१६ जानेवारी २००९

फॉरवडर्
तथ्यांश
चहा आणि चर्चा
फुल्या@डॉट कॉम
कव्हरस्टोरी
नाते संबंध
माइंड ओव्हर मॅटर
खबर संगणकाची
मेतकूट
ग्लिटरिंग गिझमोज
चित्रदृष्टी
आपलं बुवा असं आहे!
गोसीप कोलम
उत्सव
यात्रा
फॅशन
या कानाचं त्या कानाला
छंद माझा वेगळा
साहस
पुष्पोत्सव
थरारक निसर्ग
भविष्य
वाचक प्रतिसाद

संपकर्

मागील अंक

उत्सव

सर्व जातीधर्मातील लोकांमध्ये एकोपा राहावा म्हणून भगवान बाबांनी भगवानगड उभा केला. हा प्रेरणादायी भगवानगड येथील विकासकामामुळे जागतिक नकाशावर झळकू पाहतोय. ११ जानेवारी रोजी येथे आयोजित केलेल्या सप्ताहासाठी लाखो भाविकांची रीघ लागली आहे.
संतोष मुसळे

मराठवाडा ही संतांची भूमी. याच पावनभूमीत ज्ञानदेवाचे आपेगाव, एकनाथाचे पैठण याच संत मालिकेत संत भगवानबाबांचे स्थान महत्त्वाचे आहे. भगवानबाबांनी धौम्य ऋषीच्या समाधीस्थानी श्रीक्षेत्र भगवानगड ही प्रचंड वास्तू नावारूपास आणली.
श्रीक्षेत्र भगवानगड, ता. पाथर्डी, जि. अहमदनगर कल्याण- विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्गालगत निसर्गरम्य श्रीक्षेत्र भगवानगड क्षेत्र आहे. येथे सुरू असलेल्या नियोजनपूर्वक विकासामुळे हे ठिकाण प्रमुख पर्यटनस्थळ म्हणून निश्चितच जागतिक नकाशावर झळकेल.
सुपे सावरगाव, ता. पाटोदा, जि. बीड या ठिकाणी कौतिकाबाई तुबाजी सानप पाटील यांच्या पोटी श्रावण वद्य ५ (पाच) शके १८१८ (सोमवार, दि. २९ जुलै १८९६ साली) भगवानबाबा (आबाजीचा) जन्म झाला. आईवडिलांचे आबाजी पाचवे अपत्य होते. लहानपणी आबाजी खूपच हुशार, चाणाक्ष होता. गावात चौथीपर्यंत शाळा होती. पुढील शिक्षणासाठी आईवडिलांनी मामाच्या गावी लोणी, ता. शिरूर, जि. बीड या ठिकाणी पाठवले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आबाजी पुन्हा गावाकडे परत आले. घरात धार्मिक वातावरण असल्यामुळे लहानपणापासून आबाजीला देवाची आवड होती. गावातून दरवर्षी पंढरपूरला पायी यात्रा जात असे. या बालवयातच त्यांनी पंढरपूरला दिंडीत पायी यात्रा केली.
पौंडुळ, ता. पाटोदा, जि. बीड या ठिकाणी अवडंबरच्या घराण्यात नारायण नामक मुलाचा जन्म झाला. नारायणाने गावाजवळील डोंगरमाथ्यावर जागा स्वच्छ करून हरिनाम चिंतनात दंग झाले. नंतर त्यांना नगद नारायणबाबा हे नाव पडले. त्यांची ख्याती सर्वदूर पसरली. त्या ठिकाणी छोटेसे देऊळ बांधले. विठ्ठलाची मूर्ती स्थापन केली. नंतर त्या जागेस नारायणगड हे नाम प्राप्त झाले.

 


नारायणगडाच्या गादीवर माणिकबाबा कार्यरत होते. आबाजीचे आईवडील विजयादशमी (दसरा) या दिवशी या ठिकाणी आले आणि आबाजीने माणिकबाबास गुरुपदेश द्या, असे म्हणाले. त्यावर कमी वयात गुरुपदेश देता येत नाही असे माणिकबाबा म्हणाले. आबाजीने बराच वेळा आग्रह केल्यानंतर रागावून माणिकबाबांनी तू नारायणगडाच्या शिखरावरून उडी मार असे म्हणाले. काही क्षणातच आबाजीने शिखरावरून उडी मारली, त्यांना थोडेसे खरचटले. नंतर माणिकबाबांनी आबाजीचे नाव भगवान ठेवले व त्यांना गुरुपदेश दिला.
भगवानबाबांनी आळंदीत बंकटस्वामीच्या सान्निध्यात १२ वर्षे अभ्यास केला. यात पदे, ऋचा, धन, वेद, व्याकरण, न्याय, मीमांसा, धर्मशास्त्र, नीतिशास्त्र, पुराणे, उपनिषदे, सिद्धांतकौमुदी, पंचदेशी, ब्रह्मासूत्र, गीता, रामायण, महाभारत या ग्रंथांचा अभ्यास केला. मृदंग, टाळ, वाचन, ज्ञानेश्वरी, तुकाराम गाथा मुखपाठ केले.
भगवानबाबा आळंदीवरून परत आल्यानंतर गडावर त्यांच्या भेटीसाठी पंचक्रोशीतील नागरिक येत असत. कीर्तनाच्या माध्यमातून समाजप्रबोधनाची प्रभावी दिशा दाखविली. १९१८ साली त्यांनी नारायणगड पंढरपूर पायी दिंडी चालू केली. म्हणून नारायणगडाला धाकटी पंढरी म्हणतात. १९२७ साली नाथषष्ठीनिमित्त पैठणपर्यंत दिंडी चालू केली. सात दिवस अखंड हरिनाम सप्ताहाच्या माध्यमातून भजन, कीर्तन, प्रवचन, गाथा, पारायणाच्या माध्यमातून समाजप्रबोधन व्हावे यासाठी १९३४ साली पखालडोह या ठिकाणी सप्ताह सुरू केला.
भगवानबाबांची सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक विचारांची बैठक राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांशी नाते सांगते, तेच ध्येय भगवानबाबांचे होते. ते साध्य करताना बाबांची भूमिका ही एका चिंतकाची नव्हती तर एका श्रेष्ठ कृतिशील समाजसुधारकाची होती.
माजलगाव, पाथर्डी, धारूर, केज, शेगाव यासह अनेक गावांतील पशुहत्या बंद केली. भगवानबाबांचे गुरू नारायणगडाचे सर्वेसर्वा माणिकबाबा यांचे निधन ज्येष्ठ शु. १३ शके १८५९, इ.स. १९३७ रोजी झाले. मरतेवेळेस भगवान तुझ्यावर गडाची आता सर्व जबाबदारी राहील असे सांगितले. भगवानबाबांच्या प्रेरणेने थेरला, वडझरी, बेलसूर, चिंचपूर, पिंपळनेर, कारंजवण, खोकरमोह या गावांनी हैद्राबाद मुक्तिसंग्रामात सहभाग नोंदविला होता.
भगवानबाबांची कीर्ती जशी जशी वाढू लागली तशी त्यांना समाजातील वाईट लोकांकडून त्रास द्यायला सुरुवात झाली. त्यांना मारण्यासाठी वेळोवेळी मारेकरी पाठविले. भगवानबाबांस पत्र्या ठोकण्यासाठी काही विघ्नसंतोषी लोकांनी क्रांतीसिंह नाना पाटील यांना सांगितले. ते तसे करण्यासाठी गडावर गेले असता बाबांच्या डोळ्यातील प्रामाणिकपणा, करारीबाणा, सत्यवचन, विश्वास नाना पाटलांना दिसला लगेचच नाना पाटील खाली मान घालून परत निघाले. हा डाव फसल्यानंतर समाजकंटकांनी भगवानबाबांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडविण्यासाठी प्रयत्न केले.
खरवंडीच्या बाजूलाच धौम्य ऋषीचा धौम्यगड होता. याठिकाणी बाबांनी धौम्य ऋषीच्या पादुकांचे दर्शन घेतले. नानाविध औषधी वनस्पतीयुक्त ठिकाणी आपण समाजकार्य करावे असे त्यांना वाटले. याच ठिकाणी आपण भक्तीचा गड उभा करायचा नव्या उमेदीने कामाला लागायचे. पंढरपूर, आळंदी, पैठण वारी सुरू करायची असे ठरविले.
बाबांची वृत्ती धाडसी होती त्यांनी रात्रंदिवस गडाचे काम पूर्ण केले. गडाचे पूर्ण बांधकाम लाकडाचा वापर न करता दगडांनी केलेले आहे. बांधकामाला आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांनी भरभरून मदत केली. स्त्रियांनी स्वत:चे दागिने बांधकामासाठी दिले. लोकांनी घरून स्वत:च्या भाकरी आणून अहोरात्र गडाचे बांधकाम पूर्ण केले.
पाहता पाहता गडाचे काम पूर्ण झाले, अत्यंत भव्य वस्तू उभी राहिली. अध्यात्माबरोबरच शालेय शिक्षणाची सोय व्हावी म्हणून स्वतंत्र इमारतीचा आराखडा तयार केला. पांडुरंगाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी स्वामी सहजानंद सरस्वती, ह. भ. प. मामासाहेब दांडेकर, बाळासाहेब भारदे यांना तर गडाच्या उद्घाटनासाठी मुंबई प्रांताचे तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते १ मे १९५८ रोजी उद्घाटनाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी मा. मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण बोलताना म्हणाले की, ‘‘मला जेव्हा येथे येण्याचे निमंत्रण मिळाले तेव्हा वाटले होते की, सिंहगड, प्रतापगड, रायगड, तसा हा धौम्यगड असावा. धर्म रक्षणासाठी शिवाजी महाराजांनी मावळ्यांना एकत्र करून शस्त्राच्या साह्याने धर्म रक्षण केले. परंतु भगवानबाबांनी भक्तांना एकत्र करून शास्त्राच्या आधाराने भक्तीचा गड भगवानगड उभारण्याचे काम केले आहे. आजपासून हा भगवानगड म्हणून ओळखला जावा.’’ तेव्हापासून धौम्य गडाचे नाव भगवानगड असे पडले.
कीर्तनात भगवानबाबा नेहमी सांगत, लिहिता-वाचता येणे हा मानवाचा तिसरा डोळा आहे. माणूस असल्याची ओळख आहे. तुमची ऐपत नसेल तर एकाच वेळी जेवा, परंतु मुलांना चांगले शिक्षण द्या. शिक्षण नसेल तर घराच्याबाहेर पडल्यावर कोणीही तुमची फसवणूक करेल. विद्या वाघिणीचे दूध कष्टकरी कामकरी यांच्या मुलांना मिळाले पाहिजे. याच उद्दात हेतूने गडावर भगवान विद्यालयाची कोनशिला बसविली. वाडय़ा, पाडय़ा, तांडय़ावरील मुले या ठिकाणी शिक्षणासाठी येत असत. खोल्यांच्या व पाण्याच्या अडचणीमुळे बाबांनी विद्यालय खरवंडी याठिकाणी हलविले. औरंगाबादला वसतिगृहाचे उद्घाटन तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या हस्ते केले. औरंगाबादलाच भगवान होमिओपॅथी कॉलेजची स्थापना केली.
सोमवार, दि. १८ जानेवारी १९६५ रोजी रात्री एक वाजता वयाच्या ६९ व्या वर्षी जगाचा निरोप घेतला.
समाजाला ज्ञानरूपी प्रकाश देणारे.. समाजाचे चंद्रसूर्य समजले जाणारे.. प्रबोधनाचा महामेरु.. भक्तिरसाचा सागर.. मायेचा पाझर.. पंढरीचा अखंड वारकरी.. तुळशीच्या माळेने क्रांतीची ज्योत पेटविणारे.. परोपकारी.. भक्तीचा गड उभारणारे.. भजन-कीर्तन, प्रवचनाची गंगा.. शुद्ध आचरणाचा पितामह.. स्नेहप्रेमाचे सम्राट.. अशा भगवानबाबांना शेवटचा निरोप देण्यासाठी गावोगावची भजनी मंडळी, दिंडय़ा, टाळ, पखवाज घेऊन आली होती. जनसागर जणू शोकसागर वाटत होता. बाबांचे कार्ये अलौकिक होते. समाजात झालेले वैचारिक प्रदूषणे बाबांनी कमी केले होते.
भगवानबाबांनी १९३४ साली पखालडोह येथे वार्षिक हरिनाम सप्ताहाची सुरुवात केली होती. प्रत्येक वर्षी नवीन गावाला सप्ताहाचे नारळ दिले जाते. दरम्यान भगवान गडावर १८ एप्रिल ते २५ एप्रिल २००८ दरम्यान अमृत महोत्सव राष्ट्रीय पातळीवरचा अखंड हरिनाम सप्ताह झाला. भगवानबाबांनी सुरू केलेल्या नारळी सप्ताहास यावर्षी ७५ वर्षे पूर्ण होणार असल्यामुळे या ठिकाणी ७५ हजारांपेक्षा जास्त भक्त ज्ञानेश्वरी पारायणास बसले होते. शेवटच्या पंगतीत भक्तांना पुरणपोळी व दूध दिले गेले. सप्ताहादरम्यान ह. भ. प. रामराव महाराज ढोक यांचे रामायण, काकडा आरती, गाथाभजन, कीर्तन, प्रवचन, चक्री प्रवचन, भारूड, रात्रजागर आयोजित केला आहे.
डॉ. नामदेवशास्त्री गडाच्या विकासासाठी अंदाजे तीन कोटीचे महाद्वार, साडेचार कोटीचा सभामंडप, दोन कोटीचे स्वयंपाकघर बांधणार आहेत. सद्यपरिस्थितीत महाद्वाराचे काम प्रगतिपथावर आहे. महाद्वाराची उंची ६० फूट राहील. दोन लाखांपेक्षा जास्त पुस्तके समावतील असे भव्य वाचनालय, गडाच्या पायथ्याशी वातानुकूलित अतिथी निवास, भक्तनिवास, भगवानबाबांनी उपयोगात आणलेल्या वस्तूंचे भव्य म्युझिअम (संग्रहालय), रेसिडेंशियल इंग्लिश शाळा, गडाच्या पायथ्याशी देवस्थानच्या १६ एकर जागेत हेलिपॅडची सुविधा अनेक नवनवीन योजना राबवून भगवानगड म्हणजे चांगले निसर्गरम्य पर्यटनस्थळ म्हणून देशाच्या नकाशावर झळकेल. भगवानगडावर अध्यात्मासोबत विज्ञानाची सांगड घातलेली दिसेल. या ठिकाणी सौरदिवे न पवनउर्जेतून विद्युतनिर्मिती केली जाते.
यावर्षी श्री क्षेत्र भगवानगड येथे महाराष्ट्राच्या विविध कानाकोपऱ्यांतून एक लाखाहून अधिक भक्तगण दसऱ्याच्या दिवशी आले होते. येथे अनोळखी माणसे एकमेकांना दसऱ्याच्या शुभेच्छा देताना दिसतात. येथील दसऱ्यास ७५ वर्षांपेक्षा जास्त परंपरा लाभलेली आहे. येथील वैशिष्टय़ म्हणजे राज्यातून येणाऱ्या भाविकांसाठी जेवणाची व्यवस्था केलेली असते. मोठय़ा प्रमाणावर लोक एकत्र आल्यामुळे एकमेकांविषयी आपुलकी स्नेहभावना जोपासली जाते.
भगवानबाबांनी दसरा साजरा करण्यामागे खेडय़ापाडय़ातील नागरिकांनी एकत्र येऊन एकमेकांच्या सुखदु:खाची विचारणा करावी हा उद्देश होता. आजही मोठय़ा उत्साहात व एका आगळ्यावेगळ्या पद्धतीने दसरा उत्सव साजरा केला जातो.
दसऱ्याला या ठिकाणी गुरुपदेश घेण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांतून मोठय़ा प्रमाणात भक्तगण येतात. भगवानबाबांची दिंडी महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी दींडी आहे. ही दिंडी बाबांच्या पादुकांसमवेत घेऊन भारजवाडी, खरवंडी, पाटोदा, भुम, कुर्दुवाडी मार्गे जाते. वाखरी येथे संत ज्ञानेश्वरांच्या दींडीला आडवी जाण्याचा मान आहे.
शुद्ध एकादशीला गडावर भजन, कीर्तनाचा कार्यक्रम होतो. भगवानगडाच्या गादीवरील महंत कीर्तन करत नाहीत. या दिवशी एक लाखावर भाविक येतात. या सर्वासाठी चहा-फराळाची उत्तम सोय केलेली असते. गडावर १२ महिने २४ तास अन्नदानाचा कार्यक्रम सुरू असतो.
जाण्याचा मार्ग : मुंबई-पुणे नगरवरून पाथर्डीमार्गे भगवानगड, औरंगाबाद, पैठण मार्गे किंवा गेवराई पाडळ सिंगी मार्गे गडावर पोहोचता येते.
भगवानगडाविषयी अधिक माहितीसाठी इंटरनेटवर Bhagwanbaba.Com ही वेबसाईट आहे.
lokprabha.magazine@gmail.com