२५ सप्टेंबर २००९

तथ्यांश
फॉरवर्ड
तथास्तु
पडघम
आठवणींच्या प्रदेशात
चहा आणि चर्चा
कव्हरस्टोरी
राजकारण
अल्केमिस्ट्री
चीनी कम
बखर संगणकाची
मेतकूट
उत्सव
नवरात्र
छंद
पर्यावरण
आपली माती
ग्लिटरिंग गिझमोज
रॉक ऑन
शॉपिंग
प्रतिक्रिया
मोहिम
चित्रदृष्टी
थरारक निसर्ग
गॉसिप
आपलं बुवा असं आहे!
वाचक प्रतिसाद
भविष्य
संपर्क
मागील अंक

पर्यावरण

गावाच्या जैवविविधतेत देवराया महत्त्वाच्या भूमिका बजावतात. गावागावातील देवांची प्रतिष्ठापना करून पूजा अर्चा करण्याची प्रथा आजही सुरू आहे. मात्र तेथील मंदिरांच्या दुरूस्तीसाठी या देवरायांवर कुऱ्हाड चालविली जात आहे. त्यामुळे देवरायाचा आधार घेत जगणाऱ्या पशुपक्ष्यांच्या नैसर्गिक अधिवासावर आक्रमण होत आहे. दुर्मिळ वनौषधीदेखील नष्ट होत आहेत.
विवेक ताम्हणकर

कोकणातील गावागावात देवराया आढळून येतात. दक्षिण कोकण अर्थात पश्चिम घाट परिसरात आपल्याला जैवविविधता पाहायला मिळते. या जैवविविधतेत देवराया महत्त्वाच्या भूमिका बजावतात. गावामध्ये संरक्षित वने असावीत, या उद्देशाने देव या संकल्पनेची जोड देत विशिष्ट भूभागावर जंगलांची जोपासना करण्यात आली. या देवरायांमधील झाडंच नव्हे तर एखादे पानदेखील तोडणे म्हणजे देवाला दुखवणे असे मानले जाऊ लागले. येथे देवाची प्रतिष्ठापना करून पूजा-अर्चा होऊ लागली. परंपरागत चाललेली ही प्रथा आजही सुरू आहे. सध्या या देवराया गावातील देवस्थान समितीच्या ताब्यात आहेत. यामुळे त्यांचे जतन आजही केले जात असले तरी गावातील
 
मंदिरांच्या दुरुस्तीसाठी देवस्थानच्या विविध कामांसाठी अत्यंत दुर्मिळ ठेवी असलेल्या या देवरायांवर कुऱ्हाड चालविली जात आहे. यामुळे भलेमोठे वृक्ष नष्ट होतच आहेत. त्याशिवाय देवरायांचा आधार घेत जगणाऱ्या जंगली पशुपक्ष्यांच्या नैसर्गिक अधिवासावर आक्रमण होत आहे. देवरायांमधील दुर्मिळ वनौषधीदेखील नष्ट होत आहेत.
देवराया म्हणजे एक प्रकारचे संग्रहालय. एखाद्या गावात जगणाऱ्या सर्व प्रकारच्या वनस्पतींची गावाजवळच्या एखाद्या पाणवठय़ाच्या परिसरात वा देवळालगतच्या जलस्रोतापाशी लागवड करून ती वाढविण्याची पूर्वी प्रथा होती. ही झाडे धार्मिक संरक्षणामुळे दाटीवाटीने वाढत. पुढे-पुढे त्यांची एक राईच तयार होत असे. ही राई कित्येक एकरांचा प्रदेश व्यापत असे. या रायांना देवराया असे संबोधण्यात आल्याने त्यातील झाडे, पाने, फुले तोडण्यास आपसूकच मनाई आली. ती आदरयुक्त, भक्तीयुक्त भीतीतून आलेली असल्याने या देवराया शेकडो वर्षे टिकून राहिल्या. परिणामत: त्या काळीही दुर्मिळ असलेल्या अनेक वनस्पती या देवरायांमध्ये आजही टिकून आहेत. यातील काही वनस्पती तर अख्ख्या महाराष्ट्रातच नव्हे तर देशातही दुर्मिळ आहेत, असे अभ्यासाअंती सिद्ध झाले आहे. या देवरायांच्या निर्मितीबाबतच्या संकल्पनांचा विचार करता, त्या काळातील जनता पर्यावरणाच्या बाबतीत कितीतरी दक्ष असल्याचे स्पष्ट होते. या देवराया केवळ वनरायांचे संरक्षण झाले असे नव्हे, तर अनेक दुर्मिळ जातीच्या पक्ष्यांचे, कीटकांचे अन् छोटय़ा-मोठय़ा प्राण्यांचेही संवर्धन झाले आहे. कुठेही सजगपणे न आढळणारे प्राणी, पक्षी या देवरायांमध्ये सहजपणे आढळतात.
देवराईतील ‘अरूपाचे रूप’ दावणाऱ्या देवतांनी काही शतके तरी निसर्गरक्षणाची जबाबदारी पार पाडली. पण गेल्या शतकातील माणसाच्या ओरबाडण्याच्या क्रियेमुळे आसपासचा निसर्ग उजाड होत गेला. कालौघात शहरीकरणाची लाट खेडय़ापाडय़ांपर्यंत पोहोचली. श्रद्धा संपल्या. ‘जुने जाऊ द्या मरणालागुनी’ असं म्हणत देवरायांवरही कुऱ्हाड कोसळली. त्यातील कित्येकांना जलसमाधीही मिळाली. त्यांचं भवितव्य अंधारलं. मात्र १९९२ च्या ‘वसुंधरा परिषदे’ने निसर्ग वाचवा अशी हाक दिली. देवरायांना त्यांचे देव पावले. जैवविविधता टिकविण्यासाठी भारतीय उपखंडात दोन मर्मस्थळं ‘हॉट स्पॉट’ घोषित झाले. पैकी एक ईशान्य हिमालय आणि दुसरा पश्चिम घाट. दोनही पर्जन्यवनाचे प्रदेश. आपल्या उशाशी असलेल्या पश्चिम घाटातील देवराया म्हणजे जैवविविधतेच्या दृष्टीने अलिबाबाच्या गुहाच. इतरत्र नष्टप्राय होत असलेल्या वनस्पतींची अखेरची विश्रामगृहं. त्यांच्या अभ्यासाचा ‘तिळा उघड’ हा संकेत डॉ. वर्तकांना १९८३ सालीच समजला होता. विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाच्या साहाय्याने देवरायांचे पथदर्शक सव्‍‌र्हेक्षण त्यांनी केलं.
भारताच्या विविध राज्यांमध्ये पन्नास हजारांहूनही अधिक देवराया आढळतात. महाराष्ट्रात काळूबाई, रानजाई, भैरोबा, म्हसोबा, सोनजाई अशा अनेक देवतांच्या नावाने त्या-त्या देवतांची जंगलातील मंदिरे व त्या भोवतालचा परिसर तेथील गावकरीच जतन करीत असतात. महाराष्ट्रात पश्चिम घाटात अनेक देवराया आढळतात. वनस्पतींची येथे कोणतीही हानी होत नसल्याने वनस्पतींच्या जमिनीवर पडलेल्या पालापाचोळ्यातही शेकडो कीटक, कवक, गांडूळांच्या जाती येथे सापडतात. कोकणातील काही देवरायांमध्ये झाडांच्या दुर्मिळ जाती आढळतात. देवरायांमुळे मातीची सुपीकता वाढते आणि जमिनीखालच्या पाण्याचे संवर्धन होत असते.
राज्यात जवळपास तीन हजार देवराया आजघडीला अस्तित्वात आहेत. त्या एका झाडापासून शंभर हेक्टरापर्यंतच्या विस्तारलेल्या आहेत. या देवरायांनी राज्यातील जवळपास पाच हजार हेक्टरहून अधिक जमीन व्यापली आहे. एक हेक्टर क्षेत्र व्यापणाऱ्या १८५०, तर शंभर हेक्टर क्षेत्रात पसरलेल्या दोन देवराया राज्यात आहेत. या देवरायांमध्ये हजारांवर जातीची झाडे आहेत.
एकटय़ा सिंधुदुर्ग जिल्ह्यात दीड हजारांवर देवराया आहेत. शिरोडय़ाजवळच्या आरवलीतील ‘कडोबा’ ही एका झाडाची देवराई आणि कोचऱ्याच्या किनाऱ्यावरील टेकडीवरची जवळपास शंभर एकरातील ‘टुंगोबा’ देवराईचा त्यात समावेश आहे. या दोन्ही प्रमुख देवरायांचे धार्मिक, सांस्कृतिक महत्त्व आज सर्वदूर प्रसिद्ध आहे. रत्नागिरी जिल्ह्यात जवळपास आठशे देवराया आहेत. शिवाय कोल्हापूर, पुणे जिल्ह्यातही अनेक देवराया अस्तित्वात आहेत. प्रथा, परंपरांनुसार या देवरायांचे आजीव संरक्षण व संवर्धन झाल्याने नष्ट झालेल्या अनेक वृक्ष प्रजाती आपल्याला आजही या देवरायांमधून सहज उपलब्ध आहेत.
सावंतवाडी तालुक्यातील आंबोलीतील सहा हेक्टरातली लिंगाची राई, कुडाळ तालुक्यातील कोचऱ्याची टुंगोबा देवराई आणि सावंतवाडी तालुक्यातल्या मडुऱ्याची वेताळाची राई या देवरायांमध्ये जैवविविधता मोठय़ा प्रमाणात आढळली आहे. या देवरायांच्या संवर्धन आणि विकासाच्या दृष्टीने जागतिक बँकेच्या सहकार्याने महाराष्ट्रात खास प्रकल्पही राबविण्यात आला होता. त्यासाठी संपूर्ण सव्‍‌र्हेक्षण व अभ्यास करून बॉम्बे नॅचरल हिस्ट्ररी सोसायटीने १९९९ च्या मार्चमध्ये वनखात्याला एक विशेष अहवालही सादर केला आहे. मात्र नंतरच्या काळात म्हणजे गेल्या वर्षांत तरी या देवरायांच्या संवर्धनासाठी आणि विकासासाठी वनखात्याने ठोस पावले उचलल्याचे आढळत नाही.
या देवरायांमध्ये अत्यंत दुर्मिळ अशा वनौषधी, विस्मृतीत गेलेल्या वृक्ष जाती, विविध प्रकारची बांडगुळे, अनेक कीटक, पक्षीही आढळले. त्याची यादीही या अहवालाद्वारे वनखात्याला सादर केली होती. जवळपास दीडशे जातीच्या औषधी वनस्पती या देवरायांमध्ये आढळल्या आहेत. यात पांढरी बांभूळ, पिसा, घोडा खुरी, शिरीष, तांदुळजा, पिवळा धोत्रा, पिवळी कोरांटी, समुद्रफळ, चारोळी, कानफुटी, मालकांगणी, पारवेल, भोकर, पुष्कळ मुळा, नागरमोथा, करंज, टेंभुर्णी, कोरंबी, विष्णुकांत, उंबर, जंगम, काकड, डिकेमाली, खडय़ानाग, धामण, मुरडशेंग, अनंतमूळ, कडूकवठ, विखारा, पेंडकुळ, मोगली, रानएरंड, मंजिष्ठा, मेंडी, अळशी, वाकेरी, बिबा, रिठा, गेळफळ, सर्पगंधा, सीताअशोक, अगस्त, काजरा, बेहडा, हिरडा, गुळवेल, काळा कुडा, बोर अशा वनस्पतींचा समावेश आहे. या तीनशेपैकी जवळपास तीस वनौषधी दुर्मिळ आहेत, तर काही नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोलीतील लिंगाची राई, कोचऱ्यातील टुंगोबा आणि मडुऱ्यातील वेतोबाच्या राईत फुलोरा येणाऱ्या ३१३ वनस्पती सापडल्या आहेत. याच देवरायांच्या क्षेत्रात साठपेक्षा अधिक जातींचे पक्षीही आढळून आले. त्यात गरुडापासून ते स्वर्गीय नर्तकापर्यंतच्या पक्ष्यांचा समावेश आहे.
मध्यंतरी साधारणत: वर्षभरापूर्वी १४ ते १५ जून २००८ ला पुण्यातील अ‍ॅलाईड एन्व्हायरन्मेंट रिसर्च फौंडेशन या संस्थेने देवरायांच्या भवितव्याबाबत चिंता व्यक्त करून रत्नागिरीत एक विशेष कार्यशाळाही आयोजित केली होती. तिला प्रतिसादही चांगला मिळाला. नव्याने चर्चाही झाली. मात्र स्थानिक पातळीवर या देवरायांच्या जतनासाठी फारसे काम होताना दिसत नाही. लागवडीसाठी जमीन उपलब्ध व्हावी, या उद्देशाने तसेच जुनी वठलेली झाडे तोडण्याच्या निमित्ताने खासगी देवरायांची तोड मोठय़ा प्रमाणात सुरूच आहे. धार्मिक बंधनाची फारशी फिकीरही होताना आढळत नसल्याने भविष्यात खासगी देवरायांबरोबरच देवस्थान समितीच्या मालकीतील व सरकारच्या ताब्यातील राना-वनांतील देवराया तुटण्याची शक्यता नाकारता येत नाही.
वेगवेगळ्या दुर्मिळ प्रजातींची जपणूक करण्यासाठी जीन बँक उघडण्याची मागणी आयुर्वेद तज्ज्ञांकडून होत असतानाच, निसर्गानेच थेट वनस्पतींच्या स्वरूपात देवरायांच्या माध्यमातून टिकविलेल्या या बँका राजरोस लुटल्या जात असतील, तर त्या जनसामान्यांनीच रोखण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
या देवरायांमुळे केवळ वनस्पतींचे संवर्धन झाले आहे, असे नव्हे, तर यातील प्रत्येक देवराई कुठे ना कुठे तरी जलस्रोताशेजारीच निर्माण झालेली असल्याने असे जवळपास तीन हजार जलस्रोत राज्यात नजरेआड झाले आहेत. एकटय़ा सिंधुदुर्गात असे दीड हजारांवर जलस्रोत या देवरायांच्या मुळाशी लपले आहेत.
कोकण हा तलावांचा प्रदेश असे वर्णन ब्रिटिशांनी कोकणात प्रवेश केल्या केल्या केले आहे. याचा अर्थ कोकणची जलव्यवस्था निव्वळ तलावांवर त्या काळी आधारलेली होती, हे स्पष्ट होते. आजमितीला सिंधुदुर्ग जिल्ह्यात साडेचार हजार तलाव अस्तित्वात असल्याच्या नोंदी सापडतात. इथल्या अनेक गावांची नावेही ‘तळे’ या शब्दाशी निगडित असल्याचे आढळते. या तलावांपैकी कित्येक तलाव आज विनावापर पडून आहेत. त्यात गाळ साचला आहे. तो काढून ते पुन्हा वापरायोग्य बनविल्यास जिल्ह्यातील पाणी समस्या कायमस्वरूपी सुटू शकते. शिवाय या दीड हजार देवरायांमध्ये लपलेले जलस्रोत मोकळे केल्यास कधी पाणीटंचाई भासण्याचा प्रश्नच उठणार नाही.

गावात कितीही जंगलतोड झाली तरी पूर्वी देवरायांचे मात्र श्रद्धेने जतन केले जात होते. आता मात्र श्रद्धा संपली आणि लोक स्वार्थासाठी देवरायांवर कुऱ्हाड चालवू लागले आहेत. देवाच्या नावाने जोपासलेल्या देवराया मंदिरांच्या दुरुस्तीसाठी, देवासंबंधी इतर कामांसाठी आदी विविध कारणे देत नष्ट करण्याचे काम सुरू आहे. सध्या पर्यावरण प्रदूषणाचा जागतिक प्रश्न निर्माण झालेला आहे. अशा स्थितीत वृक्षतोड ही प्रदूषणाच्या दृष्टीने चिंतेचा विषय बनली आहे. लोकसंस्कृती आणि पर्यावरणातील महत्त्वाचा घटक असलेली देवराई जोपासण्यासाठी सर्वच पातळ्यांवरून प्रयत्न व्हायला हवेत.
- सुरेश लोके, सामाजिक कार्यकर्ते
vivaktamhankar@gmail.com