२८ ऑगस्ट २००९
पडघम

स्वत:ला रिपब्लिकन नेते म्हणवणारे खरोखरच दलितांचे नेते म्हणवून घेण्याच्या योग्यतेचे आहेत का; हा खरा प्रश्न आता दलित समाजाने स्वत:लाच विचारायला हवा. एकेकाळी क्रांतिकारक ध्येय बाळगणाऱ्या दलित चळवळीला प्रस्थापित राजकीय पक्षांच्या दावणीला बांधणारे हे तथाकथित दलित नेते म्हणजे प्रत्यक्षात याच व्यवस्थेने निर्माण केलेली बुजगावणी आहेत. या बुजगावण्यांमुळे आपले प्रश्न सुटणार नाहीत, याचं भान जेव्हा सर्वसामान्य दलित जनतेला येईल, तेव्हाच खरं ऐक्य होईल. आणि ते ऐक्य फक्त नेत्यांचं नसेल, राष्ट्रीय समाजाचं असेल!
कीर्तिकुमार शिंदे

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि फाटाफूट हे दोन समानार्थी शब्द आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या निधनानंतर ३ ऑक्टोबर १९५७ रोजी त्यांच्या अनुयायांनी स्थापन केलेल्या या पक्षाचा संपूर्ण इतिहासच फाटाफुटींनी भरलेला आहे. दररोज ‘रिपब्लिकन’ हा शब्द असलेला एक राजकीय पक्ष (गट) स्थापन होतो आणि पुढे तो फुटतो, असं या प्रक्रियेचं वर्णन करता येईल.
पहिल्यांदा हा पक्ष फुटला तो १९५८ साली. म्हणजे पक्षस्थापनेनंतर एक वर्षांच्या आतच! तेव्हाही नेतृत्व कुणी करायचं, यावरूनच पक्ष फुटला होता. त्यातून खोब्रागडे-गायकवाड आणि कांबळे-रूपवते असे दोन गट निर्माण झाले. १९६४ मध्ये गायकवाड गटातून आर. डी. भंडारे बाहेर पडले तर १९६५ मध्ये कांबळे गटात फूट पडून रूपवते बाहेर पडले आणि गायकवाड गटाशी त्यांचे ऐक्य झाले (म्हणजे ज्यांना विरोध केला त्यांच्याकडेच गेले)! त्यानंतर आजपर्यंतचा या पक्षाचा संपूर्ण प्रवास फाटाफूट आणि ऐक्य यांनी रंगलेला आहे. वारंवार झालेल्या या फाटाफुटी व ऐक्यामुळे ‘फूट’ आणि ‘ऐक्य’ या दोन्ही शब्दांचं रिपब्लिकन चळवळीच्या संदर्भातलं गांभीर्यच नष्ट झालं आहे.

 

तरीही ‘रिडल्स ऑफ हिंदूईझम’ वादाच्या वेळी झालेलं रिपब्लिकन ऐक्य विसरता येणं कुणालाच शक्य नाही. १९८७मध्ये जेव्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या साहित्याचा चौथा खंड शासानाने प्रकाशित केला तेव्हा त्यातील ‘हिंदू धर्मातील कूटप्रश्न’ या विषयावरील बाबासाहेबांच्या मतांच्या विरोधात शिवसेना, मराठा महासंघ यांसारख्या हिंदूत्ववादी संघटनांनी जोरदार आक्षेप घेत हा भाग वगळण्याची मागणी केली होती. या मागणीसाठी शिवसेनेने मुंबईत प्रचंड मोर्चा काढला होता. या मोर्चाला उत्तर देण्यासाठी दलितांनी काढलेला मोर्चा तर महाप्रचंड होता आणि त्याची गणना महाराष्ट्रातल्या आजवरच्या सर्वात मोठय़ा मोर्चामध्ये होते! भल्याभल्यांना तेव्हा घाम फुटला होता. अशी ताकद होती रिपब्लिकन चळवळीची. त्या ताकदीपुढे अप्रत्यक्षपणे का होईना; शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनाही माघार घ्यावी लागली होती, हा इतिहास आहे. पण दुर्दैवाने या इतिहासाची जाणीव रिपब्लिकन नेत्यांनाच राहिलेली नाही. त्यावेळी ठाकरेंना आव्हान देणारा पँथर नामदेव ढसाळ आज त्यांच्या ‘सामना’ वृत्तपत्रात लेख लिहून आपले दिवस ढकलतोय! काय हा विरोधाभास?
रिपब्लिकन चळवळीतल्या नेत्यांनी एके काळी ज्या प्रस्थापित राजकीय पक्षांना आणि त्यांच्या नेतृत्वाला विरोध केला, त्याच पक्षांच्या आणि नेत्यांच्या ताटाखालची मांजर बनण्यात त्यांनी आज धन्यता मानलेली दिसते. कोणत्या पक्षाला निवडणुकीत पाठिंबा द्यायचा; हा प्रश्न नेहमीच रिपाइं नेत्यांमध्ये वाद निर्माण करत राहिलाय. १९८९मध्ये झालेलं ऐक्य १९९० मध्ये काँग्रेस आणि जनता पक्ष यांच्यापैकी कुणाशी युती करायची; यावरून फुटलं. तर १९९५ चं ऐक्य १९९७ मध्ये पक्षातल्या पदवाटपावरून फुटलं! कुणाशी युती करायची; आणि कुणाला काय पद द्यायचं, हे दोन प्रश्न रिपब्लिकन नेतृत्वाला दलितांच्या कुठल्याही प्रश्नापेक्षा अधिक महत्त्वाचे वाटत आले, आणि म्हणूनच या चळवळीला दलितांच्या जीवनात कोणतेही क्रांतिकारक परिवर्तन घडवून आणण्यात यश आलं नाही. तो सपशेल अपयशी ठरला.
या सर्व पाश्र्वभूमीवर सध्याच्या रिपब्लिकन ऐक्याच्या प्रक्रियेचा आढावा घेणं खूप उद्बोधक ठरेल. कदाचित ते राजकीयदृष्टय़ा मनोरंजकही ठरेल! पण तत्पूर्वी राज्यात सध्या किती आणि कोणते रिपब्लिकन गट अस्तित्वात आहेत, ते पाहू.
सर्वात प्रमुख गट आहे, रामदास आठवलेंचा. १९९८ मध्ये काँग्रेसमध्ये फूट पडून शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. त्यानंतर १९९९ च्या लोकसभा निवडणुकीत आठवलेंनी काँग्रेसला सोडून राष्ट्रवादीची कास धरली. (तर रा. सु. गवई आणि जोगेंद्र कवाडे यांनी मात्र काँग्रेससोबतची युती कायम ठेवली. गवई आणि कवाडे या दोघांचे रिपाइं गट स्वतंत्र आहेत.) पवारांनी तेव्हा आठवलेंना खासदार बनवलं मात्र यंदाच्या २००९ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना तिकीटच दिलं नाही. अखेर आठवलेंनी शिर्डीमधून उमेदवारी मिळवली, पण काँग्रेसकडून. त्यासाठी त्यांनी थेट दिल्लीत सोनिया गांधींनाच गाठलं! तरीही आठवले हरलेच.
गवई नेहमी काँग्रेसशी प्रामाणिक राहिले. काँग्रेस मंत्रिमंडळात मंत्री बनले. त्यानंतर त्यांना आधी बिहारचं आणि आता केरळचं राज्यपालपद बक्षीस मिळालं. आयुष्याचं सार्थक झालं! सध्या त्यांच्या गटाचं नेतृत्व त्यांचे पुत्र राजेंद्र गवई यांच्याकडे आहे. लोकसभा निवडणुकीत राजेंद्र गवईंनाही पराभवालाच सामोरं जावं लागलं.
जोगेंद्र कवाडे यांचा प्रवास दलित मुक्तिसेना ते काँग्रेस ते भाजप मित्र असा झालाय. रामटेक लोकसभा मतदारसंघाची निवडणूक ते पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या नावाखाली लढवणार होते. पण ऐनवेळी त्यांनी माघार घेतली आणि भाजपच्या उमेदवाराचा प्रचारही केला.
कवाडेंची भाची असलेल्या सुलेखा कुंभारे यांच्या गटाचं नाव बहुजन रिपब्लिकन युनायटेड होतं!/आहे? सुलेखाताईंनी लोकसभेच्या निवडणुकीसाठी थेट मातोश्री गाठलं. पण शिवसेनेत प्रवेश केल्याशिवाय उमेदवारी मिळणार नाही, असं उद्धव ठाकरेंनी सांगितल्यावर त्या नरमल्या. निवडणुकीत त्यांचाही पराभवच झाला.
हे झाले प्रमुख रिपाई गट. याशिवाय इतरही डझनावारी गट आहेतच. टी. एम. कांबळे यांचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रेटिक) आहे. रिपाईंच्या बी. सी. कांबळे गटाचं नेतृत्व त्यांच्या पत्नी आक्काताई कांबळे करताहेत! शिवाय, उपेंद्र शेंडे यांची खोब्रागडे रिपब्लिकन पार्टी आहेच. गंगाराम इंदिसेंचा युनायटेड रिपब्लिकन फ्रंट आहे. राजाराम खरातांचा स्वत:चा गट आहे. विशेष म्हणजे, ‘ऐक्यवादी रिपब्लिकन पार्टी’ नावाचाही एक स्वतंत्र गट आहे! दिलीपदादा जगताप त्याचे अध्यक्ष आहेत.
यांच्याशिवाय, शिवसेनेची चुंबनं घेणारा राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष नावाचा गटही आहेच. तानसेन ननावरे या पक्षाचे ‘राष्ट्रीय’ अध्यक्ष तर नितीन मोरे ‘राष्ट्रीय’ सरचिटणीस आहेत! शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र आणण्याचं उद्दिष्ट ते बाळगून आहेत.
वर उल्लेखलेल्या सर्व रिपब्लिकन नेत्यांचा सध्या सुरू असलेल्या ऐक्याच्या प्रक्रियेत सहभाग आहे. या संपूर्ण प्रक्रियेपासून पूर्णपणे स्वतंत्र आणि अलग राहिलेला एकमेव रिपब्लिकन नेता म्हणजे प्रकाश आंबेडकर.
भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष असलेल्या प्रकाश आंबेडकरांनी रिपब्लिकन ऐक्याला पूर्ण विरोध केलेला आहे. त्यांच्या मते, ऐक्यापेक्षाही अनेक गंभीर प्रश्न आजच्या दलित चळवळीसमोर आहेत.
ऐक्यात सहभागी न होण्याची आपली भूमिका त्यांनी लोकप्रभापुढे मांडली. ते म्हणाले, सध्याचं ऐक्य हे चळवळकंेद्रीत नसून व्यक्तिकंेद्रीत आहे. यामागे कोणतीही निश्चित भूमिका नाही. हे लोक (आठवले, कवाडे, गवई, कंभारे) निवडणुकीत हरले म्हणून त्यांना ऐक्य आठवलंय.
आठवलेंनी देऊ केलेल्या ऐक्यानंतरच्या रिपाईंच्या नेतृत्वाबाबत आंबेडकर म्हणाले, जर त्यांना पक्षच विसर्जित करायचे असतील आणि माझं नेतृत्व स्वीकारायला ते खरोखरच तयार असतील तर त्यांनी भारिप बहुजन महासंघातच विलीन व्हावं.
ऐक्यात सहभागी न होणाऱ्यांच्या सभा कार्यकर्त्यांनी उधळाव्यात, असं भावनिक आवाहन करणाऱ्या आठवलेंचा रोख आंबेडकरांकडेच होता, हे स्पष्ट आहे. पण त्यांचं हे भावनिक आवाहन रिपब्लिकन कार्यकर्त्यांसाठी ‘इमोसनल अत्याचार’ ठरेल याची जाणीव त्यांना नसावी.
आंबेडकरांबरोबरच मायावतींनाही आठवले यांनी ऐक्यात येण्याचं आवाहन केलंय. त्यासाठी बहुजन समाज पार्टीने नव्याने एकवटलेल्या रिपाईंत विलीन व्हावे असा त्यांचा उदात्त विचार आहे. मायावतींना या पक्षाचं अध्यक्षपद देता येईल, असंही त्यांनी सूचित केलंय.
पण बसपा आणि रिपाइं या दोन राजकीय पक्षांची तुलना करणंही हास्यास्पद ठरेल, इतका जमीन आस्मानाचा त्यांच्यात फरक आहे. बसपाने स्वबळावर उत्तर प्रदेशमध्ये सत्ता संपादन केलेली आहे. आणि मायावती तर थेट पंतप्रधानपदावरच दावा सांगत असताना त्यांना आपल्या(?) पक्षात येण्याचं आवाहन करून आठवले यांनी त्यांच्या ऑफर्स किती विनोदी आहेत, हेच दाखवून दिलंय. आठवलेंच्या या टाईमपास स्वभावामुळेच त्यांचं ऐक्यही तकलादूच असणार, याबाबत शंका वाटत नाही.
एक गोष्ट मात्र मान्य करायलाच हवी की रिपाइं आपल्यासोबत आहे म्हणजे आपण जातीयवादी, धर्माध नसल्याचं जणू सर्टिफिकेटच मिळाल्याचं राज्यातल्या प्रत्येक राजकीय पक्षाला वाटतं. त्यात काँग्रेस-राष्ट्रवादीप्रमाणे शिवसेना-भाजपही आलेच. आणि हेच रिपब्लिकन चळवळीचं राजकीय यश बनलं आहे. त्यांना किंमत आहे ती त्यांच्या या सर्टिफिकेटमुळेच. दुर्दैवाने आपल्या या सर्टिफिकेटची किंमत त्यांनी फार कमी करून ठेवली आहे. त्यामुळेच असेल कदाचित निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळी प्रत्येक राजकीय पक्ष स्वत:च्या ध्वजासोबत रिपब्लिकन निळा ध्वज आवर्जून लावतो. रिपब्लिकन पक्षातल्या फाटाफुटीचं हे एक महत्त्वाचं कारण आहे.
समाजाच्या भल्याचा स्वतंत्रपणे विचार करणारे प्रज्ञावान रिपब्लिकन नेते कुणालाच परवडणारे नाहीत. ताटाखालचं मांजर बनून राहणारे आणि धू म्हटलं की धुणारे सांगकामेच त्यांच्या कामाचे असतात. यातूनच निर्माण झाली रिपब्लिकन बुजगावणी! ते भीती घालतात, पण कुणालाच पिटाळून लावू शकत नाहीत. निवडणुकांतल्या जयपराजयावरही त्यांची कारकीर्द अवलंबून नसते. त्यासाठीची किंमत त्यांनी वसूल केलेली असते. दलित समाजातून नवं प्रज्ञावान नेतृत्व उदयाला येऊ नये, याची पूर्ण काळजी घेण्यासाठीची ती सुपारी असते. मूळात स्वत:च्या चुकीच्या राजकीय निर्णयांनी या रिपब्लिकन नेत्यांनी दलित समाजाचं नुकसान तर केलंच पण समाजासाठी काही करू इच्छिणाऱ्या चांगल्या कार्यकर्त्यांच्या दोन पिढय़ाच नष्ट केल्या. आजच्या ऐक्याने या नष्ट झालेल्या पिढय़ा पुन्हा उभ्या करता येतील का? या प्रश्नाचं कुणाकडेच उत्तर नाही.
इतर राजकीय पक्षांना जातीयवादी लेबलं लावणाऱ्या रिपब्लिकन नेत्यांनी कधी स्वत: आत्मपरिक्षण केलं आहे का? बौद्धांच्या पलिकडे इतर दलित-ओबीसी जातीत तरी त्यांनी कधी पक्ष नेण्याचा प्रयत्न केला का? असे प्रयत्न करण्यापासून त्यांना कुणी रोखलं होतं?
पुन्हा दुर्दैवाने या प्रश्नांचं उत्तर ‘नाही’ असंच आहे (अपवाद प्रकाश आंबेडकर आणि नामदेव ढसाळ). ज्यांनी कुणी असे प्रयत्न केले त्यांना कधी मार्क्‍सवादी तर कधी संधीसाधू म्हणत संपवण्यात आलं. त्यांना संपवण्यात जसा बाहेरच्यांचा हात आहे, तसा आतल्यांचाही आहेच. पण या गोष्टीवर सर्वाची अळीमिळी गूपचिळी असते. त्यामुळेच या ऐक्याकडून फार अपेक्षा ठेवण्यात काही अर्थ नाही. ज्या नेत्यांना कधी स्वत:चा मतदारसंघ बांधता आला नाही, त्यांच्याकडून ऐक्याचं हे ‘भीमधनुष्य’ तरी कसं बांधून होणार? त्यामुळे या नेत्यांमुळे आपले प्रश्न सुटणार नाहीत याचं भान जेव्हा सर्वसामान्य दलित जनतेला येईल, तेव्हाच खरं ऐक्य साधलं जाईल. आणि ते ऐक्य फक्त रिपब्लिकन नेत्यांचं नसेल, तर राष्ट्रीय समाजाचं असेल!

ऐक्यवादी रिपब्लिकन
रामदास आठवले यांच्या पुढाकाराने सुरू झालेल्या रिपब्लिकन पक्षाच्या ऐक्य प्रक्रियेत सहभागी झालेले विविध गट आणि त्यांचे नेते.
१. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (रामदास आठवले)
२. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (राजेंद्र गवई)
३. पीपल्स रिपब्लिकन पार्टी (जोगेंद्र कवाडे गट)
४. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रॅटिक - टी. एम. कांबळे)
५. दलित पँथर (नामदेव ढसाळ)
६. ऐक्यवादी रिपब्लिकन पार्टी (दिलीपदादा जगताप)
७. बहुजन रिपब्लिकन युनायटेड (सुलेखा कुंभारे)
८. खोब्रागडे रिपब्लिकन पार्टी (उपेंद्र शेंडे)
९. युनायटेड रिपब्लिकन फंट (गंगाराम इंदिसे)
१०. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (राजाराम खरात)
११. राष्ट्रीय रिपब्लिकन पार्टी (तानसेन ननावरे)
१२. युथ रिपब्लिकन (मनोज संसारे)
१३. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (बी. सी. कांबळे गट-
आक्काताई बापूसाहेब कांबळे)
१४. दलित कोब्रा (भाई विवेक चव्हाण)
१५. भारतीय दलित पँथर (दयाल बहादुरे)
१६. पँथर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया/बसपा (गंगाधर गाडे)
यांशिवाय लक्ष्मण माने (भटके विमुक्त संघटना), लक्ष्मण गायकवाड (भटके विमुक्त जाती जमाती संघटना), प्रा. मोतीराम राठोड (राष्ट्रीय बंजारा दल), बाळकृष्ण रेणके (भटके विमुक्त जमाती), एकनाथ आव्हाड (राष्ट्रीय मानवाधिकार संघटना) तसंच प्रफुल्ल पाटील, भागूराम कदम, व्ही. जी. गायकवाड, रविंद्र बागडे, कत्रुलाल जैन, अविनाश कुट्टी यांसारखे विविध संघटनांचे पदाधिकारीही ऐक्याच्या बैठकींना हजर होते.

रिपब्लिकन/ दलित/ पँथर/ भीम/ प्रबुद्ध!
कारणं काहीही असोत पण रिपब्लिकन चळवळीतला नेता/ कार्यकर्ता सहजासहजी हार मानत नाही. तो काही ना काही करत राहतो. कधी नेत्यांबरोबरचे वाद, तर कधी पदांचा संघर्ष यांना तो वैतागतो, पण राजकारणातनं सहजासहजी सन्यास घेत नाही. तो स्वत:चा गट काढतो. गंमतीची गोष्ट म्हणजे, स्वत:च्या गटाला नाव देताना तो विचार करतो ते रिपब्लिकन/ दलित/ पँथर/ भीम/ प्रबुध्द या आंबेडकरी चळवळीतल्या पेटंट शब्दांचाच! आजही महाराष्ट्रात दलित सेना, भिमशक्ती, प्रबुद्ध रिपब्लिकन पार्टी, बहुजन भीम पँथर, भारतीय युथ पँथर, रिपब्लिकन टायगर फोर्स, आंबेडकरवादी रिपब्लिकन पार्टी, बहुजन रिपब्लिकन पार्टी असे अनेक रिपाईं गट कार्यरत आहेत. बाबासाहेबांच्या मुंबईतल्या निवासस्थानाच्या नावावरुन ’राजगृह’ रिपब्लिकन पार्टी नावाचा गटही आहे!
shinde.kirtikumar@gmail.com