१६ जानेवारी २००९

फॉरवडर्
तथ्यांश
चहा आणि चर्चा
फुल्या@डॉट कॉम
कव्हरस्टोरी
नाते संबंध
माइंड ओव्हर मॅटर
खबर संगणकाची
मेतकूट
ग्लिटरिंग गिझमोज
चित्रदृष्टी
आपलं बुवा असं आहे!
गोसीप कोलम
उत्सव
यात्रा
फॅशन
या कानाचं त्या कानाला
छंद माझा वेगळा
साहस
पुष्पोत्सव
थरारक निसर्ग
भविष्य
वाचक प्रतिसाद

संपकर्

मागील अंक

छंद माझा वेगळा

गाडय़ांवर स्पेशल व्हीआयपी नंबर असण्याची क्रेझ दिवसेंदिवस वाढत आहे. अशा स्पेशल नंबरचे संकलन करण्याचा छंद जोपासणारे रवींद्र लाड यांनी आतापर्यंत ५०० हून अधिक ‘स्पेशल नंबर’ आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात बंदिस्त केलेले आहेत.
जगदीश भोवड


रस्त्यावरून पळणाऱ्या गाडय़ांना असलेले ‘स्पेशल नंबर’ आपण नेहमीच पाहतो. या स्पेशल नंबरवाल्या गाडीतून प्रवास करणारी व्यक्तीही स्पेशलच असणार असेही आपल्याला वाटते. लोकांना असे वाटावे म्हणूनही काही लोक या स्पेशल नंबरच्या मागे लागलेले असतात आणि त्यासाठी काही हजार ते अगदी लाखो रुपये खर्च करण्यासाठीही ते तयार असतात. लोकांची ही आवड लक्षात घेऊन सरकारही आपली ‘गंगाजळी’ वाढविण्यासाठी या स्पेशल नंबरसाठी ‘स्पेशल फी’ आकारते.
रवींद्र लाड ही असामी मात्र यासंबंधी एक वेगळाच छंद जोपासत आहे. अशा स्पेशल नंबरचे, व्हीआयपी नंबरचे संकलन करण्याचा छंद त्यांना जडलेला असून अजूनपर्यंत त्यांनी ५०० हून अधिक ‘स्पेशल नंबर’ आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात बंदिस्त केलेले आहेत. या वेगळ्या छंदाविषयी सांगताना ते म्हणाले, ‘साधारण वर्षभरापूर्वी मी काम करीत असलेले ऑफिस मुंबईहून नवी मुंबईतील महापे येथे स्थलांतरित झाले. त्यामुळे माझा लोकलऐवजी रस्त्यावरून जाणाऱ्या गाडय़ांतून प्रवास सुरू झाला आणि तिथूनच माझ्या या छंदाचाही प्रवास सुरू झाला. कधी ठाणे-बेलापूर मार्गे तर कधी डोंबिवली-शिळफाटामार्गे असा दररोज प्रवास सुरू झाला. ऑफिसच्या गाडीतून जाताना पुढे-मागे हे जादुई नंबर दिसू लागले. अर्थात इतरांना वाटते तसे मलाही त्याचे आधी कुतूहल वाटायचे. असेच एकदा ऑफिसला जात असताना आमची गाडी सिग्नलला थांबली असताना समोरच्या गाडीचा ५५५ हा ठळकपणे लिहिलेला नंबर दिसला. माझ्या डोक्यात लगेच चमकून गेले की अरे हा नंबर तर शाहरुख खानचा आहे. मध्यंतरी मी टीव्हीवर एका कार्यक्रमात ऐकले होते की शाहरुखच्या सगळ्या गाडय़ांचा नंबर ५५५ असाच असतो. मला फोटोग्राफीची तशी बऱ्यापैकी आवड आहे. सहज म्हणून मी लगेच मोबाईलच्या कॅमेऱ्यात तो नंबर बंदिस्त केला. नंतर इकडे-तिकडे कुठे कुठे फिरताना असे स्पेशल नंबर्स बरेच दिसू लागले. कधीकधी तेही मी मोबाईलच्या कॅमेऱ्यात बंदिस्त केले. माझ्या मोबाईलला ३ मेगापिक्सेलचा सायबरशॉट कॅमेरा असल्याने फोटोही चांगले येत होते. ते मी मित्रांना दाखवू लागलो. त्यांनाही त्याचे कौतुक वाटू लागले. मग हे असले नंबर जमा करण्याचे मला वेडच लागले. हळूहळू संकलन वाढत गेले. मित्रांनीही प्रोत्साहन दिले आणि मदतही केली.’’

 


लाड यांच्या संकलनात असेही अनेक नंबर आहेत की त्यातून काहीतरी ‘शब्द’ प्रतीत होतात. उदा. काही ठिकाणी ४१४१ हा आकडा इंग्रजीतून अशा प्रकारे लिहिलेला असतो की त्यातून मराठीतील ‘दादा’ असे अक्षर वाटते. तसेच ४७४७ या इंग्रजी आकडय़ानेही ‘दादा’ अक्षर तयार होते. १२१२ या इंग्रजी आकडय़ातून इंग्रजी ‘आरआर’, २१४ या आकडय़ातून ‘राम’. तसेच राज (२१५१), पवार (४९१२), अमर (३७४२), बॉस (८०५५), नाना ‘७१७१’ अशी इंग्रजी आकडय़ांतून मराठीची अनोखी संगती साधलेले नंबरही त्यांच्या निदर्शनास आले आहेत, पण त्यांच्या हाती अजून ते लागलेले नाहीत. आज ना उद्या तेही आपल्या संकलनात असतील याची त्यांना खात्री आहे. या अनोख्या नंबरांतील अक्षरांबरोबरच कुणातरी व्यक्तीवरील ‘निष्ठा’ही प्रतीत होतात. उदा. राज, पवार, दादा, मराठा हे नंबर! ही नावे कदाचित त्यांची स्वत:चीही असू शकतात. तसे असेल तर त्यांना आपल्या नावाविषयीचा सार्थ अभिमानही त्यातून ध्वनित करावयाचा असेल, असे लक्षात आले.
पूर्ण सिरीजचे नंबरही त्यांना मिळालेले आहेत. त्यात ११११, २२२२, ३३३३, ४४४४, ५५५५, ६६६६, ७७७७, ८८८८, ९९९९ या नंबर्सचा समावेश आहे. १२३, १२३४, ४५६७, ६७८९ असे क्रमाने येणारे व लक्ष वेधून घेणारे नंबरही त्यांच्या कलेक्शनमध्ये आहेतच, शिवाय १०००, २०००, ३०००, ४०००, ५०००, ६०००, ७०००, ८०००, ९००० असे खास नंबरही आहेत. १०१० २०२० ३०३० ४०४० ५०५०, ६०६० किंवा १०२०, २०३०, ४०५०, ५०६० अशा श्रेणींचेही नंबर्स त्यांनी मिळवले आहेत. एका दुचाकी स्वाराचा नंबरही लक्षवेधक आहे. कारण त्या नंबरमधून ‘श्रीराम’ असे अक्षर ध्वनित होते. १२१४ या इंग्रजी नंबरामागे श्र आणि वेलांटीचा मेळ जमवून ‘श्रीराम’ अक्षर ध्वनित करून मर्यादा पुरुषोत्तम आणि हिंदुत्वाविषयीची प्रखर निष्ठा त्यातून घडवली असावी.
जेम्स बॉण्डचा ००७ नंबरही लाड यांच्याकडे आहे. त्याचप्रमाणे १०१, १२५, १५१, २५१, ५०१, १००१ असे काही हिदूंमध्ये पवित्र समजले जाणारे व ७८६ हा मुस्लिमांमध्ये पवित्र समजला जाणारा नंबरही त्यांच्या कलेक्शनमध्ये आहे. ४२० सारखा टिंगलबाज नंबरही त्यांनी मिळवला आहे. काही नंबर्सना बऱ्याच प्रमाणात मागणी असावी. उदा. ४१४१ हा नंबर तर त्यांना खूप प्रमाणात आढळला आहे.
हे नंबर टिपताना कुणी हटकत नाही, असे विचारता ते म्हणतात, ‘‘हो, असे बऱ्याचदा घडते. काही वेळा तर उगीचच भानगड नको म्हणून मी काही नंबर सोडूनही दिलेले आहेत. पण अशा प्रसंगांची आपल्याला तयारी ठेवावी लागते. माझे नंबरचे कलेक्शन वाढविण्यात माझ्या काही मित्रांचीही चांगलीच मदत मला होते. किरीट गोरे, नीलेश वेंगुर्लेकर, दिलीप पंडित, सिद्धिविनायक भडसावळे हे माझे मित्रही असे नंबर टिपून माझ्या संग्रहात नेहमी भर घालत असतात. एवढेच नव्हे तर मी ज्या सुमो गाडीतून ये-जा करतो त्याचे ड्रायव्हरही त्यांच्या दृष्टीस एखादा नंबर पडला तर मला सजग करतात. पृथ्वी नावाचा ड्रायव्हर मागून-पुढून येणाऱ्या अशा नंबरवाल्या गाडीची आगाऊ सूचना देत असे. मग मी कॅमेरा सरसावून तो नंबर टिपत असे. कधी वेगात गाडी पुढे निघून गेली तर आपल्या गाडीचाही वेग वाढवून सावज योग्य त्या टप्प्यात आणून देत असे.’’
आताशा अशा जम्पिंग, स्पेशल, व्हीआयपी नंबरची फार मोठी क्रेझच आलेली आहे. एक वर्षांपूर्वी म्हणजे १२ डिसेंबर २००७ रोजी राज्यपालांच्या सहीने एक अध्यादेशच काढण्यात आलेला आहे. या अध्यादेशानुसार अशा नंबर्ससाठी काही फी आकारण्यात आलेली आहे. अर्थात पूर्वीसुद्धा अशी फी आकारली जायची; परंतु ती कमी असायची. आता मात्र केवळ एक लकी आकडा हवा असेल तर तब्बल १ लाख रुपये मोजावे लागतात. दोन आकडे हवे असतील तर २५ हजार व ९, ९९, १११, २२२, ३३३, ४४४, ५५५ असे काही स्पेशल व्हीआयपी आकडे हवे असतील तर ५० हजार रुपये मोजावे लागतात. कधी कधी आपल्याला हवा असलेला आकडा मिळत नाही, तो दुसऱ्या कोणाला तरी देऊन झालेला असतो. असा ‘आवडता’ आकडा टू व्हिलरचाही घेता येतो. असा आकडा फोर व्हीलरला हवा असेल तर तब्बल तीन लाख रुपये खर्च करावे लागतात. लक्ष्मीपुत्र हा खर्च अगदी हसत हसत करतात.
न्यूमरॉलॉजी म्हणजे आकडेशास्त्राचे फॅड आपल्याकडे आल्यानंतर तर या स्पेशल आणि व्हीआयपी नंबरची मागणी खूपच वाढलेली आहे, असे ‘आरटीओ’तील सूत्रांनी सांगितले. महाराष्ट्रात अशा नंबरचे अधिकृत रेट ठरलेले असताना महाराष्ट्राबाहेरच्या काही राज्यांमध्ये मात्र स्पेशल नंबरसाठी लिलाव पुकारला जातो.
अशी ही स्पेशल नंबरची, व्हीआयपी नंबरची क्रेझ दिवसेंदिवस वाढत असताना रवींद्र लाड यांच्यासारखी काही छांदिष्ट माणसे मात्र आपला वेगळाच छंद जोपासत आहेत.
lokprabha.magazine@gmail.com