|
|
कव्हर स्टोरी
त्याला मनाची होणारी स्वत:ची तडफड थांबवता येत नव्हती. ही तडफड कोणाकडे व्यक्तही करता येत नव्हती. कुठल्यातरी भयंकर सापळ्यात अडकल्यासारखं.. बहिणीचे फ्रॉक्स, तिच्या ओढण्या, तिच्या बांगडय़ा त्याला आवडायच्या. बिल्डिंगमधल्या मुलींशी खेळायला आवडायचं. त्यांच्या बाहुल्यांशी खेळताना काही वेगळं करतोय आपण असं वाटायचं नाही. वयाच्या नेमक्या कोणत्या वर्षी ही जाणीव झाली त्यालाही माहीत नाही. पण त्याचं मित्रांसोबत न खेळणं, असं मुलींसारखं वागणं, त्यांच्यात रमणं, बहिणीचे कपडे घालून स्वत:ला आरशात निरखणं हे पाहून त्याच्या आईला मात्र टेन्शन यायला लागलं. मग त्याला जबरदस्ती मुलांमध्ये खेळायला पाठवणं, तो खाली मुलांच्यामध्ये रमतोय की नाही हे वर गॅलरीत उभं राहून निरखणं, मुलांसोबत खेळणं त्याला नकोसं वाटायला लागलं की तो तिथून निघून जाऊ नये यासाठी त्याला दटावणं, थोडक्यात त्याने नॉर्मल मुलांसारखं वागावं यासाठी त्याची आई प्रयत्न करायला लागली. पण त्या मुलांमध्ये खेळताना त्याची घुसमट व्हायची. मुलांच्या मते तो बायकी होता. तो मुलींसोबत खेळायचा हे काही लपून राहिलेलं नव्हतं. त्यामुळे त्याला मुलं चिडवायची. या सगळ्यातून त्याच्या वाटय़ाला फक्त घुसमट येत होती. आणि मग काही मुलांकडून आलेले दुर्दैवी अनुभव. पौगंडावस्थेमध्ये सेम सेक्सकडे आकर्षित होणं, पुन्हा हेही सांगता न येणं.. या सगळ्या गोष्टींनी त्याच्या वाटय़ाला फक्त घुसमट दिली. कोणी समजून घेत नसल्याची घुसमट, आपल्याच बाबतीत असं का होतंय हे कळत नसल्याची घुसमट, यातून उपाय काय हे कळत नसल्याची घुसमट, अनेकांच्या तिरस्कारपूर्ण, हेटाळणीच्या नजरांना तोंड द्यावं लागण्याची घुसमट, शरीर पुरुषाचं आणि जाणिवा स्त्रीच्या अशा विचित्रपणामध्ये अडकल्याची घुसमट.. खूप गुंतागुंत झाली त्याच्या आयुष्याची. |
|
मथितार्थ
राजकारण्यांचा अर्क अन् संसदेतील चित्र !
सुमारे महिन्याभरापूर्वीच ममता बॅनर्जीसंदर्भातील एक व्यंगचित्र इ-मेल वरून प्रसृत केल्याबद्दल एका प्राध्यापकावर थेट देशद्रोहाचाच खटला भरण्याची धमकी पश्चिम बंगाल पोलिसांनी दिली आणि तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी तर त्याला चोपही दिला. या घटनेला महिना उलटतो न उलटतो तोच आता राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भात १९४९ साली प्रसिद्ध झालेल्या व्यंगचित्रावरून संसदेतच गदारोळ झाला आणि त्यापाठोपाठ केंद्र सरकारने अर्थात सरकारच्या वतीने मनुष्यबळ विकास मंत्री कपिल सिब्बल यांनी तात्काळ माफीही मागितली. एवढय़ावरच हा प्रश्न सुटणार असता तर तसेही नव्हते. त्यानंतर राजकारण्यांशी संबंधित सर्वच व्यंगचित्रे वगळण्याची मागणीही झाली. त्याला सर्वपक्षीय पाठिंबाही मिळाला. म्हणजे यापुढे क्रमिक पुस्तकांमधून राजकारण्यांशी संबंधित व्यंगचित्रे, अर्कचित्रे दिसणार नाहीत.. वरवर पाहता या दोन्ही घटना तशा साध्या वाटू शकतात. पण वस्तुस्थिती तशी नाही. या दोन्ही घटनांकडे खोलात जाऊन पाहण्याची व समजून घेण्याची गरज आहे.
|
|
गुंता मनाचा
साडेतीन महिन्यांपूर्वी, २५ जानेवारी रोजी पुण्यात एस.टी. बस दुर्घटना घडली. त्यात बसचालक संतोष माने याने विरुद्ध दिशेने बस चालवून अनेक वाहने ठोकरली, त्यात अनेकांना जीव गमवावा लागला. त्यामुळे संपूर्ण शहरभर भीती आणि असुरक्षिततेचं सावट पसरलं. नंतरचे आठ-दहा दिवस बसचालक माने हा मनोरुग्ण आहे की नाही, तो स्किझोफ्रेनियाचा रुग्ण आहे का, एस.टी. व्यवस्थेतील त्रुटी, याबद्दलच्या चर्चा झाल्या. आता ती घटनासुद्धा लोक विसरून गेले. उलटय़ा दिशेने किंवा वेगाने वाहन चालवणाऱ्या व्यक्तींना नंतर संतोष माने म्हणून संबोधणं आणि चेष्टामस्करी करत हसणं, अशा गोष्टी नंतरच्या काही दिवसांमध्ये पाहायला मिळाल्या. समाज मानसिक आजारी व्यक्तीकडे कशा दृष्टीने पाहतो, हे समजण्यासाठी या गोष्टी पुरेशा बोलक्या आहेत. मानसिक आजार आणि आरोग्याबाबत अजूनही भारतीय समाजाचा पुरेसा सकारात्मक आणि वास्तव दृष्टिकोन तयार झालेला नाही. मानसिक आजार आणि आजारी व्यक्ती यांच्याबद्दलचे अनेक गैरसमज समाजात मूळ धरून आहेत. |
|
नुलकरच्या गोष्टी
बोटांनी आपल्याच तळहाताला स्पर्श करीत त्याच चेतना पुन्हा जागविण्याचा निष्फळ प्रयत्न श्रीने करून पाहिला, पण ती अनुभूती मिळेना. आठवणींच्या कप्प्यात खोलवर जाणून-उमजून दडविलेले क्षण आज एवढय़ा वर्षांनी का आठवतायत श्रीला कळेना. झोप लागण्याचा प्रयत्न करण्याचं सोडून जे जे आठवतंय ते या अंधारात एकटय़ाने का होईना पुन:प्रत्ययाचा आनंद घेण्याचं श्रीने ठरवलं. बिर्ला कॉलेजातील अकरावीचं वर्ष हा हा म्हणता सरत होतं. अॅन्युअल जवळ येत होतं. बऱ्याच स्पर्धा, एकांकिकांची धावपळ चालू होती. प्रत्येक स्पध्रेत भाग घेण्याची इच्छा होती, पण हिम्मत नव्हती. एव्हाना वर्गातील ग्रुप छान जमला होता. एके दिवशी सीनिअरमधील जयेश यांच्या वर्गात आला. एकांकिका करणार का विचारलं, कोण कोण काम करू इच्छितात म्हटल्यावर श्रीकांतनेही हात वर केला. तालमीला सुरुवात झाली. जयेश सेकंड बी.ए.ला शिकणारा हँडसम तरुण, कॉलेजमधील बऱ्याच पोरींचा हीरो. गेली चार वष्रे स्पध्रेत नाटकं करणारा, आठवी-दहावीतच व्यावसायिक बालनाटय़ाचा अनुभव असलेला रंगकर्मी. वादविवाद, मोनो अॅक्टिंग बऱ्याच स्पर्धामधील हमखास विजेता. रमेश पवारांची कोणती तरी धमाल एकांकिका आणलेली. श्रीचा रोल जयेश त्याला सेकंड लीड म्हणत असे. तालमीदरम्यान जयेशची अन् श्रीची एकदा वाजली, पण तेवढय़ापुरतीच. एकांकिका झाली. संध्याकाळी रिझल्ट अनाऊन्स झाला. पंधरा एकांकिकेतून यांची एकांकिका फायनलसाठी पात्र झालेली. पुढच्या आठवडय़ात फायनल आणि अॅन्युअल नाइटला प्राइज डिस्ट्रिब्युशन. आता या वेळी जयेशने आणखीनच मेहनत घेतली. |
|
दुर्गाच्या देशा
महाराष्ट्राला ७२० किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे. या समुद्रकिनाऱ्याच्या अंगानेच आमच्याकडे इतिहासात जलदुर्ग संस्कृती निर्माण झाली. महाराष्ट्राच्या किनारी असे शंभरएक जलदुर्ग आजही त्या समुद्राच्या लाटांशी गुजगोष्टी करत उभे आहेत. यातील काही ऐन समुद्रात, काही किनाऱ्यावर पाण्यात पाय बुडवून, तर काही काठालगतच्या एखाद्या डोंगर-टेकडीवर ठाण मांडून बसले आहेत. या माळेतील एक छोटेखानी रत्न - पूर्णगड!
रत्नागिरीच्या पूर्व दिशेला समुद्रात समांतर अशी एक वाट गेलेली आहे. भाटय़ेची खाडी, पावस, गणपतीगुळे अशा या वाटेवरचा शेवटचा थांबा, पूर्णगड! या वाटेवरील पावसला अनेक पर्यटक-भाविक जात असतात. रत्नागिरी ते पावस अंतर २० किलोमीटर, तर त्यापुढे १० किलोमीटरवर पूर्णगड! या पूर्णगडासाठी रत्नागिरी किंवा पावसहून बस, रिक्षा मिळतात. खरेतर रत्नागिरीहून स्वतंत्र रिक्षा करूनच निघाल्यास भाटय़ेचा किनारा, पावस, गणपतीगुळे आणि पूर्णगड अशी चारही स्थळे पाहता येतात. पूर्णगड हे अगदी छोटेखानी गाव. गावाच्या पूर्वेला मुचकुंदी नदी आणि तिची पूर्णगड नावाची खाडी. रत्नागिरीहून निघालेली ही वाट या खाडीवरील पुलावरून पुढे राजापूर तालुक्यात शिरते. |
|
|
|