९ ऑक्टोबर २००९
आठवण

पैठणीला गतकाळचं वैभव मिळवून देण्याचं खरं श्रेय सरोज धनंजय यांनाच जातं. सरोजबाई आज हयात नाहीत. मात्र ‘न्यू वेव्ह पैठणी’शी त्यांचं नातं त्यांच्या आठवणींमुळे आजही टिकून आहे.
संजय भिडे

‘पैठणी’च्या त्रात्या सरोज धनंजय,
भन्नाट व्यक्तिमत्त्व!
‘‘करा, करा टिंगल माझी! पण संजय, सांगून ठेवते की, मी परावलंबित जख्ख म्हातारी होऊन मरणार नाही व माझी ‘साठी बुद्धी नाठी’ तर कधीच होऊ देणार नाही!’’ असे आस्वान धरणाच्या कट्टय़ावर बसून सरोज धनंजय मला ठासून म्हणाल्या होत्या. आमच्या ट्रान्स एशियन चेंबरने आयोजित केलेल्या इजिप्त, इस्राएल, पॅलेस्टाईन व दुबईच्या सदिच्छा दौऱ्यास सरोजबाई सह-संघटक म्हणून मला सामील झाल्या होत्या. त्यांची तुलना, मी इजिप्तमधील भव्य, नेत्रदीपक भग्नावशेषांशी केल्याने त्या माझ्यावर लटके लटके संतापल्या होत्या.
त्यांच्या साठाव्या वाढदिवसाच्या बरोबर एक महिना आधी, १२ डिसेंबर २००३ रोजी मेंदूच्या कर्करोगाने सरोजबाईंचे निधन झाले. त्यांनी स्वत:ला जख्ख म्हातारी होऊ दिले नाही. दोन वर्षांच्या प्रदीर्घ लढय़ात कर्करोगाने त्यांच्यावर मात केली. प्रथम

 

स्तनांचा कर्करोग फुफ्फुसांमध्ये शिरला व टाटा इस्पितळाच्या कर्करोगतज्ज्ञांना चुकवून मेंदूत शिरला. जरी केमो-थेरपीने त्यांचे केस गळले होते, तरी मृत्यूसमयी त्यांचा चेहरा प्रसन्न, टवटवीत होता. त्यांचे सौंदर्य कमी झाले नव्हते.
सरोजबाईंच्या शेवटच्या क्षणी शांति- आवेदना इस्पितळात त्यांच्या मोठय़ा मुलाबरोबर मी व पत्नी सन्निधा, आम्ही दोघेही होतो.
याच मोठय़ा मुलाच्या, अद्वैतच्या मुंजीसाठी सुमारे पंचवीस वर्षांपूर्वी सरोजबाई जेव्हा नवीन पैठणी घ्यायला गेल्या, तेव्हा त्यांच्या लक्षात आले की, दुकानांमध्ये नवीन पैठण्या उपलब्धच नाहीत. मुंबईत पैठणी नाही मिळाली, म्हणून त्या पुण्याला गेल्या. तिथेही त्यांना नवीन पैठणी मिळाली नाही. शेवटी पैठणीशिवायच त्यांनी मुंज उरकली.
पण नवीन पैठणी न मिळाल्याची रुखरुख त्यांना लागली होती. त्यामुळे मुंजीचा सोहळा आटोपताच, सरोजबाई तडक पैठण व येवला येथे पोचल्या. तिथे त्यांच्या लक्षात आले का, पैठण्या विणणाऱ्या कारागिरांचे हातमाग बंद पडले आहेत. ते दुरुस्त करायला वा नवीन हातमाग लावायला विणकरांकडे पुरेसा पैसा नाही. विणकर कर्जबाजारी झाले आहे वा देशोघडीस लागायच्या बेतात आहेत.
मराठी संस्कृतीचा घटक असणाऱ्या, घराण्याचे महावस्त्र असलेल्या पैठणी या मानदंडाची दुर्दशा बघून सरोजबाईंनी कंबर कसली. त्या वेळी जेमतेम पस्तिशीत असणाऱ्या, उंचपुऱ्या, देखण्या, मिठास बोलणाऱ्या सरोजबाईंनी पैठणी विणणाऱ्या कलावंत- कारागिरांसाठी महाराष्ट्र सरकार, तसेच ग्रामीण पतसंस्थांचे उंबरे झिजवायला सुरुवात केली. त्यांच्या अथक प्रयत्नांनी पैठणी बनवणाऱ्या कारागिरांच्या जुन्या कर्जाना मुदतवाढ मिळाली. त्यांचे हातमाग दुरुस्त करायला, नवीन हातमाग विकत घ्यायला अल्प व्याजदराने कर्जे मिळवून दिली व हळूहळू पैठण्यांचे उत्पादन पुन्हा चालू झाले.
पैठणी बनवणाऱ्या विणकरांना मधल्या दलालांमुळे त्यांच्या कामाचा उचित भाव मिळत नव्हता. तेव्हा १९ वर्षांपूर्वी, सरोजबाईंनी या विणकरांना उचित भाव मिळवून देण्यासाठी व ग्राहकपेठेत थेट प्रवेश मिळवून देण्यासाठी ‘न्यू वेव्ह पैठणी’ (NEW WAVE PAITHANI) या प्रदर्शनाची सुरुवात केली. हे प्रदर्शन सवंगपणे जागोजागी लावण्याऐवजी वर्षांतून एकदाच, दसरा व दिवाळी, या सुगीच्या दिवसांतच लावल्याने, पैठण्यांना उचित भाव मिळायला सुरुवात झाली व उत्तरोत्तर हे प्रदर्शन कमालीचे लोकप्रिय होत गेले. आजही सरोजबाईंच्या निधनानंतर ‘न्यू वेव्ह पैठणी’ हे प्रदर्शन लोकप्रिय आहे.
‘‘या प्रदर्शनाने मला खरे समाधान दिले व महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नाव दिले,’’ असे सरोजबाई नेहमी मला सांगत असत. पैठणीबद्दल व या प्रदर्शनाबद्दल बोलताना कमालीच्या हळव्या होत असत. हे प्रदर्शन आयोजित करताना येणाऱ्या चित्रविचित्र अनुभवांचे त्या दिलखुलासपणे कथन करीत असत.
कोकण्यांच्या कोहिनूरमध्ये मराठी लोकांच्या आंतरराष्ट्रीय परिषदेत माझी व सरोजबाईंची ओळख झाली. त्या परिसंवादाचे सूत्रचालन त्यांनी केले होते. त्यांचे प्रसन्न, उमेद व्यक्तिमत्त्व, सकारात्मक दृष्टिकोन व कोणत्याही गोष्टीकडे पूर्वदूषित नजरेने न बघण्याच्या त्यांच्या वृत्तीमुळे सरोजबाई व मी अल्पावधीमध्ये चांगले स्नेही बनलो. लवकरच आमची कुटुंबेदेखील चांगलीच जवळ आली. धनंजय ढमढेरे माझे मित्र झाले तर सन्निधा व सरोज चांगल्या मैत्रिणी झाल्या.
माझी पत्नी सन्निधा ही खरे तर एकलकोंडी! परंतु सरोजबाईंनी तिच्यावर काय जादू केली हेच कळत नाही. त्यांनी सन्निधाला तिच्या कोषातून अक्षरश: ओरबाडून बाहेर काढले. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभावच तसा होता.
सरोजबाई राहायच्या वरळीमध्ये, पण त्यांच्या पायाला लावली होती भिंगरी. त्यांच्या हिरव्या मारुती झेनमधून त्या अख्ख्या मुंबईभर भटकत असायच्या. जागतिक मराठी चेंबरच्या त्या सह-सचिव होत्या. तसेच विविध शालेय संस्थांच्या कार्यकारिणींच्या सदस्य होत्या. युतीचे राज्य असताना राज्यस्तरीय कामगार कल्याण समितीच्याही त्या सदस्य होत्या. इंडो- मंगोलियन फ्रेंडशिप सोसायटीची स्थापना केली, तेव्हा त्या माझ्या संस्थेच्या आजीव सदस्य झाल्या.
दिवसभराच्या धावपळीत शिवाजी उद्यान परिसरात सरोजबाई आल्या की, हमखास त्यांचा दूरध्वनी यायचा. दुपारी दोन ते अडीच ही त्यांची वेळ. खणखणीत आवाजातच आमच्या घरात प्रवेश करायच्या, ‘‘सन्निधा, खूप भूक लागली आहे, उरलेसुरले आहे का घरी जेवायला माझ्यासाठी?’’ माझे कार्यालय व घर एकच आहे. माझ्या कार्यालयात काम करणाऱ्या मुलींना त्या ओळखत असत. त्यांची चौकशी करत, खुर्चीवर मांडी घालून त्या बसायच्या. अनोळखी व्यक्तींना बुजणारा आमचा बोका चिंगू, त्या आल्या की, बाहेर यायचा. त्याला उचलून मांडीवर बसवून, त्याचे लाड करायच्या. ‘‘बघा संजय, माझ्या गुबगुबीत मांडीवर चिंगू कसा शोभतोय, पण त्याला माहीत आहे की, ही खरी मायेची ऊब आहे!’’ तोपर्यंत सन्निधा गरमागरम वरणभात, लोणचे, थोडी भाजी आणत असे. सरोजबाईंचे खाणे जास्त नसायचे, पण आव मात्र गाडाभर अन्न फस्त केल्याचा असायचा. तोंडाची बडबड चालूच असायची. काहीही खाताना काही ना काही तरी अंगावर सांडायच्या व मी त्यांना नेहमी हसायचो. ‘‘कशा अजागळपणे खाता हो तुम्ही, सरोजबाई! बडबड बंद करा. अन्नाला न्याय द्या,’’ असे म्हटल्यानंतर हसून म्हणायच्या, ‘‘संजय, अहो, आपण मुंग्यांना खायला द्यायला नको का?’’
यावर तुम्ही काय बोलणार?
आपण जेव्हा १५-२० दिवस एकत्र प्रवासास जातो, तेव्हा सोबतच्या व्यक्तींचे खरेखुरे स्वरूप आपल्याला कळते. नेहमी औपचारिक कपडय़ात दिसणाऱ्या व्यक्ती आपल्यासमोर उघडय़ा होतात. त्यांच्या सवयी, लकबी, वागण्यातील उणिवा, सामंजस्य, सहनशीलता, आर्थिक प्रवृत्ती नव्हे तर त्यांची उचलेगिरीदेखील आपल्या लक्षात येते. अर्थात अनुभवात घट्ट झालेले हे माझे मत आहे.
सरोजबाई जेव्हा सह-संघटक म्हणून इजिप्त, इस्राएल, पॅलेस्टाईन व दुबईच्या सदिच्छा दौऱ्यास माझ्याबरोबर आल्या तेव्हा त्यांचे सर्व गुणावगुण मी बघितले. त्या वारल्या म्हणून वाईट लिहायचे नाही, असे नाही. परंतु इथे मला असे मनापासून सांगावेसे वाटेल की, प्रवासास जाण्यासाठी सरोजबाई या उत्तम सहप्रवासी होत्या. अत्यंत वक्तशीर, सुटसुटीत, इतरांना समजून मदत करणाऱ्या, सौंदर्यदृष्टीने जगाकडे बघणाऱ्या, उत्तम विनोदबुद्धी, गप्पिष्ट. सरोजबाईंचा सहवास खरेच आनंददायी होता.
परंतु, थोडा चिडखोरपणा व हेकेखोरपणा त्यांच्यात होता. समोरच्या व्यक्तीचे आपल्याशी मतभेद नसणारच, असा त्यांचा भाबडा विश्वास असायचा. विसराळूपणा व अवघड प्रसंगात घाबरटपणादेखील त्यांच्यात होता. एमिरेट या विमान कंपनीच्या मनमानी कारभारामुळे, दुबईवरून मुंबईस परत येताना, एकंदर २७ पैकी १९ आरक्षणे रद्द केली. सरोजबाईंचे प्रदर्शन अवघ्या ६ दिवसांवर आले होते. त्यांचे मुंबईस परत येणे अत्यावश्यक होते. पण सर्व प्रयत्न करूनही त्यांना मुंबईस परत येता आले नाही. तेव्हा त्या ढसढसा रडल्या होत्या.
इजिप्तमध्ये सत्काराला सरोजबाईंना व मला एकच शिल्प एकाच वेळी आवडले. स्त्री-दाक्षिण्यामुळे मी त्यांना ते विकत घ्यायला वाव दिला. पण त्यांना त्या अरबाबरोबर भाव करता आला नाही. तेच शिल्प नंतर मी त्यांनी केलेल्या भावापेक्षा कमी भावात त्याच अरबाकडून घेतले. तसेच इस्राएलच्या जाफामध्ये आम्हा दोघांनाही एक कातडी पर्स आवडली. त्या ज्यू बाईचा व सरोजबाईंना काय वाद झाला, कुणास ठाऊक, पण तीच पर्स त्याच ज्यू बाईने मला विकली, ती पण त्यांनी देऊ केलेल्या भावापेक्षाही कमी भावात! ती पर्स अजूनही सन्निधा वापरते.
सरोजबाई खऱ्या रसिक होत्या. नाटके, चित्रपट, शास्त्रीय वा सुगम संगीत, अप्रतिम रंगसंगतीच्या छान छान साडय़ा.. सर्वच बाबतीत त्यांच्या निवडी चोखंदळ असायच्या. त्यांना स्वत:ला मांडणे व्यवस्थित जमायचे. मला त्यांचे डोळे व हसणे मनापासून आवडायचे. ‘‘संजय, संजय, हरभऱ्याचे झाड केवढे व मी केवढी? पुरे आता स्तुती! पाणीपुरी खायची आहे का? देईन हो, पुढच्या आठवडय़ात!’’ खर्चाच्या बाबतीत थोडय़ा कंजूष होत्या, पण त्यांना तसे दाखवून दिल्यावर आमच्याबाबतीत तरी त्यांनी कंजूषपणा सोडला. ‘‘बघ संजय मला कंजूष भटजी म्हणतात,’’ असे म्हणून त्या सौ. सन्निधाला खास जेवायला घेऊन जात असत.
सरोजबाईंना व मला ‘कचरा’ खायला आवडत असे. ‘कचरा’ म्हणजे भेळ, पाणीपुरी, शेवपुरी, पकोडी व ‘जितका भैया कळकट, तितकी त्याने बनवलेली भेळ, पाणीपुरी चविष्ठ ही माझी व्याख्या! ’’ सरोजबाई, बघा त्या भय्याने कुठे कुठे हात घातले असतील, काय काय खाजवले असेल,’’ असे मी म्हटल्यावर हमखास एक रपटा बसून जे काही आम्ही खात असू, त्याची चव त्या आणखी वाढवत असत. वरळी समुद्रकिनारी बसून ‘कचरा’ खाणे, सूर्यास्त बघणे व जुनी गाणी गुणगुणणे हे आम्हा दोघांनाही आवडायचे.
आमची मैत्री घट्ट झाल्यानंतर सन्निधावर सरोजबाईंनी कब्जा केला. सन्निधा माझ्याचसारखी व्यवसायाने वास्तुविशारद. ‘न्यू वेव्ह पैठणी’साठी सरोजबाईंनी सन्निधाला दिमतीला घेतले. १९९८ पासूनच्या सर्व प्रदर्शनांचे मापन/आलेखन त्यांनी सन्निधाकडून करून घेतले. त्याची परतफेड म्हणून त्या सन्निधाला त्या प्रदर्शनात एक ठेला विनामूल्य देत असत. त्यांचे निधन व्हायच्या आधीच्या वर्षांपर्यंत ४ वर्षे सन्निधाने ‘न्यू वेव्ह पैठणी’मध्ये स्वत:चा ठेला लावला. सन्निधाला बहिर्मुख करण्याचे पूर्ण श्रेय सरोजबाईंचे आहे. सन्निधामध्ये सकारात्मक दृष्टिकोन त्यांनीच आणला.
सरोजबाईंचे निधन झाल्यावर एक वर्ष त्यांचे यजमान धनंजय ढमढेरे व दोन्ही पुत्र अद्वैत व अनिरुद्ध यांनी एक वर्ष ‘न्यू वेव्ह पैठणी’चे आयोजन केले. मात्र धनंजय यांची प्रकृती ढासळल्याने त्यांनी हे प्रदर्शन स्वत: न आयोजिण्याचे ठरवले आणि २००५ च्या मध्यावर धनंजयांना बहुधा साक्षात्कार झाला.
धनंजयांचा मलाच दूरध्वनी आल्याने, मी जरा चकितच झालो. त्यांनी मला ‘न्यू वेव्ह पैठणी’ प्रदर्शन स्वत: आयोजित न करण्याचे, तसेच पुण्यातच स्थायिक व्हायचे ठरवल्याचे सांगितले व भेटायची ‘वेळ’ मागितली. त्यांनी ‘वेळ’ मागितल्याने मी जरा चिंतातुरच झालो, कारण ते बरेच गंभीर होते. ‘‘काय, धनंजय वेळ कसली मागताय, मी काय इतका परका आहे?’’ या माझ्या प्रतिक्रियेवर, ‘‘नाही संजय ‘न्यू वेव्ह पैठणी’च्या बाबतीत काही कठोर निर्णय घ्यायचे आहेत. तुम्ही सरोजचे खूप जवळचे स्नेही होता, त्यामुळे आपण भेटणे आवश्यक आहे,’’ हे धनंजय यांचे उत्तर. सरोजबाईंच्या निधनानंतर आमची दुसरी भेट. सरोजबाईंच्या पहिल्या पुण्यतिथीला त्यांच्या घरी आयोजित केलेल्या शास्त्रीय गायनाच्या वेळी आम्ही भेटलो होतो. पण आम्ही दोघे असे पहिल्यांदाच भेटत होतो. खूपच हृद्य भेट होती. दोघांच्या डोळ्यांच्या कडा ओलावलेल्या होत्या.
धनंजयांनी त्यांची प्रकृती चांगली नसल्याचे सांगत, ‘न्यू वेव्ह पैठणी’ प्रदर्शन आयोजित करण्याबाबत त्यांची असमर्थता व्यक्त केली आणि थेट मला प्रश्न केला, ‘‘संजय, हे प्रदर्शन ‘सन्निधा भिडे’ने करावे, अशी माझी इच्छा व निर्णय आहे, पण एका अटीवर! तुम्ही सन्निधाला पूर्ण मदत करणार का? जर तुमचे पाठबळ असेल तर मी ‘न्यू वेव्ह पैठणी’ प्रदर्शन भरवण्याचे सर्व हक्क तुमच्या पत्नीस, सन्निधास देऊ इच्छितो. कारण सरोजचा तुम्हा पती-पत्नीवर खूप जीव होता आणि महत्त्वाचे म्हणजे पूर्ण विश्वास होता.
मी धनंजयना विचारले की, इतर सुयोग्य व्यक्ती त्यांच्याजवळ असताना त्यांनी आम्हालाच का निवडले? ते फक्त हसले. ‘‘संजय, इतर कोणाला विचारायचे असेल, तर तुम्हाला का विचारले? तुमचा प्रचंड जनसंपर्क व सन्निधाची मेहनत या गोष्टी व तुम्हा दोघांचेही सरोजवरचे खरेखुरे प्रेम यामुळेच मी तुम्हालाच विचारले आहे. लगेच निर्णय देऊ नका. पण सरोजचे नाव तुम्ही दोघेच ‘न्यू वेव्ह पैठणी’च्या माध्यमाने जिवंत ठेवणार आहात, याची मला खात्री आहे.’’
२००५ पासून सन्निधा भिडे, माझ्या पत्नीने समर्थपणे ही जबाबदारी पेललेली असून या वर्षी पाचवे वर्ष आहे. माझ्या अल्प कुवतीनुसार धनंजयांना दिलेल्या शब्दानुसार मी सन्निधास मदत देत असतो.
इतका विश्वास माझ्यावर व सन्निधावर टाकल्यानंतर आमच्या परमस्नेही दिवंगत सरोज धनंजय यांच्या स्मृतिसाठी, आम्ही ‘न्यू वेव्ह पैठणी’ प्रदर्शनासाठी आमची नैतिक जबाबदारी, पार पाडायला नको का?
lokprabha@expressindia.com