे की या सेवेकऱ्यांच्या वृत्तीमध्ये इतकी स्थितप्रज्ञता कुठून येते? शांतचित्ताने अविरत सेवेचं हे अवघड व्रत सांभाळण्याचं तितकंच अवघड शिवधनुष्य यांना पेलवतं तरी कसं?
इथल्या सेवेकऱ्यांचं वैशिष्टय़ म्हणजे इथे कोणी कुणावर हुकूम सोडताना दिसत नाही. कुणी कुणाच्या अंगावर ओरडताना दिसत नाही. इथे कुणी कुणाला काम करण्याविषयी सूचक इशारे करतानाचे दृश्य दिसत नाही. सेवेकऱ्यांना ‘टोळकं’ करून गप्पा छाटताना पाहिल्याचे कधी स्मरत नाही. इथल्या सेवेकऱ्यांपैकी कधी कुणी, ‘महाराजांचे दर्शन घडवतो, दोन-पाच रुपये द्या’ असली लाचारी करताना, आशाळभूत अजिजी करताना पाहिलं नाही. निष्काम कर्मयोगाचा प्रत्यय देणारी, आत्मानंदाने तृप्त झालेली, गजाननबाबाच्या सेवेनेच संतोष पावलेली ही दोन-अडीच हजार माणसं छातीवर सेवेकऱ्याचा बिल्ला लागला की वेगळीच भासू लागतात. बाहेरच्या जगातील नोकरदार मंडळी ऑफिसमध्ये आठ ते पाच या वेळेत काम करताना, रीतसर पगार मिळत असतानादेखील जेव्हा कामामध्ये आळस करतात, सुट्टय़ा घेतात, कामचोरपणा करतात तेव्हा त्या पाश्र्वभूमीवर ही सेवेकरी मंडळी इतकं चांगलं आणि प्रामाणिकपणानं कसं वागू शकतात? असा प्रश्नही पडतो. चांगल्या, निरपेक्ष वृत्तीनं, सेवाभावानंदेखील या जगात वावरता येतं हेच त्यांना सुचवायचं आहे काय? हे संस्थान आपलं आहे, आपल्या महाराजांचं आहे या विषयीची पराकोटीची जागरूकता, प्रेम आणि आदर बाळगणारा इथला सेवाभावी वर्ग पाहिला की जगातलं आठवं आश्चर्य पाहिल्याप्रमाणे मन आश्चर्यचकित होतं. लहान मुलांपासून ते मोठय़ा, वयोवृद्ध सेवेकऱ्यांपर्यंतचा हा सद्आचरणाचा वारसा किती समृद्धपणे येथे नांदतोय हे पाहून मन धन्य होतं.
स्वच्छ परिसर, भव्य बांधकामे, नीटनेटक्या सुबक इमारती, साधी परंतु आकर्षक रंगसंगती, शिस्तीने लावलेली दुकाने, ओळीने येणारी हार-फुलांची विक्री केंद्रे अशा आखीव रेखीव रचनेकडे कुतूहलाने पाहात आपण श्रींच्या समाधीचे दर्शन घेण्यास निघतो, मात्र दर्शन घेण्याआधी आपल्याला जावं लागतं ते पादत्राणे विभागाकडे. आपापल्या चपला, बूट इथे जमा करायचे. तेही शिस्तीत, रांगेत, घाई गडबड नाही. सर्वात महत्त्वाचं म्हणजे वरती टांगलेला फलक ‘ही सेवा विनामूल्य आहे तरी सेवकांना पैसे देऊन संस्थानच्या नियमांचा भंग करू नये.’ शहरात आधुनिकीकरणाचं वारं अंगात मुरवलेल्या आपल्यासारख्या सुशिक्षित (?) लोकांना अडलेली कामं झटपट करवून घेण्यासाठी पैसे देण्यात काहीच गैर वाटत नाही. या पाश्र्वभूमीवर संस्थानचा रोखठोक इशारा अगदी सलामीलाच मनाला भिडतो तेव्हा खाडकन डोळे उघडतात आणि जाणवतं की इथलं पाणी काही औरच आहे. पैशाविषयी इतका निरिच्छ भाव आणि अलिप्तता यांच्या मनोवृत्तीत येते तरी कुठून येते? चार दिडक्या कमवण्यासाठी इमान विकणारी शे, सव्वाशे माणसं दररोज इथे तिथे भेटत असताना इथं पैशाला ठामपणे नकार देणारी, पैशाचं लांगूलचालन न करणारी, त्यामागं न धावणारी वृत्ती पाहिली की प्रश्न उभा राहतो की, ‘हे सगळं कसं काय बुवा जमतं या लोकांना?’

अलौकिक संत श्रीगजानन महाराज
श्रीगजानन महाराजांचे शेगाव येथील अवतारकार्य उण्यापुऱ्या ३२ वर्षांचे होते. या अवधीत त्यांनी अनेक लीला, चमत्कार केले. इतर संतचरित्रामध्ये उल्लेख केलेले चमत्कार उदा. मृत व्यक्तीस अथवा पशूस जिवंत करणे, आजारी वा मरणोन्मुख व्यक्तीस खडखडीत बरे करणे, विस्तवावाचून अग्नी प्रगट करणे, जल निर्माण करणे, शारीरिक आधी-व्याधी दूर करणे, विविध देवदेवतांच्या रूपात दर्शन देणे या व अशा अनेक चमत्कारांची पुनरावृत्ती श्रीगजानन महाराजांनीदेखील केली. हे चमत्कार तसे प्रत्येक संतांनी अनेकदा केलेले. मात्र महाराजांनी या चमत्कारापाठीमागची विचारधारा प्रकट करण्याचा आग्रह धरला हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील वैशिष्टय़ होते. विविध दैवतांची उपासना करणाऱ्या महाराजांनी धर्माचे अवडंबर न माजविता परमेश्वर हा एकच असल्याचा वारंवार प्रत्यय आणून दिला. त्यांच्या हयातीतच स्थापन झालेल्या संस्थानचे नियमही त्यांच्याच साक्षीने झाले. यामध्ये महाराजांच्या पायास अगर शरीराला हात लावू नये, मठामध्ये पाच दिवसांपेक्षा जास्त काळ कुणी राहू नये, महाराजांच्या पुढे जमणाऱ्या पैशास कुणी हात लावू नये, लोकांकडून दिली जाणारी देणगी विश्वस्ताच्या भावनेने पुन्हा लोककल्याणार्थ उपयोगात आणावी, द्रव्याचा संचय न करता त्यास समाजहितासाठी वापरावे यासारखे काही नियम अतिशय काटेकोरपणे ‘श्रीं’च्या समक्ष आखले गेले आणि त्याचे प्रत्यंतर आज करोडो भाविकांना येत आहे. पाणी तसेच अन्न वाया न घालविणे, संकटकाळी सर्वप्रथम आपल्या देशहिताचा, देशबंधूचा विचार करणे, देशातच राहून आपली विद्या देशवासीयांसाठी उपयोगात आणणे, देशाभिमान राखणे, धर्मामध्ये भेदभाव न बाळगणे, जातपात न मानणे, बुवाबाजीवर कठोर प्रहार, कोणत्याही संकटाचा बाऊ न करता त्याला सामोरे जाणे, दिन, दलित, पतीत आणि रोगी माणसांनादेखील समाजजीवनाच्या मुख्य प्रवाहात सामील करून घेणे ही महाराजांची मते काळाच्याही पुढची होती. अशा द्रष्टय़ा संतसत्पुरुषाचे कार्य व विचारप्रणाली लक्षात घेण्याऐवजी त्यांनी केलेल्या चमत्कारांचा उदोउदो करणारी पिढी जेव्हा महाराजांचे कालानुरूप विचार प्रत्यक्ष आचरणात आणतील तेव्हा त्यांच्यासाठी तीच खरी ‘आदरांजली’ असेल.

श्रीगजानन महाराजांच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठीच्या रांगेत उभं राहिलं की पुन्हा जाणवते तीच शिस्त, तोच आटोपशीरपणा. उत्सवाच्या वेळी हीच रांग काही किलोमीटर इतकी प्रचंड गर्दीने वाढते. तरीही शिस्त तीच. आटोपशीरपणाही तोच. दर्शनबारीमध्ये येऊन पोहोचताच मोठ्ठाले पंखे हवेचे झोत पसरवून वातावरण थंड करताना दिसतात. रांग हालती असली तरी जिथे थांबते तिथेच असलेल्या लोखंडी आसनांवर निवांतपणे श्रींचे नामस्मरण करीत बसता येते. प्रत्येक दोन रांगेनंतर थंड पाण्याची व्यवस्था केलेली दिसते. मध्येच निसर्गाची हाक आल्यास शौचालयाची सोयही आहे. नित्यकर्म आटोपून आपल्याला पुन्हा मूळच्याच जागेवर आणून सोडणारे ‘दक्ष’ सेवेकरी पाहून तर आपण अचंबितच होतो. दर्शनबारीमध्ये सर्वत्र औषधोपचाराची सोय आहे. एवढय़ा सुखसोयी येथे उपलब्ध आहेत म्हटल्यावर दर्शनासाठी उभं राहताना थकवा जाणवत नाही. मुखाने चाललेलं नामस्मरण मनाला उभारी देतं. असं असलं तरीही शांत आणि स्वस्थ राहील तर ते ‘संस्थान’ कसलं? गजानन बाबाला भेटायला त्याची भक्तमंडळी लांबलांबून आलेली आहेत याची नोंद घेऊन संस्थानने दर्शनार्थीसाठी ‘गरमागरम चहा’ची देखील व्यवस्था केली आहे आणि तीही अर्थातच विनामूल्य. महाराजांच्या दर्शनाला आलेला भक्त रांगेत उभा राहून शिणला असेल याची जाणीव उराशी बाळगून त्याला थंडगार पाणी, औषधोपचार आणि शौचालयाची सोय उपलब्ध करून देण्या सोबतंच त्याची मरगळ, थकवा दूर करण्यासाठी त्याला ‘वाफाळलेला चहा’ देणे यासाठी ‘माऊली’चं, मन लागतं. महाराजांच्या दर्शनाला जाताना त्यांच्या भक्तांनी दमूनभागून न जाता अगदी ताजंतवानं होऊन जावं, महाराजांच्या दर्शनाचा निर्भेळ, निर्मळ आनंद त्यांना घडावा यासाठी ही धडपड फक्त संस्थानच करू जाणे.
आपण समाधी मंदिरापाशी येऊन पोहोचतो तेदेखील वातानुकूलित यंत्राच्या थंडगार हवेचा झोत घेत घेत, त्यामुळे मन अधिकच प्रसन्न होतं आणि त्याच नादात आपण गाभाऱ्यापाशी येऊन पोहोचतो आणि आपलं भान हरपतं. उतरत्या पायऱ्या, प्रत्येक पायरीवर उभं राहतानादेखील समोर सातत्यानं दिसणारं महाराजांचं लोभसवाणं रूप, त्यांच्या नजरेतील वात्सल्य, चेहऱ्यावरची निरागसता या पाश्र्वभूमीवर अधूनमधून होणारा श्रींचा नामगजर, अशा या वातावरणात अश्रद्ध मनही सश्रद्ध व्हावं. घशाशी आवंढा दाटून येतो. डोळ्यात पाणी साठून राहतं. इथं आपण आणि समोर महाराज. एवढंच काय ते शिल्लक उरतं. गाभाऱ्यातील वातावरणही इतकं आनंदी, प्रासादिक आणि मनाला सुखावणारं आहे की महाराजांना चित्ती साठवून घेण्यात आपणच कमी पडतो की काय असं वाटावं. अन्य मंदिरात दिसणारी चमकधमक, दिव्यांची रोषणाई, सतराशे-साठ मूर्त्यां, हार-फुलांचा ढीग, हंडय़ा-झुंबरं असला अवाजवी थाटमाट इथे नाही. कोरीव कलाकुसर केलेले चार खांब, मधल्या प्रशस्त मोकळ्या जागेत विराजमान झालेली ‘श्रीं’ची चैतन्यमयी मूर्ती, पहाटे स्नानादी विधी झाल्यावर मूर्तीवरील नीटनेटकी मोजकीच वस्त्रे, त्यावर आकर्षकरीत्या केलेली पुष्पहारांची रचना, बस्स. एवढंच. कुणालाही ‘श्रीं’च्या मूर्तीला हात लावणं शक्य न व्हावं इतपत सुरक्षित अंतर. त्यामुळे धक्का-बुक्की नाही. कुठे गडबड गोंधळ नाही की भक्तांच्या बखोटीला धरून त्यांना बाहेर ढकलण्याचा उद्दामपणा नाही. सर्व काही शांत, सुरळीत. इथले सेवेकरीसुद्धा दर्शनार्थीना घाई घाई करून पुढे लोटत नाहीत तर शांतपणे ‘माऊली.. चला पुढे.. माऊली.. हळू हळू पुढे चला..’ असे आर्जव करतात.
समाधीचं दर्शन घेऊन आपण वरच्या दालनातील प्रभू रामचंद्र, मारुतीरायाचं दर्शन घेऊन प्रदक्षिणेला सज्ज होतो. विदर्भ म्हणजे रखरखाट. उन्हाच्या काहिलीने तन, मन अस्वस्थ करणारा हा प्रांत. मात्र मंदिर प्रदक्षिणा करणाऱ्या भाविकांच्या पावलांना उन्हाच्या झळांचे चटके बसू नयेत म्हणून प्रदक्षिणा मार्गावर पांढऱ्या रंगाच्या ऑइलपेंटचे रुंद पट्टे ओढलेले आढळतात. पांढरा रंग उष्णतेचा गुणधर्म शोषणारा आहे त्यामुळे या पट्टय़ांवरून चालले असता पाय भाजत नाहीत. उन्हाळ्याचा फारसा त्रास होत नाही. संस्थानच्या या नियोजनाचं कौतुक करावंसं वाटतं. असामान्य पोटतिडीक आणि अतीव कणवेतून आलेलं हे तत्त्वज्ञान आहे. नियोजनांची काळजी वाहण्यासाठी इतकं तरल मन यांना लाभलं तरी कसं? हा प्रश्न मग साहजिकच मनात डोकावतो.
समाधी मंदिराचा परिसर भव्य आहे. मध्यभागी समाधी मंदिर आणि चारही बाजूला दगडी पाठशाळा, देणगी कक्ष, चौकशी कक्ष, पारायण मंडप, प्रकाशन विभाग, व्यवस्थापन कचेरी आहेत. मात्र सर्व वास्तूंची मांडणी अगदी आटोपशीर. नियोजन व्यवस्थेसाठी अत्याधुनिक ‘कम्प्युटराइज्ड’ तंत्रही अवगत केलेलं. इथेही स्वच्छतेचा कमालीचा आग्रह आहे. कचेऱ्यांची गर्दी असली तरीही सर्व काही नीटनेटकं आणि सुबक. सर्वसाधारण कार्यालयात आढळणारी फायलींचा ढिगारा, अस्ताव्यस्त टेबल, वेगवेगळ्या आकाराच्या खुच्र्या, ओसंडून वाहणाऱ्या कचऱ्याच्या पेटय़ा, फाटलेली, सुरकुतलेली सोफ्यांची कव्हरे, िभतीवर सुरनळ्या झालेली चित्रविचित्र कॅलेंडर्स अशी नेहमीची दृश्ये इथे दिसत नाहीत. सर्व काही नीटनेटकं आणि आटोपशीर. स्वच्छ आणि प्रशस्त काउंटर्स, तात्काळ, विनम्र आणि हसतमुख सेवा देणारे कर्मचारी. सर्वकाही स्वप्नवत.
इथलं आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे समाधी मंदिर परिसरात, अन्यत्र देवस्थानात आढळतात तशी देवीदेवतांच्या मंदिरांची भाऊगर्दी नाही. सुविचार, संतांची वचने, विविध संतसत्पुरुषांची छायाचित्रे यांची रेलचेल इथे आढळत नाही. त्यामुळे साहजिकच भाविकांच्या मनात महाराजांच्या दर्शनसुखापलीकडे कुठलाच विचार राहत नाही. इथं प्रत्येक भाविक येतो तो महाराजांची भेट घ्यायला. त्यामुळे त्याला महाराजमय वातावरण लाभावं हा यामागचा प्रामाणिक विचार आहे. विविध देवदेवतांची देवळं उभारली, सुविचार, संतवचनांचे बोर्ड टांगून ठेवले की भक्तांची पावलं तिथंच रेंगाळतात. मन विचलित होतं. श्रद्धाभाव डळमळतो आणि महाराजांच्या दर्शनसुखाचा आनंद विभागला जातो. यामुळेच की काय हा परिसर इतर देवस्थानांपेक्षा अतिशय वेगळा भासतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या परिसरात आपल्या पाठी हटवादीपणे मागे लागणारे भिकाऱ्यांचे निलाजरे तांडे, अभिषेकाची पावतीपुस्तके घेऊन फिरणारे महाभाग आणि लोभी, मेणचट लोकांची फटावळ दृष्टीसदेखील पडत नाही.

श्रीगजानन महाराज संस्थान : स्थापना
‘जीवभावे शिवसेवा’ हे ब्रीदवाक्य असलेल्या श्रीगजानन महाराज संस्थानाची स्थापना १९०८ साली खुद्द श्रीगजानन महाराजांच्या समक्ष झाली. महाराजांनी घालून दिलेल्या अनेक नियमांपैकी महत्त्वाचा नियम होता तो ‘द्रव्याचा संचय करू नये’. लोकांकडून येणाऱ्या प्रत्येक पैशाचे रूपांतर पुन्हा लोककल्याणार्थ झाले पाहिजे यासाठी त्यांनी संस्थानच्या धुरिणांना ‘विश्वस्त’ या भूमिकेत समरस होण्याची सूचना केली. महाराजांचे हे कल्याणकारी विचार आजही येथे तंतोतंत अंमलात आणले जात आहेत. येथे येणारा प्रत्येक पैसा लोककल्याणार्थ खर्चिला जातो. स्वयंपूर्णता हे संस्थानचे वैशिष्टय़ आहे. संस्थान तर्फे कायान्वित असलेल्या ४२ प्रकल्पांमधून समाजोपयोगी कार्य करण्यावर विशेष भर दिला जातो. देणगीद्वारे भक्तांकडून येणारा निधी शैक्षणिक, वैद्यकीय आणि आध्यात्मिक कार्यामधून लोककल्याणार्थ उपयोगात आणला जातो. संस्थानचे हे विशाल कार्य ‘सेवा हीच साधना’ या तत्त्वाचा अंगीकार करीत जोमाने चालू आहे.
होमिओपॅथी, आयुर्वेदिक व अॅलोपथी या तिन्ही प्रकल्पातील सेवा, अपंग पुनर्वसन केंद्र, फिरते रुग्णालय यासारख्या अद्ययावत वैद्यकीय सुविधा देण्याचा यशस्वी प्रयत्न या वैद्यकीय सेवा प्रकल्पामधून आकारास येत आहे. शैक्षणिक प्रकल्पांच्या माध्यमातून मतिमंदासाठीचे विद्यालय, आदिवासी आश्रम शाळा, वारकरी शिक्षण संस्था तसेच परिपूर्ण इंजिनिअरिंग कॉलेज आज लाखो विद्यार्थ्यांचे, नव्या पिढीचं स्वप्न प्रत्यक्षात साकारत आहे. समाजातील उपेक्षित घटक असलेल्या दुर्गम भागातील आदिवासी मुलांना शिक्षण संजीवनी बहाल करणारं अनोखं सेवाकार्य इथं आकारास आलं आहे.
श्रीगजानन महाराज संस्थानच्या आध्यात्मिक पायावर वसलेले आनंदसागर हे आध्यात्मिक केंद्र सध्या कौतुकाचा विषय बनले आहे. पाण्याचे दुर्भिक्ष्य असलेल्या या क्षेत्रामध्ये परमेश्वराची कृपा आणि माणसाचं कर्तृत्व एकत्रित आलं की काय चमत्कार होऊ शकतो हे पाहण्यासाठी आनंदसागर परिसराला भेट देणे गरजेचे ठरेल. निसर्गातील पंचमहाभूतांचे कार्य उपयोगात आणून त्याला कल्पक वृत्तीची जोड देऊन घडविलेला निसर्गाचा चमत्कार येथे पावलापावलावर पाहावयास मिळतो तेव्हा अश्रद्ध माणसाच्या हृदयातही सश्रद्ध भाव जागृत होतात. परमेश्वराचं अस्तित्व न मानणारी माणसंही इथं अंतर्मुख होतात.
संस्थानच्या अंदाजपत्रकातील एकूण आवक लक्षात घेता देणगीतून येणाऱ्या निधीच्या १३ टक्के भाग प्रशासकीय कामकाज, ७ टक्के भाग धार्मिक कार्ये, १० टक्के भाग बांधकाम विभागासाठी आणि ७० टक्के भाग लोककल्याणकारी सेवाकार्यावर खर्च केला जातो. संस्थानचे सर्व उपक्रम स्वयंपूर्णतेकडे वाटचाल करणारे आहेत. श्रींचे आशीर्वाद, संस्थानचे द्रष्टे व्यवस्थापन आणि सेवाभावी कर्मचारी वर्ग या त्रिसूत्रीमधून साकारलेलं हे संस्थान म्हणजे भारतातील जणू एक स्वयंपूर्ण आणि आदर्श खेडं आहे. अत्यंत पारदर्शकपणे केल्या जाणाऱ्या कार्यावर जर निरलस, निरपेक्ष अशा सेवाभावी व्यवस्थापनाची पकड असेल तर शून्यातून विश्व कसं साकारता येऊ शकेल असा प्रश्न जर हिंदुस्थानात विचारला गेला तर लक्षावधी बोटं आदराने आणि कौतुकाने रोखली जातील ती श्रीगजानन महाराज संस्थान, शेगाव यांच्याकडेच.

समाधी मंदिराजवळ असलेली श्रींच्या देहविसर्जन स्थळाची अतिशय सुबक आणि आकर्षक वास्तू पाहताक्षणीच मन भारावतं. येथे श्रींनी प्रज्वलित केलेली धुनी, त्यांनी हयातीत वापरलेल्या वस्तू पाहतानाचा दर्शनयोग अपूर्व आणि अलौकिकच. समोरच भव्य पारायण मंडप आहे. शेकडो पारायणार्थी इथं एैसपैस बसलेले दिसतात. पांढऱ्याशुभ्र मार्बलवर हिरव्या मऊसूत पथाऱ्या अंथरलेल्या असतात. त्यावर शांतचित्ताने पारायणाचा आनंद घेता यावा यासाठी लाकडाची तक्तपोशी, ग्रंथ, तबक, इ. ठेवण्यासाठी लाकडी कलत्या फळीचा बेंच, पारायणार्थीच्या पाठीला रग लागू नये यासाठी घेतलेली काळजी, पारायणासाठी उपलब्ध करून दिलेल्या लहान-मोठय़ा अक्षरातल्या पोथ्या इतकंच काय तर एखादा भक्त येताना आपला चष्मा विसरला असेल तर अशांसाठी संस्थानने इथे विविध नंबर्सचे चष्मेसुद्धा ठेवले आहेत. हे सर्व पाहिलं की आश्चर्य शतपटीने वाढतं. हे इतकं दूरवरचं यांना सुचतं तरी कसं? माणसाला नेमकी काय अडचण येऊ शकते याचं नेमकं ज्ञान यांना होतं तरी कसं?
पारायण मंडपातून बाहेर आल्यावर ग्रंथविक्री विभाग आणि इथूनच पुढे देणगी विभाग आहे. इथे आपण स्वइच्छेनुसार देणगी देऊ शकतो. देणगी छोटी असो वा मोठी त्या सोबत लागलीच पावती मिळते. आता देणगी दिल्यावर पावती आणि सोबतच प्रसाद किंवा अंगाऱ्याची पुडी तर सर्वच देवस्थानं किंवा तीर्थक्षेत्रांमध्ये मिळतेच. त्यात वेगळं नवल, विशेष ते काय? मात्र इथे हीच गोष्ट अतिशय वेगळ्या पद्धतीने समोर येते. इथे तुम्ही देणगी दिल्यावर त्याच्या एक दशांश रक्कम तुम्हाला संस्थानद्वारा वस्तुरूपाने ‘प्रसादभेट’ म्हणून दिली जाते. विश्वास नाही ना बसत? ही चक्क सत्य गोष्ट आहे! श्रीगजानन महाराजांच्या दर्शनासाठी आलेल्या त्याच्या लेकरांना मिळणारी ही खास ‘प्रसादभेट’आहे. याची तुलना माहेरवाशिणीला सासरी जाताना तिच्या आईवडिलांकडून मिळणाऱ्या प्रेमाच्या भेटीशीच करता यावी. संस्थानचे हे वैशिष्टय़ आहे, ठळकपणे जाणवून येणारा हा संस्थानचा ‘माऊली’ स्वभाव आहे. ही प्रसादभेट मिळावी व मिळालेली भेट राखावी म्हणून भक्त जिवापाड धडपडतात. देणगीदार स्त्री, पुरुष असेल त्यानुसार साडी-चोळी, खण किंवा शाल, श्रीफळ, श्रींच्या समाधीवरील वस्त्रे, चांदीच्या पादुका, या रितीने त्या त्या देणगीच्या रकमेसमोर तशी तशी प्रसादभेट. काहीही झालं तरी देणगीच्या एक दशांश रकमेची प्रसादभेट दात्याला कृतज्ञतापूर्वक सुपूर्द करायची हा निश्चय गेली कित्येक वर्षे अव्याहतपणे सुरू आहे. नव्याने आलेला भाविक तर हा जगावेगळा सन्मान स्वीकारताना अचंबित होतो, भारावून जातो. कित्येक जुनीजाणती मंडळी तर आपल्या हृदयात ही ‘प्रसादभेट’ जपून ठेवतात. ‘बाबांची’ ही प्रसादभेट अवचितपणे मिळाल्यावर होणारा आनंद हा ‘जावे त्याच्या वंशा तेव्हाच कळे’. म्हटलं तर ‘अव्यवहार्य’ तरीही भावनिक नातं आणि श्रद्धाभाव दृढपणे जपणारी ही परंपरा शेगांव संस्थानमध्ये पूर्वापार चालत आली आहे. मात्र या ‘आतबट्टय़ाच्या’ व्यवहाराचे अनुकरण करण्याचा प्रयत्नदेखील अन्य कुणा तीर्थक्षेत्री का केला गेला नाही याचंच आश्चर्य वाटतं. ही प्रथा अन्य देवस्थानातून का राबविली गेली नाही न कळे? असो.
येथून पुढचं ठिकाण अर्थातच ‘प्रसाद बारी’ जिथे ‘श्रीं’च्या प्रसादाची व्यवस्था केली आहे तिथं पावलं वळतात. प्रसादबारीमध्ये एकाच वेळी हजारो माणसांची गर्दी शिस्तीने रांगेतून मार्गक्रमणा करताना दिसते. इथेही प्रत्येक रांगेमध्ये बसण्याची सोय आहे. पिण्याचे पाणी उपलब्ध आहे. प्रसादबारीच्या भव्य हॉलमध्ये हजारोंची बसण्यासाठी केलेली सोय, स्वच्छता, झगमगीत प्रकाश, प्रसादाची स्वच्छ लखलखीत भांडी आणि टापटिपीने उभे सेवेकरी हे दृश्य पाहूनच मन सुखावते. कुठेही धक्काबुक्की नाही, सांडलवंड नाही, अस्वच्छता, माश्या घोंगावताहेत, जमिनीवर उष्टं खरकटं पडलंय असं दृश्य कुणालाही येथे आजतागायत दृष्टीस पडलेलं नाही. येथील काउंटरवर ‘बिसलेरी बॉटल फक्त ८ रु./-’ हा बोर्ड बघून तर चक्रावल्यागत होतं. जगाच्या पाठीवर सर्वत्र या बाटल्या दहा-बारा रुपयांना आणि थंड करून घेतल्यास एक रुपये अधिभार अशा दराने मिळत असतांना इथं चक्क ८ रुपये? हे नवलच! नवशिक्या दर्शनार्थीच्या मनात तर प्रथमदर्शनी या पाण्याच्या बाटल्या ‘डय़ुप्लिकेट’ तर नाहीत ना? असा संशय डोकावतो. मात्र खात्री करावयास गेलेला हाच भक्त सत्य जाणून घेतल्यावर मात्र अचंबित होतो, भारावतो, गहिवरतो. या मागचं अर्थकारण म्हणजे संस्थान ज्या भावात या बाटल्यांची खरेदी करतं त्याच भावात ती भाविकांना उपलब्ध करून देण्याचा ‘अव्यापारेषू व्यापार’ही करतं. यामागे दोन-पाच रुपये नफा ठेवून त्याची विक्री करायचा विचारदेखील या मंडळींच्या मनाला कधी शिवत नाही. पुढे कधी शिवणारही नाही कारण हा खरेदी-विक्रीचा व्यवहार नाही तर भक्तांच्या निव्वळ सोय किंवा सुविधेसाठीचे हे सेवाकार्य आहे.

श्रीगजानन महाराज संस्थान : सेवाकार्य
धर्मार्थ अॅलोपथी दवाखाना ’ धर्मार्थ होमिओपथी दवाखाना ’ धर्मार्थ आयुर्वेदिक दवाखाना ’ अपंग पुनर्वसन केंद्र ’ फिरते रुग्णालय (मोबाईल व्हॅन) ’ फिरते रुग्णालय (आदिवासी विभागाकरिता) ’ नेत्रशस्त्रक्रिया शिबिर ’ प्राथमिक स्वास्थ्य केंद्र नसलेल्या परिसरातील ग्रामीण विभागातील रुग्णांकरिता फिरती रुग्णालय सेवा ’ ग्रामीण विभागांतील कमकुवत घटकातील रुग्णांना आर्थिक मदत ’ फिजिओथेरपी विभाग ’ श्री क्षेत्र पंढरपूर, श्री क्षेत्र आळंदी, श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर (कुंभमेळा) तसेच मध्यप्रदेशातील श्री क्षेत्र ओंकारेश्वर (कार्तिक मेला) येथे यात्रेकरूंच्या सुविधेकरिता मोफत औषधोपचार केंद्रे तथा महाप्रसाद वितरण ’ वेगवेगळ्या गंभीर आजाराने पीडित रुग्णांकरिता विशेष मार्गदर्शन शिबिरे व मदत ’ राष्ट्रीय कार्यक्रमांतर्गत वेगवेगळ्या लसीकरणाची मोहीम ’ श्री गजानन महाराज निवासी मतिमंद विद्यालय ’ आदिवासी विभाग : दीपावलीस मिष्टान्नासह कपडे वाटप ’ आदिवासींना गरजेनुसार अन्नधान्य वाटप ’ बौद्धिकदृष्टय़ा कमकुवत पाल्यांचे विकासासाठी पालक मेळावे तथा मार्गदर्शनपर शिबीर ’ ग्रामीण-सेवा ’ विभागीय नैसर्गिक आपद्ग्रस्तांना मदत - भूकंप, पूरपीडित, दुष्काळ, आगग्रस्त (अग्निप्रकोप) प्रसंगी सर्वतोपरी साहाय्य ’ दुष्काळग्रस्त विभागातील जनावरांकरिता चारा व पाण्याची व्यवस्था ’ अवर्षणग्रस्त भागाकरिता पिण्याच्या पाण्याची व्यवस्था ’ कुष्ठरोग्यांचे सेवेतील संस्थेस आर्थिक साहाय्य ’ वारकरी शिक्षण संस्था व लहान मुलांकरिता व्यक्तिमत्त्व विकास शिबिरे ’ प्रवचन, कीर्तन, िदडी यात्रा व व्याख्यानाद्वारे आध्यात्मिक प्रबोधन ’ भजनी साहित्य वाटप : टाळ, मृदंग, वीणा तसेच संत वाङ्मय वितरण, शेगाव व श्री क्षेत्र पंढरपूर येथे (आतापावेतो ९८४१ िदडय़ांना साहित्य वाटप) ’ संत वाङ्मय प्रचार ’ धार्मिक, आध्यात्मिक व योगासन शिबिर ’ श्रींच्या दर्शनार्थ पालखी सोहळा आयोजन ’ शेगांवसह संस्थेच्या सर्व अधिकृत शाखांमध्ये भक्तनिवास सेवा ’ दररोज २५ हजार भक्तांना मिष्टान्नासह महाप्रसादाचे विनामूल्य वितरण ’ अल्प निधी भोजन सेवा ’ आनंद सागर प्रकल्प ’ शेगाव व आजूबाजूच्या परिसरातील भूगर्भामधील पाण्याच्या पातळीचा समतोल राखण्यासाठी प्रयत्न ’ पर्यावरणाचा समतोल राखण्याकरिता २ लाखांच्या जवळपास वृक्षारोपण ’ वाचनालय ’ २४ तास सेवार्थ बस सेवा उपलब्ध ’ ५ बसेसद्वारा मंदिर - बसस्टॅण्ड - रेल्वेस्टेशन - आनंदसागर (जाणे-येणे) ’ लोकहितोपयोगी तसेच राष्ट्रीय हित साधण्याच्या दृष्टीने शैक्षणिक गुणवत्ता विकास, नैतिक विकास व संपूर्ण स्वच्छता अशा कार्यशाळेकरिता कार्य ’ खातेनिहाय कामाद्वारे रोजगार उपलब्ध या व अशा एकूण ४२ प्रकल्पाद्वारे संस्थानचे सेवाकार्य सुरू आहे.
संस्थानद्वारे कार्यान्वित झालेला महत्त्वाचा सेवा प्रकल्प म्हणजे ‘विक्रम पंडित ग्रामीण आरोग्य सेवा योजना’. या अंतर्गत श्रीगजानन महाराजांचे एक दानशूर भक्त विक्रम पंडित यांनी दिलेल्या देणगीच्या व्याजातून संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यातील १३ तहसिल आणि ११३९ खेडय़ांमधील शेतकरी बांधव आणि अत्यंत गरजू रुग्णांकरिता संस्थानद्वारे ग्रामीण आरोग्य सेवा योजना कार्यान्वित केली गेली आहे. आजपावेतो बारा लाखांहून अधिक बंधुभगिनींनी या योजनेचा लाभ घेतला आहे.
या सर्व प्रकल्पांकडे नजर टाकल्यावर एक गोष्ट प्रकर्षांने लक्षात येते ती म्हणजे संस्थेचा मुख्य उद्देश केवळ पैसा उभारणे हा नसून श्रद्धा व भक्ती यांचे संवर्धन होऊन लोकोपयोगी सेवाकार्य घडून यावे हाच त्या मागील एकमेव निस्सीम उद्देश आहे.

खरं तर संस्थानची स्वत:ची अतिशय प्रशस्त आणि विस्तीर्ण जागेवर उभारलेली जलशुद्धीकरण, पाणीपुरवठा योजना आहे. त्यामार्गे संस्थानच नव्हे तर गावातील जनतेलाही पाण्याचा पुरवठा होतो. मात्र जर एखाद्याला मिनरल वॉटरची सवय असेल तर तीही सोय संस्थानतर्फे उपलब्ध आहे मात्र ती केवळ मूळ किमतीतच. संस्थानचा कारभार भक्तांच्या सेवेसाठी आहे. पैसे उकळण्यासाठी, धंदा करण्यासाठी नाही. ‘द्रव्याचा संचय करू नका’ हे ‘श्रीं’चे उद्गार संस्थानने सर्वत्र सत्यात उतरविले आहे. हे संस्थान ‘पैसे कमावण्याची फॅक्टरी नसून’ ‘श्रीं’च्या आदेशानुसार चालणारे, भक्तांची काळजी घेणारे, दर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येक भक्ताला पोटतिडकीने, आईच्या मायेने ‘जेवूखावू’ घालणारे, त्याचे लाडकोड मायेच्या ममतेने पुरविणारे आणि ‘माऊलीतत्त्व’ बाळगणारे आहे. त्यामुळे इथे ‘व्यवहाराचा’ प्रश्नच मुळी उपस्थित होत नाही. असलाच तर तो आदर आहे, श्रद्धेचा, सेवेचा, आत्मीयतेचा, त्यागाचा आणि समर्पणाचा. हे सर्व अनुभवल्यावर मन ठायी ठायी अचंबित होत जातं. व्यवहारी जगात पावलोपावली स्वार्थ, मोह, सत्ता, पैसा यांचा उघड उघड संघर्ष होताना दिसतो. त्या पाश्र्वभूमीवर लोप पावण्याची शक्यता असलेले श्रद्धामूल्य, सेवामूल्य, त्याग, समर्पण हे शब्द आणि भावना संस्थान ज्या तडफेने आणि जिद्दीने जोपासतेय ते पाहून मनाला एकच प्रश्न वारंवार सतावतो की, हे असे विचार नेमके यांनाच कसे सुचतात?
प्रसादालयातही सर्वप्रथम जाणवते ती स्वच्छता. इथले सेवेकरी आग्रह करून प्रसाद घेतात. तप्तरतेने पाणी पुरवितात. प्रसादासाठी मोजकेच जिन्नस. मात्र वेळोवेळी त्याचे सतर्कतेने वाटप होते. कुठेही ‘चला उठा.. घाई करा.. माणसं खोळंबलीयेत.. इतरांनाही प्रसाद घेऊद्या..’ असल्या कर्कश सूचना नाहीत. ‘जेवणाच्या ताटात उष्टे अन्न ठेवू नये’ या आशयाच्या एखाद-दोन पाटय़ा िभतीवर पाहावयास मिळतात. त्यामुळे कुणालाही अन्न वाया घालवण्याची दुर्बुद्धी होत नाही. सर्वजण शिस्तीने येतात, प्रसाद ग्रहण करतात आणि सुसंस्कारित होऊन माघारी परततात. न बोलता शिकविलेला हा ‘संस्काराचा’ पाठ आहे.
‘श्रीक्षेत्र शेगांव’ इथं येणारा नवागत भक्त डोक्यात शंकाकुशंकाची जळमटं घेऊन येतो मात्र परतताना स्वच्छ मनानं संस्काराची गाठोडी घेऊन जातो. पावलोपावली नवा विचार, नवी संस्कारमूल्ये, आधुनिक तरीही संस्कृतीला धरून चाललेली विचारधारा संस्थानच्या प्रत्येक कार्यातून दिसते. मात्र ती जाणवून देण्याचा अट्टहास आणि अभिनिवेश नाही कारण संस्कार ही शिकवून सांगण्याची गोष्ट नाही तर ती अनुभवण्याची गोष्ट आहे हे संस्थान जाणतं. ही अंगी मुरवून घेण्याची सवय आहे. स्वत:हून बदलण्याची ही वृत्ती आहे. तसं करावयास संस्थान आपल्याला भाग पाडते, तेही आपसूकपणे, अलगदपणे. इथे प्रचारकी थाट नाही, भाषणं नाहीत, जे काही आहे ते कृतीतून, प्रत्येक संकल्पातून. यामागे आहे ती केवळ प्रामाणिक कळकळ, ‘आम्ही ग्रेट आहोत’ हा आविर्भाव, अहं किंवा देहबुद्धी नाही तर येथे त्याचे प्रत्यक्ष आचरण आहे. हा संयम, हे तारतम्य बाळगणं यांना जमतं तरी कसं?
याचे उत्तर मिळविण्यासाठी संस्थानच्या एकूणच दृष्टिकोनाकडे अभ्यासकाच्या दृष्टीने पाहावयास लागेल. शेगांवात पाय ठेवल्यापासून ते माघारी परतेपर्यंतची भक्तांची सर्व जबाबदारी संस्थान उचलतं ते ‘माऊली’ तत्त्वाने. संस्थान त्यांची निगुतीने, आपुलकीने काळजी घेतं, त्यांना दर्शनासाठी लागणारं निर्मळ मन जागृत ठेवण्याची जबाबदारी संस्थान घेतं. गजाननबाबांचं दर्शन भक्तांना मोकळ्या मनाने घेता यावं यासाठी संस्थानची ही सर्व धडपड असते. ट्रेन आणि एस.टी.तून येणाऱ्या प्रवाशांची ने-आण करण्यासाठी संस्थानची विनामूल्य बस सेवा आहे. संस्थानने एक दोन नाही तर तब्बल सहा भव्य भक्तनिवास समाधी मंदिर परिसराजवळ उभारले आहेत तर ‘आनंद विसावा’ आणि ‘आनंद विहार’ या अतिभव्य भक्तनिवास संकुलांमध्येही भक्तांच्या राहण्याची, भोजनाची सोय केली जाते. या भक्तनिवास परिसरामध्ये एकत्रितपणे एकाच वेळी अक्षरश: हजारो वाहनांचे पाìकग उपलब्ध करून देण्याची क्षमता आहे. नजीकच्या काळाचे भान ठेवून संस्थानने ही नियोजन व्यवस्था आखली आहे. येथील सर्व भक्तनिवास संकुलांमध्ये निवास व्यवस्था अतिशय माफक दरामध्ये उपलब्ध आहे. येथे चटकन लक्ष वेधून घेणारी गोष्ट म्हणजे ‘नो रिझव्र्हेशन’, इथे आरक्षण पद्धत नाही. जो कुणी सर्वप्रथम येईल त्याला संस्थानच्या नियमानुसार जागा उपलब्ध असल्यास लागलीच मिळते. इथे रांगेत उभे असणारे सर्व ‘महाराजांचे भक्त’आहेत. त्यामध्ये कुणी मोठा, कुणी छोटा, कुणी गरीब, कुणी श्रीमंत असा भेदभाव केला जात नाही. संस्थानच्या दृष्टीने कुणी क्षुल्लक, टाकाऊ नाही आणि कुणी ‘व्हीआयपी’देखील नाही त्यामुळेच इथे राहण्या, जेवण्यासाठी आणि महाराजांच्या दर्शनासाठी ‘व्हीआयपी’ पासेसची सोय नाही. संस्थानच्या दृष्टीने सर्वच भक्त व्हीआयपी आहेत. सर्वाची श्रेणीही एकच आणि ओळखही एकच व ती म्हणजे ‘श्रीगजानन माऊलीचे भक्तगण’. सर्वाना समान न्याय त्यामुळे निवासव्यवस्थाही उपलब्धतेनुसार होते. नाममात्र सहयोगराशीमध्ये उत्तम व्यवस्था. योजनाबद्ध नियोजनामुळे, भक्तांच्या मनोवृत्तीचा व्यवस्थित अभ्यास करून उभारलेल्या यंत्रणेमुळे, पराकोटीच्या सेवाभावी वृत्तीमुळे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे श्रींनी घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या श्रद्धाभावामुळे हे संस्थान भक्तांची आपल्या लेकरागत काळजी घेतं. त्यांना काय आणि कोणत्या समस्या येतील याचं भान राखून ही नियंत्रण व्यवस्था आकाराला आली आहे.
संस्थानचं हे माऊलीतत्त्व केवळ शेगांवच नव्हे तर संस्थानच्या प्रत्येक शाखेत तितक्याच दृढपणे जाणवतं. आपण संस्थानच्या त्र्यंबकेश्वर, पंढरपूर, ओंकारेश्वर वा अन्य कोणत्याही शाखेत गेलो तरीही आपल्याला हेच वातावरण दृष्टीस पडते. क्षणभर डोळे मिटून मग पाहिलं तर आपण शेगावातच आहोत की काय? असा भास होतो. सर्वत्र एकाच पद्धतीची नियोजन व्यवस्था, वितरण व्यवस्था, नम्रभावाने कार्यरत सेवेकरी असंच चित्र दिसून येतं. ‘मा फलेषु कदाचन’ ही भगवंताची वाणी इथंच साकारते आणि इथेच प्रगट होते.

सेवाकार्याचे मानकरी
संस्थानच्या कार्याचा विशाल वटवृक्ष शेगाव परिसरात ठामपणे उभा आहे, यामागे श्रीगजानन महाराजांचा आशीर्वाद आणि संस्थानची नियोजनबद्ध कार्यप्रणाली यासोबतच महत्त्वाचे आहेत ते सेवावृत्तीने कार्यरत असलेले हजारो हात. केवळ भक्तिभावाने कार्य करणारे, कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न धरता कार्यरत असणारे हजारो सेवेकरी हा सेवा प्रकल्पाचा खऱ्या अर्थाने ‘यू.एस.पी’ आहे. या सेवेकऱ्यांमध्ये विविध जातीधर्माचे, वयोगटाचे, आबालवृद्ध आणि महिलांचाही समावेश असतो. संस्थानाच्या सर्व विभागातील लहान-मोठी सर्व कामे हा सेवेकरी वर्गच पार पाडतो. यासाठी एक सक्षम यंत्रणा उभी केलेली दिसून येते. वेगवेगळ्या गावातून हे सेवेकरी येतात. त्यांचे गट केलेले असतात व सेवा ठरलेली असते. मंदिर परिसरात आढळणाऱ्या कमालीच्या स्वच्छतेचे सर्व श्रेय सेवेकऱ्यांनाच द्यावे लागते.
ही संकल्पना प्रायोगिक तत्त्वावर सुरू होण्याच्या काळात या सेवाधाऱ्यांचा एक हृदयस्पर्शी अनुभव येथील व्यवस्थापकीय विश्वस्तांनी सांगितला. हे सेवाधारी पहिल्यांदा सेवा करायला आले असल्याने त्यांच्यासमोर कार्याची स्पष्ट संकल्पना अशी काहीच नव्हती. त्यांच्या जेवणा-खाण्याची आणि राहण्याची सोय होईल एवढेच त्यांना सांगितले गेले होते. सेवा सुरू होण्याच्या आदल्या रात्रीपासून ही मंडळी मंदिरात पोहोचली. त्यांची भेट घेण्यासाठी जेव्हा विश्वस्त गेले तेव्हा सर्व मंडळी जेवावयास बसली होती. जेवण काय? तर भाकरी, त्यावर लाल तिखट, त्यावर पाणी. हे पाहून विश्वस्तांनी त्यांची जेवणाची व्यवस्था संस्थानद्वारे केली गेली असल्याचे सांगितले. त्यावर ही मंडळी उत्तरली की, ‘आज कसले जेवण? सेवा उद्यपासून तेव्हा जेवणही उद्यापासून.’ जिथे साधा सेवेकरी असा विचार करू शकतो ते कार्य स्वर्गीय ठरणार यात शंका ती कसली?
सेवेकरी म्हणजे कोणत्याही प्रकारच्या मोबदल्याची अपेक्षा न ठेवता आपली जबाबदारी पार पाडणारी देवाची लेकरं. नि:स्वार्थी, निर्लेप वृत्तीने कोणत्याही यशाचे श्रेय न घेणारी ही मंडळी. महाराजांच्या चरणी ३० हून अधिक वर्षे सेवा रुजू करणारे सेवेकरी संस्थानात आहेत. आपले अनुभव सांगितल्यानंतर हे सारे छापले जाणार आहे म्हणून नावही न सांगणारे महाभाग आपल्याला शेगाव संस्थानात भेटतात तेव्हा आश्चर्याचा धक्काच बसतो. सध्याच्या प्रसिद्धीलोलुप जगात स्वत:च्या कार्याचाही बडेजाव न करणारी ही सेवेकरी मंडळी खरोखरच उल्लेखनीय आहेत.
आज संस्थानच्या सर्व शाखांमध्ये मिळून जवळजवळ २००० मानसेवी आहेत. तीन हजार स्वयंसेवक आहेत. जे सेवा करू इच्छितात असे ३००० लोक अजूनही प्रतिक्षा यादीत आहेत. मतिमंद विद्यालय, इंग्रजी शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, अभियांत्रिकी महाविद्यालय या सर्व ठिकाणी सेवावृत्तीने काम करणारे उच्चशिक्षित शिक्षक आहेत. वैद्यकीय केंद्रावर अनेक ठिकाणाहून डॉक्टर येतात. ते आठवडय़ातील एक, दोन किंवा त्याहून अधिक दिवस सेवा रुजू करतात. आनंदसागर प्रकल्प तर संपूर्णपणे सेवेकऱ्यांच्या कार्यावर उभा आहे. सेवा रुजू केल्यानंतर सेवेकऱ्यांची अपेक्षा असते ती फक्त श्रींचा प्रसाद अर्थात श्रीफळ. आपली सेवा संपली की प्रसादाचा नारळ घ्यायचा आणि चालू लागायचे. असं असलं तरीही संस्थान तर्फे सेवेकऱ्यांची संपूर्ण व्यवस्था तर केली जातेच, शिवाय रामनवमीच्या उत्सवाप्रसंगी या सेवेकऱ्यांना २ पोती गहू, २५ किलो तांदूळ, २५ किलो तूरडाळ अशी शिधारूपाने मदतही केली जाते. तसेच वेळप्रसंगी शैक्षणिक, वैद्यकीय मदतही पुरवली जाते. यांपैकी निराधार, एकाकी लोक संस्थानच्या प्रांगणातच राहतात. हे लोक डोंगराएवढे काम उपसतात. कष्ट करतात. तरी सुखासमाधानाने असतात. मात्र मोबदला घेताना कष्टी होतात कारण काय? तर मोबदला घेतला तर ती सेवा कशी काय? संस्थानाने हा महाराजांचा प्रसाद आहे असे सांगितल्यावर त्यांना या साऱ्याचा स्वीकार करावा लागतो. मात्र मोबदला मिळतोय म्हणून सेवा करण्याची कुणाचीही भावना नाही. धन्य ते सेवेकरी आणि धन्य ते संस्थान.

इथल्या आनंदसागर या आध्यात्मिक केंद्राला भेट दिल्यावर तेथील दृश्य पाहून तर मन थक्क होते. आनंदसागरचा पसारा भव्य आहे. हा संपूर्ण परिसर नीटसपणे न्याहाळून पाहावयास दोन दिवस लागतात. निसर्ग आणि मानव एकत्र आल्यावर काय चमत्कार घडून येतो त्याचे पावलोपावली थक्क करणारे अनेक चमत्कार आपल्याला इथे पाहावयास मिळतात. आनंदसागर परिसर पाहण्याचा मुक्त आनंद धडधाकट माणसांना तर निर्विवाद घेता येतो; मात्र विकलांगानादेखील तो घेता यावा यासाठी खास व्हीलचेअर्सची विनामूल्य सोय आहे. लहान बाळांसाठी बाबागाडय़ांची सोय आहे, तसेच वृद्ध मंडळींना उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून येथे छत्र्याही उपलब्ध करून दिल्या जातात. अत्यंत अल्प सहयोगराशीमध्ये जेवण, शीतपेयं यांची सोयदेखील आहे. शाळकरी मुलांसाठी इथे विविध प्रकारची मनोरंजक खेळणी उपलब्ध करून दिली गेली आहेत. याचा उपयोग आजूबाजूच्या खेडोपाडय़ातील गरीब मुलांना व्हावा हा या मागचा संस्थानचा हेतू आहे. येथे पंचक्रोशीतील सर्व शाळांच्या सहली येतात तेव्हा आनंदसागर पाहण्याचा आनंद मुक्तपणे मिरविणाऱ्या खेडेगावातील गरीब मुलामुलींचे प्रसन्न चेहरे पाहून केलेल्या कार्याचे सार्थक झाले ही भावना संस्थानच्या मनात दाटून येते. विदर्भाच्या रखरखीत भूमीवर हिरव्याकंच टेकडय़ा, तलाव, विस्तीर्ण लॉन, कारंजे, अॅम्फी थिएटर आणि अत्याधुनिक खेळ सामग्री असलेल्या या आध्यात्मिक मनोरंजन परिसराला गेल्या वर्षी २५ लाखांहून अधिक लोकांनी भेट दिली.
शेगाव संस्थानचा ‘यू.एस.पी’ म्हणजे इथला सेवेकरी वर्ग. शेतीचे कामकाज किंवा नित्याचा व्यापारउदीम आटोपून ही खात्यापित्या घरची कर्ती सवरती मंडळी सेवा करण्यासाठी इथं दाखल होतात. त्यामुळे त्यांना पैशाचा लोभ किंवा हाव नाही. असलाच तर मोह आहे सेवाकार्य करण्याचा कारण इथं सध्या २५०० सेवाधारी कार्यरत असून ३५०० सेवेची संधी मिळावी यासाठी संस्थानच्या प्रतीक्षायादीत आहेत. सेवेकऱ्यांना हुकूम देणारा ‘मुख्य’ सेवेकरी इथं आजतागायत कुणाला दिसला नाही कारण इथं प्रत्येकजण सेवाक्षेत्रातील ‘अधिकारी’ आहे. प्रत्येकाला स्वत:चे कर्तव्य माहीत आहे. कर्तव्यात कसूर म्हणजे साक्षात महाराजांनी घालून दिलेल्या अधिकारांची ‘पायमल्ली’ याची जाण व चाड या सेवेकऱ्यांच्या मनात आहे. महाराजांबद्दलची अपार श्रद्धा आणि संस्थानच्या कार्याबद्दलचा नितांत आदर लहानमोठय़ा प्रत्येक सेवेकऱ्याच्या वर्तणुकीत आढळतो. इथला प्रत्येक सेवेकरी जणू मातेच्या उदरातून श्रद्धा आणि सेवेचे बाळकडू घेऊन आल्याची भावना निर्माण होण्याइतपत ही मंडळी प्रामाणिक आणि सच्ची आहेत. हाच संस्थानचा मूळ पाया आहे. हा पाया इतका भक्कम आहे की त्याच जोरावर संस्थानचे ४२ प्रकल्प हातात हात घालून उभे आहेत, समर्थपणे कार्यरत आहेत. आध्यात्मिक, शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात संस्थानचे उपक्रम यशस्वीपणे कार्यरत आहेत याचे श्रेय या सेवेकऱ्यांना, संस्थानच्या व्यवस्थापनाला आणि महाराजांच्या आशीर्वादमयी प्रेरणेला आहे.
नीट लक्ष देऊन पाहिलं तर श्रीक्षेत्र शेगांव हे तीन भागात व्यापलेलं असल्याचं दिसून येतं. ‘श्रीं’चा महिमा, संस्थानचे व्यवस्थापन आणि सेवेकऱ्यांचे अमूल्य योगदान. श्रीगजानन महाराजांचा महिमा तर जगजाहीर आहे. प्रचीती आणि अनुभवांतून तो दिवसेंदिवस वाढतच आहे. १८७८ ते १९१० या बत्तीस वर्षांच्या काळात श्रींनी असंख्य लीला, चमत्कार केले. आजही ते करताहेत. ‘आम्ही येथेच राहू रे’ अशी ग्वाही स्पष्टपणे देतानाच ‘आम्ही गेलो ऐसे मानू नका’ असा दिलासा देणारी ही प्रेमळ वात्सल्यमूर्ती आजही आपल्या भक्तांना कृपाशीर्वादाचा घास भरविते आहे. कोणत्याही माऊलीचे प्रेम तिच्या धडधाकट बाळावर जितकं असतं त्याच्या कैकपट अधिक असतं ते तिच्या कमकुवत व अशक्त बाळावर. या बाबतीत संस्थानचा दृष्टिकोनही हाच आहे. समाजात आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक व आरोग्यदृष्टय़ा मागासलेले, पिछाडीवर असलेले, दारिद्रय़ रेषेवर घुटमळणारे असे असंख्य जीव आहेत. ‘त्यांच्या’साठी संस्थानचे सर्वच्या सर्व प्रकल्प कार्यरत आहेत. आरोग्य, शैक्षणिक आणि आध्यात्मिक क्षेत्रात जोमाने कार्यरत असलेले हे सर्व उपक्रम गरिबातील गरीब, कणाहीन, द्रव्यहीन अशा लोकांना नजरेसमोर ठेवून संस्थानने आखलेले आहेत. ‘सर्वे भवन्तु सुखीन:’ हे ब्रीदवाक्य, ‘जीवभावे शिवसेवा’ हे बोधवचन आणि १०० टक्के परिपूर्ण सेवाभावी नियोजनाची अंमलबजावणी या त्रिसूत्रीवर संस्थानची कार्यप्रणाली कार्यरत आहे. सर्व निर्णय सेवाभावनेने, श्रद्धाभावनेने आणि ‘श्रीं’च्या चरणी समर्पित करून साकारले जातात.
श्री. शिवशंकरभाऊ पाटील यांच्या समर्थ नेतृत्वाखाली शेगावचे विश्वस्त मंडळ कार्यरत आहे. येथील विश्वस्त मंडळी संस्थानचा कारभार आणि स्वत:चा उपजीविकेचा मार्ग याची एकत्रित सांगड घालण्याची गल्लत करीत नाहीत. त्यामुळे संस्थानच्या एकाही पैशाचा दुरुपयोग होत नाही. महाराजांनी सांगितलेल्या ‘पैशाचा संचय करू नका’ या वचनाची शब्दश: अंमलबजावणी येथे केली जाते. इथलं विश्वस्त मंडळ सेवाभावी वृत्तीने समर्पित आहे. एखाद दुसऱ्या उत्सवप्रसंगी ‘श्रीं’चा प्रसाद, नैवेद्य घेण्यापलीकडे इथली विश्वस्त मंडळी येथील अन्नाच्या कणालादेखील स्पर्श करीत नाहीत. इतका नि:स्पृह सेवाभाव अन्यत्र कोठे पाहावयास मिळतो?
श्रीगजानन महाराज संस्थानच्या अंतरंगात शिरलं की सचोटी, सहृदयता, निष्काम वृत्ती, निरहंकारी सेवाभाव, कृतज्ञतेपण, सौजन्य, साक्षीभाव हे पुस्तकी शब्द मूर्त स्वरूप घेऊन समोर येतात. त्यांच्या या अफाट कार्यामुळेच इथे वारंवार यावेसे वाटते. आपण या गौरवशाली परंपरेचा भाग आहोत हे आठवून मन उचंबळून येते. असं असलं तरीही एक प्रश्न सदोदित अनुत्तरित राहतो व पुढेही कायम राहील की ‘हे सर्व काही नेमकं यांनाच कसं सुचतं?’ आणि फक्त ‘यांनाच का सुचतं?’ असो.
या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा व्यर्थ खटाटोप करण्याऐवजी प्रत्येक सुसंस्कृत आणि संस्कारक्षम व्यक्तीने आणि संस्थांनी शेगाव संस्थानचे कार्य आणि संकल्पना यांचा अनुकरणीय आदर्श ठेवावा हीच संस्थानच्या कल्पक आणि सक्षम व्यवस्थापनाला खऱ्या अर्थाने दिलेली मनमोकळी दाद असेल.
vivekvaidya1878@gmail.com