११ डिसेंबर २००९
घरचा शेफ

शेफ म्हटलं की आपल्याला आठवतात फाइव्ह स्टार हॉटेलातील, टीव्हीवर चमकणारे शेफ. पण, खरं तर प्रत्येक घरात एक शेफ असतो, नवनवीन प्रयोग करणारा, इतरांना प्रेमाने रूचकर पदार्थ खाऊ घालणारा. तुम्हीही त्यापैकीच एक. मग, तुमच्या पाककृती लोकांसमोर यायला नकोत? तर मग उचला पेन आणि कॅमेरा, लिहून पाठवा तुमच्या खास रेसिपीज. सोबत तुमचा आणि पाककृतीचा फोटोही पाठवा. मात्र, कृपया फोटो मोबाइलवरून काढू नका. चला तर मग, चमचे, कढया, डाव आणि सोबत पेपर-पेन घेऊन तय्यार? ह्या वेळच्या ‘घरचा शेफ’मधील शेफ आहेत विलेपार्लेच्या स्नेहलता दारशेतकर

तुम्ही घरघरच्या शेफ! तुमचं ग्लॅमरही काही कमी नाही. तुम्हीही चमकायला पाहिजे आणि तुमचा अन्नकोटही.
पण या रेसिपीचा आणि स्वत:चा फोटो पाठवायचा कसा, हा गहन प्रश्न भेडसावतोय नाही का?
अगदी नाहीच जमलं फोटोचं तर त्याचं टेन्शन घेऊ नका. आधी तुमची रेसिपी डिटेलमधे बारीक-सारीक टिप्ससह लिहून तर पाठवा. सोबत तुमचा संपर्कही. फोटोग्राफरची व्यवस्था होईल. ‘जिव्हा’ळ्याच्या गोष्टीत बाधा नको, नाही का?

‘वांगीवडे’
साहित्य : वांगी, फोडणीचे साहित्य, तेल, थालीपिठाची भाजणी, धने-जिरे पावडर, कोथिंबीर, ओवा-तीळ, तीखट, मीठ, दही, डाळीचे पीठ.
कृती : वांग्याचे पातळ काप करावेत व चिरून ते पाण्यात ठेवावे. जरा जास्त तेलात हिंग, मोहरी, हळद घालून खमंग फोडणी करावी. त्यात वांगीकाप घालून अंदाजे मीठ, तिखट, धने-जिरे पावडर चिमूटभर साखर घालून भाजी वाफवून घ्यावी. भाजी शिजली की झाकण काढून त्याला बेसन लावावे व खमंग पीठभाजी तयार करावी. खाली उतरवून गार करावी. थोडक्यात वांग्याची पीठभाजी करणे.

 


एका परातीत वांग्याची भाजी घ्यावी. मग जेवढे वडे करायचे असतील तेवढीच थालीपीठ भाजणी घ्यावी व भाजी मिसळावी. एका कढल्यात तेल कडकडीत गरम करावे व खाली उतरवून त्यात तिखट, हळद, धने-जिरे पावडर, तीळ व ओवा घालून पिठात मिसळावे. भाजी + कढल्यातले मसाले, १ चमचा दही, प्रमाणात मीठ घालून मळावे. त्यात बारीक कापलेली कोथिंबीर घालून कोरडे वाटल्यास थोडे कोमट पाणी घालून वडय़ाचे पीठ वडे थापता येतील इतपत भिजवावे व वडे घालून तेलात तळावेत.
टिप्स :
वांगी व थालीपिठाची भाजणी ताजी असावी.
पिठाचे थालीपीठ लावावे किंवा भाजीसुद्धा तळता येतात.
दही आंबट असावे.
वांग्याच्या भाजीत तिखट, मीठ घातले असल्याकारणाने थालीपिठाच्या भाजणीत प्रमाणात तिखट-मीठ घालावे.
मुलांनी वांग्यांची भाजी पोळीबरोबर आधी खावी व उरलेल्या भाजीचे वडे करावे.
कोबी, कांदा, मेथी, पालक वगैरे कुठल्याही भाजीची पीठभाजी करून वरीलप्रमाणे वडे करावेत.

‘अळीवाचे पॅनकेक’
साहित्य : प्रत्येकी १ वाटी सोयाबीन, नाचणीचे पीठ, एक वाटी बेसन, रवा, कणीक, तांदूळाचे पीठ, दीड वाटी गूळ दुधात किंवा पाण्यात विरघळवलेला, मीठ, काजूचे बारीक तुकडे, वेलची पावडर, भिजवलेले अळीव, तेल, साजूक तूप.
कृती : प्रथम १ वाटी नाचणीचे पीठ + १ वाटी सोयाबीन पीठ + वरीलपैकी कोणतीही दोन पिठे एकेक वाटी अथवा अर्धा वाटी सगळी पिठे एकत्र करावीत. त्यात चिमूटभर मीठ, वेलची पावडर, काजू तुकडा व ४ चमचे दुधात किंवा पाण्यात भिजवलेले अळीव घालावे. गुळाचे पाणी घालून पीठ घिरडय़ाच्या पिठाइतके पातळ भिजवावे. आवडेल इतपत गोड करावे. नॉनस्टीक पॅनमध्ये साजूक तूप घालून ते पसरवावे व त्यावर झाकण ठेवावे. आकार हवा तेवढा लहान-मोठा करावा. खालची बाजू लालसर झाली की झाकण काढून उलटावे व गुलाबी रंगावर झाले की सवर्ि्हग प्लेटमध्ये काढून घ्यावे. नारळाची चटणी किंवा आले + लिंबूरस + काळ्या मनुका + सैंधव यांचे लोणचे किंवा लिंबू गोड लोणचे किंवा टोमॅटो सॉस असतोच. खूप पौष्टिक व आबालवृद्धांना थंडीत अति उत्तम.
टिप्स :
सर्व पिठे फार जुनी नसावीत.
गूळ पिवळाधम्मक असावा.
अळीव नीट निवडावे, कारण कच किंवा रेव असते.
बाळंतिणीला अळीव लाडू देतात पण पॅनकेकमुळे अळीव खाल्ले जातात.
नारळाचे दूध घालायचे असेल तर दूध काढल्यावर चोथा पिठात घालावा.
गूळ व साखर अर्धी अर्धी वापरावी.

‘कंदी कीस’
साहित्य : प्रत्येकी २०० ग्रॅम सुरण- रताळी व बटाटे, शेंगदाणा भरड कूट, तेल, जिरे, मीठ, साखर, हिरव्या मिरचीचे तुकडे, कोथिंबीर, कढीपत्ता, नारळाचा चव, लिंबूरस, काजू.
कृती : बटाटे, रताळी व सुरण स्वच्छ धुऊन घ्यावे. सुरणाची मातीमय साल काढून टाकावी. रताळी व बटाटे एकत्र किसावे. सुरण वेगळे किसून त्याला लिंबूरस चोळून ठेवावा.
रताळे कीस + बटाटा कीस + सुरण कीस एकत्र करून त्यात दाण्याचे कूट + मीठ + थोडीशी साखर + काजूचे चार तुकडे करून + थोडी जिरेपूड एकत्र करून हलक्या हाताने एकत्र करावे. नॉनस्टीक कढईत तेल वा तूप घालून तापले की त्यात जिरे, हिरव्या मिरचीचे तुकडे, कढीपत्ता घालून फोडणी करावी. त्यात वरील मिश्रण घालावे. चांगले परतून थोडी कोथिंबीर व थोडा नारळाचा चव घालून परतावे व झाकण ठेवावे. जरा जरा वेळाने हलवावे. छानपैकी वाफ आली की झाकण काढून बाऊलमध्ये काढून घ्यावा. सव्‍‌र्ह करताना वरून खवलेला नारळ, कोथिंबीर व लिंबाच्या फोडी ठेवून सजवावे.
टिप्स :
सुरण शक्यतो पांढरा घ्यावा. त्याला खाज नसते तरी लिंबूरस चोळावो, शंका नको.
बटाटा खाल्ला जातो पण सुरण खाल्ले जात नाही. तर रताळे कधीतरी. तर असा कीस केला की सुरण खाल्ला जातो.
जिरे फोडणीत घालताना जरा दोन्ही तळहाताने चोळावे, स्वाद छान येतो.
उपासाला पण चालतो व नसताना पण.
वरील मिश्रणाचे छोटे छोटे वटे तळावेत किंवा थालीपीठ लावावे.
रताळे व बटाटे सालासकट किसावेत.

‘स्वादिष्ट चिरोटे’
साहित्य : १ वाटी मैदा, १ वाटी बारीक रवा, तळण्यासाठी तूप, साखर, साटय़ासाठी तांदळाचे पीठ, अननसाचे तुकडे, दूध.
कृती : रवा व मैदा परातीत घेऊन त्याला चोळून चोळून तूप लावावे. प्रत्येक कणाला तूप व्यवस्थित लागले पाहिजे. किंचित मीठ घालून रवा व मैदा घट्टसर भिजवावा व तासभर ओल्या मलमलच्या कपडय़ात गुंडाळून झाकून ठेवावा. पिठाचा गोळा बाहेर काढला की चांगला तिवावा किंवा बत्त्याने कुटावा व मुलायम करून घ्यावा. वाडग्यात मैदा किंवा तांदूळ पीठ घेऊन त्यात तूप घालून चांगले फेसाळ व साटा करून घ्यावा. पातेल्यात साखर घेऊन ती बुडेल इतके पाणी घालावे. त्या अगोदर अननसाचे बारीक तुकडे करून ठेवावे व ते पाकात घालावे. स्वादिष्ट पाक तयार होईल. पिठाची पोळी लाटून मध्ये साटेा लावून एकावर एक दोन पोळ्या ठेवाव्या व गुंडाळी करून त्याचे काप काढावेत व ते हलक्या हाताने चौकोनी लाटावे व तुपात मंद आचेवर तळावेत. चांगले पदर सुटतात. ते गरम असतानाच गार पाकात टाकावेत. दुसरे तळले की पहिले काढून डीशमध्ये ठेवावेत.
टिप्स :
रवा व मैदा दूधात भिजवावा किंवा पाण्यात.
चिरोटय़ावर अगदी बारीक बारीक तुकडे वर यायला हवेत.
संत्रे, टोमॅटो, डाळिंबाचा रस किंवा रोझ सिरपने लाल रंग येतो. पाकात गुलकंद टाकला तर गुलाबाचा टाकावा.
पाकात लिंबूरस घालू नये.